जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – २०६/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २९/११/२०११
तक्रार निकाली दिनांक – २१/०७/२०१४
सैयद लियाकतअलि दिलावरअली,
वयः ५० वर्षे, धंदाः व्यापार,
रा.निजामपुर, ता.साक्री, जि.धुळे - तक्रारदार
विरुध्द
ओरीएंटल इन्शुरन्स कंपनी लि., धुळे
गल्ली नं.५, मराठी मुलींच्या शाळेजवळ, धुळे - सामनेवाले
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.श्री.बी.पी. पवार)
(सामनेवाले तर्फे – अॅड.सौ.एम.एम.पासेकर)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
१. तक्रारदार यांनी वाहनाचा विमा क्लेम मिळण्याकामी सामनेवाला विरूध्द सदरची तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदारचे थोडक्यात म्हणणे असे आहे की, तक्रारदाराच्या मालकीची माल ट्रक क्र.एम.एच.१५ ए.के. ३७८६ अशी असून तिचा सामनेवाले यांच्याकडे पॉलीसी क्र.१६१७९१/३१/२०११/१७१९ ने विमा काढलेला आहे. सदर वाहनाचा दिनांक २६/११/२०११ रोजी वाहन रोडवरून पडून पलटी होवून अपघात झाला आहे. त्यामध्ये वाहनाचे नुकसान झाले आहे. याकामी पोलीस स्टेशनला खबर देण्यात आली आहे. सदर अपघातात वाहनाचे नुकसान झाल्याबाबत विमा कंपनीला कळविण्यात आले आहे. सदर ट्रक दुरूस्त करून त्याची बिले सामनेवाला कंपनीला जमा केली आहे. त्याबाबत सामनेवाले यांनी सर्व्हे केला आहे. त्यामध्ये दुरूस्तीसाठी आलेला खर्च रूपये १,८५,१९०/- यामधून घसारा वजा जाता रूपये १,२७,०००/- तक्रारदारास देण्यास हरकत नाही असा अहवाल विमा कंपनीस दाखल केला. परंतु सदरची रक्कम सामनेवाले यांनी न देता सदरचा विमा क्लेम दि.१३/०७/२०१२ रोजीच्या पत्राने नामंजूर केल्याचे कळविले, त्यामुळे तक्रारदार यांना सदरची तक्रार या मंचात दाखल करणे भग पडले आहे.
३. तकारदारची विनंती अशी आहे की सामनवाले यांच्या कडून सर्व्हे रिपोर्ट प्रमाणे नुकसान भरपाई रुपये १,२७,०००/- व्याजासह, मानसिक त्रासाकामी रुपये १०,०००/- व अर्जाचा खर्च रूपये १०,०००/- मिळावेत.
४. याकामी सदर तक्रार अर्जामध्ये तक्रारदार यांनी शपथपत्र नि.२, दस्तऐवज यादी नि.६ सोबत १ ते ७ कागदपत्रे यामध्ये कंपनीचे पत्र, गाडीचे कागदपत्र, पोलीसांकडील कागदपत्रे इत्यादी कागदपत्रे दाखल केले आहे.
५. सामनेवाले यांनी त्यांचा लेखी खुलासा नि.१४ सोबत देऊन सदर अर्ज नाकारला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदारांनी क्लेम फॉर्म दाखल केल्यानंतर त्याची सत्यता पडताळणी करण्याकामी इन्व्हेस्टीगेटर श्री.पि.जी.गागरे यांच्याकडे प्रकरण सोपवून त्यांचा अहवाल मागविण्यात आला. त्या अहवालानुसार तक्रारदारांनी दाखल केलेल्या बिलाबात ती खोटे असल्याबाबत अहवाल दिला आहे. तसेच बिलांमधील पावत्यांवरील सहीची तफावत दिसुन येत आहे. तक्रारदाराने खोटे व बनावट बिल सादर केले. त्यामुळे सदर तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला आहे. त्यामुळे सदरची नुकसान भरपाई देण्यास सामनेवाले जाबाबदार नाही. सबब तक्रार अर्ज खर्चासह रदद करण्याची मागणी केली आहे.
सदर खुलाशासोबत सामनेवाले यांनी शपथपत्र नि.१५ सोबत दाखल केलेले आहे.
६. तक्रारदार व सामनेवाले यांचे शपथपत्र, पुराव्यासाठी दाखल कागदपत्रे व युक्तिवाद पाहता आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुददे निष्कर्ष
- तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? होय
- सामनेवाले यांनी सेवा देण्यात कमतरता
केली आहे काय ? होय
क. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
७. मुद्दा ‘अ’ - तक्रारदार यांनी त्यांच्या मालकीची माल ट्रक क्र.एम.एच.१५ ए.के.३७८६ अशी असून तिचा सामनेवाले यांच्याकडे पॉलीसी क्र.१६१७९१/३१/ २०११/१७१९ ने विमा काढलेला आहे. ही बाब सामनेवाले यांनी मान्य केलेली आहे, याबाबत वाद नाही. याचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत हे स्प्ष्ट होते. म्हणून मुद्दा ‘अ’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
८. मुद्दा ‘ब’- सदर ट्रकचा दिनांक २६/११/२०११ रोजी रोडवरून पलटी होऊन अपघात झाला आहे. त्याबाबत संबंधीत पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्याबाबतचे कादगपत्र, निजामपूर पोलीस स्टेशन येथील घटनेचा पंचनामा नि.६/५, वाहनाचे कागदपत्र नि.६/३, ड्रायव्हींग लायसन्स नि.६/४ सोबत दाखल केली आहे व यामध्ये पोलीसांकडील कागदपत्रे याचा विचार करता सदर वाहनाचा अपघात होवून वाहनाचे नुकसान झाले आहे व त्याकामी तक्रारदार यांना नुकसान सहन करावे लागले आहे हे स्पष्ट होते. सदरची नुकसान भरपाई मिळण्याकामी तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे विमा क्लेम दाखल केला. परंतु सामनेवाले यांनी तो नाकारला आहे. याबाबतचे पत्र नि.६/१ सोबत तक्रारदारांनी दाखल केले आहे. सदर दि.१३/०७/२०१२ चे पत्र पाहता, या पत्राप्रमाणे सामनेवाला यांनी बिलामध्ये फेरबदल असल्यामुळे सदरचा क्लेम नाकारलेला दिसत आहे. याबाबत सामनेवाले यांनी असा बचाव घेतला की, इन्व्हेस्टीगेटरच्या अहवाला प्रमाणे तक्रारदारने दाखल केलेले बिल खोटे व बोगस असल्याचा निष्कर्ष आलेला आहे, त्यामुळे क्लेम नाकारला आहे.
या पत्राचा व बचावाचा विचार होता सामनेवाले यांनी सदर क्लेम हा तक्रारदार यांनी खोटा व बोगस बिल दाखल केल्यामुळे नाकारला आहे. परंतु त्याबाबत सामनेवाले यांनी इन्व्हेस्टीगेटर श्री.पि.जी.गागरे यांनी केलेला अहवाल दाखल केलेला नाही. तसेच कोणत्याही बिलासोबत कोणत्या रकमेचे चुकीचे बिल आहे हे तक्रार अर्जामध्ये दाखल केलेले नाही. सदरची बिले ही कशाप्रकारे खोटी व बोगस आहे हे सामनेवाले यांनी सिध्द केले नाही. त्यामुळे त्यांच्या बचावात तथ्य नाही असे स्पष्ट होते. तसेच सामनेवाले यांनी, त्यांनी वाहनाचा सर्व्हे रिपोर्ट तक्रार अर्जामध्ये दाखल केलेला नाही. या सर्व बाबींचा विचार होता सामनेवाला यांच्या बचावात तथ्य नसून त्यांच्या सेवेत कमतरता स्पष्ट होत आहे, म्हणून मुद्दा ‘ब’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
तक्रारदार यांना सर्व्हे रिपोर्टप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यास पात्र असे आमचे मत आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या अर्जामध्ये सर्व्हे रिपोर्ट प्रमाणे घसारा वजा जाता रक्कम रूपये १,२७,०००/- मिळण्याची मागणी केलेली आहे. ती रास्त व बरोबर आहे. सदरची रक्कम सामनेवाले यांनी वेळेत न दिल्याने तक्रारदार यांना मानसिक त्रास व आर्जाचा खर्च करावा लागला आहे, तो देण्यास सामनेवाले जाबाबदार आहे.
८. मुद्दा ‘क’ वरील मुद्यांचा विचार करता सामनेवाले यांच्यात कमतरता स्प्ष्ट होत असल्याने आम्ही खालील आदेश परित आहोत.
आ दे श
- तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२. सामनेवाले यांनी आदेश दिनांकापासून तीस दिवसाचा आत खालील रकमा तक्रारदार यांना द्याव्यात.
- सामनेवाले यांनी सदर वाहनाचे नुकसान भरपाई कामी विम्याची रक्कम रूपये १,२७,०००/- (अक्षरी रूपये एक लाख सत्तावीस हजार मात्र) द्यावी. सदर रक्कम वेळेवर न दिल्यास ६ टक्के व्याज आकारण्यात जाईल.
ब. मानसिक व शारीरीक त्रासाकामी रक्कम रूपये २,०००/- (अक्षरी रूपये दोन हजार मात्र) आणि सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये १,०००/- (अक्षरी रूपये एक हजार मात्र) तक्रारदार यांना द्यावा.
-
-
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.