नि.29
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष : श्री.ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य : श्री के.डी.कुबल
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 539/2010
----------------------------------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : 15/10/2010
तक्रार दाखल तारीख : 16/10/2010
निकाल तारीख : 21/03/2013
-----------------------------------------------------------------
कालिदास रघुनाथ हरिदास
वय वर्षे – 53, व्यवसाय – स्वयंपाकी
रा. हरिदास भवन, गांवभाग, सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. व्यवस्थापक, तीर्थ इंजिनिअरिंग
2. श्री सचिन राठोड
तीर्थ इंजिनिअरिंग
व.व.42, व्यवसाय – व्यापार
3. श्री किरण राठोड
तीर्थ इंजिनिअरिंग
व.व.40, व्यवसाय – व्यापार
क्र.1 ते 3 रा. सर्व्हे नं.44/1,
इंडस्ट्रीयल घर नं.2161/2,
गणपती माथा मंदीरजवळ, वारजे माळवाडी,
पुणे – 52 ..... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅडएस.के.केळकर
जाबदार क्र.1 व 2 तर्फे : अॅडजे.टी.मुलाणी
- नि का ल प त्र -
द्वारा – मा. सदस्य - श्री के.डी.कुबल
1. प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे वस्तूची आगाऊ रक्कम देवूनही सदोष वस्तू दिली यासाठी मंचात तक्रार दाखल केली आहे.
2. सदर तक्रारीची वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे -
तक्रारदार हे आपल्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी सांगली येथे स्वयंरोजगाराच्या माध्यमातून सणासुदीच्या काळात खादयपदार्थ बुंदी लाडू, चिवडा बनवितात. हे सर्व खादयपदार्थ विशेषतः लाडू हाताने बनविणे कष्टप्रद आणि वेळ जाणारे असते. यासाठी त्यांच्या मनात कल्पना आली की, त्यासाठी लागणारी मशीन जर बनवून घेतली तर काम सोपे होईल. यासाठी त्यांनी जाबदार क्र.1 ते 3 यांचेशी संपर्क साधून तशा प्रकारची मशीन बनविता येईल का या संबंधात त्यांना आपली कल्पना सांगितली. जाबदार यांनासुध्दा त्यांची कल्पना आवडली. त्यांनी त्यांना होकार दिल्यानंतर तक्रारदारांनी जाबदार यांना बुंदीच्या कळया पाडण्याचे एक व प्रत्यक्ष लाडू करण्याचे एक अशी दोन मशिन बनवून देण्याचे ठरले. त्याप्रमाणे दोहोंमध्ये सांगली येथे तक्रारदार यांच्या घरी व्यवहाराच्या शर्ती अटी ठराल्या. त्यात प्रामुख्याने ऑर्डर फॉर्मवर नमूद केल्याप्रमाणे मशीनच्या किंमतीपैकी 50 टक्के आगावू रक्कम, 60 दिवसांत मशिनची पोच, मशीन योग्य पध्दतीने काम करत नसल्यास आगाऊ रकमेची परतफेड इ. मुद्दे निश्चित करण्यात आले. त्याप्रमाणे दि.5/8/04 रोजी रक्कम रु.5,000/- चा (नि.4/2) चा डी.डी. जाबदार क्र.1 या नावे काढला. त्यानंतर दि.13/9/2004, 14/9/2004 रोजी जाबदार क्र.2 व 3 च्या नावे प्रत्येकी रक्कम रु.45,000/- चे डी.डी. (नि.4/3, व 4/4) सांगली अर्बन को.बँक मुख्य शाखा सांगली वरील काढले. सदर तिनही डीडींची रक्कम जाबदारांना मिळालेली आहे. सप्टेंबर 2004 पर्यंत रु.1,40,000/- इतकी रक्कम जाबदारांना प्राप्त झाल्यावर त्यांनी मशीन तयार करण्यास सुरुवात केली. पुन्हा ऑक्टोबर 2005 मध्ये जाबदार यांनी रु.1,00,000/- ची मागणी तक्रारदार यांचेकडे केल्यावर त्यांनी दि.17/10/2005 रोजी दी सांगली अर्बन को.ऑप. बँक शाखा सांगली वरील रु.1 लाखाचा डी.डी.काढून जाबदार यांचेकडे जमा केला. 50 टक्के रक्कम आणि 60 दिवस झाल्यानंतरही जाबदार यांनी मशिन दिली नाही. 1 वर्षानंतर जाबदारांनी तयार केलेल्या 2 मशीन्स ट्रायलसाठी सांगलीला पाठविल्या. मात्र त्यात उणीवा जाणवल्याने त्या मशीन तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे परत पाठविल्या. सन 2004 पासून 2/3 वेळा ट्रायल घेण्यात आल्या. परंतु अपेक्षित कार्यसाफल्य मिळत नव्हते. त्यामुळे तक्रारदारांनी जाबदार यांचेकडे मशीन परत केल्या. कालांतराने लाडू वळायच्या मशीनची गरज जास्त असल्याने त्यात योग्य ती दुरुस्ती करुन आपल्याला देतो व कळया पाडण्याचे मशीन आपल्याकडे ठेवून घेतले, ते तक्रारदाराला अद्यापर्यंत दिलेले नाही. सन 2008 मध्ये तक्रारदारांनी जाबदारांना फोन करुन विचारले असता मशीन तयार आहे, ट्रायलसाठी या असे त्यांनी सूचीत केले. त्याप्रमाणे तक्रारदार पुणे येथे ट्रायलसाठी गेले असता “वायरिंग जळाल्यामुळे लाईट नाही, 2 दिवसांनी या” असे उत्तर जाबदारांच्या वतीने देण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांनी तक्रारदार जाबदार यांचेकडे परत गेले असता त्यांनी मशीनमध्ये तयार झालेले लाडू दाखविले. मात्र सदर लाडू तक्रारदार यांचे समक्ष केलेले नसलेने त्यांनी आपल्या समक्ष कृती करण्याची विनंती केली. मात्र त्यावेळी सुध्दा लाडू अपेक्षेप्रमाणे मशीनद्वारे निर्माण झाले नाहीत. त्याचे कारण त्यांनी तुम्हा आणलेल्या कळया कमी असल्याने लाडू व्यवस्थित झाले नसावेत असे दिले. तक्रारदारांनी सदर मशीन सांगलीला आणून त्यांचे प्रात्यक्षिक घेतले, तेव्हाही लाडू तयार झाले नाहीत. त्यानंतर वारंवार फोन करुनही जाबदार यांनी तक्रारदारास प्रतिसाद दिला नाही अथवा दखल घेतली नाही. दि. 28/9/2010 रोजी जाबदारास नोटीस (नि.4/6) पाठवूनही आगावू रक्कम परत द्यावी लागेल म्हणून ते टाळत आहेत हे स्पष्ट होते. जाबदारांनी सेवेत त्रुटी केल्याने तक्रारदारांना जाबदारांचेविरुध्द या मंचाकडे धाव घेणे भाग पडले. त्यासाठी त्यांनी आगाऊ रक्कम रु.2,40,000/- त्यावर सप्टेंबर 2004 पासून द.सा.द.शे. 15 टक्के व्याज, मानसिक शारिरिक त्रासापोटी रु.1,60,000/-, खर्चापोटी रु.10,000/- जाबदार यांचेकडून मिळावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. आपल्या मागणीच्या पुष्ठयर्थ स्वतःचे शपथपत्र नि.क्र.7 वरील 7 कागद, न्यायनिवाडे इ. कागदपत्रे सादर केलेली आहेत.
3. जाबदार सुरुवातीला मंचाची नोटीस मिळूनही हजर झालेले नव्हते. त्यामुळे त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. मात्र त्यानंतर नि.क्र.13 वर अर्ज देवून एकतर्फा आदेश रद्द करुन घेतला. नि.15 वर तक्रारदाराच्या अर्जाला प्रतिउत्तर दिलेले आहे. त्यामध्ये त्यांनी भौगोलिक कार्यक्षेत्राचा मुद्दा प्रामुख्याने मांडला असून त्यामुळे सदरची तक्रार ही सांगली अधिक्षेत्रात येत नाही असे विवेचन केले आहे. मात्र तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये खरेदी विक्रीचा व्यवहार घडल्याचे मान्य केले आहे. जाबदारांनी आपल्या म्हणणेचे पुष्ठयर्थ नि.8/4 वर 5 कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. तक्रारदार यांची तक्रार, लेखी पुरावे, जाबदारांचे म्हणणे, यासंदर्भात अवलोकन केले असता तसेच लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन करता व तक्रारदार यांचे विधिज्ञांचा तोंडी युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायामंचापुढे निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तरे |
1. | तक्रारदार हे जाबदार यांचा ग्राहक आहेत काय ? | होय |
2 | जाबदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय |
3 | काय आदेश ? | अंतिम आदेशाप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1, 2 व 3
5. तक्रारदार व जाबदार क्र.1 ते 3 यांचेमध्ये नि.क्र.... वरुन खरेदी विक्रीचा व्यवहार झाल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार व जाबदार क्र. 1 ते 3 यांचेमध्ये ग्राहक व सेवादार असे नाते प्रस्थापित होत आहे.
6. सदर प्रकरणामध्ये तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे दोहोंमध्ये ठरल्याप्रमाणे आगाऊ रक्कम रु.2,40,000/- सांगली अर्बन को.बँकेचे डी.डी.चे माध्यमातून अदा केलेली असूनसुध्दा मागणी केलेली मशीन वेळेत आणि योग्य मापदंडाने बनविलेली नसल्याने तसेच सदोष असल्याचे दिसून येते. त्यामुळे हा सेवेतील दोष आहे असे या मंचाचे मत आहे.
7. भौगोलिक कार्यक्षेत्राचा मुद्दा जाबदार यांचेमार्फत प्रकर्षाने मांडला गेला आहे. मात्र नि.4/1 वर जाबदार यांनी मशीनसाठी जी ऑर्डर घेतली आहे त्या ऑर्डरमध्ये फॉर्ममध्ये दि.5/8/04 Order No. 1015, Visit Sangli असे स्पष्टपणे नमूद आहे. यावरुन सदरची ऑर्डर ही सांगली येथे स्वीकारली असून त्याचदिवशी अॅडव्हान्स म्हणून रक्कम रु.5,000/- स्वीकारलेचे दिसून येते. यावरुन जाबदार यांनी मशीन खरेदी देणची ऑर्डर सांगली येथे स्वीकारली असलेने सदर तक्रारअर्जास या मंचाचे अधिकारक्षेत्रात अंशतः कारण घडले आहे असे या मंचाचे मत आहे. सदर ऑर्डर फॉर्मवर “Subject to Pune jurisdiction only” असे नमूद आहे. त्यामुळे या मंचास भौगोलिक अधिकारक्षेत्र येणार नाही असे जाबदारांनी नमूद केले आहे. त्याबाबत तक्रारदारांनी सन्मा.राष्ट्रीय आयोग यांचे I (2004) CPR 62 (NC) परवेशकुमार विरुध्द एअर ट्रान्स्पोर्ट कॉर्पोरेशन हा निवाडा दाखल केला आहे. सदर निवाडयामध्ये सन्मा. राष्ट्रीय आयोगाने पुढीलप्रमाणे निष्कर्ष काढले आहेत.
“Unilateral condition in a consignment note ousting jurisdiction of a forum when there was no conscious agreement would not deprive forum of its power to adjudicate complaint.” सदर निष्कर्षाचे अवलोकन करुन सदर ऑर्डर फॉर्मवर असलेली अट तक्रारदारांवर बंधनकारक होणार नाही असे मंचाचे मत आहे. शिवाय तक्रारदार यांनी जाबदार क्र. 1 ते 3 यांना दिलेल्या रकमेचे डी.डी. हे सुध्दा सांगली येथे दी सांगली अर्बन को.ऑप.बँकेच्या द्वारे दिलेले आहेत.
सदर प्रकरणामध्ये प्राथमिक मुद्दा काढून प्रकरण निकाली काढण्याची कोणतीही आवश्यकता मंचास वाटत नाही. त्यामुळे तक्रार प्रकरण गुणदोषांवर निकाली काढणे आवश्यक आहे. यासंबंधाने मा. राज्य आयोग मुंबई यांनी वाहिदा शेख विरुध्द पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँक लि. (2005) CCC(270)(SS) या प्रकरणात निर्वाळा देताना प्राथमिक मुद्दा काढणेची आवश्यकता नसलेचे स्पष्ट केले आहे.
8. जाबदार क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांचेकडून मशीन बनविणेसाठी रक्कम घेतली. मात्र त्या मशिनकडून अपेक्षित काम निर्माण झालेले नाही. तक्रारदाराला सांगली-पुणे असे अनेकवेळा हेलपाटे मारावे लागले. अनावश्यक खर्च करावा लागले, मानसिक शारिरिक त्रास झाला हे सर्व मंचाला मान्य करावेच लागते. सन 2004 पासून सलगपणे तक्रारीचे कारण घडत आलेले आहे. अंतिमतः सुध्दा कोणताही अपेक्षित रिझल्ट तक्रारदार यांना मशीनीच्या माध्यमातून मिळाला नाही हे वास्तव मंचाला स्वीकारणे क्रमप्राप्त आहे.
9. या तक्रारीत जाबदार यांच्या सेवेमध्ये त्रुटी सिध्द होत आहे व तक्रारदार हे जाबदार क्र.1 ते 3 यांच्याकडून तक्रारीत विनंती केल्याप्रमाणे अॅडव्हान्सची रक्कम सव्याज, तसेच शारिरिक मानसिक आर्थिक नुकसान व खर्चापोटी भरपाई मिळणेस हक्कदार आहेत.
वरील विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
2. जाबदार क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांना मशीन तयार करण्यासाठी घेतलेली आगाऊ रक्कम रु.2,40,000/- दि.5/8/2004 पासून द.सा.द.शे. 8.5 टक्के दराने अदा करणेचे आदेश देणेत येत आहेत.
3. तक्रारदार यांना जाबदार क्र.1 ते 3 यांनी शारीरिक, मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार माञ) व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रुपये 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार माञ) अदा करणेचे आदेश करण्यात येत आहेत.
4. वर नमूद आदेशाची अंमलबजावणी जाबदार क्र.1 ते 3 यांनी 45 दिवसांत करावी. जाबदार यांनी आदेशाची पुर्तता न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. 21/03/2013
(के.डी. कुबल ) ( ए.व्ही. देशपांडे )
सदस्य अध्यक्ष