नि का ल प त्र :- (दि.12/10/2011) (द्वारा-श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदार हे शेतकरी आहेत. राज्य शासनातर्फे तक्रारदारांच्या पतीचा शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविलेला आहे. तक्रारदारांचे पती मयत पांडूरंग मोरबाळे हे दि. 17/09/2009 रोजी दुपारी 2.10 वाजणेचे सुमारास शेताकडे पिक पाहण्यासाठी गेले असता त्यांच्या उजव्या पायाचे घोटयास सर्पदंश झाला व त्यांना उपचारासाठी सी.पी.आर. हॉस्पीटल, कोल्हापूर येथे दाखल केले. उपचारादरम्यान दि. 18/09/2009 रोजी तक्रारदारांचे पती मयत झाले. याबाबत करवीर पोलिस स्टेशनला अपघाताची वर्दी दिली. त्यानंतर घटना स्थळाचा पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, पोस्ट मार्टेम केलेले आहे. त्यामध्ये तक्रारदारांच्या पतीचा मृत्यू हा सर्पदंशाने झाला असलेबाबत मेडीकल अहवाल दिलेला आहे. तक्रारदारांनी आवश्यक ते सर्व कागदपत्रांसह दि. 1/04/2010 रोजी क्लेम फॉर्म भरुन क्लेमची मागणी केली असता तसेच वारंवार भेटून तसेच फोनवरुन चौकशी केली असता सामनेवाला कंपनीने क्लेम मंजूर करीत आहे असे सांगितले परंतु अद्यापी क्लेम मंजूर केला नाही. व त्याबाबत काहीही कळविलेले नाही. सामनेवाला यांना वकिलामार्फत नोटीसही पाठविली होती त्यासही उत्तरही दिलेले नाही. सबब, तक्रारदारांची विमा क्लेमची रक्कम रु. 1,00,000/- दि. 1/04/2010 पासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासहीत मिळावी अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत तक्रारदार यांचा अर्ज, क्लेम फॉर्म नं. 1, क्लेम फॉर्म नं. 2 तलाठयाचे प्रमाणपत्र, गट नं.850 चा 7/12 उतारा, खाते नं. 419 चा 8 अ चा उतारा, सर्व्हे नं. 201 चा सन 1960-61/62-63 चा 7/12 उतारा, पांडूरंग गोपाळ मोरबाळे यांच्या जमिनीचा एकत्रीकरणाचा उतारा, गट नं. 850 चा 1963 ते 1979 चा 7/12 उतारा, वारसा डायरी उतारा, तक्रारदार यांचे पतीचे मतदार ओळखपत्र, मृत्यूचा दाखला, पावती, कॉज ऑफ डेथ सर्टीफीकेट, पी.एम. रिपोर्ट, इन्क्वेस्ट पंचनामा, पोलिस अहवाल, तक्रारदार यांचे ओळखपत्र व रेशनकार्ड, तक्रारदार यांचे मतदान ओळखपत्र, फायनल ओपिनियन ऑफ कॉज ऑफ डेथ सर्टीफीकेट, व्हीसेरा मिळणेबाबतचा अर्ज, लॅब रिपोर्ट, सामनेवाला यांना वकिलामार्फत पाठविलेली नोटीस, पोस्टाची पोहोच पावती इत्यादींच्या प्रती व शपथपत्र दाखल केलेले आहे. (4) सामनेवाला विमा कंपनीने त्यांच्या म्हणण्याअन्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारलेली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, पोस्ट मार्टेमच्या अहवालामध्ये मृत्यूचे कारण अनिश्चित असल्याने पुढील तपासासाठी व्हिसेरा राखून ठेवण्यात आलेला होता. फोरॅन्सिक लॅबोरेटरी, पुणे यांचेकडे व्हिसेरा पाठवून दिला व त्यांच्या अहवालानुसार मृत्यूचे कारण हे विषाचे कारणाने झाला नसल्याचे अहवालामध्ये नमूद आहे. तसेच केमीकल अहवाल हा पुढील तपासासाठी राखून ठेवण्यात आलेला आहे. त्यामध्ये सामनेवाला कंपनीची कोणतीही सेवा त्रुटी झालेली नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे. (5) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणणेसोबत व्हिसेरा पुणे येथे पाठवलेबाबत करवीर पोलिस ठाणे यांचे पत्र, केमीकल लॅबोरेटरी, पुणे यांचे व्हिसेराचे तपासणी सर्टीफीकेट, डेथ सर्टीफीकेट सी.पी.आर. हॉस्पीटल, कोल्हापूर इत्यादींच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (6) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकला तसेच उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केलेले आहे. तक्रारदार हे शेतकरी आहेत. शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत सामनेवाला विमा कंपनीकडे विमा उतरविलेला आहे. तक्रारदारांची तक्रार ही तक्रारदारांच्या पतीचा मृत्यू हा सर्पदंशाने झालेला आहे. व सदरचा मृत्यू हा अपघाती झालेला असल्याने तक्रारदारांना क्लेम रक्कम सामनेवाला विमा कंपनीने दिलेली नाही या मुद्दयाकडे या मंचाचे लक्ष वेधले आहे. परंतु त्याअनुषंगाने उपरोक्त कागदपत्रांचे अवलोकन केले असता सर्पदंशाने मृत्यू झाल्याबाबतची वर्दी करवीर पोलिस स्टेशनला दिलेली आहे. त्याबाबतचा वर्दीजबाब प्रस्तुत कामी दाखल आहे. तसेच मरणोत्तर पंचनामा दाखल केलेला आहे तसेच पोस्टमार्टेम रिपोर्ट या मंचाचे निदर्शनास आणून दिलेला आहे. सदर पोस्ट मार्टेम रिपोर्टचे अवलोकन केले असता सदर पोस्ट मार्टेम रिपोर्टमध्ये कॉलम 16 या ठिकाणी सर्पदंशाच्या खुणा आढळून आल्याचे नमूद केलेले आहे. व सदरचा मुद्दा विचारात घेता मरणोत्तर पंचनामा व सी.पी.आर. हॉस्पीटल येथील मृत्यूच्या कारणांचा दाखला इत्यादी कागदपत्रे विचारता घेता तक्रारदारांच्या पतीचा मृत्यू हा सर्पदंशाने झाल्याचे दिसून येत आहे. सामनेवाला विमा कंपनीने त्याअनुषंगाने व्यापक दृष्टीकोन ठेवून व वस्तुनिष्ट परिस्थितीचा विचार करुन तक्रारदारांच्या क्लेमबाबत कार्यवाही करणे आवश्यक होते. उपरोक्त विवेचनाचा विचार करता तक्रारदारांच्या पतीचा मृत्यू हा सर्पदंशाने झाला असल्याने तक्रारदार हे क्लेम रक्कम व्याजासह मिळणे पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब आदेश, - आ दे श - 1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना क्लेम रक्कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) द्यावी. तसेच, सदर रक्कमेवर दि.1/04/2010 पासून संपूर्ण रक्कम अदा होईपावेतो द.सा.द.शे. 9 टक्केप्रमाणे व्याज द्यावे. 3. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- ( अक्षरी रुपये एक हजार फक्त) द्यावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |