द्वारा घोषित - श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष. तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे आहे. तक्रारदारानी गैरअर्जदार क्र 2 यांच्याकडून दिनांक 19/12/2009 रोजी गैरअर्जदार क्र 1 यांच्या कंपनीचा हॅण्डसेट खरेदी केला. तक्रारदारानी विक्रेत्यास सर्व आवश्यक ती कागदपत्रे दिली. परंतु मोबाईल अक्टीवेट झाला नाही म्हणून गैरअर्जदारास विचारणा केली असता त्यांनी दिनांक 24/12/2009 रोजीच त्यांचा मोबाईल अक्टीवेट झाल्याचे सांगितले. अनेकवेळा गैरअर्जदाराकडे जाऊन मोबाईल अक्टीवेट झाला नाही आणि करुन दिला नाही पुन्हा तक्रारदार गैरअर्जदार क्र 2 यांच्याकडे गेले असता तेथे मोबाईलची पाहणी केली असता असे दिसून आले की, हॅण्डसेटमध्ये जे सिम कार्ड बसविण्यात आले होते ते त्यांच्या कंपनीचे नाही असे सांगण्यात आले. त्यामुळे मोबाईल कार्यान्वित होत नव्हता. परंतु हे सांगण्याआधी गैरअर्जदारानी तक्रारदारास योग्य ती वागणूक दिली नाही. जे सिम कार्ड पॅक डोकोमो कंपनीचे अर्जदारास दिला त्यावर Sr.No 537111000125996 MSIDSN 8087377533 असा आहे व आतमध्ये जो सिमकार्ड दिला त्याचा Sr.No 537111000125997 Sim Card No 8991037111 0012 59979 असा आहे. याचा अर्थ असा होतो की, कंपनीच्या चुकी व निष्काळजीपणामुळे सिमकार्ड पॅक मध्ये जो सिमकार्ड पाहिजे होता त्या ऐवजी दुसराच सिमकार्ड होता. सिम Sr.No 537111000125996 पॅक वर आहे व आत मध्ये सिमा कव्हरवर Sr.No 537111000125997 असा आहे. त्यानंतर तक्रारदारानी कंपनीच्या मुंबई व औरंगाबाद यांच्या ऑफिसला नोटीस पाठविली. कंपनीने तक्रारदारास फक्त तोंडी सांगितले की, सिमकार्ड बदलून देऊ परंतु अद्यापपर्यंत सिमकार्ड बदलून दिले नाही म्हणून सदरील तक्रार. या सर्व प्रकरणामध्ये तक्रारदारास मानसिक त्रास व शारीरिक त्रास सहन करावा लागला म्हणून नुकसान भरपाई म्हणून तक्रारदारास रु 70,000/- व तक्रारीचा खर्च रु 10,000/- मागतात. गैरअर्जदार क्र 1 आणि 2 यांनी लेखी जवाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराची नोटीस त्यांना प्राप्त झाली त्याचवेळेस गैरअर्जदार त्यांना जुने सिमकार्ड बदलून नविन सिमकार्ड देण्यास तयार होते. गैरअर्जदाराचे असेही म्हणणे आहे की, सिमकार्ड बाहेर देशातुन बनून येण्यासाठी रु 100/- पेक्षा जास्त किंमत लागते. म्हणून तक्रारदारास त्यांचे आधीचे सिमकार्ड नवीन सिमकार्ड मिळण्यासाठी परत देण्यास सांगितले होते. परंतु तक्रारदारानी त्यांना सहकार्य केलेले नाही. सिमकार्ड बदलून देण्यास आजही गैरअर्जदार तयार आहेत. गैरअर्जदाराने शपथपत्र दाखल केले. दोन्हीही पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्राची मंचाने पाहणी केली. तक्रारदाराने त्यांच्या हॅण्डसेट सोबत चुकीचे सिमकार्ड दिल्याबद्दल त्यांची गैरसोय झाली. गैरअर्जदारानी सिमकार्ड बदलून दिले नाही फक्त बदलून देतो असे म्हणाले आहेत त्यासाठी कुठलाही पत्र व्यवहार केल्याचे त्यांनी दाखल केलेले नाही. वास्तविक पाहता, स्थानिक डिलरने त्यांना सिमकार्ड बदलून देण्यास किती वेळ लागेल किंवा विलंब लागेल हे व्यवस्थित सांगितले असते तर तक्रारदारास ते पटले असते. परंतु तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार स्थानिक डिलरने त्यांना व्यवस्थित वागणूक दिली नाही म्हणून त्यांना नोटीस पाठवावी लागली आणि मंचात यावे लागले. त्यामुळे नविन मोबाईल हॅण्डसेट घेऊनही केवळ गैरअर्जदाराच्या चुकीमुळे दुसरेच सिमकार्ड घातल्यामुळे तक्रारदारास तो हॅण्डसेट वापरता आला नाही त्यामुळेच तक्रारदारास आर्थिक , मानसिक त्रास सहन करावा लागला असावा असे मंचाचे मत आहे. म्हणूनच मंच गैरअर्जदार क्र 1 आणि 2 यांना असा आदेश देतो की, त्यांनी या त्यांच्या सेवेतील त्रुटीसाठी आणि तक्रारीच्या खर्चापोटी रु 3,000/- 6 आठवडयाच्या आत तक्रारदारस द्यावेत. वरील विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे. 2. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी या आदेशाच्या प्राप्तीपासून 6 आठवडयाच्या आत तक्रारदारास त्यांच्या हॅण्डसेटमध्ये योग्य ते सिमकार्ड घालून द्यावे तसेच सेवेतील त्रुटीची व तक्रारीच्या खर्चापोटी रु 3,000/- द्यावेत.
| [ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |