श्रीम. अपर्णा वा.पळसुले, अध्यक्ष यांचेव्दारा ः-
सदरचा तक्रार अर्ज तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडून सौरउर्जा अभियाना अंतर्गत प्रॉडक्ट खरेदी केलेनंतर सामनेवाले यांनी दिलेल्या सदोष सेवेबाबत नुकसान भरपाई मिळावी म्हणून ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 13 अन्वये दाखल केली आहे.दर तक्रारीचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणेः- तक्रारदार हया गृहिणी असून वर नमुद पत्त्यावर कायमच्या रहिवाशी आहेत. सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला क्र.1 चे रत्नागिरी जिल्हयासाठी विक्री प्रतिनिधी म्हणून नियुक्त केलेले आहेत. सामनेवाला क्र.1 यांचेमार्फत सामनेवाला क्र.2 हे सौर प्रकाश उपकरणांची विक्री ग्राहकांना करतात. तक्रारदारांनी सामनेवाला क्र. 1 व 2 यांचेकडून दि.22/12/10 रोजी प्रॉडक्ट कोड SUAS 06 हे युनिट रक्कम रु.25,000/- ला खरेदी केले. त्याबाबत रक्कम रु.25,000/- देणेत आले. त्याबबातची पावती क्र.5810 सामनेवाला यांनी दिली. सदर उपकरण खरेदी केल्यानंतर अनुदान रक्कम रु.21,875/- ही दि.22/06/2012 नंतर पुढे अशी नोंद सामनेवाला क्र.2 यांनी पावतीवर नमुद करुन दिली. तसेच सदर उपकरणा बाबत दोन वर्षाची वॉरंटी असलेबाबत सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी हमी व खात्री दिलेली होती.
सदरचे उपकरण खरेदी केल्यानंतर सुमारे एक वर्ष व्यवस्थीत चालले. त्यानंतर सदर उपकरणासाठीची बॅटरी नादुरुस्त झाली. त्याबाबत तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे फोनवरुन तसेच लेखी तक्रारी केल्या. तथापि, सामनेवालांनी सदरची बॅटरी बदलून देणेस नकार दिला. तसेच सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचेकडे साधन सामुग्रीची कमतरता असलेने सदरची बॅटरी बाजारातून खरेदी करुन घ्यावी असे सांगितले व सदर बॅटरीची किंमत प्रत्यक्ष अनुदानासोबत देणेत येईल असे कळविले. तक्रारदाराच्या म्हणणेनुसार दि.14/07/12 रोजी सामेनवालांनी मूळ पावती परत घेऊन झेरॉक्स पावतीवर पोच दिलेली आहे व सदरची रक्कम लवकरात लवकर बचत खातेत जमा करेन असे सांगितले होते. तथापि, सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी वस्तु विक्री पश्चात तक्रारदारांना कोणतीही सेवा दिली नाही. तसेच वॉरंटी काळात चार्जींग बॅटरी बदलून दिली नाही व रक्कमही दिलीनाही. तक्रारदाराचे म्हणणेनुसार सामनेवाला यांनी विक्री पश्चात सेवेत त्रुटी ठेवून तक्रारदाराची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे तक्रारदारास मानसिक, आर्थिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला. तक्रारदारांनी सामनेवाला यांना दि.11/12/13 रोजी वकीलांमार्फत मागणी नोटीस पाठवली. सदर नोटीस मिळूनदेखील सामनेवालांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. सबब प्रस्तुतची तक्रार सामनेवाला यांचेकडून अनुदान रक्कम रु.21,875/- बॅटरीची किंमत रु.3,600/- नुकसानभरपाई रक्कम रु.25,000/- व नोटीस, पत्रव्यवहार फोन व इतर खर्चापोटी रक्कम रु.5,000/-असे एकूण रक्कम रु.55,000/- व त्यावरील व्याज सामनेवालांकडून वसुल होऊन मिळणेकरिता दाखल केलेली आहे.
सामनेवालाक्र.1 यांना नि.12 नुसार नोटीस बजावणी होऊनदेखील ते याकामी हजर झालेले नाहीत. सबब सामनेवाला क्र.1 विरुध्द प्रकरण एकतर्फा चालवणेचे आदेश करणेत आले.
5) सामनेवाला क्र.2 यांना नोटीस बजावलेनंतर ते हजर झाले परंतु सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे म्हणणे दाखल केले नाही. सबब त्यांचेविरुंध्द ‘ म्हणणे नाही ’ असे आदेश पारीत करणेत आले. तथापि, सामनेवाला क्र.2 यांनी नि.13 कडे अर्ज देऊन रक्कम रु.21,875/- चा चेक नं.004264,बँक ऑफ महाराष्ट्र शाखा-गोडोली, साताराचा या मंचामध्ये जमा केला. सदरचा चेक तक्रारदार यांनी तक्रारीत केलेल्या तक्रारीला बाधा न येता, तसेच तडजोड न करता (without prejudice) स्विकारलेला आहे व सदरची रक्कम मिळालेबाबत या मंचासमोर कळवलेले आहे.
6) त्यानंतर तक्रारदाराने त्यांचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र नि.16 कडे दाखल केले व पुरावा संपलेची पुरसिस नि.17 कडे दाखल केली. तदनंतर तक्रारदाराचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला. एकंदरीत तक्रारीचा आशय, पुरावा, युक्तीवाद ऐकला असता तक्रारीच्या न्याय निर्णयासाठी या मंचाचे विचारार्थ पुढील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार हे सामनेवालांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
2 | सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली असलेचे तक्रारदार शाबीत करतात का? | अंशतः होय |
3 | आदेश काय ? | अंतिम आदेशानुसार अर्ज अंशतः मंजुर. |
7) मुद्दा क्र.1 ः- तक्रारदार हे सामनेवाला कंपनीचे ग्राहक आहेत काय ?
स्पष्टीकरण ः- सदर तक्रारीबाबत तक्रारदाराने त्याचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र नि.16 कडे दाखल केलेले आहे. त्यामध्ये तक्रारीतील मजकूराचा ऊहापोह केलेला आहे. सदर तक्रारीतील तसेच प्रतिज्ञापत्रातील मजकूर सामनेवाला यांनी नाकारलेला नाही. सबब त्यामधील मजकूर पुराव्याचे दृष्टीने ग्राहय मानावा लागेल. तसेच तक्रारदाराने नि.6 कडे एकूण 12 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. नि.6/1 कडे रु.25,000/- ची पावती असून त्यावर सामनेवाला क्र.2 ची सही आहे. नि.6/2 कडे अनुदान योजनेची पावती आहे. नि.6/3 कडे दि.11/12/13 ची मागणी नोटीस, नि.6/4 ते 6/11 कडे नोटीस बजावल्याच्या पोस्टाच्या पावत्या, नि.6/12 कडे रु.3,600/- ची दत्त साई एन्टरप्राईजेसकडे बॅटरी खरेदी केल्याबाबतची पावती दाखल केली आहे. एकंदरीत कागदपत्रांचा विचार करता विशेषता अनुदान योजना पावतीचा विचार करता अनुदान रक्कम रु.21,875/- मिळणेची तारीख दि.22/06/2012 नंतर पुढे असे नमुद आहे. तसेच दि.14/07/12 रोजी मूळ पावती सामनेवाला क्र.2 यांचेकडे दिलेबाबतची पोच नमुद आहे. या कागदपत्रावरुन असे दिसून येते की तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांचेकडून सामनेवाला क्र.2 स्थानिक विक्री प्रतिनिधी यांचेमार्फत सदर प्रॉडक्ट खरेदी केलेले आहे. म्हणून या मंचाचे असे मत आहे की तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेत येतात. सबब हे मंच मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देत आहे.
8) मुद्दा क्र.2 ः- सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली असलेचे तक्रारदार शाबीत करतात का?
स्पष्टीकरण ः- तक्रारदाराने प्रॉडक्ट कोड SUAS 06 हे सामनेवाला यांचेकडून खरेदी केलेबाबत सामनेवाला यांनी कोणताही पुरावा देऊन नाकारलेले नाही. तसेच रक्कम रु.25,000/- पोहोचलेची दि.12/12/2010ची पावती देखील नाकारलेली नाही. तसेच अनुदान योजना पावती दि.22/12/10 ची पावती क्र.5810दाखल केलेली आहे. सदर पावतीमध्ये अनुदान मिळणेची तारीख 22/06/2012 नंतर पुढे असा उल्लेख आहे. तसेच अनुदान रक्कम रु.21,875/- याचादेखील उल्लेख आहे. तथापि, सामनेवाला यांनी सदरची अनुदानाची रक्कम या मंचात तक्रार झालेनंतर दि.14/03/14 रोजी चेकने तक्रारदारांना दिलेली आहे. तथापि, सामनेवाला यांनी सदर अनुदानाची रक्कम रु.21,875/-देणेस विलंब का झाला? याबाबत कोणताही सबळ पुरावा या कामी दाखल केलेला नाही. तथापि,सबब तक्रारदार हे सदरची रक्कम मिळणेस पात्र नाहीत या निर्णयाप्रत हे मंच येत आहे.
9) तक्रारदार यांनी सदर उपकरणाची बॅटरी खराब झालेबाबत सामनेवाला यांना कळवलेले होते. सदर बॅटरी बदलून देणेबाबत वॉरंटी पिरीयड दोन वर्षाचा होता असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. तथापि, तक्रारदारांनी सदरच्या बॅटरीबाबत वॉरंटी कार्ड किंवा सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी कोणतीही हमी दिलेबाबत कोणताही लेखी पुरावा या कामी हजर केलेला नाही. तथापि, तक्रारदार यांनी बॅटरी खरेदी केलेबाबतची पावती नि.6/12 कडे दाखल केलेली आहे. सदरची बॅटरी दि.22/04/13 रोजी खरेदी केलेचे दिसून येते. म्हणजेच उपकरण खरेदी केल्यानंतर दोन वर्षानी खरेदी केलेचे दिसून येते. सबब तक्रारदाराचे म्हणणे सदर बॅटरी बाबत दोन वर्षाची वॉरंटी सामनेवालांनी दिली होती. याबाबत ठोस पुरावा तक्रारदाराने दाखल केलेला नाही. सबब सदरची रक्कम रु.3,600/- मिळणेस तक्रारदार हे पात्र नाहीत या निर्णयाप्रत हे मंच येत आहे.
10) एकंदरीत पुराव्यावरुन तक्रारदारांना उपकरण विक्री पश्चात सामनेवाला यांनी योग्य ती सेवा देणेत कसूर केली आहे हे शाबीत होत आहे. तसेच मागणी नोटीस मिळूनदेखील सामनेवाला यांनी तक्रारदारांना अनुदानाची रक्कम देणेस विलंब लावला. तसेच सदरची रक्कम तक्रार दाखल केलेनंतर देणेत आली. सबब सामनेवालांनी तक्रारदारांना विक्री पश्चात देण्यात येणा-या सेवेमध्ये त्रुटी ठेवली व सदोष सेवा दिली या निर्णयाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच मुद्दा क्र.2 चा निर्णय होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3 :- आदेश काय ?
स्पष्टीकरण ः- वरील सर्व विवेचनावरुन तक्रारदारांची रु.21,875/- व नवीन बॅटरी खरेदीची किंमत रु.3,600/- ही मागणी मान्य करतायेणार नाही. तथापि, तक्रारदारांना झालेल्या आर्थिक, मानसिक त्रासापोटी तक्रारदार हे रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रुं.2,000/- मिळणेस पात्र आहेत या निर्णयाप्रत हे मंच येत आहे. सबब, तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो आणि पुढील आदेश पारित करण्यात येतो.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
2) सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास झालेल्या आर्थिक,शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- (रुपये पाच हजार मात्र) तसेच तक्रार अर्जाच्या खर्चाची रक्कम रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त) अदा करावे.
3) सामनेवाला क्र.2 यांचेविरुध्द कोणतेही आदेश नाहीत.
4) सदरचे आदेशाची पूर्तता सामनेवाला क्र.1 यांनी 45 दिवसांत करावी. तशी पूर्तता न केल्यास तक्रारदार हे सामनेवालाविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 25 व 27 मधील तरतुदीनुसार दाद मागू शकेल.
6) या निकालाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षांना विनामुल्य देण्यात / पाठविण्यात
याव्यात.