जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 113/2011 तक्रार दाखल तारीख –02/08/2011
वैशाली भ्र.सुभाष चाटे
वय 35 वर्षे धंदा शेती .तक्रारदार
रा.देवि निमगांव ता.आष्टी जि.बीड
विरुध्द
1. शाखा व्यवस्थापक,
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
मंडल कार्यालय क्र.2, अंबिका हाऊस सामनेवाला
शंकर नगर चौक, नागपूर 440 010
2. शाखा व्यवस्थापक,
कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा. लि.
शॉप नं.2 दिशा अंलकार कॉम्प्लेक्स,
टाऊन सेंटर,सिडको,औरंगाबाद.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.डि.जी.भगत
सामनेवाला क्र.1 तर्फे :- कोणीही हजर नाही.
सामनेवाला क्र.2 तर्फे ः- स्वतः
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराचे पती सुभाष शंकर चाटे यांचा मृत्यू दि.22.5.2010 रोजी त्यांचे शेतातील मोटार चालू करण्यासाठी गेले असताना विहीरीत पडून अपघाताने झालेला आहे.
सदर घटनेची माहीती अंभोरा पोलिस स्टेशन यांना दिली. पोलिसांनी घटनेची चौकशी करुन मृत्यूची नोंदणी केली. मयत व्यक्तीचा पंचनामा करुन शव विच्छेदनासाठी वैद्यकीय अधिका-याकडे सूर्पूद करण्यात आले.तक्रारदाराचा जवाब घेतला आहे.
सुरेश चाटे व्यवसायाने शेतकरी होता. म्हणून तक्रारदारांनी तालूका कृषी अधिकारी यांचेमार्फत सामनेवाला क्र.1 व 2 कडे रितसार मूदतीत आवश्यक त्या कागदपत्रासह प्रस्ताव दाखल केला. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी सदरचा प्रस्ताव आजपर्यत मंजूर केलेला नाही. सेवेत कसूर केलेला आहे. त्यामुळे तक्रारदारांना शारीरिक मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व दाव्याचा खर्च रु.3,000/- ची मागणी केली आहे.
विनंती की, सामनेवाला यांनी तक्रारदारांना विमा रक्कम रु.1,00,000/- 18 टक्के दाराने व्याजासहीत देण्या बाबत तसेच मानसिक शारीरिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/-देण्या बाबत आदेश व्हावेत.
सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारीची नोटीस मिळाले, ते प्रकरणात हजर झाले नाही. त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले नाही. त्यांचे विरुध्दचे सदरचे प्रकरण एकतर्फा चालविण्याचा निर्णय जिल्हा मंचाने दि.3.1.2012 रोजी घेतला.
सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचा खुलासा दि.23.9.2011 रोजी पोस्टाद्वारे दाखल केला. श्री.सुरेश चाटे रा. देवि निमगांव ता.आष्टही यांचा अपघात दि.205.2010 रोजी झाला. त्यांचा दावा दि.11.11.2010 रोजी अपूर्ण कागदपत्रा उदा.6-क, फेरफार , एफआयआर, रासायनिक प्रयोगशाळेचा अहवाल पोलिस अधिका-यांनी सांक्षाकीत केलेला इत्यादी कागदपत्राच्या अपूर्णतेने मिळाले. त्या बाबत दि.7.12.2010 रोजी कळविले. तक्रारदारांनी वरील कागदपत्र दाखल केले नाही. सदरचा दावा यूनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी नागपूरला दि.21.12.2010 रोजी अपूर्ण कागदपत्र या शे-याने प्रस्ताव पाठविला. विमा कंपनीने त्यांचे पत्र दि.31.12.2010 नुसार दावा बंद केला.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला क्र.2 चा खुलासा यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.भगत यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता सामनेवाला क्र.2 यांचा खुलासा या संदर्भात महत्वाचा आहे. त्यांनी 6-क, फेरफार , एफआयआर, रासायनिक प्रयोगशाळेचा अहवाल पोलिस अधिका-यांनी सांक्षाकीत केलेला अशी कागदपत्र अपूर्ण असल्याचे म्हटले आहे. त्या संदर्भात त्यांचे पत्रही त्यांनी त्यांचे खुलासासोबत दाखल केलेले आहे. सदरचे कागदपत्र मागणीचे पत्र जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय आष्टी यांचे नांवाने आहे. सदरचे पत्र पाठविल्या बाबत त्यांची कोणतीही पोहच किंवा पोस्टाचा पूरावा त्यांचे खुलासासोबत दाखल नाही.
दि.31.12.2010 रोजी सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदाराचा दावा अपूर्ण कागदपत्र असल्यामूळे व ते तक्रारदारांनी दि.14.11.2010 पर्यत न दिल्याने बंद करण्यात आला यांचे पत्राची प्रत आहे. सदरचे पत्र पंजीकृत पावतीद्वारे तक्रारदारांना पाठविले आहे परंतु या संदर्भात तक्रारदाराची तक्रार पाहता तक्रारदारांना वरील दोन्ही पत्र मिळाल्याचे तक्रारीत नमूद नाही. तसेच विमा कंपनी हजर नसल्याने सदर पत्रा बाबत विमा कंपनीकडून कोणताही खुलासा नाही. तक्रारदारांना जर वरील दोन्ही पत्रे योग्य रितीने मिळाली असती तर तक्रारदारांनी त्यांची पूर्तता केली असती. परंतु सदरची दोन्ही पत्राचे तक्रारदारांना मिळाली नाहीत यात तक्रारदारांचा कोणताही दोष नाही.
सामनेवाला क्र.1 यांनी अपूर्ण कागदपत्राअभावी दावा बंद केलेलाक आहे व तो जिल्हा मंचात हजरही झालेले नाहीत त्यांनी आव्हानही दिलेले नाही. अपूर्ण कागदपत्राचे संदर्भात त्यामुळे कोणताही खुलासा होऊ शकला नाही. तसेच सदरचा दावा बंद केल्याचे पत्र तक्रारदारांना मिळाल्याचे शाबीत करण्याची जबाबदारी पूर्णपणे विमा कंपनीचीच आहे.परंतु त्या संदर्भात कोणताही पुरावा नसल्याने सामनेवाला क्र.2 ने दिलेला खुलासा व त्यात सामनेवाला क्र.1 ने अपूर्ण कागदपत्राअभावी बंद केलेला प्रस्ताव या बाबत योग्यरितीने गांभीर्यपूर्ण, सामाजीक न्यायाचे दृष्टीने विमा कंपनीने त्यांची कोणतीही जबाबदारी पार पाडल्याचे दिसत नाही. त्यामूळे तक्रारदाराचा दावा योग्य रितीने सामनेवाला क्र.1 यांनी नाकारला ही बाब स्पष्ट होत नाही. दावा नाकारुन तक्रारदारांना दयावयाचे सेवेत सामनेवाला क्र.1 ने कसूर केल्याची बाब स्पष्ट होते असे न्यायमंचाचे मत आहे.
सामनेवाला यांनी मयत सुरेश चाटे यांचे मृत्यूच्या विम्याची रक्कम रु.1,00,000/- तक्रारदारांना देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सेवेत कसूरीची बाब स्पष्ट झाल्याने सामनेवाला यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु.3,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला क्र.1 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना मयत
सुरेश चाटे यांचे अपघाती मृत्यू दाव्याची रक्कम
रु.1,00,000/- (अक्षरी एक लाख फक्त) आदेश मिळाल्यापासून
एक महिन्याचे आंत अदा करावी.
3. सामनेवाला क्र.1 यांना आदेश देण्यात येतो की,वरील रक्कम मूदतीत
न दिल्यास वरील रक्कमेवर द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज तक्रार
दाखल दि.20.08.2011 पासून देण्यास सामनेवाला क्र.1 जबाबदार
राहतील.
4. सामनेवाला क्र.1 यांना आदेश देण्यात येतो की, मानसिक त्रासाची
रक्कम रु.5000/-(अक्षरी रु.पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चाची
रककम रु.3,000/-(अक्षरी रु.तिन हजार फक्त) आदेश प्राप्तीपासून
30 दिवसांचे आंत अदा करावी.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड