तक्रार दाखल ता.15/04/2015
तक्रार निकाल ता.28/09/2016
न्यायनिर्णय
द्वारा:- - मा. सदस्या–सौ. मनिषा एस.कुलकर्णी.
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने आपले ठेवपावत्यांद्वारे ठेवलेली रक्कम पावती क्र.F.D.No.1000714620000096,F.D.No.1000714620000097,F.D.No.1000714620000098, F.D.No.1000714620000099 (एकूण चार) ही जाबदार बँकेकडून व्याजासह परत मिळणेसाठी दाखल केलेली आहे. सदरची तक्रार स्विकृत होऊन जाबदार यांना नोटीस आदेश होऊन जाबदार हे मंचासमोर हजर होऊन त्यांनी आपले म्हणणे दाखल केले.
2. तक्रारदारांची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे:-
तक्रारदार हे यळगुड गावचे कायमचे रहिवाशी आहेत. तक्रारदार हे देशभक्त रत्नाप्पा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना, गंगानगर येथे नोकरीस होते. ते 2008 साली नोकरीतून सेवानिवृत्त झाले. त्यांनी त्यांचेकरीता व त्यांचे पत्नीकरीता वृध्दापकाळाची सोय व्हावी म्हणून ठेव पावतीच्या स्वरुपात मोठया विश्वासाने जाबदार यांचेकडे ठेव ठेवल्या होत्या. तक्रारदारांनी आपले नोकरीतून सेवानिवृत्त झालेवर मिळाले रक्कमेतून वि.प.यांचे बँकेत आपल्या उतारवयातील उदनिर्वाहाच्या तरतुदीच्या उद्देशाने तसेच त्यांचे औषधोपचाराकरीता आर्थिक अडचणीसाठीचे दृष्टीकोनातून खालील नमुद ठेव ठेवलेल्या आहेत.
1. F.D.No.1000714620000096
2. F.D.No.1000714620000097
3. F.D.No.1000714620000098
4. F.D.No.1000714620000099
तक्रारदारांचे सदरहू बँकेत ठेवपावत्या असलेकारणाने त्यांचे जाबदार बँकेत वरचेवर जाणे-येणे होत होते. जाबदार बँकेने तक्रारादारांचा भोळा स्वभाव असलेचा गैरफायदा घेऊन अभिलाष बुध्दीने तक्रारदारांचे काही कागदपत्रांवर सहयां घेतल्या आहेत. तक्रारदारांचे कथनानुसार, जाबदार त्यांचे नोटीसीत कथन करतात त्याप्रमाणे तथाकथित कर्ज प्रकरणात दि.28.03.2012 रोजी कर्जदार श्री.संभाजी जनार्दन फगरे व श्री.युवराज जनार्दन फगरे यांना रक्कम रु.6,00,000/- मंजूर केले होते व सदर कर्जास संभाजी फगरे यांचेकडून त्यांचे दुकानातल चांदीचा कच्चा माल, चांदीचा पक्का माल, दुकानातील वस्तु व फर्निचर व इतर माल अशा वस्तुतारण घेतल्या आहेत. त्याशिवाय श्री.युवराज फगरे यांचे मालकीचे मौजे यळगुड येथील क.ग.नं.46 पैकी हे.0.1.5 आर मिळकत म्हणजे दक्षिणोत्तर- पूर्व व पश्चिम 33 फुट आणि पूर्वपश्चिम-दक्षिणोत्तर बाजू 50 फुट अशी 33 बाय 50 एकूण 1650 चौ.फुट (153.3स्क्वे.फुट) जागा व त्यावरील मिळकत नं.254/2 असा ग्रामपंचायत क्रमांक असलेली घर मिळकत तारण घेतलेली आहे. तसेच प्रस्तुत तथाकथित कर्जाची मुदत दि.28.03.2015 अखेर आहे. त्यामुळे सदर तथाकथित कर्जाची मुदत संपलेली नतसाना जाबदार यांनी तक्रारदारांच्या ठेवपावत्या बेकायदेशीररित्या वर्ग केल्या आहेत हे जाबदार यांचे कृत्य हे साफ चुकीचे बेकायदेशीर व अन्यायकारक आहे. कर्जाची मुदत संपली नसताना बँकेने ठेव पावत्या बेकायदेशीररित्या वर्ग केल्या हे बँकेचे कृत्य बेकायदेशीर आहे. तक्रारदार हे कोणाही इसमास जामीनदार राहिलेले नाहीत, जामीनाबाबतचे कथन व कागदपत्रे खोटी, बनावट, बेकायदेशीर, बिनभरवश्याच्या आहेत. कर्ज प्रकरणाबाबत शहानिशा करणेसाठी कागदपत्रे दाखविणेची विनंती केली त्यावेळी हजर असलेल्या अधिकारी यांनी कागदपत्रे दाखविणेस नकार दिला व उडवाउडवीची उत्तरे दिली. कागदपत्रे पाहणेसाठी वरिष्ठाकडे अर्ज द्यावे लागतील असे सांगून आणखी काही अर्ज देणेस व सहया देणेस भाग पाडले. परंतू कर्जाची कागदपत्रे दाखविली नाहीत, म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार या मंचात दाखल केली. सबब, तक्रारदाराने जाबदार बँकेकडून त्याने ठेवले वर नमुद ठेवपावत्यांची व्याजासह होणारी रक्कम मागितलेली असून तसेच ठेवपावत्यांची रक्कम रु.3,88,324/- व त्यावरील होणारे व्याज नुकसानभरपाईपोटी रक्कम रु.2,00,000/- तसेच व आर्थिक नुकसान रक्कम रु.50,000/- मागितलेली आहे.
3. तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत तक्रारदारांनी वि.प.यांचे बँकेत ठेवलेली ठेव पावती क्र.96, 97, 98 व 99 यांची साक्षांकीत प्रत तक्रारदारांनी अॅड.डी.व्ही.लांबट यांचेमार्फत वि.प.यांचे पत्रास दिलेली उत्तरे व प्रति नोटीसा, वि.प.बँकेकडून तक्रारदारांना पाठविलेले पत्र, दि.16.03.2016 रोजीचे तक्रारदाराचे सरतपासाचे शपथपत्र, न्यायनिर्णय, इत्यादीं कागदपत्रे जोडलेली आहेत.
4. जाबदार हे या मंचासमोर हजर होऊन त्यांनी आपले म्हणणे दाखल केले. त्यांचे कथनानुसार सदरचा अर्ज बेकायदेशीर चुकीचा व अप्रामाणिकपणाचा असलेने जाबदार यांना कोणत्याही प्रकारे कबुल नाही. तक्रार अर्जामध्ये बँकेची काय त्रुटी आहे याची स्पष्टता केलेली नाही. केवळ ठेवपावत्यांमुळे ग्राहक हे नाते होत नाही. सबब, प्रस्तुत अर्ज या मंचाचे अधिकारक्षेत्रात नाही. तक्रारदारांनी त्यांचे अर्जामध्ये तसेच दाखल केले कागदपत्रांत अप्रत्यक्षरित्या तक्रारदार हा संभाजी फगरे व युवराज जनार्दन फगरे, रा.यळगुड यास (कर्जास) जामीनदार होता हे त्याने कबुल केले आहे. या दोघांचे कर्ज थकीत झालेनंतर त्यावरुन उदभवणा-या वैयक्तिक व संयुक्तीक जबाबदारी तक्रारदार हा वैयक्तिक बॉंडमधील अटी व शर्थीनुसार पात्र ठरतो. या तांत्रिक मुद्दयांरुनही सदरचा अर्ज नामंजूर होणेस पात्र होत आहे. त्याबाबतचा मजकूर बरोबर आहे. तथापि या रकमा तक्रारदाराने कोठून आणल्या याबद्दल जाबदार यांना माहिती नाही. तक्रारदाराचेकडून जाबदार बँकेने संगनमताने काही कागदपत्रांवर तक्रारदारांच्या खोटया सहयां घेतल्या आहेत हे म्हणणे चुकीचे आहे. कर्जाची मुदती संपली नसताना जाबदार बँकेने ठेवपावत्या, बेकायदेशीररित्या जमा करुन घेतल्या हे म्हणणे चुकीचे आहे. तक्रारदार हे कोणाही इसमास जामीन राहिलेले नाहीत हे कथन खोटे आहे. जाबदार यांनी ठेवीची रक्कम तक्रारदारांना फसवून कर्जास वर्ग केली आहे ह कथन चुकीचे आहे. तक्रार अर्जातील कलम-5 मधील सर्व मजकूर चुकीचा आहे.
5. तक्रारदार तसेच कर्जदार श्री.संभाजी फगरे व त्यांचे भाऊ श्री.युवराज जनार्दन फगरे हे मौजे यळगुड येथील कायमचे रहिवासी असून फगरे यांचा व्यवसाय शेती व चांदीचे दागिने बनवून विक्री करणेचा तसेच चांदीच्या व्यापा-यांना चांदीचे दागिने बनवून पुरवठा करणेचा व्यवसाय आहे. फगरे बंधूनी रक्कम रु.8,00,000/- जाबदार यांचेकडे कर्जाची मागणी करुन तक्रारदार पांडूरंग घुणके यांना जामीनदार म्हणून निश्चित केले व तक्रारदारांनी जामीन राहणेचे मान्य करुन सही केली आहे. दि.19.12.2012 रोजी कर्ज मंजूरीपत्र तसेच दि.28.03.2012 रोजी तक्रारदारांनी कर्जदार श्री.फगरे बंधुसह जाबदार बँकेचे हक्कामध्ये श्री.फगरे यांचे स्थावर मिळकतीबद्दल नोंदणीकृत 1435/2012 या दस्त गहाणदस्त लिहून दिला असून त्या दस्तामध्ये तक्रारदारांनी जामीनदारांचा अटीस अधीन राहून सही केलेली आहे. सबब, फगरे बंधूंचे कर्ज दि.31.12.2012 रोजी थकीत गेलेने तक्रारदारांनी आपले कर्तव्यात कसुर केलेने सदरचे ठेवींची रक्कम कर्जास जमा केलेली आहे.
6. तक्रारदारांच्या सर्व पावत्यां, या Reinvestment Deposits होते. सदरच्या पावत्या या फगरे यांचे कर्जास लीन होत्या. जामीन दस्तातील कराराप्रमाणे अटी व शर्थीनुसार तक्रारदारांचे बँकेतील ठेवी फगरे यांचे कर्जखातेस जमा करुन घेणेस जाबदार बँकेस कायदेशीर हक्क व अधिकार आहे. सबब, तक्रारदारची खोटी तक्रार नामंजूर करुन जाबदार बँकेस तक्रारदारांचेकडून रक्कम रु.25,000/- देवविणेत यावे.
7. जाबदार यांनी अर्जासोबत तक्रारदार व मुळ कर्जदार यांचा कर्ज मागणी अर्ज, कर्ज मंजूर केलेचे आणि तक्रारदार व कर्जदार यांनी कर्जाच्या अटीवर कर्ज घेणेस कबूल असलेचे मान्यता पत्र, तक्रारदार व जाबदार यांचे कर्ज सुविधा मिळणेचे मागणीपत्र, कर्जदारांनी बँकेच्या हक्कात लिहून दिलेली वचनचिठ्ठी, तक्रारदाराने कर्जास लिहून दिलेला वैयक्तिक जामीन बॉंन्ड, कर्जदार व तक्रारदार यांनी बँकेच्या हक्कात लिहून दिलेला नोंदणीकृत गहाणदस्त, वरील गहाणदस्त नोंद केलेची पावती, कर्जदाराच्या कर्जखातेचा उतारा, वरील कर्जखातेच्या उता-याबाबतचे सर्टिफिकेट, श्री.अमर शरद पाटील यांना वि.प.बँकेने दिलेले अधिकारपत्र, श्री.बाहूबल्ली मल्लाप्पा कोथळी, शाखा मॅनेजर यांचे शपथपत्र, श्री.अमर शरद पाटील यांचे सरतपासाचे शपथपत्र, न्यायनिर्णय, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
8. तक्रारदारांची तक्रार, दाखल पुरावे व जाबदार यांचे लेखी कथन यावरुन मंचासमोर खलील मुद्दे उपस्थित होतात.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार हे ग्राहक आहेत काय ? | होय |
2 | जाबदार बँकेने तक्रारदारांना त्यांची ठेवीची रक्कम परत न करुन त्यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे का ? | होय |
3 | तक्रारदार हा त्याने मागितलेल्या मागण्यां मिळणेस पात्र आहे काय ? | होय, अंशत: |
4 | आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवरण:-
9. मुद्दा क्र.1:- तक्रारदाराने जाबदार बँकेत मुदतठेव योजनेअंतर्गत पावती क्र.F.D.No.1000714620000096,F.D.No.1000714620000097,F.D.No.1000714620000098, F.D.No.1000714620000099 (एकूण चार) ठेवपावत्यां ठेवलेल्या होत्या व आहेत. सदरच्या ठेवपावत्यांच्या साक्षांकित प्रतीही तक्रारदारांनी आपले कागद यादीबरोबर दाखल केले आहेत व जाबदार बँकेने आपल्या कथनांमध्ये त्या मान्यही केलेल्या आहेत. सबब, उभयप्क्षांमध्ये याबद्दल वाद नाही. सबब, तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये सेवा घेणार व सेवा देणार हे नाते निर्माण झालेले आहे. सबब, तक्रारदार हा जाबदार बँकेचा ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम-2(1)(डी) खाली ग्राहक होतो या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
10. मुद्दा क्र.2 ते 4:- तक्रारदाराने जाबदार बँकेत पावती क्र.F.D.No.1000714620000096, F.D.No.1000714620000097, F.D.No.1000714620000098, F.D.No.1000714620000099 अशा चार ठेवपावत्यां मुदतठेव योजनेअंतर्गत ठेवलेल्या होत्या व आहेत. याबद्दल उभय पक्षांमध्ये वाद नाही. सबब, जाबदार यांनी सदरचे तक्रारदार, हे ग्राहकच होत नसलेचा आक्षेप हे मंच फेटाळून लावत आहे. तक्रारदारांच्या सदरच्या ठेवपावत्यांचा मुदतीही संपलेल्या आहेत. तथापि सदरच्या ठेवपावत्या हा कर्जदार श्री.संभाजी जनार्दन फगरे व श्री.युवराज जनार्दन फगरे यांचे कर्जास तारण असलेने व सदरचे कर्जाची फेड हे वर नमुद जामीनदार करत नसलेने तसेच तक्रारदारांचे ठेवी सदरचे कर्जास लीन असलेने त्या वर्ग करणेत आल्या आहेत. सबब, सदरचे ठेवपावत्या कर्जास वर्ग करणेचा पूर्ण अधिकार हा जाबदार बँकेस आहे असे कथन जाबदार बँकेचे आहे व सदरचे कथनाचे पृष्ठर्थ जाबादार बँकेने अमर शरद पाटील यांचे शपथपत्रही दाखल केले आहे. सदरचे कथनाबरोबर जाबदार बँकेने तक्रारदार व मुळ कर्जदार यांचा कर्ज मागणी अर्ज तक्रारदाराने कर्जास वैयक्तिक लिहून दिलेला बॉंड तसेच नोंदणीकृत गहाणखत हे सर्व कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
11. तथापि तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत जाबदार बँकेत ठेवलेल्या ठेवपावत्यांच्या साक्षांकित केलेल्या प्रतीं दाखल केलेल्या आहेत. तसेच तक्रारदाराने स्वत:चे सरतपासाचे अॅफीडेव्हीटही दाखल केले आहे. वर नमुद तक्रारदारांच्या ठेवपावत्या या लीन असलेने या फगरे बंधुंच्या कर्जास वर्ग करुन घेतल्या असे जाबदार बँकेचे कथन आहे. मात्र संबंधीत पावत्या सदरचे कर्जास लीन असलेबाबतचा कोणताही पुरावा या मंचासमोर आलेला नाही. सबब, सदरच्या पावत्यां लीन नसलेकारणाने वर्ग करणेचा प्रश्नच उदभवत नाही.
12. तसेच जाबदार बँकेने दाखल केले कागदपत्रांचे अ.क्र.6 वर कर्जदार व तक्रारदार यांनी बँकेचे हक्कात लिहून दिलेला नोंदणीकृत गहाणखत दाखल केला आहे. सदर गहाणखतावरुन तक्रारदार पांडूरंग घुणके हे सदरचे फगरे बंधुचे कर्जास गॅरंटर आहे ही बाब Crystal clear आहे. तथापि जाबदार बँकेने सदरचे गहाणखताद्वारे कर्जदार फगरे बंधुंनी प्रॉपर्टी ही मॉरगेज केलेली आहे व शेडयूल-II मध्ये सदर प्रॉपर्टीचे वर्णनही आलेले आहे. सबब, या मंचासमोर वादाचा पहिला मुद्दा उपस्थित होतो. तो जाबदार बँकेने सदरचे जामीनदारास (तक्रारदारास) ठेवपावत्या वर्ग करुन घेताना Due Process of low, follow केली आहे काय ? मात्र जाबदार बँकेने तक्रारदार कर्जदार फगरे बंधू यांने मॉरगेज केले प्रॉपर्टीला धक्का न लावता तक्रारदारांचे ठेवपावत्या सदरचे फगरे बंधूचे कर्जास वर्ग केलेल्या आहेत. याहीपुढे की सदरच्या ठेवपावत्या या जाबदार यांचे कथनानुसार लोन केलेल्या होत्या असे कथन केले आहे. मात्र तसा कोणताही पुरावा या मंचासमोर दाखल केलेला नाही. जाबदार बँकेने तक्रारदार (जामीनदार) यांचे ठेवपावत्या कर्जास वर्ग करणेपूर्वी प्रथम कर्जदार यांचे तारण प्रॉपर्टीचा विचार करणे जरुरीचे होते. मात्र जाबदार बँकेने या संदर्भात तसे काही प्रयत्न केलेचे दिसून येत नाही. सबब कोणतीही Due Process of low ची अंमलबजावणी न करता जाबदार यांनी तक्रारदारांचे ठेवरक्कमा कर्जास वर्ग करुन व त्यांची ठेवपावत्यांची होणारी रक्कम न देऊन सेवेत त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, तक्रारदार हा त्याने केलेली ठेवपावत्यांची व्याजासहीत होणारी रक्कम मिळणेची केलेली मागणी मिळणेस तो पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत झाले आहे.
13. तक्रारदार व जाबदार यांनी या संदर्भात काही उपरोक्त न्यायालयाचे पुर्वाधार दाखल केलेले आहेत.
अ. तक्रारदारांनी दाखल केलेले-
(1) Supreme Court of India
Union Bank of India …Appellant
Versus
Manka Nayaryan …Respondent
Head Note:- Contract Act, 1872-S-128-Civil Procedure Code, 1908 OR.34-The Appeal is directed against the order passed by a learned Single Judge of the High Court-The Appellant to exhaust the remedies available in law against the mortgaged property and the principal debtor in execution of decree obtained by it before proceeding to execute the same against the Guarantor-The court was considering the correctness of a direction to the creditor to enforce his decree against the surety after exhausting the remedies against the principal debtor-The High Court was in error in making the direction-Held-it is evident that the decree holder had proceeded against the mortgaged property against the principal debtor-the High Court will dispose of the matter in accordance with law- ordered accordingly.
From this is evident that the decree0holder had proceeded against the mortgaged property and also against the principal debtor. If this is correct, execution against the guarantor was maintainable. In view of this disclosure, we remand the matter to the High Court giving opportunity to the appellant to plead this case before the High Court and seek execution of the decree against the respondent with liberty to the respondent to dispute the correctness of this statement. The High Court will dispose of the matter in accordance with law. No order as to costs. Appeal dismissed.
3.4:- न्याय निवाडे:-
1. कर्जदाराची मालमत्ता प्रथम नंतर जामीनदार:-
2. प्रथम कर्जदार नंतर जामीनदार:- कर्ज वसुली : बँक व कर्जदार-
बँकेने सर्वोच्च न्यायालयाचा दर्जा ठोठावला. जामीनदारांकडून वसुली करण्यापूर्वी कर्जदाराविरुध्द वसुलीचे प्रयत्न केलेच पाहीजे असे बंधन टाकता येणार नाही अशी भूमिका बँकेने मांडली. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने बँकेच्या प्रतिपादनाशी सहमती न दर्शविता हुकूमनाम्याप्रमाणे वसुली मिळविताना प्रथम कर्जदाराच्या गहाण मिळकती संदर्भात वसुलीचे प्रयत्न करावेत व तदनंतर जामीनदाराविरुध्द वसुली मागणी करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश योग्य असल्याचे मत प्रकट केले. बँकेची जामीनदाराविरुध्द वसुली अमान्य करुन बँकेचे अपील फेटाळले.
(युनियन बँक विरुध्द मान्क नारायण) ए.आय.आर.1987 एस.सी.1078
तसेच जाबदार बँकेनेही
(1) बँकींग लॉ अॅन्ड प्रॅक्टीस, चॅप्टर-7
(2) एम.एल.जे.2012(5) पान नं.17
(3) 2001 (3) All MR page no.32
तथापि जाबदार यांनी दाखल केले, उपरोक्त न्यायालयाचे निवाडयांचा विचार करता असे निरीक्षण नोंदविले आहे कि, यामध्ये Deposits वर General Lien असलेने सदरच्या पावत्या जाबदार बँकेस कर्जखातेस जमा करता येतात. मात्र सदरचे तक्रार अर्जाचे कामी असे ठेवपावत्यांवर lien असलेचा कोणताही पुरावा जाबदार बँकेने या मंचासमोर आणलेला नाही. सबब, सदरचे पुर्वाधारांचा आदर करीत, हे पुर्वाधार या तक्रार अर्जाचे कामी लागू होत नसलेचे दिसून येते.
14. सबब, वर नमुद तक्रारदारांचे पुर्वाधारांचा विचार करता, आधी कर्जदाराची मालमत्ता व नंतर जामीनदार ही बाब स्पष्ट होते.
15. जाबदार वर नमुद कारणास्तव जाबदार बँकेने, तक्रारदारांना त्यांनी ठेवलेल्या ठेव पावती क्र.F.D.No.1000714620000096, F.D.No.1000714620000097, F.D.No.1000714 620000098, F.D.No.1000714620000099 या व्याजासहीत देणेचे आदेश करते. तसेच तक्रारदारांनी मागितलेली मानसिक त्रासापोटी व नुकसानभरपाईपोटी मागितलेली रक्कम या मंचास संयुक्तिक वाटत नसलेने नुकसानभरपाईपोटी रक्कम रु.25,000/- तसेच तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- देणेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2 जाबदार बँकेने, तक्रारदारास त्यांचे नमुद ठेव पावती क्र.
1. F.D.No.1000714620000096
2. F.D.No.1000714620000097
3. F.D.No.1000714620000098
4. F.D.No.1000714620000099
अन्वये ठेवीवरील नमुद व्याजदराने होणारी व्याजासहीत रक्कम तक्रारदारांना अदा करावी.
3 जाबदार बँकेने, तक्रारदारास सदरची ठेवीची रक्कम मुदत संपलेपासून ते संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत मुळ ठेव रक्कमेवर द.सा.द.शे.6टक्के व्याज दराने अदा करावी.
4 जाबदार बँकेने, तक्रारदारास नुकसानभरपाईपोटी व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- (रक्कम रुपये पंचवीस हजार फक्त) देणेचे आदेश करणेत येतात.
5 जाबदार बँकेने तक्रारदारांना तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- देणेचे आदेश करणेत येतात.
6 वर नमुद आदेशाची पूर्तता वि.प.यांनी 45 दिवसांत करणेचे आहे.
7 विहीत मुदतीत वि.प.यांनी मे.मंचाचे आदेशांची पूर्तता न केलेस तक्रारदारांना वि.प.विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-25 व कलम-27 प्रमाणे कारवाई करणेची मुभा राहील.
8 आदेशाच्या सत्यप्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.