रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, रायगड - अलिबाग.
तक्रार क्र. 99/2013
तक्रार दाखल दिनांक 29/01/14
न्यायनिर्णय दिनांक 18/02/2015
स्टर्लिंग कन्स्ट्रक्शन्स सिस्टीम्स प्रा. लि..,
तर्फे अधिकृत प्रतिनिधी श्री. चंदन एकनाथ महाडीक,
रा. नाना मास्तर नगर, कर्जत (ईस्ट),
कर्जत, जि. रायगड. ....... तक्रारदार
विरुध्द
मॅनेजर,
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं. लि.,
914 / 915, बुरहानी मॅन्शन,
टपाल नाका, नेताजी सुभाषचंद्र बोस,
पनवेल, जि. रायगड. 410206. ....... सामनेवाले
समक्ष :- मा. अध्यक्ष, श्री. उमेश वि. जावळीकर,
मा. सदस्या श्रीमती उल्का अं. पावसकर,
मा. सदस्य, श्री. रमेशबाबू बि. सिलिव्हेरी
उपस्थिती :- तक्रारदारांतर्फे अॅड. भटगुणकी
सामनेवाले विरुध्द एकतर्फा आदेश.
न्याय निर्णय
द्वारा मा. सदस्य, श्री. रमेशबाबू बि. सिलिव्हेरी
1. सामनेवाले यांनी तक्रारदारास कराराप्रमाणे वाहन चोरी विमा रक्कम प्रतिपूर्ती दावा अयोग्य कारणामुळे नाकारुन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याने तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदारांनी सामनेवाले कडून वाहन क्र. एम.एच. 43 – व्ही 9133 या वाहनाचा विमा करार केला होता. सदर करार दि. 20/08/08 ते दि. 19/08/09 या कालावधीसाठी वैध होता. तक्रारदारांचे वाहन दि. 03/03/09 रोजी चोरीस गेले. त्याबाबत प्रथम खबरी अहवाल दि. 07/03/09 रोजी दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिस तपासाअंती संशयित गुन्हेगारांचा जबाब घेऊन देखील वाहन न सापडल्याने पोलिसांनी “अ समरी ” अहवाल मा. अति. मुख्य महानगर दंडाधिकारी, 37 वे न्यायालय, किल्ला कोर्ट, मुंबई यांचेकडे दाखल केले. त्यानंतर तक्रारदारांनी सामनेवालेकडे संपूर्ण कागदपत्रांसह परिपूर्ण विमा दावा सादर केला. सदर दाव्यावर सामनेवाले यांनी तक्रारदारांचा रक्कम रु. 5,29,433/- एवढया रकमेचा विमा दावा मान्य केला असल्याबाबत कळविले. सदर रक्कम स्विकारण्यास तक्रारदार तयार असल्याबाबत तक्रारदारांनी सामनेवाले यांना दि. 22/06/12 रोजी कळविले. परंतु त्याप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदारास विमा रक्कम अदा न केल्याने तक्रारदाराने सामनेवाले यांना दि. 25/06/12 रोजी पुन्हा कागदपत्रे सादर केली. परंतु त्यानंतर सामनेवाले यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने विमा रक्कम व नुकसानभरपाईची मागणी प्रस्तुत तक्रारीत तक्रारदारांनी केली आहे.
3. तक्रारदारांची तक्रार दाखल झाल्यावर मंचाने सामनेवाले यांना नोटीस पाठवून लेखी जबाब दाखल करण्याचे निर्देश दिले. परंतु मंचाची नोटीस प्राप्त होऊनही सामनेवाले मंचासमक्ष हजर न झाल्याने व त्यांनी लेखी जबाब दाखल न केल्याने सामनेवाले विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आले. सदर आदेश आज रोजी अबाधित आहेत.
4. तक्रारदारांची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व त्यांची वादकथने यावरुन तक्रार निकालीकामी खालील मुद्दे निश्चित करण्यात येतात.
मुद्दा क्रमांक 1 - सामनेवाले यांनी तक्रारदारास कराराप्रमाणे वाहन चोरी विमा
रक्कम प्रतिपूर्ती दावा अयोग्य कारणामुळे नाकारुन सेवा
सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारदार सिध्द
करतात काय ॽ
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 2 - सामनेवाले तक्रारदार यांस नुकसानभरपाई देण्यास पात्र
आहेत काय ॽ
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 3 - काय आदेश ॽ
उत्तर - तक्रार अंशतः मान्य
कारणमिमांसा –
5 मुद्दा क्रमांक 1 - सामनेवाले यांनी तक्रारदारास विमा रक्कम रु. 5,29,433/- मंजूर केल्याबाबत कळविल्यानंतर सदर रक्कम स्विकारण्यास तयार असल्याबाबत लेखी सूचनापत्र दि. 22/06/12 रोजी तक्रारदारांनी सामनेवाले यांस पाठविले होते. त्याप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदारास सदर रक्कम अदा करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. सदर रक्कम अदा करण्याची पूर्तता न करण्याचे कोणतेही सबळ कारण सामनेवाले यांनी मंचासमक्ष दाखल केलेले नाही. तक्रारदारांच्या वाहनाचा विमा वैध असल्याबाबत व नुकसानभरपाईची रक्कम अंशतः मान्य केल्याबाबत कागदपत्रे मंचात दाखल केलेली आहेत. तक्रारदारांना विमा रक्कम अदा न करुन सामनेवाले यांनी तक्रारदारास सेवासुविधा पुरविण्यात कसूर केलयाची बाब सिध्द होते. सबब, मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
6 मुद्दा क्रमांक 2 - तक्रारदारांनी सामनेवाले यांनी मान्य केलेली रक्कम स्विकारण्याबाबत लेखी सूचनापत्र देऊन देखील सामनेवाले यांनी तक्रारदारांस रक्कम अदा न करुन सदर रकमेचा विनियोग स्वतःच्या वापरासाठी केल्याबाबत निष्कर्ष निघतो. तक्रारदारास विम्याची रक्कम विहीत कालावधीत प्राप्त न झाल्याने तक्रारदाराचे आर्थिक नुकसान झाल्याने सामनेवाले तक्रारदारांस नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्रमांक 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
7. उपरोक्त निष्कर्षा वरुन खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येतो.
-ः अंतिम आदेश ः-
1. तक्रार क्रमांक 99/2013 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारास कराराप्रमाणे वाहन चोरी विमा रक्कम प्रतिपूर्ती दावा अयोग्य कारणामुळे नाकारुन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारास कराराप्रमाणे वाहन चोरी विमा रक्कम प्रतिपूर्ती दावा रक्कम रु. 5,29,433/- (रु. पाच लाख एकोणतीस हजार चारशे तेहेतीस मात्र) या आदेश प्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांत अदा करावेत.
4. सामनेवाले यांनी तक्रारदारास तक्रार खर्च, मानसिक व शारिरिक त्रासाच्या नुकसानभरपाई पोटी एकत्रित रक्कम रु. 1,00,000/- (रु. एक लाख मात्र) या आदेश प्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांत अदा करावेत.
5. सामनेवाले यांनी वर नमूद क्र. 3 चे पालन विहीत मुदतीत न केल्यास सामनेवाले यांनी तक्रारदारास कराराप्रमाणे वाहन चोरी विमा रक्कम प्रतिपूर्ती दावा रक्कम रु. 5,29,433/- (रु. पाच लाख एकोणतीस हजार चारशे तेहेतीस मात्र) दि. 22/06/2012
पासून अदा करेपर्यंत 6% व्याजासह द्यावी.
6. न्याय निर्णयाच्या सत्यप्रती उभयपक्षांना पाठविण्यात याव्यात.
दिनांक – 18/02/2015
ठिकाण- रायगड – अलिबाग.
(रमेशबाबू बी. सिलीव्हेरी ) (उल्का अं. पावसकर ) (उमेश वि. जावळीकर)
सदस्य सदस्या अध्यक्ष
रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, रायगड – अलिबाग.