(पारीत व्दारा श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य)
01. उभय तक्रारदारांनी विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 भारतीय स्टेट बॅंकेच्या विरुध्द दोषपूर्ण सेवा मिळाली म्हणून तसेच अन्य अनुषंगिक मागण्यां साठी ग्राहक संरक्षण कायदा-2019 चे कलम-35 खाली प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारदारांचे तक्रारी प्रमाणे उभय तक्रारदार हे आर्डीनन्स फॅक्टरी जवाहर नगर, भंडारा येथे कार्यरत आहेत. तक्रारकर्ता क्रं 1) श्री ताराचंद गोविंदा काळबांधे आणि तक्रारकर्ता क्रं 2) श्री किशोर लालाजी रामटेके यांचे विरुध्दपक्ष क्रं 1) स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखा जवाहर नगर , भंडारा येथे बचत खाते असून त्यांचे खात्यांचे क्रमांक अनुक्रमे-11517212384 आणि क्रं-11517258352 असे आहेत आणि त्यांचे सदर बचत खात्यांमध्ये त्यांची प्रतीमाह वेतनाची रक्कम जमा होत होती.
उभय तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, त्यांचे सोबत आर्डीनन्स फॅक्टरी, जवाहर नगर, भंडारा येथे एक कर्मचारी श्री जगतपाल मय्यादिन धाडीया हे बॉयलर अटेंडन्ट या पदावर कार्यरत होते परंतु त्यांचे सध्या स्थानांतरण आयुध निर्माणी क्रम संख्या-9817 कानपूर येथे झालेली आहे. श्री जगतपाल मय्यादिन धाडीया हे आर्डीनन्स फॅक्टरी, जवाहर नगर, भंडारा येथे कार्यरत असताना त्यांनी दिनांक-03 मे, 2012 रोजी त्यांची अपंग मुलगी आकृतीदेवी जगतपाल मय्यादिन धाडीया हिचे शिक्षणासाठी विरुध्दपक्ष बॅंकेतून रुपये-5,00,000/- एवढया रकमेचे कर्ज घेतले होते आणि सदर शैक्षणिक कर्जासाठी उभय तक्रारदार हे जामीनदार होते. पुढे मूळ कर्जदार श्री जगतपाल धाडीया यांनी घेतलेल्या शैक्षणिक कर्जाची परतफेड न केल्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 1 स्टेट बॅंक ऑफ इंडीया जवाहर नगर, भंडारा तर्फे वकील श्री आर.के. सक्सेना यांचे मार्फतीने दिनांक-13.03.2020 रोजीची नोटीस पाठवून मूळ कर्जदार आणि जामीनदार असलेले उभय तक्रारदार यांना त्याव्दारे थकीत शैक्षणिक कर्जाची पतरफेड करावी असे कळविले. सदर नोटीस मिळाल्यावर उभय तक्रारदारांनी विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेच्या कार्यालयात भेट देऊन मूळ कर्जदार श्री जगतपाल धाडीया यांचा पत्ता कळवून प्रथम मूळ कर्जदारा कडून कर्ज रकमेची वसुली करावी व त्यानंतर वसुली न झाल्यास जामीनदार असलेले तक्रारदार कर्ज रकमेची परतफेड करतील असे सांगितले होते. उभय तक्रारदारांनी मूळ कर्जदाराचे कर्ज खाते उता-याची प्रत मागितली असता ती पुरविण्यास विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंके तर्फे नकार देण्यात आला. पुढे विरुध्दपक्ष क्रं 1 स्टेट बॅंक ऑफ इंडीया, जवाहर नगर, भंडारा येथील शाखा व्यवस्थापकांनी कर्ज प्रकरणात जामीनदार असलेल्या उभय तक्रारदारांचे नावे दिनांक-30.09.2020 रोजीचे सुचनापत्र पाठून त्याव्दारे मूळ कर्जदार यांनी शैक्षणिक कर्जाची परतफेड केलेली नसून अद्दाप रुपये-6,42,000/- बॅंकेला घेणे बाकी आहे आणि मूळ कर्जदार यांचा पत्ता लागत नाही करीता उभय तक्रारदार हे सदर शैक्षणिक कर्ज प्रकरणात जामीनदार असल्याने बॅंकेच्या नियमा प्रमाणे उभय तक्रारदारांचे बॅंकेच्या खात्यातील व्यवहार रोखून धरण्यात येत आहेत असे कळविले.
उभय तक्रारदारांचे असेही म्हणणे आहे की, दरम्यानचे काळात कोवीड-19 रोगाचा प्रार्दुभाव वाढलेला असून त्यांना या काळात तयांचेच खात्यातील पैसा मिळू शकलेला नाही परिणामी त्यांना शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, करीता उभय तक्रारदारांच्या बचत खात्यावरील बंद उठविण्यात यावी. तक्रारकर्ता क्रं 1 श्री ताराचंद गोविंद काळबांधे यांचे असेही महणणे आहे की, त्यांनी त्यांचे मुलाचे शिक्षणा करीता रुपये-9,00,000/- चा धनादेश जारी केला होता परंतु विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी सदर धनादेशाची रक्कम दिली नाही. विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी दिनांक-01.10.2020 रोजी रुपये-6,42,000/- गोठविले आणि नंतर पत्र दिले.म्हणून शेवटी उभय तक्रारदारांनी विरुध्दपक्ष बॅंके विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
- गैरअर्जदार क्रं 1 ने होल्ड केलेले भारतीय स्टेट बॅंक शाखा जवाहरनगर मधील तक्रारकर्ता क्रं 1 यांचे बचत खाते क्रं -11517212384 आणि क्रं 2 चे बचत खाते क्रमांक-11517258352 नियमित करावे व त्यातील होल्ड केलेली रक्कम रुपये-6,42,000/- तक्रारकर्ता यांना देण्याचे आदेश पारीत करहावे तसेच गैरअर्जदारांनी बचत खाते होल्ड केलेल्या दिनांक-01.10.2020 पासून ते रकमेची पूर्ण परतफेड होई पर्यंत 18 टक्के वार्षिक वरूाजाने रक्कम परत देण्याचे आदेश अर्जदाराच्या बाजूने दयावे.
- तक्राकर्त्याला गैरअर्जदारांमुळे झालेल्या मानसिक आणि आर्थिक व शारिरीक त्रासापोटी गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्याला कमीतकमी प्रत्येकी रुपये-50,000/- देण्याचे आदेश दयावे.
- सदर तक्रारीचा खर्च प्रत्येकी रुपये-15,000/- मंजूर करण्यात यावा. तसेच मा. कोर्ट विद्दमान जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, भंडारा यांनी योग्य ते आदेश तक्रारकर्त्याच्या बाजूने दयावे.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 स्टेट बॅंक ऑफ इंडीया यांचे तर्फे लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करण्यात आले. त्यांनी लेखी उत्तरात असे नमुद केले की, उभय तक्रारदार यांचे त्यांचे बॅंकेत बचतखाते असून त्यांचे बचत खात्यातील व्यवहार हे विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेच्या दिनांक-30.09.2020 रोजीचे पत्रा नुसार बंद केलेले आहेत.विरुध्दपक्ष स्टेट बॅंकेनी हे सुध्दा मान्य केले की, विरुध्दपक्ष क्रं 1 यांनी तक्रारकर्त्यांना त्यांच्या खात्यातील रक्कम रुपये-6,42,000/- वापरण्यास बंदी केलेली आहे. तक्रारकर्ता क्रं 1 यांनी बचत खात्या मधून रुपये-9,00,000/- वळती करण्यासाठी धनादेश जारी केला होता परंतु विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी धनादेशाची रक्कम दिली नाही हे म्हणणे सुध्दा मान्य केले. तक्रारदारांनी तयांचे तक्रारीत कुठेही नमुद केले नाही की, कोणाच्या खात्या मधून किती रक्कम विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी गोठविलेली आहे. मूळ कर्जधारक श्री जगतपाल धाडीया यांनी त्यांचे मुलीचे शिक्षणासाठी जे कर्ज घेतले होते परंतु मूळ कर्जधारक श्री जगतपाल धाडीया यांची आता आर्डीनन्स फॅक्टरी कानपूर येथे बदली झालेली आहे. सदर कर्ज प्रकरणात उभय तक्रारदार हे जामीनदार आहेत. मूळ कर्जदाराचे कर्ज रकमेची परतफेड न केल्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेचे वकीलांनी दिनांक-13.09.2020 रोजीची मूळ कर्जदार आणि कर्ज प्रकरणात जामीनदार असलेले उभय तक्रारदार यांना नोटीस पाठविली होती. सदर नोटीस मध्ये मूळ कर्जदारा कडून प्रलंबित असलेली कर्ज रक्कम रुपये-6,42,000/- एवढया रकमेची विरुध्दपक्ष बॅंकेला वसुली करावयाची आहे असे सुध्दा नमुद केले होते. कर्जदाराच्या कर्जा करीता कर्जदारा एवढेच जामीनदार सुध्दा तेवढेच जबाबदार आहेत. मूळ कर्जदारा कडून कर्ज वसुली होण्याचे दृष्टीने जामीनदार असलेले तक्रारदार यांनी कोणतीही पाऊले उचलली नाहीत. मूळ कर्जदाराने विरुध्दपक्ष बॅंकेतील त्याचे खाते सुध्दा बंद केलेले आहे, त्यामुळे विरुध्दपक्ष बॅंकेनी कर्जाची वसुली जामीनदारांच्या खात्यातून कायदेशीररित्या (Legally) केलेली आहे. मूळ कर्जदार यांचे कडे दिनांक-30.09.2020 पर्यंत कर्ज रक्कम रुपये-6.42 लक्ष थकीत होती व ती वसुल करणे आवश्यक आहे, करीता तक्रारदार हे जामीनदार असल्याने तयांचे खाते गोठविण्यात आले व खात्यातील उर्वरीत रकमेचा वापर करण्यासाठी तक्रारदार हे स्वतंत्र आहेत. जर तक्रारदारांनी मूळ कर्जदारा कडून कर्जाची थकीत रक्कम कर्ज खात्यात भरुन दिली तर विरुध्दपक्ष स्टेट बॅंक ही तक्रारदारांची गोठविलेली रक्कम तक्रारदारांना प्रचलीत व्याजासह परत करण्यास तयार आहे. अशाप्रकारे विरुध्दपक्ष बॅंकेनी कायदयातील नियमा नुसार कार्यवाही केलेली असून त्यांनी तक्रारदारांना कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. तक्रारदारांची तक्रार खोटी व बनावट असून ती खारीज करण्यात यावी अशी विनंती केली.
04. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रारी सोबत अंतरीम आदेश मिळावा म्हणून विरुध्दपक्ष स्टेट बॅंके विरुध्द अंतरीम अर्जाचे किरकोळ प्रकरण क्रं MA/20/83 दाखल केले होते आणि सदर अंतरीम प्रकरणा मध्ये उभय पक्षकार व त्यांचे अधिवक्ता यांचा मौखीक युक्तीवाद ऐकल्या नंतर जिल्हा ग्राहक आयोगाने दिनांक-19 ऑक्टोंबर, 2020 रोजी आदेश पारीत करुन कोवीड-19 रोगाचा प्रार्दुभाव लक्षात घेऊन उभय तक्रारदारांचा अंतरीम अर्ज अटी व शर्तीवर मंजूर करण्यात आला होता. अंतरिम आदेश पारीत दिनांक-19 ऑक्टोंबर, 2020 रोजी उभय तक्रारदारांचे बचत खात्या मध्ये जेवढी रक्कम शिल्लक असेल त्यापैकी 30 टक्के एवढी रक्कम प्रत्येक तक्रारदाराच्या बचत खात्या मध्ये जमा ठेऊन उर्वरीत 70 टक्के रक्कम प्रत्येक तक्रारदारास विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी उचल करु दयावी. त्याच बरोबर सदर आदेश पारीत झाल्या नंतर पुढील महिन्या पासून म्हणजे माहे नोव्हेंबर-2020 पासून ते प्रस्तुत तक्रारी मध्ये अंतीम निकाल लागे पर्यंतच्या कालावधी मध्ये प्रत्येक तक्रारदारांच्या बचत खात्या मध्ये ज्या काही रकमा जमा होतील त्या जमा होणा-या रकमे पैकी 30 टक्के रक्कम बचत खात्यात जमा ठेऊन उर्वरीत 70 टक्के रक्कमेची उचल प्रत्येक तक्रारदारास विरुध्दपक्ष स्टेट बॅंक ऑफ इंडीयाने करु दयावी असे आदेशित केले होते.
05. तक्रारदारांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले दस्तऐवज, उभय तक्रारदारांचे स्वतंत्ररित्या शपथे वरील पुरावे त्याचबरोबर विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 स्टेट बॅंकेचे लेखी उत्तर व शपथे वरील पुरावा तसेच विरुध्दपक्ष बॅंके तर्फे दाखल दसतऐवज इत्यादीचे जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे सुक्ष्म अवलोकन करण्यात आले, त्यावरुन जिल्हा ग्राहक आयोगा समोर न्यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
1 | उभय तक्रारदार हे कर्ज प्रकरणात जामीनदार असून मूळ कर्जदाराने कर्ज रक्कम थकीत ठेवल्याने विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी तक्रारदारांचे बचत खात्यातील रक्कम गोठवून दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय? | -नाही- |
2 | विरुध्दपक्ष बॅंकेनी मूळ कर्जदाराचे कर्ज खाते एन.पी.ए. केलेले असून दिवाणी न्यायालयात मूळ कर्जदार आणि जामीनदार असलेले दोन्ही तक्रारदार यांचे विरुध्द कर्ज रकमेच्या वसुलीसाठी दावा दाखल केलेला असल्याने अशा परिस्थितीत उभय तक्रारदारांची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे काय | -नाही- |
2 | काय आदेश | अंतीम आदेशा नुसार |
:: कारणे व मिमांसा ::
मुद्दा क्रं 1 व 2
06. उभय तक्रारदार हे आर्डीनन्स फॅक्टरी जवाहर नगर, भंडारा येथे कार्यरत आहेत आणि त्यांचे विरुध्दपक्ष क्रं 1 स्टेट बॅंक ऑफ इंडीया, जवाहर नगर, भंडारा येथे वेतनाचे बचत खाते असून त्यांचे खात्यांचे क्रमांक अनुक्रमे-11517212384 आणि क्रं-11517258352 असे आहेत आणि त्यांचे सदर बचत खात्यांमध्ये त्यांची प्रतीमाह वेतनाची रक्कम जमा होत होती. त्याच बरोबर उभय तक्रारदारां सोबत आर्डीनन्स फॅक्टरी, जवाहर नगर, भंडारा येथील कार्यरत कर्मचारी श्री जगतपाल मय्यादिन धाडीया बॉयलर अटेंडन्ट यांनी त्यांनी दिनांक-03 मे, 2012 रोजी त्यांची अपंग मुलगी आकृतीदेवी जगतपाल मय्यादिन धाडीया हिचे शिक्षणासाठी विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेतून रुपये-5,00,000/- एवढया रकमेचे कर्ज घेतले होते आणि सदर शैक्षणिक कर्जासाठी उभय तक्रारदार हे जामीनदार होते. परंतु मूळ कर्जदार श्री जगतपाल मय्यादिन धाडीया यांचे सध्या स्थानांतरण आयुध निर्माणी क्रम संख्या-9817 कानपूर येथे झालेली आहे. मूळ कर्जदार यांचे कडे दिनांक-30.09.2020 पर्यंत कर्ज रक्कम रुपये-6.42 लक्ष थकीत होती या बाबी उभय पक्षांना मान्य आहेत, त्या बद्दल कोणताही विवाद नाही.
07. विरुध्दपक्ष बॅंकेचे असे म्हणणे आहे की, त्यांनी कर्जाची वसुली जामीनदारांच्या खात्यातून कायदेशीररित्या (Legally) केलेली आहे. मूळ कर्जदार यांचे कडे दिनांक-30.09.2020 पर्यंत कर्ज रक्कम रुपये-6.42 लक्ष थकीत होती व ती वसुल करणे आवश्यक आहे, करीता तक्रारदार हे जामीनदार असल्याने त्यांचे बचत खाते गोठविण्यात आले व खात्यातील उर्वरीत रकमेचा वापर करण्यासाठी तक्रारदार हे स्वतंत्र आहेत. जर तक्रारदारांनी मूळ कर्जदारा कडून कर्जाची थकीत रक्कम कर्ज खात्यात भरुन दिली तर विरुध्दपक्ष स्टेट बॅंक ही तक्रारदारांची गोठविलेली रक्कम तक्रारदारांना प्रचलीत व्याजासह परत करण्यास तयार आहे. अशाप्रकारे विरुध्दपक्ष बॅंकेनी कायदयातील नियमा नुसार कार्यवाही केलेली असून त्यांनी तक्रारदारांना कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही.
08. प्रकरणातील उपलब्ध दसतऐवजाचे अवलोकन केले असता विरुध्दपक्ष क्रं 1 बॅंकेनी उभय तक्रारदारांना त्यांचे बचत खात्यातील व्यवहार रोखून धरल्या बाबत दिनांक-30.09.2020 रोजीचे सुचनापत्र रजिस्टर पोस्टाने पाठविलया बाबत सुचनापत्राची प्रत पुराव्यार्थ दाखल केलेली आहे. तसेच विरुध्दपक्ष बॅंकेचे वकील श्री आर.के. सक्सेना यांनी मूळ कर्जदार याचे मुंबई येथील राहते घरी तसेच आर्डीनन्स फॅक्टरी कानपूर येथे त्याच बरोबर उभय तक्रारदार जे जामीनदार आहेत त्यांना दिनांक-13.03.2020 रोजीची कर्ज वसुली संबधात कायदेशीर नोटीस सुध्दा पाठविलेली असून सदर नोटीसची प्रत पुराव्यार्थ अभिलेखावर दाखल आहे.
09. विरुध्दपक्ष स्टेट बॅंक ऑफ इंडीया तर्फे पुराव्याचे जे शपथपत्र दाखल केलेले आहे त्यानुसार उभय तक्रारदार हे कर्ज प्रकरणात जामीनदार आहेत आणि बॅंकेच्या नियमा नुसार जर कर्जदाराने कर्ज रकमेची परतफेड केली नाही तर कर्ज परतफेडीची जबाबदारी ही जामीनदाराची असते तसेच दिनांक-13.03.2020 पर्यंत कर्जाची थकीत रक्कम रुपये-6.42 लक्ष एवढी होती असे सुध्दा नमुद केलेले आहे. जिल्हा ग्राहक आयोगाचे अंतरीम आदेशा प्रमाणे उभय तक्रारदार यांनी त्यांचे बचत खात्या मधून बरीच मोठी रककम काढलेली आहे. त्यांनी नियमा नुसार तक्रारदारांचे बचत खाते गोठविलेले आहे. कर्ज रकमेची वसुली न झाल्यास विरुध्दपक्ष बॅंकेचे नुकसानहोणार आहे असे शपथपत्रात नमुद केले. विरुध्दपक्ष बॅंकेनी मा. दिवाणी न्यायाधीश दिवाणी न्यायालय, वरिष्ठस्तर भंडारा यांचे न्यायालयात दिवाणी दावा क्रं 10/2021 दाखल केल्या बाबत सही व शिक्का नसलेली दिवाणी दाव्याची प्रत माहितीस्तव दाखल केलेली आहे. सदर दिवाणी दाव्या व्दारे मूळ कर्जदाराची थकीत रक्कम रुपये-5,68,361.57 आणि व्याज व ईतर खर्च असे मिळून डिक्री पास करण्याची विनंती केलेली आहे.
10. विरुध्दपक्ष बॅंकेनी मूळ कर्जदाराचे दिनांक-20.06.2012 ते 25.05.2021 या कालावधीची खाते उता-याची प्रत पुराव्यार्थ दाखल केलेली आहे. सदर खाते उता-यावरुन असे दिसून येते की, विरुध्दपक्ष बॅंकेनी मूळ कर्जदार श्री जगतपाल मय्यादिन धाडीया यांचे कर्ज खाते N.P.A. करुन दिनांक-27.12.2018 रोजी CURRENT LOAN ACCOUNT WRITE OF CREDIT RS.-5,36,571.57 दर्शविले असून Balance-0 दर्शविलेले आहे. या नोंदी वरुन असे दिसून येते की, विरुध्दपक्ष बॅंकेनी मूळ कर्जदाराचे कर्ज खाते एन.पी.ए. करुन दिनांक-27.12.2018 रोजी बंद केलेले आहे आणि दिवाणी न्यायालयात कर्ज रकमेच्या वसुलीसाठी मूळ कर्जदार आणि उभय तक्रारदार यांचे विरुध्द दावा दाखल केलेला आहे. अशापरिस्थितीत विरुध्दपक्ष बॅंकेनी जामीनदार असलेले उभय तक्रारदार यांचे बचत खात्यामधील रक्कम गोठविण्याची कार्यवाही ही दोषपूर्ण सेवेत मोडत नाही कारण विरुध्दपक्ष बॅंकेनी बॅंकेच्या नियमा नुसार कार्यवाही केलेली आहे आणि जिल्हा ग्राहक आयोगाने कोवीड-19 रोगाचा प्रार्दुभाव लक्षात घेऊन उभय तक्रारदारांचे बचत खात्यातील एकूण जमा रकमे पैकी 70 टक्के काढण्याची उभय तक्रारदारांना मुभा सुध्दा दिलेली होती. परंतु दिवाणी न्यायालयात कर्ज रक्कम वसुलीचा दावा विरुध्दपक्ष बॅंकेनी दाखल केलेला आहे, त्यामुळे आम्ही मुद्दा क्रं 1 व 2 चे उत्तर नकारार्थी नोंदवित आहोत, मुद्दा क्रं 1 व क्रं 2 चे उत्तर नकारार्थी नोंदविल्याने मुद्दा क्रं 3 अनुसार उभय तक्रारदारांची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. उभय तक्रारदारांनी मूळ तक्रारीचा निकाल लागे पर्यंत जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष जे अंतरीम अर्जाचे किरकोळ प्रकरण क्रं MA/20/83 दाखल केले होते त्यामध्ये जिल्हा ग्राहक आयोगाने दिनांक-19 ऑक्टोंबर, 2020 रोजी पारीत केलेला आदेश आता मूळ तक्रार खारीज झालेली असल्याने आपोआपच निरस्त ठरतो.
11. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन जिल्हा ग्राहक आयोग प्रस्तुत तक्रारीमध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
:: अंतीम आदेश ::
- उभय तक्रारदार क्रं 1) श्री ताराचंद गोविंद काळबांधे आणि तक्रारदार क्रं 2) श्री किशोर लालाजी रामटेके यांची विरुध्दपक्ष क्रं 1 भारतीय स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखा जवाहर नगर, भंडारा तर्फे शाखा प्रबंधक आणि विरुध्दपक्ष क्रं 2) भारतीय स्टेट बॅंक ऑफ इंडीया तर्फे विभागीय प्रबंधक, नागपूर यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
- खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
- उभय तक्रारदारांनी मूळ तक्रारीचा निकाल लागे पर्यंत जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष जे अंतरीम अर्जाचे किरकोळ प्रकरण क्रं MA/20/83 दाखल केले होते त्यामध्ये जिल्हा ग्राहक आयोगाने दिनांक-19 ऑक्टोंबर, 2020 रोजी पारीत केलेला आदेश आता मूळ तक्रार खारीज झालेली असल्याने आपोआपच निरस्त ठरतो.
- उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्ध करुन दयावी
- उभय पक्षकार व त्यांचे अधिवक्ता यांना निर्देशित करण्यात येते की, त्यांनी जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष प्रकरणात दाखल केलेले अतिरिक्त संच जिल्हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.