::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 01.04.2016)
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
1. अर्जदाराला चार चाकी गाडी घ्यावयाची असल्याने त्याने टाटा मोटर्स ची टाटा सुमो व्हिक्टा गाडी पसंत पडल्याने त्याने गैरअर्जदार क्र.3 ने त्याचे प्रतिनीधी मार्फत कोटेशन दिले. गैरअर्जदार क्र.1 ते 3 चे प्रतिनीधी म्हणून गैरअर्जदारक्र.4 कर्ज देत असतो. अर्जदाराने गैरअर्जदारांचे प्रतिनीधीवर विश्वास ठेवून त्यांचेकडून कर्ज घेण्याचे व टाटा सुमो व्हिक्टा ही गाडी घेण्याकरीता दि.25.10.2008 रोजी गैरअर्जदार क्र.3 व 4 चे कार्यालयात रुपये 1,51,000/- जमा केले त्यावेळी गैरअर्जदारांनी अर्जदारास दिलेल्या रकमेची पावती न देता दि.27.10.2008 ची रुपये 1,19,300/- तसेच दि.14.11.2008 ची रुपये 10,500/- ची पावती दिली. गैरअर्जदारांचे प्रतिनीधीनी गाडीची एकूण किंमत रुपये 5,84,130/- सांगीतले होते व त्यावेळी रुपये 4,40,000/- चे कर्ज देण्याचे ठरले त्याप्रमाणे कर्जाच्या करार पुस्तकावर अर्जदाराच्या सह्या घेण्यात आल्या व गैरअर्जदार क्र.3 कडून टाटा सुमो व्हिक्टा गाडी घेतली त्याचा क्र.एम एच 31 सीआर-7916 होता. गाडी ताब्यात घेतल्यानंतर अर्जदाराचे असे लक्षात आले की, दिलेली गाडी ही 1018 कि.मी.चाललेली आहे. त्यामुळे, अर्जदाराने गैरअर्जदार क्र.3 व4 यांना पञ पाठवून विचारणा केली असता, त्यास काहीहीकारण सांगून दिशाभूल करण्यात आली. अर्जदाराने गाडीसाठी घेतलेले कर्ज नियमीत वेळोवेळी भरणा केलेला आहे. गैरअर्जदारांनी कर्ज खात्यावर ठरल्याप्रमाणे व्याजदर न लावता चुकीच्या पध्दतीने व्याजदर लावले. गैरअर्जदार क्र.1 ते 4 यांनी अर्जदारास कोणतीही मागणी व पञ व्यवहार न करता तसेच अर्जदारास कोणतीही पूर्वसुचना न देता गाडीचे लॉक तोडून अर्जदाराचे घरुन कोणालाही न सांगता दि.16.1.2010 रोजी घेवून गेले. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.3 व 4 कडे कर्ज रकमेच्या खाते उता-याची मागणी केली. तसेच कर्ज रकमेच्या एकूण व थकीत रकमेबाबत माहिती मागीतली व थकीत रक्कम भरण्याबाबत सहमती दर्शविली असता गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांनी खाते उतारा देण्यास नकार दिला व कर्ज खात्याची पूर्ण रक्कम रुपये 91,534/- भरण्यास सांगीतले. त्यावेळी अर्जदाराने दिनांक 25.01.2010 रोजी रुपये 92,000/- कर्ज खात्यात भरले व गैरअर्जदाराकडे गाडीची मागणी केली. गैरअर्जदार क्र.3 व4 यांनी गाडी देण्यास टाळाटाळ केली. गैरअर्जदार क्र.3 व 4 यांनी दि.10.2.2010 रोजी अर्जदारास रुपये 13,500/- भरण्यास सांगीतले. अर्जदारास गाडीची अत्यंत आवश्यकता असल्याने दिनांक 15.2.2010 रोजी रुपये 13,500/- भरुन गैरअर्जदार क्रमांक 3 व4 यांना गाडीची मागणी केली. परंतु, तेंव्हा सुध्दा गैरअर्जदारांनी गाडी दिली नाही. गैरअर्जदारांनी दि.28.6.2010 रोजी अर्जदारला पञ पाठवून गाडीची उरलेली थकीत रक्कम भरुन गाडी घेवून जाण्यास सांगीतले. तेंव्हा अर्जदाराने यापूर्वीच पूर्ण रक्कम भरलेली असल्याने व अतिरिक्त रक्कमही भरल्याने पुन्हा रक्कम भरण्यास नकार दिला व गाडीची मागणी केली. त्यावेळी गैरअर्जदार क्र.3 व4 यांनी गाडी देण्यास नकार दिला. गैरअर्जदारांनी अर्जदारास कोणतीही पूर्व सुचना न देता उपरोक्त गाडी टाटा सुमो विक्टा क्र.एम एच 31-सीआर 7916 ही दुस-या व्यक्तीला विकल्याचे अर्जदारास माहित झाले. गैरअर्जदारांचा हा व्यवहार गैरकायदेशीर व ग्राहकाला फसवून लुबाडनुक करणारा व त्यास ञास देणारा आहे.
2. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदारांनी अर्जदाराकडून घेतलेला अतिरिक्त व्याज रक्कम, अर्जदार 15 टक्के व्याजदार आकारुन वापस देण्यात यावे. अर्जदाराची गाडी टाटा सुमो विक्टा क्र.एम एच 31-सीआर 7916 सुयोग्य स्थितीत वापस देण्यात यावी किंवा त्यास नवीन गाडी त्याच किंमतीत देण्यात यावी. जर गाडी देऊ शकत नसल्यास अर्जदाराने भरलेली रक्कम रुपये 2,19,500/-, 15 टक्के व्याजासह अर्जदारास परत देण्यात यावे. तसेच अर्जदारास आजच्या बाजार भावानुसार गाडीची असलेली किंमत देण्यात यावी. तसेच अर्जदाराला झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून मिळण्याचा आदेश व्हावे.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदाराने सदर नोटीस मिळाल्यानंतर मंचात सदर प्रकरणात हजर झाले व गैरअर्जदार क्रमांक 1 ने नि.क्र.29 वर त्यांचे लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्रमांक 2 ने नि.क्र.37 वर त्यांचे लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 ने निशाणी क्रमांक 27 वर लेखीउत्तर दाखल केले.
4. गैरअर्जदार क्र.1 यांनी लेखीउत्तरात असे कथन केले आहे की, अर्जदाराने त्यांचेवर तक्रारीत लावलेले आरोप खोटे असून त्यांना नाकबूल आहे. सदर तक्रार मधील नमूद असलेला मजकूर हा ग्राहक वाद या संज्ञे मध्ये मोडत नसल्याने सदर तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. सदर तक्रार या मंचाचे कार्यक्षेञात येत नसल्याने खारीज होण्यास पाञ आहे. अर्जदार व गैरअर्जदार क्र.2 मधील फायनान्स संदर्भीत करार असल्याने गैरअर्जदार क्र.1 चा कोणताही सहभाग नाही. गैरअर्जदार क्र.1 ने वादातील गाडी गैरअर्जदार क्र.3 ला विकली व गैरअर्जदार क्र.3 ने अर्जदाराला वादातील वाहन विकले त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 व अर्जदाराचा कोणताही करार नव्हता. कोणतेही गैरअर्जदारांची चंद्रपूर येथे व्यवसायीक शाखा किंवा व्यवसाय करीत नसल्याने सदर तक्रारीत उद्भवीत असलेला वाद हा दिवाणी स्वरुपाचा असल्याने मा.मंचाला सदर तक्रार चालविण्याचा अधिकार क्षेञ नसल्याने सदर तक्रार खारीज होण्यास पाञ आहे.
5. गैरअर्जदार क्र.2 यांनी लेखीउत्तरात असे कथन केले आहे की, अर्जदाराने त्यांचेवर तक्रारीत लावलेले आरोप खोटे असून त्यांना नाकबूल आहे. गैरअर्जदार क्र.2 ने पुढे कथन केले आहे की, वादातील वाहन अर्जदाराने गैरअर्जदाराकडून कर्ज घेतलेले होते त्याकरीता अर्जदार व गैरअर्जदार क्र.2 मध्ये करार झाला होता त्या कराराच्या अन्वये अर्जदार व गैरअर्जदार क्र.2 ला कराराचे शर्ती व अटींचे पालन पालन करणे आवश्यक आहे. परिच्छेद क्र.9 करार क्र.125973 मध्ये स्पष्ट नमूद आहे की, वाहनाची चोरी, जप्ती, अपघात किंवा वाहनात ञुटी नुकसान आणि दर्जात असलेल्या वादावर गैरअर्जदार क्र.2 ची कंपनी जबाबदार राहणार नाही. तसेच कराराच्या नियम क्र.3 खाली असे नमूद आहे की, अर्जदाराने कराराचे शर्ती व अटी नियम वाचुन समजून स्वाक्षरी केलेली आहे व ते त्याला मान्य आहे. परिच्छेद क्र.8 करारामध्ये असे नमूद आहे की, कंपनीला वेळेवर कर्जाचे हप्त्याची रक्कम न भरल्यास त्यावर व्याज लावण्याचे अधिकार तसेच जप्तीचे अधिकार आहे. तसेच जप्ती केलेले वाहन व दिलेला कर्ज वसूल करण्याकरीता कंपनी जप्त केलेले वाहन विकू शकतो. सदर तक्रार अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.2 कडून घेतलेले कर्जाची रक्कम भरलेली नसल्याने हेतुपुरस्पर सदर खोटी तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे. म्हणून सदर तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विंनती केली आहे.
6. गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 ने त्यांचे लेखी जबाबात असे कथन केले आहे की, अर्जदाराने तक्रारीत गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 चे विरुध्द लावलेले आरोप खाटे असून त्यांना नाकबूल आहे. गैरअर्जदाराने पुढे लेखी जबाबात असे मान्य केले आहे की, अर्जदाराने रुपये 92,000/- आणि रुपये 13,500/- जमा केले होते, तसेच हे मान्य केले आहे की, पञ दिनांक 28.6.2010 व्दारे अर्जदाराला उरलेली रक्कम जमा करण्याकरीता कळविण्यात आलेले होते. अर्जदाराने टाटा फायनान्सकडून लोन घेण्याची इच्छा जाहीर केली होती. गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांनी अर्जदाराचे वाहन जप्त केले कारण त्यांनी पूर्ण रक्कम भरलेली नव्हती सदर कार्यवाही कराराचे शर्ती व अटी नुसार करण्यात आली होती तसेच कराराचे अन्वये ही डिलरची जबाबदारी होती, म्हणून गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 चे सांगण्यावर अधिकृत केल्यावर जप्तीची कार्यवाही करण्यात आलेली होती. सदर तक्रार अर्जदाराने गैरअर्जदाराला ञास देण्याकरीता दाखल केलेली आहे. सबब तक्रार खारीज करण्यात यावी.
7. अर्जदार व गैरअर्जदाराचे तक्रार व जवाब, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय
2) सदरहू तक्रार या मंचाचे कार्यक्षेञात आहे काय ? : होय
3) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति न्युनता पूर्ण सेवा दिली आहे काय ? : नाही
4) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यवहार पध्दतीची : नाही
अवलंबना केली आहे काय ?
5) अंतिम आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
8. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 कंपनीची निर्मीत वाहन गैरअर्जदार क्र.3 कडून विकत घेतली व गैरअर्जदार क्र.4 कडून त्याकरीता कर्ज घेतले ही बाब अर्जदार व गैरअर्जदारांना मान्य असून अर्जदार हा गैरअर्जदारांचा ग्राहक आहे असे सिध्द होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
9. सदर प्रकरणात मा.मंचाने दिनांक 23.11.2011 विद्यमान मंचाला अधिकारक्षेञा बाबत निशाणी क्र.1 वर आदेश केलेला आहे व गैरअर्जदाराने दिनांक 16.1.2010 ला अर्जदाराचे वादातील गाडी नागभीड येथून नेले त्यामुळे सदर तक्रार दाखल करण्याचे अंशतः कारण या मंचाला आहे, मंचाचे मत ठरले आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 3 व 4 बाबत ः-
10. सदर प्रकरणात गैरअर्जदाराने अर्जदाराची गाडी दिनांक 16.1.2010 रोजी नागभीड येथून घेऊन गेले, ही बाब गैरअर्जदाराला मान्य आहे. गैरअर्जदार क्र.3 व 4 यांनी त्याचे जबाबात असे कथन केलेले आहे की, अर्जदार यांनी वाहनाचे कर्जाचे हप्ते भरले नव्हते म्हणून त्याबाबत गैरअर्जदार क्र.4 यांनी अर्जदारास सुचनाही दिलेली होती. त्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदाराविरुध्द आरबीटेशन दावा क्र.LOT 41/A 1094 of 2009 आरबीट्रेरर नितीन चौव्हान यांचेकडे दाखल केला होता त्यात दिनांक 5.1.2010 रोजी आदेश पारीत झाला व त्या आदेशाची पुर्तताकरीता गैरअर्जदार तर्फे अर्जदारास सुचना देण्यात आली होती. गैरअर्जदार तर्फे दिनांक 15.1.2010 रोजी, 16.1.2010 रोजी गाडी उचलण्याबाबत नागभीड पोलीस स्टेशन येथे सुचना देण्यात आली होती. दिनांक 22.1.2010 व 22.7.2010 रोजी गैरअर्जदाराने अर्जदारास गाडी विकल्याचे सुचनाही दिली होती. ही बाब गैरअर्जदाराने जबाबा सोबत जोडलेले दस्ताऐवजावरुन सिध्द होते. गैरअर्जदारांनी कर्जाची थकीत बाकी रक्कम वसूल करण्याकरीता अर्जदाराचे विरुध्द कराराप्रमाणे आरबीटेशन नियमाखाली तक्रार दाखल केली व त्यातील झालेला आदेशाची सुचना अर्जदाराला दिली व अर्जदाराची गाडी उचलण्याचे पूर्वी सुचनाही दिली तरीसुध्दा अर्जदाराने त्यावर कोणतेही प्रतिउत्तर गैरअर्जदार क्र.4 ला दिली नाही व सदरहू बाब तक्रार दाखल करतेवेळी अर्जदाराने लपविलेली आहे असे सिध्द होते. गैरअर्जदार क्र.4 ने अर्जदाराकडून शिल्लक असेलेली कर्जाची रक्कम वसूली करण्याकरीता रिजर्व बॅंक ऑफ इंडिया यांनी दिलेले निर्देशाचे अन्वयाने व करारातील शर्ती व अटी प्रमाणे अर्जदाराचे विरुध्द कार्यवाही करुन अर्जदाराप्रति कोणतीही न्युनतम् सेवा दिली नाही व अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केली नाही असे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.3 व 4 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
11. अर्जदाराने सदर तक्रारीत गैरअर्जदाराने पाठविलेले थकीत बाकी रक्कम वसूल करण्याकरीता सुचना व आरबीटेशन प्रकरणात आलेले नोटीस व आदेशाबाबत गैरअर्जदाराकडून मिळालेले सुचना लपवून तक्रार स्वच्छ हाताने दाखल केलेली नाही असे मंचाचे मत ठरले आहे. सदर बाब ग्राह्य धरुन व मुद्दा क्रं. 1 ते 2 च्या विवेचनावरुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येते.
अंतीम आदेश
1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येते.
2) उभय पक्षांनी आप-आपला तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
3) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
4) सदर निकालपञाची प्रत संकेतस्थळावर टाकण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 1/4/2016