तक्रारदार :वकीलांचे कारकून सोनावणे हजर.
(त्यानंतर वकील श्रीमती किर्ती शेट्टी हजर)
सामनेवाले :वकील श्रीमती प्रज्ञा लादे हजर..
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. तक्रारदार ही बँक असून तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून दिनांक 4.3.2005 रोजी मॅनहटन नांवाचे क्रेडीट कार्ड प्राप्त केले होते. त्याची कमाल मर्यादा रु.50,000/- होती. तक्रारदारांनी त्या क्रेडीट कार्डाच्या आधारे सा.वाले यांचेकडून रु.47,000/- ची उचल केली.
2. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे तक्रारदार हे 9.5.2005 ते 15.1.2008 या कालावधीमध्ये बँकेकडे धनादेशाव्दारे क्रेडीट कार्डच्या देय रक्कमेबद्दल काही रक्कमा अदा करीत होते. तर काही वेळेस सा.वाले यांचे एजंट तक्रारदार यांचेकडे प्रत्यक्ष येऊन रोखीने पैसे वसुली करीत होते. सा.वाले हे तक्रारदारांना देय रक्कम व जमा रक्कमे बद्दलचा हिशोब देत नव्हते व तक्रारदारांनी त्या बद्दल बँकेकडे तगादा लावला. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 2.2.2008 रोजी सा.वाले यांच्या मुख्यालयाकडे क्रेडीट कार्डच्या व्यवहाराचे स्टेटमेंट मिळावे म्हणून पत्र पाठविले. त्यानंतर तक्रारदारांना क्रेडीट कार्डचा हिशेाब (स्टेटमेंट) प्राप्त झाला. त्यावरुन तक्रारदारांचे असे लक्षात आले की, सा.वाले यांनी तक्रारदारांकडून रु.43,159/- व्याजा बद्दल वसुल केले. रु.14,301/- लेट चार्जेस बद्दल तर रु.7,962/- सेवा कर म्हणून वसुल केले. मुद्दलामध्ये काही कपात केली नाही. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 1.2.2008 पासून पैसे देण्याचे कायमचे बंद केले.
3. तक्रारदारांचे तक्रारीत असे कथन आहे की, तक्रारदार हे ह्दय विकाराने आजारी आहेत. व वर्ष 2001 मध्ये त्यांची एन्जीओग्राफी करण्यात आली होती. सा.वाले हे वेळोवेळी तक्रारदारांकडे एजंट पाठवून धमक्या देत असत व रक्कमेची मागणी करीत असत. दूरध्वनीवरुन देखील सा.वाले यांनी तक्रारदारांनाकडे पैशाची मागणी करुन धमक्या देत असत. या प्रकारे सा.वाले यांनी तक्रारदारांना रक्कम वसुलीचे संदर्भात एजंट पाठवून त्यांना धमक्या देऊन सतत मनस्ताप दिला व मानसीक त्रास दिला. अंतीमतः तक्रारदारांना सा.वाले यांनी या प्रकारचा मानसीक त्रास देऊ नये व सा.वाले यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई अदा करावी या बद्दल तक्रार दाखल केली.
4. सा.वाले यांनी प्रकरणात हजर होऊन आपली कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये तक्रारदारा मॅनहटन नावाचे क्रेडीट कार्ड एप्रिल, 2005 मध्ये देण्यात आलेले होते व तक्रारदारांनी त्या क्रेडीट कार्डवर व्यवहार केलेला आहे व तक्रारदार हे कराराप्रमाणे देय रक्कमेची फेड करीत नव्हते व थकबाकी ठेवत होते असेही कथन सा.वाले यांनी केले. सा.वाले यांनी पुढे असे कथन केले की, जानेवारी 2008 मध्ये तक्रारदारांकडून येणे बाकी रक्कम रु.50,261/- येवढी होती.
5. सा.वाले यांनी असेही कथन केले की, सा.वाले यांनी तक्रारदारांना गुंड पाठवून अथवा एजंट पाठवून रक्कमेची मागणी केलेली नाही. या उलट तक्रारदारांनी देय रक्कम अदा केली नाही व क्रेडीट कार्डच्या खात्यामधील अंतीम देय रक्कम अदा करावी लागू नये म्हणून प्रस्तुतची खोटी तक्रार दाखल केली असे कथन सा.वाले यांनी केले.
6. तक्रारदारांनी सा.वाले यांच्या कैफीयतीनंतर प्रति उत्तराचे तथाप पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. तर सा.वाले यांनी त्यांचे प्रतिनिधी श्री.विनय पाटील यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंनी लेखी युक्तीवाद दाखल केला.
7. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. दोन्ही बाजुचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. |
मुद्दे |
उत्तर |
1 |
सा.वाले यांनी तक्रारदारांकडे क्रेडीट कार्डची रक्कम वसुली करणेकामी एजंट पाठवून व धमक्या देऊन तक्रारदारांचा मनस्ताप दिला व सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय? |
होय |
2. |
अंतीम आदेश |
तक्रार अशतः मंजूर. |
कारण मिमांसा
8. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून मॅनहटन नावाचे क्रेडीट कार्ड प्राप्त केले होते. व त्याची मर्यादा रु.50,000/- होती. व त्या क्रेडीट कार्डावर तक्रारदारांनी रु.47,000/- येवढया रक्कमेचा व्यवहार केला होता ही बाब उभय पक्षकारांना मान्य आहे. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे तक्रारदार सा.वाले यांना दिनांक 9.5.2005 ते 15.1.2008 पर्यत वेळो वेळी धनादेशाने व रोखीने रक्कम अदा करीत होते. व तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे तक्रारदारांना क्रेडीट कार्डचे स्टेटमेंट पाठविले नव्हते त्यामुळे तक्रारदारांना जमा व देय रक्कमेचा हिशेब समजून येत नव्हता.
9. तक्रारदारांच्या कथनास तक्रारदारांनी तक्रारीसोबत दिनांक 28.12.2007 व 2.2.2008 च्या पत्रातील मजकूरावरुन पुष्टी मिळते. तसेच त्याचे वाचन केले असतांना असे दिसून येते की, तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे ब-याच वेळा हिशेाब मागीतला होता. परंतु सा.वाले यांनी तक्रारदारांना हिशोब दिला नाही. त्यानंतर सा.वाले यांनी तक्रारदारांना क्रेडीट कार्डची स्टेटमेंट पुरविली. त्याची प्रत तक्रारदारांनी तक्रारीच्या पृष्ट क्र.83 येथे जोडलेली आहे. त्या मधील नोंदी दिनांक 18.4.2005 ते 15.1.2008 या कालावधीतील आहेत. त्या क्रेडीट कार्डच्या स्टेटमेंटच्या आधारे सा.वाले यांनी अदा केलेल्या रक्कमेचा एक तक्ता तक्रारीच्या पृष्ट क्र.13 येथे दाखल केलेला आहे. त्या नोंदी वरुन असे दिसते की, तक्रारदारांनी सा.वाले यांना एकूण 81,015.67 अदा केले. त्या रक्कमेपैकी सा.वाले यांनी उशिरा रक्कम अदा केल्याबद्दल रु.14,301/-, व्याजा बद्दल रु.43,159/- , व सेवा कराबद्दल रु.7,962/- असे एकंदरीत रु.65,423/- समायोजित केले. रु.81,015/- मधून रु.65,423/- वजा केल्यास शिल्लक रक्कम रु.15,592/- येवढी होते व ती रक्कम मुद्दला मधून कमी होणे आवश्यक होते. तक्रारीच्या पृष्ट क्र.15 वरील एप्रिल, 2005 ची स्टेटमेंट बघीतली असता त्यामध्ये देय रक्कम रु.10,453/- अशी दाखविण्यात आलेली आहे. त्यानंतर दिनांक 9.6.2005 ची स्टेटमेंट पाठविली असता त्यामध्ये देय रक्कम रु.45,773/- दाखविली आहे. कारण तक्रारदारांनी त्या महिन्यामध्ये काही खरेदीचे व्यवहार केल्याचे दिसून येते. तक्रारदारांचे क्रेडीट कार्डचे खर्चाचे शेवटचे जे स्टेटमेंट आहे ते दिनांक 15.1.2008 चे आहे. त्यामध्ये एकूण देय रक्कम रु.50,261/- अशी दाखविली आहे. यावरुन तिन वर्षामध्ये तक्रारदारांनी सा.वाले यांना वेळो वेळी रक्कम अदा करण्याची मुळ देय रक्कम रु.50,000/- हिच दाखविण्यात येत होती. या वरुन सा.वाले यांनी तक्रारदारांच्या मुळ देय रक्कमेमध्ये कुठलीही रक्कम समायोजित केलेली नाही या तक्रारदारांच्या कथनास पुष्टी मिळते.
10. तक्रारदारांची मुख्य तक्रार ही सा.वाले यांनी तक्रारदारांना दूरध्वनीवरुन धमक्या देणे, तक्रारदारांचे घरी एजंट पाठविणे तसेच कुटुंबीयांना धमकी देणे, शिल्लक रक्कमेची मागणी करणे, व धमक्या देऊन तक्रारदारांना मनस्ताप देणे या बद्दलची आहे. तक्रारदारांच्या तक्रारीमध्ये व शपथपत्रामध्ये त्याबद्दल सविस्तर कथन आहे. तक्रारदारांच्या या कथनास तक्रारदारांनी वरळी पोलीस स्टेशन येथे दिलेला अर्ज दिनांक 11.2.2011 या वरुन पुष्टी मिळते. त्यामध्ये तक्रारदारांनी असे स्पष्ट कथन केले आहे की, डिसेंबर, 2010 मध्ये ते गावी असतांना सा.वाले यांचेकडून श्री.निलेश कदम असे नांव सांगणा-या एका व्यक्तीने दूरघ्वनी केला होता व तक्रारदारांना धमक्या दिल्या होत्या. त्यानंतर तक्रारदारांना बरीच मोठी रक्कम अदा व प्रकरण मिटवून टाका अशा ही धमक्या देण्यात आल्या होत्या. सा.वाले वाले यांनी आपल्या लेखी युक्तीवादामध्ये त्या कथनास नकार दिला नाही. परंतु तक्रारदारांचे पत्र दिनांक 11.2.2011 यातील कथनास तक्रारदारांनी वरळी पोलीस स्टेशन येथे दिलेला तक्रार अर्ज दिनांक 13.2.2011 या वरुन पुष्टी मिळते. त्या तक्रारीवरुन वरळी पोलीस स्टेशन यांनी दिनांक 18.3.2011 रोजी दखलपात्र गुन्हा क्र.845/11 दाखल केला होता. त्याची प्रत तक्रारदारांनी पृष्ट क्र.132 वर आहे. त्यामध्ये अशी नोंद आहे की, सा.वाले यांचे प्रतिनिधी भ्रमणध्वनीवरुन पैसे भरले नाहीतर न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात येईल. अशा त-हेच्या धमक्या देतात.
11. वरील पुराव्यावरुन असे दिसते की, सा.वाले यांनी त्यांच्या एजंटा मार्फत तक्रारदारांना रक्कम जमा करण्याबद्दल धमक्या दिल्या व मनस्ताप दिला. व क्रेडीट कार्डची रक्कम ग्राहकाने भरली नाहीतर ती रक्कम वसुल करणेकामी कायदेशीर कार्यवाही करण्याचे बॅकेस निश्चीत अधिकार आहेत. परंतु एजंट पाठवून तसेच गुंड पाठवून धमक्या देणे व सक्तीची वसुली करणे ही बाब कराराचे विरुध्द आहे व या प्रकारचे वर्तन करुन सा.वाले यांनी तक्रारदारांना रक्कम मागण्याचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब सिध्द होते. सा.वाले यांनी तक्रारदारांनाकडून येणे बाकी रक्कमेबद्दल कायदेशीर कार्यवाही केली असती तर ते योग्य ठरले असते. परंतु एजंट पाठवून अथवा दूरघ्वनी करुन धमक्या देऊन तक्रारदारांना व त्यांचे कुटुंबियांना मनस्ताप देणे ही बाब कराराच्या विरुध्द जाते. तसेच मा.राष्ट्रीय आयोगाने या संदर्भात केलेल्या मार्गदर्शक तरतुदीचे विरुध्द जाते. या संदर्भात मा.राष्ट्रीय आयोगाचा 2007 BusLR105(NCDRC),III(2007)CPJ161(NC) CITYCORP MARUTI FINANCE LTD V/S S.VIJAYALAXMI DECIDED 27.07.2007 हा निर्णय सुस्पष्ट आहे. व त्यातील अभिप्राय मंचाच्या निष्कर्षास पुष्टी देतो. त्यातही प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारदार हे ह्रदय विकाराचे रुग्ण आहेत. व तक्रारीपूर्वी त्यांची एन्जीओग्राफी करण्यात आलेली होती. वरील परिस्थितीमध्ये सा.वाले यांनी तक्रारदारांना रक्कम मागणीचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली हा आरोप सिध्द होतो. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाईपोटी रु.1 लाखाची मागणी केलेली आहे. परंतु ती मागणी गैर वाजवी व जास्तीची दिसते. सा.वाले यांनी तक्रारदारांना नुकसान भरबाई व तक्रारीच्या खर्चाबद्दल असे एकत्रितपणे रु.10,000/- विशिष्ट मुदतीत अदा करावेत असा आदेश देणे योग्य व न्याय्य राहील असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे.
12. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 323/2008 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना क्रेडीट कार्ड रक्कमेच्या मागणीचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चाबद्दल एकत्रित रक्कम रु.10,000/- अदा करावी असा आदेश देण्यात येतो.
4. सामनेवाले यांनी वरील आदेशाची पुर्तता न्याय निर्णयाची प्रत मिळाल्यापासून 8 आठवडयाचे आत अदा करावी. नाहीतर त्या रक्कमेवर मुदत संपल्यापासून 9 टक्के व्याज रक्कम अदा करेपर्यत द्यावे.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.