निकाल
(घोषित दि. 27.09.2016 व्दारा श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष)
ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये तक्रार.
तक्रारदाराचे पती दिगंबर शंकर शेळके वय 52 वर्षे यांचा मृत्यू दि.17.05.2010 रोजी उष्माघाताने झाला. सदर माहिती तक्रारदाराने जाफ्राबाद पोलीस स्टेशन यांना दिली. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. तक्रारदाराचे पती व्यवसायाने शेतकरी होते. महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी योजनेअंतर्गत शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेचा तो लाभधारक होता. तक्रारदार हिने सदर योजनेअंतर्गत नुकसान भरपाईचा दावा तलाठी सज्जा वरुड यांच्याकडे दि.04.06.2010 रोजी केला, सदर प्रस्तावासोबत गट नं.311 चा 7/12 उतारा, 8 अ, 6 क, तलाठयाचे प्रमाणपत्र, तहसिलदाराचे प्रमाणपत्र व फेरफारच्या नक्कला सुध्दा सादर केल्या. शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना दि.14 ऑगष्ट 2009 ते 13 ऑगस्ट 2010 या कालावधीकरता कार्यान्वित होती. तक्रारदार हिने विमा प्रस्तावाकरता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता केली होती. त्यानंतर गैरअर्जदार क्र.2 यांनी सदर विमा प्रस्ताव तहसिल कार्यालय जाफ्राबाद यांच्याकडे मुदतीत दाखल न करता अंदाजे 2 वर्षांने तक्रारदार यांना परत दिला. गैरअर्जदार क्र.2 याने खुलासा केला की, सदर विमा प्रस्ताव कालबाहय झाला त्यामुळे आता तो दाखल करता येणार नाही. गैरअर्जदार क्र.2 यांच्या हलगर्जीपणामुळे तक्रारदार हिला सदर विम्याच्या रकमेचा लाभ मिळालेला नाही म्हणून हा तक्रार अर्ज दाखल केला आहे.
तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत असलेल्या नि.3 वरील यादीमध्ये दिलेल्या सर्व कागदपत्रांच्या नक्कला ग्राहक मंचाच्या अवलोकनार्थ दाखल केलेल्या आहेत.
गैरअर्जदार क्र.1 हजर झाले त्यांनी त्यांचा सविस्तर लेखी जबाब सादर केला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अपघाती मृत्यूच्या नोंदीमध्ये मृतकाचा मृत्यू हार्टअटॅकने झाल्याचे लिहीलेले आहे. याचाच अर्थ, मृतकाचा नैसर्गिक मृत्यू झाला. सदर मृत्यू अपघाताने झालेला नाही त्यामुळेच सदर मृत्यूला विम्याच्या छत्राचे संरक्षण उपलब्ध नाही. या प्रकरणात तक्रारदार यांनी आवश्यक प्रतिवादी शरीक केलेले नाहीत. आवश्यक त्या कागदपत्रांच्यासोबत कोणत्याही प्रकारची खबर विहीत मुदतीच्या आत गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे देण्यात आलेली नाही. तक्रारदार यांचा विमा दावा मंजूर अथवा नामंजूर केलेलाच नाही. कारण आज पर्यंतही दाव्यापोटी कोणतीही माहिती तक्रारदार यांना मिळालेली नाही, जी माहिती मिळाली ती समन्सची बजावणी गैरअर्जदार क्र.1 यांचेवर झाल्यानंतर मिळालेली आहे. अशा परिस्थितीत तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करावा अशी विनंती गैरअर्जदार क्र.1 यांनी केलेली आहे.
गैरअर्जदार क्र.2 तलाठी सज्जा वरुड बु. त्यांचे नाव तक्रारदार यांनी कार्यवाहीतून वगळले आहे.
तक्रारदाराचा तक्रार अर्ज व गैरअर्जदार क्र.1 यांचा लेखी जबाब आम्ही काळजीपूर्वक वाचला. दोन्ही बाजुंच्या वकीलाचा युक्तीवाद ऐकला. त्यावरुन आमचे असे मत झाले आहे की, तक्रारदार हिने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. परंतू प्रत्यक्षात असे दिसून येते की, तक्रारदार हिच्या पतीचा मृत्यू नैसर्गिक झालेला आहे. जर अपघाती मृत्यूकरता विमा संरक्षण उपलब्ध असेल तर, नैसर्गिक मृत्यूच्या प्रकरणामध्ये बळजबरीने अपघाती मृत्यूची तरतुद लागू करता येणार नाही. तक्रारदार हिने तिच्या पतीचा मृत्यू उष्माघाताने झाला असा उल्लेख तक्रारीच्या परिच्छेद क्र.2 मध्ये केलेला आहे. तर शवविच्छेदन अहवालामध्ये तक्रारदार हिच्या पतीचा मृत्यू हार्टअटॅकने झाल्याचा उल्लेख आहे. याचाच अर्थ असा की, तक्रारदार हिच्या पतीचा अपघाती मृत्यू झालेला नाही. अपघाती मृत्यू व नैसर्गिक मृत्यू या दोन्ही गोष्टीमध्ये जमीनअस्मानचे अंतर आहे. त्यामुळे या मुद्यावर तक्रारदाराचा तक्रार अर्ज ग्राहक मंचासमोर चालू शकत नाही. तसेच तक्रारदार ही विमा संरक्षणाचा लाभ घेण्यास पात्र होऊ शकत नाही.
तक्रारदार हीने असे कथन केले आहे की, तिने विमा प्रस्ताव तलाठी सज्जा वरुड बुद्रूक यांच्याकडे मुदतीच्या आत दिला होता त्यावर सदर तलाठयाने कोणतीही कार्यवाही केली नाही व अंदाजे 2 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर सदर प्रस्तावाचे कागदपत्र तलाठयाने तक्रारदार हिला परत दिले. आमच्या मताने जर शासनाच्या कल्याणकारी योजनेअंतर्गत तक्रारदार हिला विमा रकमेच्या मागणीचा प्रस्ताव संबंधित तहसिलदार यांच्याकडे दाखल करणे आवश्यक होते तर तिने सदर प्रस्ताव तलाठी वरुड बु. यांच्याकडे का दाखल केला. आणि त्यानंतर 2 वर्षाच्या कालावधीत कोणतीही कार्यवाही न करता ती गप्प का बसली, याबाबत कोणताही खुलासा देण्यात आलेला नाही.
तक्रारदार यांच्या वकीलांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेचा क्लेम फॉर्म भाग 1 ची प्रत मंचासमोर दाखवली व निवेदन केले की, सदर प्रस्ताव हा संबंधित तलाठयाकडे खरोखरच विहीत मुदतीच्या आत सादर केला होता. आम्ही सदर क्लेमफॉर्म भाग 1 चे काळजीपूर्वक परीक्षण केले. त्याचे वाचनानंतर आम्हास असे निष्पन्न झाले की, सदर कागदातील भाग क्रमांक 2 हया छापील प्रमाणपत्रावर फक्त तलाठी वरुड सज्जा यांची सही व शिक्का आहे. परंतू सदर अर्जावर तक्रारदार हिची सही नाही. आम्ही तक्रार अर्जावरील तक्रारदाराची सही व क्लेम फॉर्म भाग 1 वरील तक्रारदाराची सही करण्याची जागा याचेही काळजीपूर्वक निरीक्षण केले असता असे निष्पन्न झाले की, क्लेम फॉर्म भाग 1 वर तक्रारदार हीची सहीच नाही. त्यामुळे क्लेम फॉर्म भाग 1 वर संबंधित तलाठयाची सही व शिक्का आहे. हे कारण तक्रारदार हिने खरोखरच विमा प्रस्ताव संबंधित तलाठयाकडे दाखल केला होता असे गृहीत धरण्यास पुरेसे नाही. वरील सर्व विवेचनावरुन असे वाटते की, तक्रारदार हिने तिचा तक्रार अर्ज मुदतीच्या आत दाखल होता हे दाखविण्याकरता बनावट कथन रचले. शिवाय जर खरोखरच वरुड बुद्रूक येथील तलाठयाजवळ सदर कागदपत्र तक्रारदार हिने दिले असतील तर त्याचे नाव या कार्यवाहीतून वगळण्याकरता तक्रारदार हिला कोणतेही कारण नव्हते. संबंधित तलाठयाला नोटीस पाठविण्याच्या कार्यवाहीची पुर्तता करुन हे प्रकरण त्याचे विरुध्द योग्यरितीने चालू शकत होते. अशा परिस्थितीत आमच्या मताने तक्रारदाराचे प्रकरण हे मुदतबाहय आहे. त्याचप्रमाणे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेच्या तरतुदीच्या कार्यक्षेत्रामध्ये ते येत नाही. त्यामुळे तक्रारदार व गैरअर्जदार क्र.1 यांच्यामध्ये ग्राहक व सेवा पुरविणारा तसेच अभिप्रेत असलेली सेवा देण्यात त्रुटी यापैकी कोणतेही कारण उदभवत नाही. म्हणून आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करतो.
आदेश
- तक्रारदार याचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना