जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/228 प्रकरण दाखल तारीख - 16/09/2010 प्रकरण निकाल तारीख – 04/03/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या आनंदराव माणिकराव लाठकर, वय वर्षे 67, धंदा शेती रा.उस्मान नगर, नांदेड. अर्जदार. विरुध् व्यवस्थापक, टाटा केमिकल्स लि. प्लॉट नं.डी-1 एम.आय.डी.सी. गैरअर्जदार कृष्णूर, ता.नायगांव (बा) अर्जदारा तर्फे वकील - अड.एस.जी.निमगोळे गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.एस.के.देशपांडे. निकालपत्र (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष ) 1. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक असून तो शेतकरी आहे. त्याची 70 एकर शेती आहे. गैरअर्जदार हे टाटा केमिकल्स लि. कंपनी असून ज्वारी पासून अल्कोहल तयार करते. सन 2008 मध्ये गैरअर्जदार यांना लागणारी ज्वारी पिक पिकवण्यासाठी अर्जदार यांना विनंती केली व त्यासाठी बि-बियाणे औषधी खते व तंञज्ञान पुरविण्याची हमी दिली. सन 2008 चा प्रयोग अयशस्वी झाल्यामूळे गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना रु.5000/- एकरी नूकसान भरपाई दिली ती कमी दिली होती. परंतु गैरअर्जदार यांनी पूढच्या वर्षी जास्त भाव देऊ अशी हमी दिली. परत गैरअर्जदाराने सन 2009 मध्हये 40 एकर मध्ये त्यांच्या कंपनीचे बियाणे खत, औषधी विकत घेऊन जर लागवड केली तर विदेशी तंञज्ञान पूरवितो अशी हमी दिली. गैरअर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे एकरी 25 टन उत्पादन होईल असे सांगितले. 40 एकर मध्ये जवळपास 1000 टन उत्पादन होईल व त्यांस रु.1000/- भाव आम्ही देऊ असे सांगितले. तसेच बि-बियाणे औषधी व खते यांचे पैसे ज्वारीचे उत्पादन आल्यावर चेक देताना पैसे कापून घेऊ असे सांगितले. दि.19.06.2009 रोजीला खते बि बियाणे औषधीचा अर्जदाराला पूरवठा केला तसेच योग्य सेवा देण्याची हमी गैरअर्जदाराने मान्य केली. गैरअर्जदार ही नांमाकित कंपनी असल्यामूळे अर्जदाराने स्लीप पावती क्र.1916 दि.19.6.2009 (20 एकर) क्र.1917 दि.19.6.2009 (15 एकर) पावती क्र.1918 दि.19.6.2009 (5 एकर) असे एकूण 40 एकरासाठी लागणारे बियाणे विकत घेतले. गैरअर्जदाराने पूरवलेले निविष्टा पावती क्र.901,902,903 सोबत जोडली आहे. अर्जदाराने आपल्या एकञित कूटूंबातील सदस्यांच्या नांवे असलेल्या शेतात गट नं.1036, 90,9 (15 एकर) गट नं.1001,06,1039, 1040 (20 एकरऋ व गट क्र.07 (5 एकर) शेतामध्ये गैरअर्जदाराने पूरवठा केलेल्या बियाण्यांची पेरणी केली. गेरअर्जदार कंपनीचे कर्मचा-याच्या देखरेखीखाली पेरणी यंञाद्वारे पेरणी केली, औषधी फवारणी खते टाकली. कंपनीचे कर्मचा-यानी दि.1.11.2009, 14,11,2009 रोजी शेतात पाहणी केली व माल घेऊन गेले व उर्वरित माल घेऊन जातो असे म्हणाले. परंतु दि.14.11.2009 नंतर चार महिने माल घेऊन गेले नाही. गैरअर्जदाराने दि.1.11.2009 रोजी ते 14.11.2009 मध्ये नेलेल्या मालाचे चेक क्र.30835272166 अर्जदाराला देताना सांगितले की बि बियाणे औषधी व खते यांची रक्कम कापण्यात आलेली आहे. अर्जदार हा बी.एस.सी अग्री असल्यामूळे त्यांचे लक्षात आले की, पिकास दाणेच आले नाही व हे सर्व वांझ बि बियाणे औषधी व खते यांच्यामूळे झाले आहे व गैरअर्जदारास संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. गैरअर्जदाराने पूरविलेल्या यंञणेचा काहीही उपयोग झाला नाही. कारण बियाणे बनावट असल्यामूळे पिक आले नाही. शिल्लल पिक काढण्यास गैरअर्जदारास रु.2500/- एकरी प्रमाणे रु.1,00,000/- राहीलेले पिक काढणीचा खर्च अर्जदाराला करावा लागला. तसेच दूबार पेरणी करता आली नाही व त्यापासून येणारी एकरी 12 हजार प्रमाणे रु.4,80,000/- व गैरअर्जदाराने दिलेल्या हमी भाव व उत्पादनाची सरासरी यापासून मिळणारे रु.10,00,000/- असे एकूण रु.15,80,000/- नूकसानीस गैरअर्जदार हे जबाबदार आहेत, तसेच मानसिक ञासापोटी रु.1,00,000/- असे एकूण रु.16,80,000/- व्याजासह मिळण्यास अर्जदार पाञ आहे अशी मागणी केली आहे. 2. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांचे मधील व्यवहार हा व्यापारी दृष्टीने झालेला आहे म्हणून तो अर्जदार ग्राहक होत नाही. अर्जदार हा स्वच्छ हाताने मंचासमोर आलेला नाही. पिक वाढीसाठी ब-याच गोष्टी अवलंबून आहेत जसे की, वातावरण, हवामान, पाणी, खते फवारणी, वेळेवर पेरणी. अर्जदार यांनी 40 एकर ऐवजी 22.03 एकर मध्येच पेरणी केलेली आहे. गैरअर्जदार हे अर्जदार यांचेकडे गेले होते हे त्यांना मान्य नाही, तर अर्जदाराच गैरअर्जदाराकडे आले होते. गैरअर्जदार हे मल्टीनॅशनल कंपनी असून त्यांचा व्यवहार हा स्वच्छ व पारदर्शी आहे. झालेल्या मालाची रक्कम ही केदारनाथ कृषी सेवा केंद्र उस्माननगर यांना आधी दयावी लागते कारण त्यांचेकडून क्रेडीट वर बि बियाणे व खते आणलेली असतात.सर्वात महत्वाचे म्हणजे अर्जदार जे सांगतात की, त्यांनी 40 एकर मध्ये पेरणी केली, हे म्हणणे चूक असून त्यांनी प्रत्यक्षात 22.03 एकर मध्ये पेरणी केली आहे. गैरअर्जदार यांनी इन्सेंटीव्ह रु.6767.75 हा रु.1250/- पर एकर प्रमाणे दिलेले आहे. अर्जदार यांनी खते बियाणे व औषधी ही 40 एकरसाठी क्रेडीटवर घेतली व प्रत्यक्षात 22.03 एकर मध्ये पेरले, व त्यापैकी 16.61 एकर मध्ये पिक आले व 5.41 एकर मध्ये येणे बाकी आहे ? सिड क्वॉलिटी रिपोर्ट हा तक्रारी सोबत जोडला आहे. अर्जदार यांनी पिकाची योग्य निगा राखलेली नाही त्यामूळे त्यांना कमी उत्पादन झाले. अर्जदार यांचे कोणतेही रु.10,00,000/- चे नूकसान झालेले नाही. तसेच पिक काढण्यास रु.2500/- प्रमाणे लागले हे त्यांना मान्य नाही. अर्जदाराचे फक्त 5.41 एकर मध्ये पिक हे पूअर कंडीशन मध्ये होते ते पाणी न दिल्यामूळे होते. यात अर्जदाराची पूर्ण जबाबदारी असते, तरी गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना नूकसान रु.1250/- एकर प्रमाणे 5.41 एकर बददल दिलेले आहे. हे त्यांना मान्य नाही की, इतर उत्पान्नातून त्यांना रु.4,80,000/- मिळाले असते व त्याबददल कोणताही ठोस पूरावा दाखल केलेला नाही. रब्बी पिकासाठी अर्जदार यांचेकडे पाणीच नव्हते. त्यांचे क्षेञात चांगला पाऊस झाला तर ते रब्बी पिक घेऊ शकतात त्यावर्षी चांगला पाऊस झाला नव्हता. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना कोणताही मानसिक ञास दिलेला नाही. गैरअर्जदार यांना बदनाम करण्यासाठी ही तक्रार दाखल केली आहे. त्यामूळे अर्जदाराची तक्रार ही खर्चासहीत फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे.अर्जदार हे बी.एस.सी अग्री. झालेले असले तरी हे त्यांची वैयक्तीक डिग्री आहे, गैरअर्जदार हे रेप्यूटेड कंपनी असून त्यांचे पूर्ण भारतामध्ये शाखा आहेत. गैरअर्जदार यांनी ब-याच शेतक-यांना ही स्कीम दिलेली आहे पण अर्जदार सोडल्यास कोणत्याही शेतक-याची तक्रार नाही. डीआयसी व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्फत गैरअर्जदार हे स्कीम राबवत आहेत. अर्जदार यांनी दिलेले तिरुपती अग्रो एजन्सी न्यू मोंढा नांदेड हे दूकान गैरअर्जदार यांना मान्य नाही कारण त्यांनी केदानाथ कृषी सेवा केंद्र उस्मान नगर नांदेड हे दूकान ठरविलेले आहे. अर्जदार यांनी खोटे व बोगस कागदपञ दाखल केलेले आहेत.वरील सर्व कथनावरुन अर्जदाराची तक्रार ही खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. 3. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्र तपासल्यानंतर व दोन्ही बाजूचा यूक्तीवाद ऐकल्यानंतर जे मूददे उपस्थित होतात ते मूददे व त्यावरील सकारण उत्तरे खालील प्रमाणे. मुद्ये. उत्तरे. 1. अर्जदार हे ग्राहक आहे काय ? नाही. 2. अर्जदार यांने केलेली मागणी पूर्ण करण्यास गैरअर्जदार जबाबदार आहेत काय ? नाही. 3. काय आदेश ? अंतीम आदेशाप्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 व 2 – 4. हे दोनही मूददे परस्पराशी पूरक असल्यामूळे एकञित चर्चिल्या जात आहेत. एकंदर कागदपञ पाहता असे दिसून येते की, अर्जदाराने ही तक्रार व्यवस्थितरित्या दाखल केलेली नाही. त्यांनी ज्या पावत्या दिलेल्या आहेत त्यापैकी अनेक पावत्यावर नितीन आनंदराव लाठकर, उस्मान नगर असे लिहीलेले आहे ? काही पावत्यावर जयश्रीबाई आनंदराव लाठकर, उस्मान नगर असे लिहीलेले आहे ? अशा परिस्थितीत अर्जदाराचे कर्तव्य होते की, त्यांनी त्यांचे बरोबर सदरील पावत्यातील व्यक्तीस अर्जदार क्र. 2 व 3 म्हणून यात शरीक करणे आवश्यक होते. केदारनाथ कृषी सेवा केंद्र यांनी दिलेल्या पावत्यावर असे दिसते की, त्यातील रक्कम ही अर्जदाराने किंवा त्यांचे बरोबरच्या व्यक्तींनी त्या केदारनाथ कृषी सेवा केंद्राला दिलेल्या नाही म्हणून त्या पावत्यावर “ बाकी ” असा शब्द लिहीलेला आहे. गैरअर्जदाराचे म्हणणे आहे की, त्यांनी फक्त केदारनाथ कृषी सेवा केंद्रातर्फेच बियाणे किंवा इतर साहित्याचे वितरण करण्याचे ठरले होते परंतु अर्जदाराने नितीन लाठकर रा. नांदेड ? यांचे नांवाने बियाणे घेतल्याचे दाखविले आहे. सदरील कृषी सेवा केंद्र किंवा अग्रो एजन्सीच्या मालकाचे शपथपञ अर्जदाराने त्याचे म्हणणेचे पृष्टयर्थ दाखल केलेले नाही. त्यांनी गांव नमूना आठ-ए चे उतारे दाखल केलेले आहेत ते सूध्दा वेगवेगळे नांवाचे आहेत व त्यामध्ये विनाकारण दोन उतारे असे दिलेले आहे की, त्यावर सूधाकरराव किंशनराव देशपांडे व सौ. रंजनी सूधाकरराव देशपांडे असा उल्लेख आहे ? एकंदर सर्व कागदपञे व कथन हे संदिग्ध स्वरुपाचे आहे ? 5. एकंदर कथनावरुन असे दिसते की, अर्जदाराने सदरील ज्वारीची पेरणी त्यांचे शेतामध्ये करावी व नंतर जे शेताचे उत्पन्न येईल ते गैरअर्जदाराने अर्जदाराकडून विकत घ्यावे हे कथन जर ग्राहय धरले तर अर्जदार व गैरअर्जदार मधील हा व्यवहार हा खरेदी आणि विक्री चा आहे. त्यामूळे अर्जदार हे गैरअर्जदार यांचे निव्वळ ग्राहक होऊच शकत नाहीत, कारण त्यांचे म्हणण्याप्रमाणे ते काही अंशी स्वतः ग्राहक होतात व काही अंशी गैरअर्जदार हे त्यांचे ग्राहक होतात. त्यामूळे ही तक्रार या मंचापूढे चालविण्यास पाञच नाही, कारण अर्जदार हा गैरअर्जदारांचा निव्वळ ग्राहकच होऊ शकत नाही. 6. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे गैरअर्जदार ही फार मोठी कंपनी आहे व असे जर असेल तर अर्जदार हा त्यांचे म्हणण्याप्रमाणे बी.एस.सी अग्री झालेला पदवीधर आहे. त्यांच्यात व गैरअर्जदार यांच्यात निश्चितच कोणत्या तरी स्वरुपाचा लेखी करार झालेला असणार ? पण अर्जदाराने सदरील कराराची प्रत या मंचापूढे दाखल केलेली नाही ? सदरील करारामध्ये काय अटी व शर्ती होत्या हे समोर येणे अत्यावश्यक होते परंतु अर्जदाराने तसे केलेले नाही व त्या बददल काही स्पष्टीकरण व खूलासा ही दिलेला नाही. 7. वर उल्लेख केल्याप्रमाणे अर्जदार व गैरअर्जदार यांचे अर्ज व लेखी कैफियत पाहता असे दिसते की, सदरील तक्रार ही एकमेकांशी दिलेल्या अटी व शर्तीचा भंग झालेला दिसतो व त्यासाठी ही तक्रार दिवाणी न्यायालयात चालण्यास योग्य आहे कारण तेथेच सविस्तर असे लेखी अथवा तोंडी पूरावा दिल्या जाऊ शकतो. ग्राहक मंचा समोरील सर्व तक्रारी या समरी पध्दतीने चालल्या जातात. म्हणून जेथे सविस्तर अशी लेखी अथवा तोंडी पूराव्याची गरज असते त्या तक्रारी दिवाणी न्यायालया पूढे दाखल करावयास पाहिजे. अर्जदाराला जर योग्य मिळाला तर ते आपली तक्रार योग्य त्या दिवाणी न्यायालया पूढे दाखल करु शकतील. त्यामुळै या केसमध्ये जास्त ऊहापोह करणे उचित होणार नाही. कारण ते फिर्यादी व विरुध्द पार्टी या दोघांच्याही हिताचे होणार नाही ? 8. वर उल्लेख केल्याप्रमाणे अर्जदाराच्या कथनानुसारच ते स्वतः ही गैरअर्जदाराचे, शेती उत्पन्नाचे, विक्रेता आहेत व गैरअर्जदार हे त्यांचे ग्राहक आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांचे मधील तथाकथ्रित करारातील अटी भंगाची कार्यवाही ही दिवाणी न्यायालया पूढे योग्य प्रकारे चालू शकेल. 9. वरील कारणास्तव अधिक ऊहापोह न करता किंवा कागदपञाच्या खोलात जाऊन येथे आमचे मत मांडण्यापेक्षा अर्जदार हे निव्वळ ग्राहक या संज्ञेमध्ये येत नसल्यामूळे ही तक्रार ग्राहक मंचापूढे चालण्यास योग्य नाही असे या मंचाचे मत झाले आहे.म्हणून मूददा क्र.1 व 2 चे उत्तर नकारात्मक देण्यात येत आहे. मूददा क्र.3 ः- वरील चर्चेवरुन असे दिसते की, अर्जदाराची ही तक्रार या मंचापूढे चालण्या योग्य नाही म्हणून ती खारीज करण्यात येण्याजोगी आहे या तक्रारीचा खर्च कोणा एका पक्षकारावर टाकणे योग्य होणार नाही म्हणून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. आदेश 1. अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येते. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |