(मंचाचे निर्णयान्वये, श्री. सादिक मोहसिनभाई झवेरी, सदस्य)
तक्रारकर्त्याने सदरची तक्रार विरुध्द पक्षाविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे...
1. तक्रारकर्ता हा मौजा आशिर्वादनगर, चामोर्शी रोड, जिल्हा गडचिरोली येथील रहीवासी असुन सेवानिवृत्त कर्मचारी आहे, तसेच विरुध्द पक्ष ही राष्ट्रीयकृत बँक आहे. सदर बँकेत तक्रारकर्त्याचे बचत खाते क्र. 20139996683 असुन त्याव्दारे तक्रारकर्ता आर्थीक व्यवहार करीत असतो. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षांचा ग्राहक आहे.
2. तक्रारकर्त्यानेचे म्हणणे असे आहे की, त्याला दि.03.11.2017 रोजी भ्रमणध्वनीवर मेसेज आला की तुमचे बचत खात्यातून रु.10,153/- विड्राल झाले व ती रक्कम बजाज अलायन्स कंपनी लि. कडे वळती करण्यांत आली. त्यामुळे तक्रारकर्त्याने दि.06.11.2017 रोजी बँकेत जाऊन बँक स्टेटमेंट काढले असता खात्यातून रु.10,153/- विड्राल झाल्याची नोंद आढळली व सदरची रक्कम बजाज अलायन्स कंपनीला ट्रान्सफर करुन खाते क्र.0032027160512 वर वळती करण्यांत आल्याचे निदर्शनास आले. यावरुन विरुध्द पक्ष बँकेने खातेदाराच्या कुठल्याही लेखी अथवा मौखिक संमतीशिवाय तक्रारकर्त्याचे खात्यातून पैसे काढून परस्पर बजाज अलायन्स कंपनीला पाठवून आर्थीक अन्याय केलेला आहे.
3. तक्रारकर्त्याने दि. 29.11.2017 रोजी शाखा व्यवस्थापक यांना अर्ज देऊन पैसे परत करण्याची मागणी केली. त्यानंतर दि.12.01.2018 रोजी बँकेने सदर पत्रावर उत्तर दिले. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, त्याने विरुध्द पक्षांचे रिजनल ऑफीस, नागपूर यांना व सिएमपी सेंटर मुंबई यांना पत्र पाठविले परंतु त्यांचेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने सदरची तक्रार मंचात दाखल करुन खालिल प्रमाणे मागणी केली आहे.
4. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत बचत खाते क्र. 20139996683 मधून गहाळ झालेली रक्कम रु. 10,153/- द.सा.द.शे.18% व्याजासह मिळावे तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थीक त्रासाबद्दल नुकसान भरपाईची रक्कम रु.20,000/- व तक्रारीचा खर्च रु.10,000/- मिळावा अश्या मागण्या केलेल्या आहेत.
5. तक्रारकर्त्याने निशाणी क्र.2 नुसार 9 झेरॉक्स दस्तावेज दाखल केले. तक्रारकर्त्याची तक्रार नोंदणीकरुन विरुध पक्ष क्र. 1 व 2 यांना नोटीस काढण्यांत आली. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर प्रकरणात हजर होऊन त्यांनी आपले लेखीउत्तर दाखल केले.
6. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी निशाणी क्र.13 नुसार दाखल केलेल्या लेखीउत्तरात तक्रारकर्त्याचे त्यांचे बँकेत बचत खाते क्र. 20139996683 असुन त्याव्दारे तक्रारकर्ता आर्थीक व्यवहार करीता असतो ही बाब मान्य केली असुन तक्रारकर्त्याचे इतर म्हणणे अमान्य केले आहे. तसेच विरुध्द पक्ष क्र.1 यांनी आपल्या विशेष कथनात नमुद केले आहे की, त्यांनी तक्रारकर्त्याचे खात्यातून बजाज अलायन्स कंपनीचे खात्यात रक्कम वळती केलेली नसुन उपरोक्त रक्कम तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे सिएमपी सेंटर, मुंबई कोड नं.426631, महल, आयएनडी ईस्ट महाकाली केव्हज, अंधेरी मुंबई यांचेकडून वळती करण्यांत आलेली असुन तक्रारकर्त्याने त्यांना सदर तक्रारीत सामिल केलेले नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्याचे खात्यातून कोणतीही रक्कम वळती केली नसल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारिज होण्यांस पात्र आहे. तसेच तक्रारकर्त्याने खोटी तक्रार दाखल करुन त्यांना मनस्ताप दिल्यामुळे रु.10,000/- ची नमुसान भरपाई देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
7. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी निशाणी क्र.10 नुसार दाखल केलेल्या लेखीउत्तरात तक्रारकर्त्याचे तक्रारीती कथन माहिती अभावी अमान्य केले असुन त्यांनी आपल्या विशेष कथनात नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याने पॉलिसी क्र.0236428361 दि.02.11.2011 रोजी काढली होती व खात्यातून प्रिमियम भरण्याकरीता स्टेट बँक ऑफ इंडियाचा खाते क्रमांक दिला होता व त्यातून प्रिमियम जमा होत होते. परंतु दि.07.08.2017 ला प्रिमियम भरण्यासाठी कॅनरा बँकेचा खाते क्रमांक दिला होता व विरुध्द पक्ष क्र.2 यांना कॅनरा बँकेतून पैसे प्राप्त झाले होते. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी पुढे असे नमुद केले आहे की, त्यांना आजपर्यंत स्टेट बँकेतून प्रिमियम प्राप्त झाले नसुन त्याबाबत ते पाठपुरावा करीता आहे. विरुध्द पक्ष क्र. 2 यांचा तक्रारकर्त्याला कोणताही त्रास देण्याचा उद्देश नसुन फक्त तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष क्र.1 यांचे चुकीमुळे सदरची बाब झाल्याचे दिसते. त्यामुळे त्यांनी कोणतीही न्यूनतापूर्ण सेवा दिली नसल्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार खारिज होण्यांस पात्र आहे.
8. तक्रारकर्त्याची तक्रार, शपथपत्र, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेले बयान, तसेच दाखल दस्तावेज, शपथपत्र व तोंडी युक्तिवादावरून खालिल मुद्दे निघतात.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्त्याने ही विरुध्द पक्षांची ग्राहक आहे काय ? होय
2) विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यानेप्रती सेवेत न्युनतापूर्ण होय
व्यवहार केला आहे काय ?
3) अंतिम आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
- // कारणमिमांसा// -
9. मुद्दा क्र.1 बाबतः- तक्रारकर्ता हा मौजा आशिर्वादनगर, चामोर्शी रोड, जिल्हा गडचिरोली येथील रहीवासी असुन सेवानिवृत्त कर्मचारी आहे, तसेच विरुध्द पक्ष ही राष्ट्रीयकृत बँक आहे. सदर बँकेत तक्रारकर्त्याचे बचत खाते क्र. 20139996683 असुन त्याव्दारे तक्रारकर्ता आर्थीक व्यवहार करीत होता ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या निशाणी क्र.2 वरील दस्त क्र.1 वरुन सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
10. मुद्दा क्र.2 बाबतः- विरुध्द पक्ष क्र.1 यांनी आपल्या विशेष कथनात नमुद केले आहे की, त्यांनी तक्रारकर्त्याचे खात्यातून बजाज अलायन्स कंपनीचे खात्यात रक्कम वळती केलेली नसुन सिएमपी सेंटर, मुंबई कोड नं.426631, महल, आयएनडी ईस्ट महाकाली केव्हज, अंधेरी मुंबई यांचेकडून वळती करण्यांत आली आहे. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी आपल्या विशेष कथनात नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याने पॉलिसी क्र.0236428361 दि.02.11.2011 रोजी काढली होती व खात्यातून प्रिमियम भरण्याकरीता स्टेट बँक ऑफ इंडियाचा खाते क्रमांक दिला होता. परंतु दि.07.08.2017 ला प्रिमियम भरण्यासाठी कॅनरा बँकेचा खाते क्रमांक दिला होता व विरुध्द पक्ष क्र.2 यांना कॅनरा बँकेतून पैसे प्राप्त झाल्याबाबत नमुद केले आहे. त्यानंतर विरुध्द पक्ष क्र.2 यांनी दि.15.06.2018 रोजी केलेल्या अर्जासोबत ई-मेलव्दारे तक्रारकर्त्यास दि.22.05.2018 रोजी तक्रारकर्त्याचे खाते क्र. 20139996683 मध्ये एनईएफटी व्दारे रु.10,153/- जमा केल्याबाबत नमुद केले आहे. याअर्थी तक्रारकर्त्याचे तक्रारीतील वाद हा संपुष्टात आल्याचे निदर्शनास येते असुन विरुध्द पक्षांचे चुकीमुळे तक्रारकर्त्यास सदरची तक्रार दाखल करुन त्रास सहन करावा लागला. त्यामुळे नैसर्गीक न्याय तत्वाचा विचार करता तक्रारकर्ता हा काही अंशी नुकसान भरपाई मिळण्यांस पात्र आहे, असे या मंचाचे मत आहे. सबब हे मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- // अंतिम आदेश // -
1. तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विरुध्दची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.1,000/- व तक्रारीचा खर्च रु. 500/- अदा करावे.
5. वरील आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक किंवा संयुक्तपणे आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
6. दोन्ही पक्षांना आदेशाची प्रथम प्रत विनामुल्य द्यावी.
7. तक्रारकर्त्यास प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.