जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १७/२०१३ तक्रार दाखल दिनांक – १८/०३/२०१३
तक्रार निकाली दिनांक – १३/११/२०१४
जितेंद्रसिंग गुलझारसिग गिरासे. (राजपूत)
उ.व ४७ धंदा नोकरी व शेती.
रा.३० सुखसागर सोसायटी गोकर्ण हौसींग
सोसायटी जवळ देवपुर मु.पो.ता.जि. धुळे
मो.नं. ९४०३०८९८०४ . तक्रारदार
विरुध्द
१. म.व्यवस्थापक सो.
व्हर्लफुल ऑफ इंडिया लि.
जि.ऑफिस प्लॉट नं.अे.४
एम आय डि सी. रांझणगाव
ता.शिरूर जि. पुणे ४१९२०४
२. प्रोपा. व्यवस्थापक सो.
श्री. भागवत सोनगीरे उ.व. सज्ञान
निशा इलेकट्रॉनिक्स जयहिंद टॉवर ३० जयहिंद चौक
देवपुर धुळे ४२४००२ . सामनेवाला
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
(मा.सदस्या – सौ.के.एस.जगपती)
उपस्थिती
(तक्रारदारातर्फे – अॅड.श्री.एस.एन. राजपूत)
(सामनेवाला क्र.१ तर्फे – अॅड.श्री.राजेश अग्रवाल)
(सामनेवाला क्र.२ तर्फे – अॅड.श्री.व्ही.एस.भट)
निकालपत्र
(दवाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
१. सामनेवाले यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आणि सदोष वॉटर प्युरीफायर यंत्र बदलून दिले नाही, या कारणावरून तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांचे म्हणणे आहे की, त्यांनी सामनेवाले क्र.१ यांनी उत्पादित केलेले वॉटर प्युरीफायर यंत्र दि.०८/०२/२०१२ रोजी सामनेवाले क्र.२ यांच्याकडून खरेदी केले होते. मात्र हे यंत्र दोन महिनेही सुरळीत चालले नाही. त्याबाबत तक्रारदार यांनी वेळोवेळी सामनेवाले क्र.१ व २ यांच्याकडे तक्रारी करूनही सामनेवाले यांनी ते समाधानकारक दुरूस्त करून दिले नाही किंवा बदलून दिले नाही. तक्रारदार यांनी घेतलेले यंत्र सध्या बंद अवस्थेत असून त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे तक्रारदार यांना विनाकारण त्याची किंमत भरावी लागली आणि मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. सामनेवाले यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे, असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदार यांचे यंत्र बदलून द्यावे किंवा त्यांची किंमत रूपये १४,०००/- परत करावी, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रूपये २५,०००/- भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
३. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत वॉटर प्युरीफायर खरेदीचे बिल, वॉरंटी कार्ड, सामनेवाले यांच्याकडे केलेल्या तक्रारींचा तपशील, सामनेवाले यांना वकिलामार्फत पाठविलेली नोटीस, सामनेवाले यांना नोटीस मिळाल्याच्या पावत्या, यंत्राचे छायाचित्र आदी दाखल केले आहे.
४. सामनेवाले क्र.१ यांनी हजर होवून खुलासा दाखल केला. त्यात म्हटले आहे की, या मंचाला तक्रारदार यांच्या तक्रारीवर न्यायनिवाडा करण्याचे अधिकारक्षेत्र नाही. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना वेळोवेळी सेवा दिली आहे. त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार खोटी आहे. तक्रारदार यांच्याकडील यंत्र दि.११/०४/२०१२, दि.२९/०६/२०१२ आणि दि.१९/०१/२०१३ असे तीन वेळा दुरूस्त करून त्यातील सदोष भाग बदलून देण्यात आला आहे. यंत्राची वॉरंटी संपल्यानंतर त्यानंतरच्या दुरूस्तीची आणि सेवा देण्याची जबाबदारी सामनेवाले यांची येत नाही. तरीही सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदार यांना सेवा दिली आहे. जे भाग वॉरंटी कालावधीत येत नाही ते बदलून देण्याचा तक्रारदार आग्रह धरीत आहे. ही बाब कंपनीसाठी शक्य नाही. दि.०९/०२/२०१३ रोजी कंपनीचा अभियंता तक्रारदार यांच्याकडे यंत्र तपासणीसाठी गेला असता तक्रारदार यांनी त्याच्याकडून यंत्र तपासणी करवून घेण्यास नकार दिला. त्यामुळे या प्रकरणात सामनेवाले क्र.१ यांची कोणतीही त्रुटी येत नाही. या खुलाशासोबत सामनेवाले क्र.१ यांचे अधिकारी मुझ्झमील खान अजीज यांचे शपथपत्र दाखल करण्यात आले आहे.
५. सामनेवाले क्र.२ यांनी हजर होवून खुलासा दाखल केला. त्यात म्हटले आहे की, तक्रारदार यांची तक्रार वाद या संज्ञेत येत नाही. तक्रारदार यांनी तक्रारीत आवश्यक पक्षकारांना सामील केले नाही. त्यामुळे सदरची तक्रार प्रथपदर्शनीच रद्द करण्यात यावी. त्यांनी खुलाशात पुढे असेही म्हटले आहे की, सामनेवाले क्र.२ हे सामनेवाले क्र.१ यांनी उत्पादित आणि निर्मित केलेल्या घरगुती वस्तूंची विक्री आणि त्यानंतरची सेवा देण्याचे काम करतात. सामनेवाले क्र.२ यांनी सदर वस्तूची निर्मिती केलेली नाही. तक्रारदार यांनी वेळोवेळी केलेल्या तक्रारीचे निराकरण सामनेवाले क्र.२ यांनी केले आहे. त्यामुळे सामनेवाले क्र.२ यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. तक्रारदार यांची तक्रार रद्द करावी अशी मागणी सामनेवाले क्र.२ यांनी केली आहे. या खुलाशासोबत सामनेवाले क्र.२ यांच्यातर्फे भागवत नरहर सोनगिरे यांचे शपथपत्र दाखल करण्यात आले आहे.
६. तक्रारदार यांची तक्रार, त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले यांचा खुलासा आणि तक्रारदार यांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद पाहता आमच्यासमोर निष्कर्षासाठी पुढील मुद्दे उपस्थित होतात.
. मुद्दे निष्कर्ष
- तक्रारदार हे सामनेवाले क्र.१ व २ यांचे ग्राहक
आहेत काय ? होय
ब. सामनेवाले क्र.१ यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा
अवलंब केला आहे काय ? होय
- आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
७.मुद्दा ‘अ’- तक्रारदार यांनी दि.८/०२/२०१२ रोजी सामनेवाले क्र.२ यांच्याकडून व्हर्लपुल कंपनीचे आर.ओ. वॉटर प्युरीफायर खरेदी केले. त्यासाठी तक्रारदार यांनी रूपये १४,०००/- एवढी रक्कम सामनेवाले क्र.२ यांना रोखीने दिली. याबाबातचे सामनेवाले क्र.२ यांच्या दुकानाचे म्हणजेच निशा इलेक्ट्रानिक्स या नावाचे बिल तक्रारदार यांनी दाखल केले आहे. तक्रारदार यांनी खरेदी केलेले वॉटर प्युरीफायर यंत्र सामनेवाले क्र.१ म्हणजेच व्हर्लपुल कंपनीने उत्पादित केले आहे. त्याचा मॉडेल क्र.११७७८ असा असून सिरियल क्र. केआरए १०४९३११६२३ असा आहे. सामनेवाले क्र.२ यांनी दिलेल्या बिलावर वरील बाबींची नोंद आहे. तक्रारदार यांनी हे बिल दाखल केले असून त्यावर तक्रारदार यांचेच नाव आहे. सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार ग्राहक या संज्ञेत येत नसल्याचे आपल्या खुलाशात म्हटले असले तरी तक्रारदार यांनी दाखल केलेल्या बिलावरून ते सामनेवाले क्र.१ व २ यांचे ग्राहक आहेत हे सिध्द होते. म्हणून आम्ही मुद्दा ‘अ’ चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
८.मुद्दा ‘ब’ – तक्रारदार यांनी दि.०८/०२/२०१२ रोजी सामनेवाले क्र.१ यांनी उत्पादित केलेले वॉटर प्युरीफायर यंत्र सामनेवाले क्र.२ यांच्याकडून खरेदी केले. हे यंत्र खरेदी केल्यापासून जेमतेम दोन महिने सुरळीत चालले असेल. त्यानंतर ते नादुरूस्त झाले आणि व्यवस्थितपणे चालले नाही असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. एप्रिल २०१२ पासून हे यंत्र बंद अवस्थेत आहे असेही त्यांनी म्हटले आहे. दि.०३/११/२०१२ पर्यंत त्यासंदर्भात अनेकदा तक्रारी करूनही सामनेवाले क्र.१ व २ यांनी त्याची समाधानकारकपणे दुरूस्ती करून दिली नाही असे तक्रारदार यांनी म्हटले आहे.
तक्रारदार यांनी यंत्राचे वॉरंटीकार्ड तक्रारीसोबत दाखल केले आहे. त्यात सदर यंत्राची एक वर्षापर्यंत वॉरंटी राहील असे नमूद करण्यात आले आहे. याच कलमात पुढीलप्रमाणे विधान करण्यात आले आहे.
WOIL’s obligation under the warranty shall be limited to remove the defect & make the product functional by repair or replace of a defective part with a functional part in respect of the said Water Purifier product within one year from the date of original purchase and which on WOIL’s examination discloses to its satisfaction to be defective.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत सामनेवाले क्र.१ व सामनेवाले क्र.२ यांच्याकडे वेळोवेळी केलेल्या तक्रारींचा तारीखनिहाय तपशील दाखल केला आहे. त्यात तक्रारदार यांनी दि.११/०४/२०१२ च्या पूर्वीपासून दि.०९/०१/२०१३ पर्यंत तब्बल ३९ वेळा तक्रारी नोंदविल्याचे दिसत आहे.
सामनेवाले क्र.१ यांनी आपल्या खुलाशात तक्रारदार यांच्या तक्रारींची दखल घेवून दि.११/०४/२०१२, दि.२९/०६/२०१२ आणि दि.१९/०१/२०१३ रोजी त्यांच्याकडील यंत्राची दुरूस्ती करून सदोष भाग बदलण्यात आल्याचे नमूद केले आहे. सामनेवाले क्र.१ यांनी असेही नमूद केले आहे की, दि.०९/०२/२०१३ रोजी सामनेवाले यांचा अभियंता तक्रारदार यांच्याकडे यंत्र तपासणीसाठी गेला तेव्हा तक्रारदार यांनी यंत्राची तपासणी करवून घेण्यास नकार दिला. दि.११/१२/२०१२ रोजी तक्रारदार यांची नोटीस मिळाल्यानंतर दि.१३/१२/२०१२ रोजी सामनेवाले यांच्या कर्मचा-याने तक्रारदार यांच्या घरी जावून त्यांच्या यंत्राची विनामूल्य दुरूस्ती आणि एल.पी.एस. नावाचा भाग तिस-यांदा बदलून दिला.
तक्रारदार यांनी दाखल केलेले वॉरंटीकार्ड आणि तक्रारींबाबतचा तपशील तसेच सामनेवाले क्र.१ यांनी दाखल केलेला खुलासा याचे मंचाने बारकाईने अवलोकन केले. त्यावेळी मंचाच्या असे निदर्शनास आले की तक्रारदार यांनी दि.०८/०२/२०१२ रोजी वॉटर प्युरीफायर यंत्राची खरेदी केली. त्यानंतर दि.११/०४/२०१२ च्या पूर्वीपासून दि.०९/०१/२०१३ पर्यंत तब्बल ३९ वेळेस त्यांनी सामनेवाले यांच्याकडे तक्रारी नोंदविल्या. दरम्यानच्या काळत सामनेवाले क्र.१ यांच्या खुलाशानुसार दि.११/०४/२०१२, दि.२९/०६/२०१२ आणि दि.१९/०१/२०१३ या तारखांना तीन वेळा तक्रारदार यांच्या यंत्राची दुरूस्ती करण्यात आली. दि.१३/१२/२०१२ रोजीही तक्रारदार यांच्या यंत्राची दुरूस्ती करण्यात आली असे समनेवाले क्र.१ यांनी नमूद केले आहे. सामनवाले क्र.१ यांच्या म्हणण्यानुसार चार वेळा यंत्राची दुरूस्ती करण्यात आली आणि तीन वेळा त्याचे काही भाग बदलावे लागले. सामनेवाले क्र.१ यांनी यंत्राची दुरूस्ती करण्यापूर्वी आणि केल्यानंतरही तक्रारदार यांची तक्रार कायम होती हे त्यांनी दाखल केलेल्या तपशीलावरून दिसून येते.
तक्रारदार यांनी यंत्र खरेदी केल्यानंतर लगेच म्हणजे दोन महिन्याच्या आतच ते सदोष असल्याचे निर्दशनास आले. तेव्हापासून तब्बल ३९ वेळेस त्यांनी त्याबाबत सामनेवाले क्र.१ व २ यांच्याकडे तक्रार दिली. सामनेवाले क्र.१ यांच्या कथनानुसार त्यांनी चारवेळा तक्रारदार यांच्याकडील यंत्र दुरूस्त करून दिले आणि त्यातील काही भाग तीन वेळा बदलावे लागले. यावरून ही बाब स्पष्ट होते की, सामनेवाले क्र.१ यांनी चारवेळा यंत्राची दुरूस्ती करूनही आणि तीन वेळा त्यातील भाग बदलूनही यंत्रातील दोष दूर झाला नाही. सामनेवाले क्र.१ यांनी आपल्या खुलाशात ज्या तारखांना यंत्राची दूरूस्ती करण्यात आली त्या तारखांचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र त्यांनी दुरूस्तीबाबतच्या नोंदी किंवा कागदपत्रे दाखल केलेली नाही. सामनेवाले क्र.१ यांनी ज्या तारखांना यंत्राची दुरूस्ती केली त्यानंतरही तक्रारदार यांची तक्रार कायम होती हे तक्रारदार यांनी दाखल केलेल्या तपशीलावरून स्पष्ट होते.
सामनेवाले क्र.१ यांनी वॉटर प्युरीफायर यंत्राची चारवेळा दुरूस्ती केली असतांनांही त्यातील दोष दूर होवू शकला नाही. यावरून सदरचे यंत्र सदोष आहे हे सिध्द होते. असे सदोष यंत्र बदलून देण्याची मागणी तक्रारदार यांनी केली होती आणि ती रास्त होती असे आम्हाला वाटते. तक्रारदार यांना सदोष यंत्र बदलून न देवून सामनेवाले क्र.१ यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे असे आमचे मत आहे. म्हणूनच मुद्दा ‘ब’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
११.मुद्दा ‘क’ – वरील विवेचनाचा विचार करता सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदार यांचे वॉटर प्युरीफायर यंत्र बदलून देण्याबाबत अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे हे स्पष्ट होते. सदर तक्रारीत सामनेवाले क्र.२ यांच्याकडूनही तक्रारदार यांनी भरपाई मागितली आहे. तथापि, तक्रारदार यांनी खरेदी केलेले व्हर्लपुल कंपनीचे आर.ओ. वॉटर प्युरीफायर यंत्र हे सामनेवाले क्र.१ यांनी उत्पादित केले आहे. सामनेवाले क्र.२ हे स्वतः त्या यंत्राचे उत्पादक किंवा निर्माते नाहीत. सामनेवाले क्र.१ यांनी उत्पादित केलेल्या घरगुती वस्तू विक्री करणे आणि विक्रीनंतरची सेवा देणे एवढीच सिमित जबाबदारी त्यांची आहे. त्यामुळे सदर प्रकरणात सामनेवाले क्र.२ यांना जबाबादार धरता येणार नाही आणि त्यांच्याकडून तक्रारदार यांना भरपाई देता येणार नाही असे आमचे मत बनले आहे. सामनेवाले क्र.१ यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याने तक्रारदार यांच्याकडील यंत्र त्यांना बदलून मिळायला हवे आणि त्याचबरोबर मानसिक व शारीरिक त्रासापोटी भरपाई मिळायला हवी या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. म्हणून आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२. सामनेवाले क्र.१ यांनी या निकालाच्या प्राप्तीपासून तीस दिवसांच्या आत तक्रारदार यांना त्यांनी खरेदी केलेल्या मॉडेलचेच आर.ओ. वॉटर प्युरीफायर यंत्र बदलून द्यावे.
किंवा
यंत्राची खरेदी किंमत रूपये १४,०००/- परत करावी.
३. सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदार यांना मानसिक व शारीरिक त्रासापोटी भरपाई रूपये २,०००/- द्यावी.
४. सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदार यांना आर.ओ. वॉटर प्युरीफायर यंत्र बदलून दिल्यानंतर किंवा रोख रक्कम रूपये १४,०००/- परत केल्यानंतर तक्रारदार यांनी जुने नादुरूस्त यंत्र सामनेवाले क्र.१ यांना परत करावे.
५. उपरोक्त आदेश क्र.२ ची मुदतीत पुर्तता न केल्यास त्यानंतर संपूर्ण रक्कम देवूनहोईपर्यंत द.सा.द.शे. ६ टक्के व्याज देण्यास सामनेवाले क्र.१ जबाबदार राहतील.
६. सामनेवाले क्र.२ यांच्याविरूध्द कोणतेही आदेश नाही.
धुळे.
-
(सौ.के.एस. जगपती) (श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
मा.सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.