(आयोगाचे निर्णयान्वये, सौ. किर्ती वैद्य(गाडगीळ), मा. सदस्या)
(पारीत दिनांक ०५/१२/२०२२)
तक्रारदाराने ग्राहक सरंक्षण अधिनियम १९८६ चे कलम १२ अन्वये सदर तक्रार दाखल केलेली आहे.
१. तक्रारदार हे पोलीस अधिक्षक कार्यालय येथे वरीष्ठ श्रेणी लिपीक या पदावर असून त्यांचे वेतन खाते विरुध्दपक्ष यांचेकडे “0” बॅलेंसवर असून त्यांचा बचत खाते क्रमांक ३१९८०१११७७१ असा आहे. तक्रारदाराचे नियमीत वेतन सदर खात्यात दरमहा नियमीत जमा होते. तक्रारदाराने काही कौटूंबीक वस्तु गॅस चिमणी, मोबाईल, टिव्ही हप्त्याने मेसर्स बजाज फायनान्स लिमी., चंद्रपूर यांच्या मार्फत खरेदी आधिसुध्दा केल्या असून त्याची मासिक किस्त तक्रारदाराच्या वेतनातून दर महिण्याला २ तारखेला कपात होत असते. परंतू विरुध्दपक्ष हयांनी माहे डिसेंबर-२०१९ च्या महिण्यात तक्रारदाराचे वेतन हे २ तारखेला रुपये २०,७१८/- खात्यात जमा झाले असतांनाही, तक्रारदाराचे खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याचे कारणाने दिनांक ०३/१२/२०१९ रोजी उपरोक्त वस्तुच्या किस्त कपाती केल्या परंतू त्या दिवशी दिनांक ०३/१२/२०१९ रोजी तक्रारदाराकडून कोणतेही दंड किंवा शुल्क घेण्यात आले नाही. परंतू त्यानंतर विरुध्दपक्ष हयांनी तब्बल १४ दिवस उशिराने दिनांक १७/१२/२०१९ रोजी रुपये २९५/- या प्रमाणे ३ नोंदीत रुपये ८८५/- कपात केले. तक्रारदाराचे पास बुकात पाहिले असता त्या रक्कमा मे. बजाज फायनान्स लिमी., चंद्रपूर यांचे नांवे कपात केलेल्या दिसून येत आहे. या बाबत मे. बजाज फायनान्सला विचारणा केली असता त्यांचे स्टेटमेंटमध्ये कुठलीही रुपये २९५/- ची रक्कम जमा असल्याचे दिसून येत नाही. सबब तक्रारदाराने दिनांक १९/१२/२०१९ रोजी विरुध्दपक्ष हयांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर रक्कम सर्व्हीस चार्ज म्हणून कापली असे सांगितले, तक्रारदाराने त्या जी.आर बद्दल बॅंक निर्णयाची प्रत विरुध्दपक्ष हयांना मागीतली असता विरुध्दपक्ष हयांनी तसा अर्ज तक्रारदाराला दयायला सांगितला. तक्रारदाराने तसा अर्ज विरुध्दपक्ष हयांना दिला असता दिनांक २७/१२/२०१९ रोजी इमेल प्रत तक्रारदाराला देण्यात आली त्यावर बॅंकेची स्वाक्षरी व स्टॅम्प विरुध्दपक्ष हयांनी मारला नाही. तक्रारदाराचे म्हणण्याप्रमाणे तक्रारदाराचे खात्यात रुपये २०,७१८/- दिनांक ०२/१२/२०१९ रोजी जमा असतांना मे. बजाज फायनान्स लिमी.च्या ३ किस्तीची एकूण रक्कम रुपये ६,०८०/- कपात विरुध्दपक्षाने का केली नाही तसेच दिनांक ०३/१२/२०१९ रोजी किस्तीची कपात केली असतांना त्याच दिवशी रुपये ८८५/- दंडाची कपात न करता दिनांक १७/१२/२०१९ रोजी रुपये ८८५/- ची कपात का केली, तसेच दंडाची कपात ही मे. बजाज फायनान्सच्या नांवे केली असतांना ती रक्कम रुपये ८८५/- मे. बजाज फायनान्सला का पाठविली नाही. तसेच विरुध्दपक्ष हयांनी सर्व्हीस चार्ज कोणत्या आधारे कपात केला या बाबत विरुध्दपक्ष हयांनी तक्रारदाराला कोणतेही समाधानकारक उत्तर न दिल्याने विरुध्दपक्षाविरुध्द तक्रारदाराने सदर तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदाराने तक्रारीत मागणी केलेली आहे की, विरुध्दपक्ष हयांनी रुपये २९५/- या प्रमाणे ३ वेळा कपात केलेले एकूण रुपये ८८५/- तक्रारदाराल परत करावे. तसेच तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रुपये २५,०००/- मिळण्या यावे. तसेच तक्रारीचा खर्च रुपये २,०००/- विरुध्दपक्ष हयांनी दयावा.
३. तक्रारदाराची तक्रार स्विकृत करुन विरुध्दपक्ष हयांना नोटीस आयोगामार्फत पाठविण्यात आली.
४. विरुध्दपक्ष हयांनी तक्रारीत उपस्थिती राहून त्यांचे उत्तर दाखल करीत तक्रारदाराचे म्हणणे खोडून काढीत पुढे नमूद केले की, तक्रारदाराने मे. बजाज फायनान्स कंपनीकडून घरगुती वापराचे काही वस्तू मासीक हप्त्याचे परतफेडीमध्ये विकत घेतल्या व त्यासाठी मासीक किस्त रुपये १३७५/-, रुपये १४९९/- व रुपये ३२०६/- असे एकूण रुपये ६०८०/- प्रमाणे विरुध्दपक्ष हयांच्या बॅंकमध्ये तक्रारदाराच्या खात्यातून कपात करण्याचे (ECS) व्दारे कपात करण्याचे Standing Instruction (SI) मे. बजाज फायनान्स ने दिले होते. ECS व्दारे कर्जाचे हप्तेकपात होत असतील तर ज्या दिवशीचे ECS चे SI दिलेले असेल त्याच्या अगोदरच खात्यात रक्कम जमा ठेवणे आवश्यक असते कारण ECS व्दारे रक्कम तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत म्हणजे १२.०० वाजेपर्यंत केव्हाही कपात होऊ शकते. तक्रारदाराने मे. बजाज फायनान्सला हप्ते कपातीसाठी २ तारखेचा SI दिलेले होते. तक्रारदाराचे खात्यात दिनांक ०२/१२/२०१९ रोजी ज्या वेळी ECS लागले त्यावेळी तक्रारदाराचे खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामूळे SI फेल दाखविण्यात आले व त्यामुळे नियमाप्रमाणे तक्रारदाराच्या खात्यातून सर्व्हीस चार्जेस रुपये २५०/- व त्यावर जीएसटी असे एकूण रुपये २९५/- प्रमाणे एकूण ३ नोदींत रक्कम रुपये ८८५/- कपात केले व हे चार्जेस नियमाप्रमाणेच कपात केलेले आहे. त्यामुळे तक्रारदाराचे म्हणणे की, विरुध्दपक्ष हयांनी सेवेत न्युनता दिली हे खोटे आहे. तक्रारदाराचे खात्यात दिनांक ०२/१२/२०१९ रोजी रुपये २०,७१८/- पगार स्वरुपी जमा झाले पण ते जमा होण्यापुर्वीच तक्रारदाराने मे. बजाज फायनान्स ला दिलेले ३ मासिक हप्त्याचे SI Mandate झाले व त्यावेळेस तक्रारदाराचे खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे सर्व्हीस चार्जेस म्हणून रुपये ८८५/- कपात केले व ते नियमाप्रमाणेच केले. रात्री १२.०० वाजल्यानंतर २ तारीख येते आणि तक्रारदाराच्या खात्यात रक्कम दिनांक ०२/१२/२०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता नंतर जमा झालेली आहे. सबब सर्व्हीस चार्जेस तक्रारदाराचे खात्यातून कपात केले गेले ते नियमाप्रमाणेच कपात केले असल्यामूळे विरुध्दपक्ष हयांनी तक्रारदाराला कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिली नसल्यामुळे सदर तक्रार खारीज करण्यात यावी.
५. तक्रारदाराची तक्रार, दस्ताऐवज तसेच विरुध्दपक्ष हयांचे उत्तर, दस्ताऐवज तसेच लेखी युक्तीवाद यावरुन निकालीकामी आयोग खालिल मुद्दे व त्यावरील निष्कर्ष व त्यावरील कारणमिमांसा खालिल प्रमाणे आहे.
कारणमीमांसा
६. तक्रारदाराच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे त्यांनी घरगुती वापराकरीता नमूद तिन वस्तू खरेदी हप्त्याने मेसर्स बजाज फायनान्स लिमी. चंद्रपूर मार्फत खरेदी केल्या असून त्याचे एकूण किस्त रुपये ६०८०/- त्यांचे वेतनातून ECS व्दारे विरुध्दपक्ष यांच्या बॅंकेतून दर महिण्याला २ तारखेला कपात होत होते. तक्रारदाराच्या तक्रारीप्रमाणे माहे डिसेंबर-२०१९ च्या महिण्यात २ तारखेला रुपये २०,७१८/- खात्यात जमा असतांनाही खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याचे कारणाने विरुध्दपक्ष हयांनी तब्बल १४ दिवसांनी दिनांक १७/१२/२०१९ रोजी रुपये २९५/- या प्रमाणे ३ नोंदील एकूण ८८५/- रुपये कपात केले ही रक्कम विरुध्दपक्ष हयांनी बेकायदेशीरपणे खात्यात वेतन जमा असून सुध्दा सर्व्हीस चार्जच्या नांवाखाली कपात केली असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. विरुध्दपक्ष हयांनी त्यांचे उत्तरात बचाव घेतला आहे की, तक्रारदार हयांनी विरुध्दपक्षाकडे असलेल्या त्यांच्या खात्यामधून तक्रारदाराने बजाज फायनान्स ला दिलेला SI (Standing Instruction) प्रमाणे ECS व्दारे कपात होते व ही प्रोसेस रिझर्व बॅंककडून होते. ECS व्दारे कर्जाचे हप्ते कपात होत असतील तर त्या तारखेअगोदर खात्यात रक्कम असणे अनिवार्य आहे कारण ECS व्दारे रक्कम ठरलेल्या तारखेच्या आधिच्या मध्यरात्री पासून म्हणजे रात्री १२.०० नंतर लागते त्यामुळे तक्रारदाराच्या खात्यात २ तारखेला त्याचे वेतन जमा झाले परंतू बजाज फायनान्सला दिलेल्या SI प्रमाणे रक्कम कपात १ तारखेच्या रात्री १२.०० नंतर म्हणजे २ तारीख लागल्यावर सकाळीच लागले तेव्हा तक्रारदाराचे वेतन विरुध्दपक्षाकडे जमा झाले नसल्यामुळे SI फेल झाल्यामुळे २९५/- व त्यावर जीएसटी प्रमाणे तीन नोंदीवर ८८५/- नियमाप्रमाणे कपात केले गेले. तक्रारीत दाखल दस्ताऐवजव विरुध्दपक्ष हयांचे उत्तर व युक्तीवाद यावरुन आयोगाच्या मते तक्रारदाराला हयाबाबतीत पूर्ण कल्पना होती की SI प्रमाणे ECS २ तारखेला लागून त्याचे तीन नोंदीप्रमाणे हप्त्याची कपात होते परंतू तक्रारदाराने दाखल केलेल्या पासबुकच्या नोंदीप्रमाणे दिनांक ०२/१२/२०१९ च्या आधी त्याच्या खात्यात रक्कम शिल्लक फक्त रुपये २८५.८६ होती व त्यानंतर दिनांक ०२/१२/२०१९ रोजी तक्रारदाराचे वेतन रुपये २०,७१८/- जमा झालेले दिसून येत आहे. परंतू ECS च्या नियमाप्रमाणे ECS चे Standing Instruction असतांना १ तारखेच्या मध्यरात्री म्हणजे रात्री १२.०० वाजल्यानंतर २ तारीख लागल्यावर ECS लागले तेव्हा तक्रारदाराचे खात्यात वेतन जमा झाले नसल्यामुळे विरुध्दपक्ष हयांनी ECS फेल असे दाखवून नियमाप्रमाणे १५ दिवसानंतर दिनांक १७/१२/२०१९ रोजी २९५/-प्रमाणे तीन नोंदीत जीएसटी सहीत सर्व्हीस चार्ज रुपये ८८५/-कपात केल्याचे पासबुकात नोंद दिसून येत आहे. आयोगाच्या मते विरुध्दपक्ष हयांनी नियमाप्रमाणेच तक्रारदार हयांना सर्व्हीस चार्जेस लावलेले असल्यामूळे त्यांनी तक्रारदाराप्रति कोणतीही सेवेत न्युनता दिली नाही असे आयोगाचे मत असल्याने आयोग खालिल आदेश पारीत करीत आहे.
अंतिम आदेश
१. तक्रारकर्त्याची तक्रार क्र. १४/२०२० खारीज करण्यात येते.
२. तक्रारीचा खर्च उभयपक्षांनी स्वतः सहन करावा.
३. उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावेत.