(मा.अध्यक्ष श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले) नि का ल प त्र अर्जदार यांना सामनेवाले यांच्याकडून हुंडाई व्हर्ना प्लुडीक कार ही बुकिंग केल्यामुळे त्वरीत मिळावी, सदर कार मिळणेकामी सामनेवाला यांनी विनाकारण उशीर करुन टाळटाळ केल्यामुळे नुकसान भरपाई मिळावी, यदाकदाचित नवीन कार न मिळाल्यास अर्जदार यांना भरलेल्या रकमेवर व्याज मिळावे, मानसिक आर्थीक त्रासापोटी रु.25,000/- मिळावे व अर्जाचा खर्च मिळावा या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे. सामनेवाले यांनी याकामी पान क्र.13 लगत लेखी म्हणणे व पान क्र.14 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. अर्जदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेत. मुद्देः 1) अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय?-होय. 2) सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय?-नाही. 3) अंतिम आदेश?-- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द नामंजूर करण्यात येत आहे. विवेचन याकामी अर्जदार यांचेवतीने पान क्र.22 लगत लेखी युक्तीवाद दाखल करण्यात आलेला आहे. सामनेवाला यांचेवतीने अँड.व्ही.एस.तळेकर यांनी युक्तीवाद केलेला आहे. सामनेवाले यांनी त्याचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांचेकडे अर्जदार यांनी गाडीचे बुकींग केलेले आहे ही बाब स्पष्टपणे नाकारलेली नाही. अर्जदार यांनी पान क्र.5 लगत सामनेवाला यांना बुकींगपोटी दिलेल्या रकमेची पावतीची व पान क्र.6 लगत सामनेवाला यांनी दिलेल्या कमीटमेंट लेटरची प्रत दाखल केलेली आहे. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, सामनेवाले यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र व पान क्र.5 लगत बुकींगपोटी दिलेल्या रकमेची पावतीची प्रत व पान क्र.6 लगतचे कमीटमेंट लेटर यांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. सामनेवाले यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदाराच्या तक्रारीस हुंडाई मोटार लि. ही कंपनी आवश्यक पक्षकार आहे. सामनेवाला यांचे विक्री प्रतिनीधी श्री.अमोल देशमुख यांनी 30 ते 60 दिवसात कार मिळेल असे सांगितले नव्हते. जादा रक्कम कधीही मागीतलेली नव्हती. रक्कम रु.9,36,845/- इतक्या रकमेचा चेक घेवून अर्जदार हे सामनेवालाकडे कधीही आलेले नव्हते. अर्जदाराला गाडीची विक्री करणे ही गोष्ट सामनेवाला यांचे नियंत्रणात नव्हती. 60 दिवसात वाहन विक्रीचा कुठलाही करार करण्यात आलेला नव्हता. कमिटमेंट लेटरमध्ये वाहन देण्याची अंदाजे तारीख नमूद केलेली असते. वाहन उत्पादक कंपनीकडून वाहन उपलब्ध होईल त्याप्रमाणे प्रथम येणा-याला प्राधान्य या तत्वाने वाहन विक्री केली जाते. सामनेवाला यांनी अर्जदार यांचे नोटीसीस उत्तर दिल्यानंतर अर्जदाराचे नोंदविलेले वाहन उपलब्ध झाले त्याप्रमाणे अर्जदाराला वाहना घेण्याविषयी कळविले. दि.23/09/2011 रोजी पत्र देवून 10 दिवसात वाहन घेवून जावे अथवा नोदणी रद्द होईल असे कळविले परंतु त्याप्रमाणे अर्जदाराने वाहन नेले नाही म्हणून दि.03/10/2011 रोजीच्या पत्राद्वारे सामनेवाला यांनी अर्जदाराची नोंदणी रद्द केली व अर्जदार यांची भरलेली रक्कम व्याजासह परत केलेली आहे.” असे म्हटलेले आहे. अर्जदार यांनी या कामी पान क्र.6 लगत सामनेवाला यांचे दि.16/05/2011 रोजीचे रक्कम रु.1,00,000/- भरल्याचे कमिटमेंट फोल्डर कॉपी हजर केलेली आहे. या कॉपीमध्ये एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलीवरी या ठिकाणी दि.16/05/2011 अशी तारीख दिलेली आहे. परंतु ही तारीख संभाव्य (एक्सपेक्टेड) अशीच दिलेली आहे. अर्जदार यांना नक्कीच दि.16/07/2011 किंवा त्यापुर्वी गाडीची डिलीवरी नक्की मिळेल असे कोणेतही लेखी पत्र सामनेवाला यांनी अर्जदार यांना दिलेले नाही हे पान क्र.6 चे कागदपत्रावरुन स्पष्ट होत आहे. या कामी अर्जदार यांनी वाहन उत्पादन कंपनीस सामनेवाला म्हणून सामील केलेले नाही. जरी कोणत्याही ग्राहकाने वाहनाचे बुकींग कंपनीच्या डिलरकडे केलेले असले तरीसुध्दा कंपनीकडून ज्या प्रमाणे वाहन उपलब्ध होईल त्यानुसारच ग्राहकांना वाहनाची विक्री केली जाते अशी सर्वसाधारण पध्दत आहे. सामनेवाला यांनी पान क्र.16 लगत पोलिस निरीक्षक अंबड पोलिस स्टेशन यांना दिलेले दि.21/07/2011 रोजीच्या पत्राची प्रत दाखल केलेली आहे. तसेच पान क्र.17 लगत रक्कम रु.1,03,090/- चा चेक व पान क्र.18 लगत दि.03/10/2011 रोजी बुकिंग कॅन्सलेशनचे पत्र व पान क्र.19 लगत दि.23/09/2011 रोजी अलॉटमेंट लेटर या कागदपत्रांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. पान क्र.19 चे दि.23/09/2011 चे पत्राप्रमाणे सामनेवाला यांनी अर्जदार यांना वाहन नेण्याविषयी कळविले आहे हे स्पष्ट होत आहे. परंतु अर्जदार यांनी वाहनाची डिलीवरी घेतली नाही त्यामुळे सामनेवाला यांनी पान क्र.18 चे पत्राप्रमाणे दि.03/10/2011 रोजी अर्जदार यांचे वाहनाची बुकिंग रद्द करुन अर्जदार यांना पान क्र.17 प्रमाणे रु.1,03,090/- चा चेक पाठविलेला आहे हे स्पष्ट होत आहे. पान क्र.17, पान क्र.18, पान क्र.19 चे कागदपत्रांचा विचार होता सामनेवाला यांना कंपनीकडून वाहन उपलब्ध झाल्यानंतर त्यांनी ते वाहन अर्जदार यांना उपलब्ध करुन दिलेले आहे. परंतु अर्जदार यांनी वेळेत वाहनाची डिलीवरी न घेतल्यामुळे अर्जदार यांचे बुकिंग रद्द करुन सामनेवाला यांनी अर्जदार यांना बुकिंगची रक्कम रु.1,00,000/- होणा-या व्याजासह म्हणजे रु.1,03,090/- ही रक्कम परत देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे स्पष्ट होत आहे. पान क्र.17 चा रु.1,03,090/- चा चेक अद्यापही अर्जदार यांनी वटवलेला नाही ही बाब युक्तीवादाचेवेळी दोन्ही बाजुकडून मान्य करण्यात आलेली आहे. पान क्र.17, पान क्र.18 व पान क्र.19 चा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना जाणूनबुजून त्रास व्हावा किंवा अर्जदार यांचे आर्थीक नुकसान व्हावे या हेतुने जाणीवपुर्वक सेवा देण्यामध्ये कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही असेच दिसून येत आहे. वरील सर्व कारणाचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केलेली नाही असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकिलांचा युक्तीवाद आणि वरील सर्व विवेचन याचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द नामंजूर करण्यात येत आहे.
|