(मंचाचे निर्णयान्वये, श्री. सादिक मोहसिनभाई झवेरी, सदस्य)
तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असुन तक्रारीचा आशय थोडक्यात खालिल प्रमाणे..
1. तक्रारकर्ता हा निवृत्ती वेतनधारक असून तो सध्या जिल्हा कॉम्प्लेक्स शाळेसमोर, सोनापूर कॉम्प्लेक्स वार्ड नं.14, गडचिरोली येथे कुठूंबासह वास्तव्यास आहे. तक्रारकर्त्याचे भारतीय स्टेट बँक, गडचिरोली शाखेत पेंशन खाते असुन त्याचा क्रमांक 36037031474 असा आहे. तक्रारकर्ता दि.30.06.2018 रोजी गोंडवाना युनिव्हरसीटी, गडचिरोली येथील ATM मधून रु.5,000/- काढण्याकरता गेला असता त्यास ATM मशीन मधून पैसे मिळाले नाही मात्र त्याचे खात्यातून रु.5,000/- डेबीट झाल्याबाबतचा SMS आला. त्यामुळे तक्रारकर्त्याने व्यथीत होऊन तेथील वॉचमन श्री. बंडू विठोबा आगलावे यांना सांगितले. तेव्हा त्यांनी ATM मध्ये पैसे नसल्याचे सांगितले. त्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र.1 बँकेत जाऊन तेथील अधिका-यांचे निदर्शनास सदर बाब आणून दिली असता त्यांचे सल्ल्यानुसार क्र.1800112211 वर ऑनलाईन तक्रार केली तेव्हा 1-2 दिवसात पैसे खात्यात जमा होईल असे सांगण्यात आले. तक्रारकर्त्याने तक्रारीत असे नमुद केले आहे की, त्याचे खात्यात रक्कम जमा न झाल्यामुळे वारंवार पुन्हा क्र.1800112211 वर कॉल केला असता संबंधीत ब्रँचला रिमाईंडर पाठवितो तरी आपण तेथे जाऊन चौकशी करावी असे सांगिण्यात आले. तक्रारकर्त्याने त्यानंतर दि.16.07.2018 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकडे अर्ज सादर करुन रक्कम खात्यात जमा करण्याबाबत विनंती केली. त्याचप्रमाणे विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकडे सुध्दा रक्कम मिळण्याबाबत चौकशी केली परंतु त्यांनी तुमचा ATM विरुध्द पक्ष क्र.1 कडील असल्यामुळे आम्ही काहीही करु शकत नाही, असे सांगितले.
2. तक्रारकर्त्याने तक्रारीत पुढे असे नमुद केले आहे की, त्याला दि.08.08.2018 रोजी मोबाईलवर “Your Complaint 4546520779 has been attended to and closed after resolution as: ATM BANK HAS AGAIN CONFIRMED THIS TRANSACTION AS SUCCESSFUL. RELEVENT DOCUMENTS SENT TO YOUR BRANCH.” अशाप्रकारे SMS आला. सदरचा SMS दिशाभुल करणारा असुन या दरम्यान तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकडे CCTV फुटेज देण्याबाबतचा विनंती केली असता दि.14.08.2018 रोजी ते दाखलविण्यांत आले. त्यामध्ये तक्रारकर्त्यास रक्कम मिळाली असल्याचे आढळून आले नाही. तसेच तक्रारकर्त्यानंतर ATM मध्ये आलेल्या इसमास सुध्दा रक्कम मिळाल्याचे दिसुन आले नाही. तक्रारकर्त्याने CCTV फुटेज व रक्कम मिळण्याबाबत विरुध्द पक्ष क्र.1 यांचे कडे वेळोवेळी विनंती अर्ज सादर केले, परंतु त्यांनी एकाही अर्जाचे उत्तर देण्याची तसदी घेतली नाही व तक्रारकर्त्यास मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून तक्रारकर्त्याने सदरची तक्रार मंचासमक्ष दाखल करुन खालिलप्रमाणे मागण्या केलेल्या आहेत.
अ) विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास रु.5,000/- द.सा.द.शे.15% दराने देण्याचा आदेश व्हावा.
ब) विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- देण्याचा आदेश व्हावा.
3. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे अनुषंगाने विरुध्द पक्षांना नोटीस बजावण्यात आली असता विरुध्द पक्ष क्र.2 ने प्रकरणात हजर होऊन निशाणी क्र.5 वर आपले लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदार 2 ने आपल्या लेखी उत्तरात ATM चे व्यवहार संपूर्ण झाल्याचे CODE-0 ची पावती दाखल करून “ The Transaction Is Successfull “ झाल्याचे कथन केले आहे व आम्ही कुठलीही अनुचित सेवा दिली नाही व तुमची तक्रार बंद केलेली आहे असे म्हटले आहे. विरुध्द पक्ष क्र. 1 यांना वारंवार संधी देऊन सुध्दा हजर न झाल्यामुळे त्यांचे विरुध्द निशाणी क्र.1 वर प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित करण्यांत आला.
4. तक्रारकर्त्याची तक्रार, शपथपत्र, विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी दाखल केलेले बयान, तसेच तक्रारकर्त्याचे तोंडी युक्तिवादावरून खालिल मुद्दे निघतात.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षांचा ग्राहक आहे काय ? होय
2) विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याप्रती सेवेत न्युनतापूर्ण होय
व्यवहार केला आहे काय ?
3) अंतिम आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
- // कारणमिमांसा// -
5. मुद्दा क्रमांक 1 बाबतः- विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 ह्या राष्ट्रीयकृत बँक असुन तक्रारकर्त्याचे विरुध्द पक्ष क्र.1 भारतीय स्टेट बँक, गडचिरोली शाखेत पेंशन खाते असुन विरुध्द पक्ष क्र.1 यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांचे ATM मशीन वापरण्याबाबतच्या सेवा तक्रारकर्त्यास प्रदान केल्या असल्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचा ग्राहक आहे, ही बाब सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
6. मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबतः- विरुध्द पक्ष क्र.2 यांनी आपले उत्तर दाखल करुन तक्रारकर्त्यास लेखी उत्तराची व दस्तावेजांची प्रत न देता मंचातून निघून गेले. तक्रारकर्त्यास विरुध्द पक्ष क्र.2 च्या लेखीउत्तराची प्रत व दस्तावेज मिळावे यासाठी तक्रारकर्त्याने निशाणी क्र.6 वर केलेल्या अर्जावर मंचाव्दारे आदेश करुन निशाणी क्र.7-8 नुसार विरुध्द पक्ष क्र.2 ला नोटीस काढून व तो तामील होऊन सुध्दा विरुध्द पक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्त्यास लेखी उत्तराची प्रत व दस्तावेज दिले नाही. सबब तक्रारकर्त्याचे विनंती वरुन व निशाणी क्र.10 च्या अर्जावरुन विरुध्द पक्ष क्र.2 च्या शपथपत्रा विना व युक्त्िावादाविना प्रकरण पुढे चालविण्यात यावे असा आदेश या मंचाव्दारे निशाणी क्र. 1 वर पारीत करण्यात आला. तसेच विरुध्द पक्ष क्र. 1 यांना वारंवार संधी देऊन सुध्दा हजर न झाल्यामुळे त्यांचे विरुध्द निशाणी क्र.1 वर प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित करण्यांत आला.
7. सदर प्रकरणात दोन्ही विरुध्द पक्ष किती उध्धट व अरेरावी करणारे आहेत हे वरील विवेचनावरुन सिध्द होते. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 ही सरकारी बँक असून प्रत्येक कामाचे पैसे घेऊन लोकांच्या हितासाठी काम करणारी वित्तीय संस्था आहे. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी या प्रकरणात तक्रारकर्त्यास दिलेली सेवा ही अनुचित व्यापारी पध्दत आहे, असे या मंचाचे ठाम मत आहे. या प्रकरणातील ATM मशीनमध्ये कॅश नाही असा बोर्ड मशीन बाहेर लावून सुध्दा सदर मशीन मधून अर्जदाराचे 5 हजार कसे काय डेबीट झाले याबाबत ATM मशीनच्या बाहेर बसलेले वॉचमन बंडू विठोबा आगलावे यांनी तक्रारकर्त्याचे निदर्शनास आणून दिले असे तक्रारकर्त्याचे कथन आहे.
8. एकंदरीत ATM मशीनमध्ये रक्कम नसतांना Transaction Successful अशी पावती तक्रारकर्त्यास कशी काय मिळाली याबाबतचा कुठलाही खुलासा दोन्ही विरुध्द पक्षांनी केलेला नाही. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत CCTV फुटेज दाखविण्याची विनंती केली असता सदर CCTV फुटेज दि.14.08.2018 रोजी बघितले असता त्यात रक्कम मिळाल्याचे दिसून आलेले नाही. तरीही विरुध्द पक्षांचे म्हणणे की, ‘तुमच्या मागून रक्कम कोणाला तरी मिळाली असेल’, परंतू याची खात्री करण्यासाठी CCTV फुटेज बघीतले असता तक्रारकर्त्यानंतर आलेल्या इसमास सुध्दा रक्कम मिळाल्याचे दिसून आले नाही.
9. एकंदरीत दोन्ही विरुध्द पक्षांनी नाहक तक्रारकर्त्यास त्रास देऊन न्युनतापूर्ण सेवा व अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केलेला आहे हे सिध्द होते. सबब मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- // अंतिम आदेश // -
1. तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल विरुध्द पक्षांविरुध्दची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी संयुक्तिक किंवा वैयक्तिकरित्या तक्रारकर्त्याचे ATM मधून निघालेली रक्कम रु.5,000/- दि.30.06.2018 पासुन द.सा.द.शे. 18% व्याजासह परत करावी.
3. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थीक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- अदा करावे.
4. दोन्ही पक्षांना आदेशाची प्रथम प्रत विनामुल्य द्यावी.
5. तक्रारकर्त्यास प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.