जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – २२०/२०१२
तक्रार दाखल दिनांक – ३१/१२/२०१२
तक्रार निकाली दिनांक – १३/११/२०१२
श्री नितीन भालचंद्र विसपुते
वय – ५०, धंदा – व्यापार व वाहन मालक
रा.देसाई गल्ली, शिंदखेडा
ता.शिंदखेडा, जि. धुळे . तक्रारदार
विरुध्द
दि.ओरीएंटल इन्शुरन्स कंपनी लिमि.
शाखा कार्यालय, धुळे
द्वारा महाशय शाखाधिकारी सो.
के.एन. भावसार कॉम्प्लेक्स,
तिसरा मजला ग.नं.५,
शाळा क्र.९ चे समोर, धुळे . सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
(मा.सदस्या – सौ.के.एस. जगपती)
उपस्थिती
(तक्रारदारातर्फे – अॅड.श्री.एम.बी. जैन)
(सामनेवालातर्फे – अॅड.श्री.एस.आर. वाणी)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्या – सौ.के.एस. जगपती)
१. सामनेवाले यांनी सेवा देण्यात त्रुटी केली आणि विमा पॉलिसीची रक्कम देण्यास टाळाटाळ केली, या कारणावरून तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, तक्रारदार हे शिंदखेडा जिल्हा धुळे येथिल रहिवासी असून टाटा कंपनीचे इंडिका व्हिस्टा MH-18/W3641 या क्रमांकाचे वाहन त्यांच्या मालकीचे आहे. सदर वाहनाचा विमा सामनेवाला कंपनी दि.ओरीएंटल इन्शुरन्स कंपनी लि. कडून दि.२९/०५/२०१० ते २८/०५/२०११ या कालावधीसाठी काढलेला असून त्याचा क्रमांक PRO NO.B303626 आहे. सदर पॉलिसीचा हप्ता रूपये १०,८४२/- तक्रारदार यांनी भरला आहे. दिनांक ०२/०६/२०१० रोजी सोनगिरकडून दोंडाईचाकडे जात असतांना सदर वाहनाचा अपघात झालेला होता. त्यात त्यांच्या नातेवाईकांचे निधन व एकास गंभीर दुखापत झालेली होती. तसेच इंडिका व्हिस्टा कारचे मागिल मडगार्ड तुटले, चारही दरवाजे व टप तुटून बेंड झाले, डाव्या चाकाचे नुकसान झाले, काच तुटून वायफर तुटले, साईड ग्लास व इंजिन दाबले गेले, चेसीस बेंड झाले. यासंबंधी अपघाताची नोंद पोलीस स्टेशनला करण्यात आली होती. त्याबाबत पोलिसांनी दि.०८/०६/२०१० रोजी पंचनामा केलेला आहे. तक्रारदारांचे पुढे म्हणणे असे की, सदर अपघाताग्रस्त झालेले वाहन उज्वल ऑटोमोटिव्ह प्रा.लि. धुळे येथे दुरूस्तीसाठी आणले असता रूपये ३,७१,३९१/- दुरूस्ती खर्च तसेच लेबर चार्जेस व पेंटीगबाबत रू.५३,१०९/- खर्च झाला.
सदर अपघताची सूचना तक्रारदार यांनी सामनेवाले यांना दिली व विमा क्लेमचा अर्ज दाखल केला. सामनेवाले यांच्या अधिका-यांनी सदर वाहनाचा सर्व्हे देखील केला. क्लेमची रक्कम मिळण्यासाठी तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे सर्व कागदपत्रांसह विमा क्लेम अर्ज दि.२६/०७/२०१० रोजी जमा केला व रक्कम रूपये ४,२४,५००/- व्याजासह मिळावेत म्हणून मागणी केली. सदर क्लेमची रक्कम सामनेवाला यांनी तक्रारदारास दिली नाही. वेळोवेळी सुचना देवून आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता करून सामनेवाला क्लेमची रक्कम देत नाही व त्यासंबंधीत कोणताही निर्णय घेत नाही म्हणून त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे.
तक्रारदारांनी आपल्या मागणीत नुकसान भरपाईची रक्कम रूपये ४,२४,५००/- ची मागणी केली आहे. तसेच त्यावर दि.२६/०७/२०१० पासून रक्कम वूसल होईपर्यंत द.सा.द.शे. १२ टक्के प्रमाणे व्याज, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रूपये २५,०००/- आणि तक्रारीचा खर्च रूपये १०,०००/- मिळावा अशी मागणी केली आहे.
३. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीच्या पुष्ट्यर्थ नि. ५ वर दस्तऐवज यादी दाखल केली आहे. त्यात फिर्याद, वाहन अपघातसंबंधी पोलिसांना दिलेली खबर, घटनास्थळ पंचनामा, वाहनाचे आर.सी. बुक, ड्रायव्हिंग लायसन्स, विमा पॉलिसी कव्हर नोटची प्रत, मोटर दावा क्लेम फॉर्मची प्रत, वाहनाच्या दुरूस्तीसाठी लागलेल्या खर्चाचे बिल, दुरूस्तीसाठी लागणा-या लेबर चार्जेसच्या इस्टीमेटची प्रत, सामनेवाला यांना अपघातासंबंधी दिलेली सूचना पत्र, सामनेवाला यांना दिलेली नोटीसची प्रत, सामनेवाला यांना मिळालेल्या रजिस्टर पोस्टाची प्रत इत्यादी दस्तऐवज दाखल केले आहे.
४. सामनेवाला हे हजर होवून त्यांनी नि. १४ वर खुलासा दाखल केलेला आहे. सदर खुलाशामध्ये सामनेवाला यांनी तक्रारदाराचे संपुर्ण म्हणणे नाकबुल केलेले आहेत. तक्रारदाराची विमा क्लेमची रक्कम ही अवाजवी असल्यामुळे सामनेवाला यांनी मान्य केलेली नाही. सामनेवाला यांनी रिपेअरिंग बेसीसवर सदर क्लेम तक्रारदारास देण्याचे मान्य केलेले आहे. त्यामुळे सेवेत त्रुटी केलेली नाही असे सामनेवालेंचे म्हणणे आहे.
५. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले यांनी खुलाशासोबत दाखल केलेली कागदपत्रे, उभयपक्षांचा लेखी युक्तिवाद आणि उभयपक्षांच्या विद्वान वकिलांनी केलेला युक्तिवाद पाहता आमच्यासमोर पुढील मुददे उपस्थित होतात.
मुददे निष्कर्ष
- तक्रारदार हे विमा पॉलसीची रक्कम
मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
ब. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
६. मुद्दा ‘अ’- तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून त्यांच्या वाहनाचा विमा उतरविला होता. त्याचा पॉलीसी क्रमांक PRO NO.B303626 असा होता. पॉलिसीचा कालावधी दिनांक २९/०५/२०१० ते २८/०५/२०११ असा होता. तक्रारदार यांच्या वाहनाला दिनांक ०२/०६/२०१० रोजी अपघात झाला. या अपघातात तक्रारदार यांच्या वाहनाचे नुकसान झाले. या मुद्यांबाबत उभयपक्षांमध्ये कोणताही वाद नाही. वरील घटनाक्रम सामनेवाले यांनीही त्यांच्या खुलाशामध्ये आणि युक्तिवादामध्ये मान्य केला आहे.
तक्रारदार यांच्या वाहनाची रिस्क कव्हर रूपये ३,७९,०००/- एवढी होती. अपघातामध्ये त्यांच्या वाहनाचे नुकसान झाल्याने तक्रारदारांनी रिपेअरींगसाठी लागणारा खर्च रक्कम रूपये ४,२४,५००/- व्याजासह मागितलेला आहे. परंतु वरील रक्कम देण्यास सामनेवाला तयार नाही. सामनेवाला हे सदर विमा क्लेम ची रक्कम रिपेअरींग बेसीसवर देण्यास तयार आहे.
याउपरही सामनेवाला यांनी अपघातग्रस्त वाहनाचा सर्व्हे केला. त्यानुसार रिपेअरिंग बेसीस तत्वावर रक्कम रूपये २,८३,२३५/- एवढी रक्कम सर्व्हेनुसार देण्याचे सुचविले आहे असे त्यांच्या खुलाशावरून दिसून येते.
वरील मुद्याचा विचार करता तक्रारदार यांच्या वाहनांचे नुकसान झालेले असले तरी सामनेवाला यांनी उपस्थित केलेले तांत्रिक मुद्दे दुर्लक्षित करून चालणार नाही. सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारलेला नाही. ते रिपेअरिंग बेसिसवर तक्रारदार यांना विम्याची रक्कम देण्यास तयार आहेत. तथापि, तक्रारदार यांनीच ती रक्कम स्विकारली नाही, असे सामनेवाले यांचे म्हणणे आहे. परंतु त्यावेळेस सामनेवाला हे रिपेअरींग बेसीसवर तक्रारदार यांना सदरची रक्कम देण्यास तयार आहे. असा कोणताही पुरावा सामनेवाला यांनी मंचासमोर आणलेला नाही. तक्रारदार यांनीसुध्दा रू.४,२४,५००/- एवढ्या रकमेची मागणी केली आहे. ही रक्कम ते कोणत्या आधारावर मागत आहेत याचा समाधानकारक खुलासा त्यांनी केलेला नाही. सामनेवाले यांनी अपघातग्रस्त वाहनाचा सर्व्हे केल्यानंतर रू.२,८३,२३५/- ही रक्कम निश्चित केली होती. ती देण्यास ते तयारही होते. त्यामुळे तेवढी रक्कम मिळण्यास तक्रारदार पात्र आहे असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा ‘अ’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
७. मुद्दा ‘ब’- वरील मुद्यांचा विचार करता तक्रारदार हे रिपेअरिंग बेसीसवर विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र आहे. सामनेवाले यांनी ती रक्कम देण्याची तयारी दाखविली होती. यावरून असे स्पष्ट होते की, सामनेवाला यांनी तक्रारदारांचा पूर्ण क्लेम नाकारलेला नाही. त्यासंबंधी कोणताही पुरावा तक्रारदारांनी समोर आणलेला नाही. तसेच सामनेवाले यांना जर रिपेअरिंग बेसीसवर तक्रारदार यांना विम्याची रक्कम दयायची असती तर त्यांनी तसा पत्रव्यावहार तक्रारदार यांच्याशी करायला पाहीजे होता. यासंबंधी कोणताही पुरावा मंचासमोर आलेला नाही. सामनेवाला यांच्या या कृतीमुळे तक्रारदार यांना सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. त्यामुळे तक्रारदार यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला आहे असे आमचे मत आहे. याचा विचार होता आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२. सामनेवाले यांनी या आदेशाच्या प्राप्तीपासून ३० दिवसाच्या आत तक्रारदार यांना रिपेअरींग बेसीसवर विमा दाव्याची रक्कम रूपये २,८३,२३५/- अदा करावी.
३. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रू.५,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रूपये २,०००/- द्यावा.
४. उपरोक्त आदेश क्र.२ ची मुदतीत पुर्तता न केल्यास त्यानंतर संपूर्ण रक्कम देवूनहोईपर्यंत द.सा.द.शे. ६ टक्के व्याज देण्यास सामनेवाले जबाबदार राहतील.
धुळे.
-
(सौ.के.एस. जगपती) (श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.