निकालपत्र :- (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष)
(1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले.. सुनावणीचेवेळेस, सामनेवाला यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. तक्रारदार तसेच त्यांचे वकिल गैरहजर आहेत.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी,
तक्रारदारांचे पती हे श्री शंभो विविध कार्यकारी सेवा संस्था, मेघोली, ता.भुदरगड, या संस्थचे सभासद झाले. सदर संस्थेने त्यांच्या सभासदांसाठी ग्रुप जनता अपघात विमा सामनेवाला विमा कंपनीकडे उतरविला होता. तक्रारदारांचे पती, बळवंत बाबुराव मोघर्डेकर यांचा दि.02.05.2009 रोजी मोटर सायकलवरुन जात असताना समोरुन चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने ट्रक नं.सीआरए 9797 या ट्रकने धडक दिली व सदर अपघातात ते गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. याबाबत भुदरगड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.27/2009 अन्वये गुन्हा नोंद झाला. त्यांनतर तक्रारदारांनी सामनेवला विमा कंपनीकडे क्लेम फॉर्म भरुन क्लेमची मागणी केली असता कागदपत्रांची पूर्तता केली नाही या कारणावरुन तक्रारदारांचा क्लेम दि.10.09.2009 रोजीच्या पत्रान्वये नाकारला. तक्रारदार या गरीब, अशिक्षित महिला आहेत. त्यांच्या पतीच्या अपघाती निधनानंतर त्यांचे मनावर आघात झालेला आहे. सबब, क्लेम रक्कम रुपये 1 लाख व्याजासह देणेचे आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे
.
(3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत एफ.आय.आर.रिपोर्ट, गु.रं.नं.27/09 मधील खबरी जबाब, पंचनामा, डॉ.निर्मले हॉस्पिटलचे पत्र, इन्क्वेस्ट पंचनामा, पी.एम्.रिपोर्ट, मृत्यूचा दाखला, शाखा सोडल्याचा दाखला, ओळखपत्र, प्रतिज्ञापत्र, रेशनकार्ड, सामनेवाला यांचे दि.10.09.2009 रोजीचे पत्र इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
(4) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सामनेवाला विमा कंपनीने वारंवार पत्रे पाठवून कागदपत्रांची पूर्तता करावी या बाबत कळविले होते. परंतु, त्या अनुषंगाने कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्याने क्लेम फाईल बंद करणेत आली. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे.
(5) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. तसेच, सामनेवाला कंपनीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकलेला आहे. उपलब्ध कागदपत्रांमध्ये खबरी जबाब, पंचनामा, पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट इत्यादीचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी तक्रारीत कथन केलेप्रमाणे तक्रारदारांच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला आहे, ही वस्तुस्थिती या मंचाचे निदर्शनास येते आहेत. तसेच, तक्रारदारांचे पती हे श्री शंभो विविधी कार्यकारी सेवा संस्थेचे सभासद होते व सदर संस्थेने त्यांच्या सभासदांसाठी सामनेवाला विमा कंपनीकडे ग्रुप जनता अपघाती विमा उतरविला होता, ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. प्रस्तुत प्रकरणामध्ये सामनेवाला विमा कंपनीने दि.10.09.2009 रोजी कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याने दावा फाईल बंद करणेत आलेबाबतचे पत्र दिले आहे. सदर पत्राचे अवलोकन या मंचाने केले आहे. युक्तिवादाचेवेळेस, सामनेवाला यांच्या वकिलांनी पॉलीसीबाबतची वस्तुस्थिती तसेच अपघाताची वस्तुस्थिती मान्य केली आहे. परंतु, तक्रारदारांनी क्लेम फॉर्मसोबत त्या अनुषंगाने कोणतीही कागदपत्रे पाठविली नाही या वस्तुस्थितीकडे या मंचाचे लक्ष वेधले आहे. तसेच, तक्रारदारांचा क्लेम मंजूर करणेस कोणतीही हरकत नाही, पंरतु त्यावरती कोणतेही व्याज देणेबाबतचे आदेश होवू नयेत अशी विनंती केली आहे. सदर प्रतिपादनाची न्यायिक नोंद हे मंच घेत आहे. वस्तुस्थितीचा विचार करता सामनेवाला विमा कंपनीकडे अपघाती संबंधीचे कागदपत्र तक्रारदारांनी पाठवून देणे आवश्यक होते, तसे त्यांनी पाठवून दिले नाहीत. परंतु, उपरोक्त विवेचन विचारात घेता तक्रारदार हे क्लेम रक्कम रुपये 1 लाख मिळणेस पात्र आहेत. परंतु, त्यावर कोणतेही व्याज मिळणेस पात्र असणार नाहीत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब आदेश.
आदेश
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
2. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना विमा क्लेम रक्कम रुपये 1,00,000/- (रुपये एक लाख फक्त) द्यावेत.
3. खर्चाबाबत आदेश नाहीत.