जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/193 प्रकरण दाखल तारीख - 11/08/2010 प्रकरण निकाल तारीख – 08/12/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. लक्ष्मण पि.माधव गोडबोले वय 34 वर्षे, धंदा व्यापार अर्जदार रा. शिवनेरी नगर सांगवी बु. ता.जि. नांदेड विरुध्द. शाखा व्यवस्थापक, दि न्यु इंडिया एश्योरन्स कंपनी लि. शाखा कार्यालय लाहोटी कॉम्पेक्स, गैरअर्जदार प्रभात टॉकीज जवळ, वजिराबाद, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.पी.एच.रतन गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.एस.व्ही.राहेरकर. निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुवर्णा देशमुख, सदस्या ) अर्जदार हा शिवनेरी नगर सांगवी बु. नांदेड येथील रहीवासी असून त्यांने स्वतःच्या उदरनिर्वाहाकरिता अंजली किराणा व जनरल स्टोअर्स हे दूकान उघडलेले होते. सदरील दूकानाचे दि.05.01.2009 रोजी त्यांने विमा पॉलिसी घेतली होती. त्यांचा नंबर 160900/48/08/34/0000637 असा असून सदरील पॉलिसीचा कालावधी दि.05.01.2009 ते 04.01.2010 पर्यत होता. विम्यासाठी अर्जदाराने रु.788/- चा हप्ता विमा कंपनीकडे भरला होता. दि.31.5.2009 रोजी अर्जदाराच्या घराला आग लागली व त्या आगीमध्ये त्यांचे दूकान जळून खाक झाले. सदरच्या घटने बददल अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनी यांचेकडे विमा दावा रक्कम मागितली ती आजपर्यत न मिळाल्यामूळे अर्जदाराने सदरील तक्रार ग्राहक मंचात दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, दि.31.5.2009 रोजी संध्याकाळी 7.30 ते 3.30 वाजता अर्जदाराच्या घराला आग लागली व त्या आगीमध्ये अर्जदाराचे दूकान जळाले. अर्जदाराने सदरील घटनेचा गून्हा दाखल केला. त्यांची तक्रार 07/2009 अशी असून भाग्यनगर पोलिस स्टेशन येथे गून्हा दाखल केला आहे. अर्जदाराने रु.1,50,000/- पर्यतच्या रिस्क कव्हर करिता पॉलिसी उतरवलेली होती. म्हणून या घटनेनंतर अर्जदाराने विमा कंपनीकडे क्लेम फॉर्म व इतर कागदपञे दाखल केली. रु.1,50,000/- ची मागणी केली. हे सर्व करुनही गैरअर्जदार यांनी क्लेम नाकारला व अर्जदारास कळविले की, या दूकानाचा पत्ता कल्याण नगर असा आहे शिवनेरी नगर नाही म्हणून क्लेम देण्यास इन्कार केला. अर्जदाराचे कल्याण नगर नांदेड येथे दूकान घेतले होते. त्यांचा करार संपल्यामूळे अर्जदाराने स्वतःचे दूकान शिवनेरी नगर येथील घरात सूरु केले व त्यांची सूचना गैरअर्जदार यांना तोंडी देण्यात आली. या सर्व प्रकारामूळे अर्जदारास खूप मानसिक ञास झाला. दि.30.06.2010 रोजी अर्जदाराने गैरअर्जदार यांना नोटीस पाठविली व ती त्यांना प्राप्त झाली. त्यानंतर दि.20.07.2009 रोजी गैरअर्जदार यांनी उत्तर दिले. ज्यामध्ये अर्जदारास रु.39,000/- देण्यास ते तयार आहेत अशा प्रकारचा मजकूर होता. अर्जदाराचे नूकसान व पॉलिसी प्रमाणे रिस्क कव्हर रु.1,50,000/- असल्यामूळे सदरील रु.39,000/- ची रक्कम अर्जदारास मान्य नव्हती म्हणून अर्जदाराने सदर तक्रार दाखल केली. अर्जदाराने आपल्या अर्जामध्ये नूकसान भरपाई विमा रक्कम रु.1,50,000/-, शारीरिक व मानसिक ञास रु.40,000/- व तक्रार खर्च रु.10,000/- असे एकूण रु.2,00,000/- दि.31.05.2009 पासून 24 टक्के व्याजासहीत मागणी केली आहे. अर्जदाराने आपल्या तक्रारी सोबत इन्शूरन्स पॉलिसी, शॉप अक्ट लायसन्स, दूकानाचा परवाना, भाग्य नगर पोलिस स्टेशन गून्हा नोंदविल्या बददलची सत्य प्रत, गैरअर्जदार यांनी अंजली किराणा स्टोअर्स कल्याण नगर येथून शिवनेरी नगर येथे बदललेला मान्य केल्याची प्रत, फायर स्टेशन नांदेड यांची पावती, अर्जदाराने गैरअर्जदार यांना वकिलामार्फत पाठविलेली नोटीस ही कागदपञे व शपथपञ दाखल केले आहेत. गैरअर्जदार हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. ज्यामध्ये त्यांनी असे नमूद केले आहे की, अर्जदाराच्या दूकानास आग लागल्याची व नूकसान झाल्याची माहीती कळताच त्यांनी श्री.संजय यादवडकर यांची सर्व्हेअर व लॉस असेंसर म्हणून नियूक्ती केली. सर्व्हेअरने दूकानाची जागेवर जाऊन व अपघातस्थळी भेट देऊन अर्जदाराने सादर केलेल्या कागदपञाचे आधारे सर्व्हे रिपोर्ट कंपनीला दिला ज्यामध्ये रु.39,000/- चे नूकसान झाले असे नमूद केले होते. त्यामूळे गैरअर्जदार यांनी अर्जदारास रु.39,000/- देण्याचा नीर्णय मान्य केला. सदरची गोष्ट गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सांगितली Full satisfaction and discharge voucher सही मागितली पण अर्जदार यांनी ती दिली नाही. गैरअर्जदार यांचे म्हणण्यानुसार त्यांचेकडून अर्जदारास देण्यात येणा-या सेवेमध्ये कोणतीही कमतरता झाली नाही म्हणून हे प्रकरण मंचासमोर चालविता येणार नाही. गैरअर्जदार यांनी शपथपञ दाखल केले. तसेच सर्व्हे रिपोर्ट दाखल केला व लेखी यूक्तीवाद दाखल केला. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेंडर कागदपञाप्रमाणे खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे काय ? होय. 2. अर्जदाराने मागणी केलेली नूकसान भरपाई देण्यास गैरअर्जदार बांधील आहेत काय ? अंशतः 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- गैरअर्जदार यांचेकडून अर्जदाराने त्यांचे दूकाना बाबतची पॉलिसी उतरवलेली होती या बाबत अर्जदार व गैरअर्जदार यांचेमध्ये कोणताही वाद नाही सदरची गोष्ट गैरअर्जदार यांना मान्य असल्यामुळे मूददा क्र.1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. मूददा क्र.2 ः- दि.31.05.2009 रोजी अर्जदाराच्या दूकानास आग लागली ही गोष्ट मान्य आहे असे गृहीत धरले तरी दूकानात असलेल्या सामानाचे अकाऊटंस व विक्री केलेल्या मालाचा तपशील किंवा खरेदी करुन किती विक्री झाली या बाबतचा अहवाल अर्जदाराने दाखल केलेला नाही. त्यामूळे अर्जदाराच्या दूकानात प्रत्यक्षात किती माल होता या बददल सर्व्हेअरच्या रिपोर्टशिवाय कोणताही पूरावा समोर येत नाही. अर्जदार यांनी फक्त फिर्याद दाखल केली आहे.त्यासोबत दूकानाचे लायसन्स, दूकानाची उतरवलेली पॉलिसी, पोलिस स्टेशनला दिलेला गून्हा नोंदविल्याची प्रत, फायर स्टेशन यांची पावती, एवढेच दाखल केल्यामूळे दूकानाच्या आतील माला बददल कोणतेही स्पष्टीकरण अर्जदार यांनी दाखल केलेले नाही. गैरअर्जदार यांनी दाखल केलेला सर्व्हे रिपोर्ट एवढेच फक्त दूकानातील सामाना बददलचा पूरावा देत आहेत. गैरअर्जदार यांचे म्हणण्याप्रमाणे सर्व्हेअरने काढलेल्या रिपोर्ट प्रमाणे जी रक्कम निघाली होती त्या रक्कमेचा चेक त्यांनी ताबडतोब तयार करुन अर्जदाराला देण्याचे कळविले होते परंतु अर्जदाराने तो न स्विकारता मंचात तक्रार दाखल केली म्हणून सदरची तक्रार ही प्रिमॅच्यूअर आहे तसेच गैरअर्जदार यांनी अर्जदारास कोणतीही सेवेत ञूटी दिली असे म्हणता येणार नाही. एका दृष्टीने पाहिले असता गैरअर्जदार यांचे विधानात थोडीत सत्यता वाटते. सर्व्हे रिपोर्ट पाहिला असता त्यांनी काढलेली मालाची किंमत ही रु.53,891/- दर्शवलेली आहे त्यामध्ये साल्व्हेज वगळले रु.4891/- असता एकूण रक्कम रु.49,000/- आलेली आहे. रु.53,891/- ही रक्कम असेंसेड अमाऊंट आहे. त्यामधून साल्व्हेज ही वगळलेले आहे. या सर्व प्रकारा नंतर लेस असेंस च्या नावांखाली कशाबददल रु.10,000/- कमी करण्यात आले या बददल कोणताही ऊहापोह नाही. वजा केलेले रु.10,000/- याबददल कोणतेही स्पष्टीकरण केलेले नसल्यामुळे ती वजा करणे मंचास योग्य वाटत नाही. म्हणून अर्जदारास रु.49,000/- रक्कम देणे योग्य होईल या निर्णयापर्यत हे मंच आलेले आहे. अर्जदाराने विमा दावा नूकसान भरपाईचा अर्ज केल्यापासून ते आजपर्यत गैरअर्जदार यांनी फारसा कालावधी घेतलेला नाही किंवा फार काळ अर्जदारास ताटकळत ठेवलेले नाही म्हणून त्यांचे सेवेमध्ये कोणतीही ञूटी आढळून येत नाही म्हणून अर्जदार यांनी रु.49,000/- एक महिन्यात दयावे या निर्णयापर्यत हे मंच आलेले आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास रु.49,000/- एक महिन्यात दयावेत, असे न केल्यास त्यावर 9 टक्के व्याजाने पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याज दयावे. 3. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर, लघूलेखक.
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |