निकालपत्र :- (दि.28/06/2011) ( सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला वकीलांमार्फत सदर मंचापुढे उपस्थित राहिले. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्तीवाद ऐकणेत आला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी :- तक्रारदार हे कोल्हापूर येथील रहिवाशी आहेत. सामनेवाला क्र.1 श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स लि. यांची कोल्हापूर येथील शाखा असून सामनेवाला क्र. 2 ते 4 सदर फायनान्सचे जाबबदार अधिकारी आहेत. सामनेवाला क्र.5 सदर फायनान्सची ग्रुप कंपनी आहे. यातील तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.4 विजय देसाई यांचेमार्फत ट्रक नं.MH-09-L-3308 हा खरेदी करणेचे ठरवले. सदर विजय देसाई यांचे व्यावसाईक संबंधीत इसम राजेंद्र रंगराव यादव, जावेद अमिरचॉंद खान, ईलाही आबालाल मुजावर व रमजान सुलेमान परांडे यांचेबरोबर तक्रारदार यांनी वर नमुद ट्रकचे खरेदीबाबत बोलणी केली. दि.13/03/2010 रोजी सदरचा ट्रक सामनेवाला क्र.4 विजय देसाई यांचेकरवी विक्री करणेचे अभिवचन ईलाही मुजावर यांनी तक्रारदार यांना दिले. सदर ट्रकवर रक्कम रु.3,75,000/- चे फायनान्सचे कर्ज असलेचे सांगून कर्जासह ट्रान्सफर करणेचे सांगितले होते. सदर ट्रक तक्रारदार यांनी रक्कम रु.4,80,000/- इतक्या रक्कमेस खरेदी करणेचे होते. त्यामुळे तकारदार यांनी रक्कम रु.1,05,000/- रोख स्वरुपात देणेचे ठरले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी दि.13/03/2010 रोजी ईलाही जमादार यांचेकडे रोख रक्कम रु.11,001/- कोल्हापूर येथे दिले. त्यानंतर दि.18/3/2010 रोजी सामनेवाला क्र.4 यांचे सांगणेप्रमाणे तक्रारदार यांनी जावेद अमिरचॉंद खान यांचे बाराईमाम दर्ग्यामागे, कोल्हापूर या राहते घरी रक्कम रु.35,000/- रोख दिले. त्यावेळी सामनेवाला क्र.4 याने तक्रारदार यांना फायनान्सचे सगळे काम करुन देणेची खात्री दिली. तक्रारदार आपल्या तक्रारीत पुढे सांगतात, दि.22/03/2010 रोजी तक्रारदार यांना सदर ट्रक सामनेवाला क्र.4 यांचे वर नमुद इसमांनी कोल्हापूर येथे ताबेत दिला. सामनेवाला क्र.4 याने व्हा.प्रेसिडेंट पाटीलसाहेब व मॅनेजर जोशी यांचे व माझे देणे घेणे असते ते करुन गाडीची कागदपत्रे पूर्ण करुन देतो असे तक्रारदारास सांगितले. तक्रारदार यांनी नसीर पेंटर यांचेकडे सदर ट्रकचे कलरिंग करणेकरिता रक्कम रु.9,500/- इतका खर्च केला. वीर ऑटो इलेक्ट्रीकल्स यांचेकडून सदर ट्रकचे संबंधी केले खर्चकेलेबाबत कॅश मेमो नंबर 11769 दि.04/04/2010 रक्क्म रु.3,375/- खर्च केला. तेंडूलकर टायर्स यांचेकडून सदर ट्रकचे टायर्ससाठी रक्कम रु.16,500/- खर्च झाले. जमादार मोटार गॅरेज यांचेकडून गाडीचे ग्रिसींग वगैरेकरिता रु.1,950/- इतका खर्च झाला. शाहिद अटो इलेक्ट्रीशियन यांचे बील रक्कम रु.4,580/- सदर ट्रकसंबंधी खर्च झाला. प्रतिक शेती अवजारे यांना रक्कम रु.2,870/- चेस वेल्डिंग वगैरेकरिता देणे भाग पडले. लक्ष्मण गॅरेज यांचे केबीन दुरुस्तीकरिता रक्कम रु.6,255/- इतके बील झाले व साई एंटरप्राईजेस यांचे सदर गाडीचे बॅटरीकरिता रु.6,500/- इतके बील झाले. एप्रिल-2010 मध्ये सामनेवाला क्र.4 यांना तक्रारदार यांनी फायनान्स शाखा कोल्हापूर मॅनेजर स्वामी यांचेकडून सदर ट्रक वॉंटेड असलेचे समजलेचे सांगितले. तेव्हा सामनेवाला क्र.4 यांनी तक्रारदार यांना गोकुळ हॉटेल कोल्हापूर येथे ब्रॅन्च् मॅनेजर स्वामी यांचे नावाने शिव्या देऊन 15 दिवसांत टोटल काम करुन देतो, व मीच कोल्हापूर येथे ब्रॅन्च मॅनेजर होणार आहे. घाबरु नका, फायनान्समध्ये असे घडतेच, तुम्हाला अडचण होत नाही असा दिलासा दिला. दि.02/04/2010 रोजी तक्रारदार यांनी बँक ऑफ इंडिया, शाखा मिरज येथील त्यांचे खाते क्र.10626 वरुन रक्कम रु.50,000/- सामनेवाला क्र.4 यांचे सांगणेप्रमाणे रमजान परांडे यांचेकडे दिली. त्यांनतर गाडीचे पासिंगसाठी रक्कम रु.2,500/- टॅक्स भरणेसाठी रु.20,000/- रोख दिले. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.4 विजय देसाई यांना त्यांचे सांगणेप्रमाणे वेळोवेळी रक्कम रु.1,058,000/- इतकी रक्कम रोख स्वरुपात दिली होती व आहे. सामनेवाला क्र.4 यांनी तक्रारदारास दि.07/05/2010 रोजी सामनेवाला क्र.1 यांचेकडून ट्रकची एन.ओ.सी. दिलेली आहे. त्यामुळे सदर आर.टी.ओ. यांनी दिलेल्या एन.ओ.सी.मुळे तक्रारदार हे सदर ट्रकचे मालक झालेले आहेत. त्यांनतर तक्रारदार यांनी आर.टी.ओ. सांगली यांचेकडे दि.03/08/2010 रोजी सदर ट्रकचा टॅक्स भरलेला आहे. तसेच दि.25/04/2010 रोजी गाडीचे फिटनेस सर्टीफिकेट फॉर्म नं.38 तक्रारदाराकडे आहे. तसेच सामनेवाला क्र.4 यांचे एन.ओ.सी.चे आधारे तक्रारदार यांना माल वाहतूक परवाना नंबर एमएच-10/1144/10 मिळालेला आहे. सदर ट्रकचे दुरुस्तीनंतर सामनेवाला क्र.4 यांचे सांगणेप्रमाणे दि.28/04/10 रोजी कोल्हापूर शाखेतील नोकर विरेंद्र याने सदर ट्रकसोबत तक्रारदार यांचे फोटो काढून नेलेले होते व आहेत. त्यानंतर सदर ट्रकचे मूळ मालक इक्बाल अबुबकर डांगे यांचे दि.03/05/2010रोजीचे नोटराइज्ड अफिडेव्हीट दिले होते व आहे. मात्र सदर इक्बाल डांगे सुमारे 8 ते 9 महिन्यांपूर्वी सौदी अरेबिया येथे नोकरीस आहे. त्यामुळे सदरचे नोटराईज्ड अफिडेव्हीट तोतया इसम उभा करुन केलेचे तक्रारदार यांना समजून आले आहे. तक्रारदार यांनी सदर ट्रककरिता अंदाजे रु.2,50,00/- इतका खर्च केला आहे. तक्रारदार यांनी एन.ओ.सी.चे आधारे ट्रकचे आर.सी.टी.सी.वर मालक नोंद करुन घेतले आहे. तक्रारदार यांनी दि.09/05/2010 रोजी कागल शाहू साखर कारखान्याकडून साखर घेऊन राजेश गुडस ट्रान्सपोर्ट यांचे भाडे घेतले होते. पंरतु सामनेवाला क्र.5 यांनी दि.10/05/2010 रोजी तक्रारदार यांचे ताब्यातून सदर ट्रक बेकायदेशीररित्या ताबेत घेतलेला आहे. सामनेवालांचे गैरकृत्यामुळे व फसवणूकीमुळे त्यांचे विरोधात मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, मिरज यांचे कोर्टात कि.क्रि.अर्ज नं.199/2010 दाखल केलेला असून त्याकामी मे. कोर्टांन सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असलेचा उल्लेख करुन क्रि.प्रो.को.कलम 156(3)प्रमाणे आदेश दिलेले आहेत. सबब सर्व सामनेवाला यांनी संगनमत करुन तक्रारदाराची फसवणूक केलेने सदरची तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदार यांना ट्रक नं.MH-09-L-3308 सामनेवाला यांचेकडून देवविणेचा आदेश व्हावा तसेच ट्रककरिता दिलेली रक्कम रु.1,05,000/-,गाडी खर्च रु.76,800/-,रु.3,000/- प्रत्येक दिवशी प्रमाणे दि.10/5/10 पासूनची गाडी भाडेपटीची रक्कम रु.4,29,000/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,00,000/-,व्यावसायिक अप्रतिष्ठेपोटी रु.50,000/-, असे एकूण रक्कम रु.7,60,000/-व त्यावर द.सा.द.शे.18 टक्के व्याज देणेचा हुकूम व्हावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (6) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टीप्रित्यर्थ मे.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, मिरज,यांचेकडील क्रि. कि. अर्ज. 199/10 ची प्रत, सामनेवाला क्र.1 यांचेकडून दिलेले नो ऑब्जेक्शन, गुडस कॅरेज परमिट, ट्रक नं.MH-09-L-3308 ची आर.सी.टी.सी, सांगली येथील R.T.O. यांची टॅक्स पावती व फॉर्म नं.38, सामनेवाला यांनी दिलेले इन्व्हेन्टरी लेटर, सामनेवाला यांचे नोटीस अफिडेव्हीट, तक्रारदार यांचे नोटरी अफिडेव्हीट, प्रतिक शेती औजारे यांचे बील, लक्ष्मण गॅरेज यांचे बील, राजेश गुडस ट्रान्सपोर्टचे बील, नसीर पेंटर यांचे बील, साई एंटरप्राईजेस यांचे बील, ट्रकचा फोटो 16, 16 (1) ते 16(4), वीर ऑटो इलेक्ट्रीशयनचे बील, जमादार मोटार गॅरेजचे बील, तेंडूलकर टायर्सचे बील इत्यादी कागदपत्रे जोडलेली आहेत. तसेच दि.19/10/2010 रोजी R.T.O. सांगली यांचे पत्र दाखल केले आहे.तसेच दि.03/03/2011 रोजी आर.टी.ओ. सांगली यांचेकडील कागदपत्रे फॉर्म नं.28, 29, 30, सामनेवाला यांनी दिलेला नो ऑब्जेक्शन दाखला, वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट, सामनेवाला यांनी दिलेला मूळ मालक श्री डांगे यांचे नोटरीकागद, वाहनासाठी झाले खर्चाची बीले, दिलीप मोरे यांचे पोलीसांपुढील जबाब, सामनेवाला क्र.4 यांचा जबाब, विरेंद्र पडवळ यांचा जबाब, गाडीचे 3 फोटो इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (7) सामनेवाला क्र.1 ते 5 यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार परिच्छेद निहाय नाकारलेली आहे. सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, तक्रारदाराने सदरची तक्रार सामनेवाला यांना नाहक त्रास देण्याचे हेतूने व सुडबुध्दीने दाखल केलेली आहे. तक्रार अर्जातील कलम 1 मधील मजकूर सर्वसामान्यपणे सामनेवाला यांना मान्य व कबूल आहे. तक्रार अर्ज कलम 2 व 3 तसेच 5 ते 10, 12 ते 16 मधील मजकूराबाबत तक्रारदार यांनी सबळ पुरावा देण्याचे आव्हान सदर सामनेवाला करतात. तक्रार अर्ज कलम 4 मध्ये सामनेवाला क्र.2 श्री भालचंद्र मलगोंडा पाटील, प्रेसिडेंट श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी यांच्यावर बिनबुडाचे आरोप केलेले आहेत. वस्तुस्थिती पाहता श्री पाटील यांनी कोणासही कोणत्याही प्रकारचे अधिकार व बेकायदेशीर कृत्य करण्याचे कधीही सांगितलेले नाही. तसेच सामनेवाला क्र.3 श्री महेश जोशी यांचेवरसुध्दा भलले सलते आरोप केले आहेत सदरचे आरोप सामनेवाला यांना मान्य व कबूल नाहीत. सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, तक्रार अर्ज कलम 11 मध्ये नमुद केल्याप्रमाणे मिरज येथील मे.प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टातील क्रिमिनल केस नं.199/2010 चा उल्लेख केला आहे. परंतु सदर सामनेवाला यांना आजअखेर कोणत्याही प्रकारचे नोटीस आलेली नाही व यातील सामनेवाला यांना 156(3) फौजदारी दंड संहिता अन्वये जरी मिरज येथील मे.प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारीसो यांनी कोणताही आदेश केला असला तरी सामनेवाला यांचेविरुध्द गुन्हा शाबीत झालेला नाही. तक्रारदाराने त्यांचे नांवे सदर वाहन झाल्याबद्दल व एच.पी. कंटीन्युएशन व आर.सी.बुक दाखल केले आहे. सदर दोन्ही हजर केलेल्या कागदपत्रांना सामनेवाला श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी यांनी आपली फिर्याद कोल्हापूर येथे दाखल केलेली आहे व तसेच न्यायालयीन मार्गाचादेखील अवलंब केलेला आहे. सामनेवाला कंपनीचे कर्ज न फेडता तसेच लोन टर्मिनेशन न करता यातील तक्रारदार यांनी सदरचे वाहन आपल्या नांवे करुन घेणेचा कट रचून सदर ट्रक आपले नांवे हस्तांतरीत केलेला आहे. याबद्दल सखोल चौकशी व गुन्हेगाराविरुध्द गुन्हा शाबीत होईपर्यंत वस्तुस्थिती व तक्रारदाराने दाखल केलेले बोगस कागदपत्रांचे अवलोकन करुन प्रस्तुत सामनेवाला यांचेविरुध्द कोणतेही कायदेशीर आदेश पारीत करणे चुकीचे होईल. वस्तुस्थिती अशी आहे की, ट्रक नं.MH-09-L-3308 हे वाहन सामनेवाला कंपनीकडे इकबाल अबुबकर डांगे रा. मनोली, मुसलमान वाडी, ता.शाहूवाडी जि.कोल्हापूर यांच्या नांवे सदर वाहनाची नोंद आहे. त्यांनी सामनेवाला कंपनीकडून कर्ज मागणी करुन व लिखीत अटी व शर्ती मान्य करुन रक्कम रु.5,78,594/- इतके कर्ज घेऊन सदर वाहन तारण ठेवून कंपनीस करार क्र.STFCKLPR0902270011 लिहून दिलेला आहे व त्याची कराराची मुदत दि.05/02/2013 पर्यंत आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारास कल्पना देऊनही तक्रारदाराने इकबाल अबुबकर डांगे यांचेबरोबर संगनमत करुन बेकायदेशीररित्या ट्रक नं.MH-09-L-3308 स्वत:चे नांवे करुन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सामनेवाला क्र.5 यांनी सदरचे वाहन रितसर कंपनीच्या कराराप्रमाणे व ठरलेल्या नियमावलीप्रमाणे ताब्यात घेऊन तसे रितसर पार्किंग करुन व सिझींग करुन ठेवले आहे व त्याबाबत इकबाल डांगे यांना रितसर कळविण्यात आले होते. तसेच त्यांना हाती नोटीस बजावण्यास सामनेवाला कंपनीतर्फे अधिकारी गेले असता सदर डांगे मिळून आले नाहीत. त्याप्रमाणे फिल्ड ऑफिसर यांनी त्यात्या नोटीसवर इंडॉसमेंट नमुद केली आहे. श्री डांगे यांनी मुराद अब्दुल रहिमान लांडगे यांना हाताशी धरुन सदर बेकायदेशीर कृत्य केलेले आहे. तसेच सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 2 अन्वये चालण्यास पात्र नाही. तसेच यातील सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देण्याबद्दल कोणताही करार झालेला नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये कोणत्याही प्रकारचे सेवेत त्रुटी ठेवली नसलेने प्रस्तुत सामनेवाला क्र. 1 ते 5 यांना तक्रारदाराची तक्रार मान्य व कबूल नाही. सबब तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (9) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ करारपत्र क्र.STFCKLPR0902270011, श्री पी.आर.पाटील यांचे वटमुखत्यार इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (10) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्हणणे दाखल कागदपत्रे उभय पक्षकारांच्या वकीलांचा अंतिम युक्तीवाद इत्यादीचे साकल्याने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. अ) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या कर्जकरारपत्राप्रमाणे ट्रक क्र. MH-09-L-3308 टाटा एलपीटी 1613 साठी इक्बाल अबुबकर डांगे यास रक्कम रु.3,42,000/- इतका कर्ज पुरवठा केलेचे दिसून येते. सदर कर्जप्रकरणासाठी रमजान सुलेमान परांडे व विशाल चंद्रकांत स्वामी हे दोन जामीनदार आहेत. प्रस्तुत ट्रकबाबतची तक्रार अब्दुलरहेमान लांडगे यांनी दाखल केलेली आहे. प्रस्तुत वाहनाचे कर्ज थकीत गेलेने नमुद वाहनाचा मूळ मालक तक्रारदार तसेच अन्य व्यक्तींनी सदर ट्रकच्या खरेदीबाबत परस्पर व्यवहार केलेला आहे व सदरच्या ट्रकवर असणारे कर्ज तक्रारदाराने घेणेचे ठरवून त्याप्रमाणे नमुद ट्रक तक्रारदाराचे नांवे हस्तांतर करणेबाबत तक्रार नसलेचे सामनेवाला यांचे कर्मचा-यांनी सहीशिक्क्यानिशी दि.07/05/2010 रोजी आर.टी.ओ. ऑफिसला पत्र दिलेले आहे. याव्यतिरिक्त प्रस्तुत कर्ज हस्तांतर अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा व्यवहार तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये झालेला नाही ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तसेच प्रस्तुत व्यवहारासंदर्भात विजय देसाई यांना वेळोवेळी रक्कम रु.1,05,000/- दिलेचे प्रतिपादन तक्रारदाराने केले आहे. मात्र त्याबाबतच्या कोणत्याही प्रकारच्या पावत्या नसलेचे तक्रारदाराचे वकीलांनी मान्य केलेले आहे. तक्रारदार हा सामनेवाला यांचा कर्जदार नाही. सामनेवालांचे तत्कालीन ब्रॅन्च मॅनेजर यांनी फ्रॉड करुन प्रस्तुतचे कृत्य केल्याने सामनेवाला कंपनी त्यास जबाबदार नाही असे सामनेवालांचे वकीलांनी युक्तीवादाच्या वेळेस प्रतिपादन केलेले आहे. नमुद वाहनाचा मूळ मालक इक्बाल डांगे हा परदेशात आहे. तसेच नोटराईज्ड अग्रीमेंटवर विजय देसाईची सही नाही. नमुद वाहनाची एन.ओ.सी. व ताबा तक्रारदारास सामनेवाला कंपनीचे नमुद कर्मचारी यांनी दिलेला आहे. प्रस्तुत संपूर्ण व्यवहार फ्रॉडचा असलेने सामनेवाला यांनी तक्रारदार तसेच मूळ मालक व नमुद कर्जाचे जामीनदार परांडे तसेच अन्य मस्जीद डांगे यांचेविरुध्द शाहूपुरी पोलीस स्टेशन कोल्हापूर येथे दि.10/02/2011 रोजी गुन्हा नोंद केलेला आहे. नमुद परांडे यांना पोलीस कोठडी दिलेचे आदेश प्रस्तुत प्रकरणी दाखल आहे. ब) नमुद तक्रारदाराचे ताब्यात असलेले वाहन वाशी येथून दि.10/05/2010 रोजी ताब्यात घेतलेने तक्रारदाराने मिरज पोलीस स्टेशन येथे सामनेवाला कंपनी तसेच त्यांचे कर्मचारी, जामीनदार श्री परांडे, एजंट इत्यादी वयक्तीविरुध्द भा.द.वि.स.कलम 420, 406, 467,468, 471, 34 प्रमाणे फसवणूकीचा गुन्हा दाखल केलेला आहे. क) सामनेवाला व तक्रारदार यांनी परस्पर विरोधी फौजदारी गुन्हे दाखल केलेले आहेत. तक्रारीचे स्वरुप व व्यवहाराची गुंतागुंत पाहता ग्राहक संरक्षण कायदयाच्या तरतुदींचा विचार करता (समरी प्रोसिडींग) संक्षिप्त पध्दतीमध्ये प्रस्तुतची तक्रार निर्णित करता येणार नाही. सबब प्रस्तुतची तक्रार चालणेस पात्र नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच तक्रारदार त्यांचे इच्छेनुसार योग्य त्या ऑथॉरिटीपुढे दाद मागू शकेल व त्यासाठी प्रस्तुत तक्रारीसंदर्भात व्यतीत झालेला कालावधी मुदतमाफीसाठी ग्राहय राहील या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार काढून टाकण्यात येते. 2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |