ग्राहक तक्रार क्र. 93/2014
अर्ज दाखल तारीख : 20/03/2015
अर्ज निकाल तारीख: 14/07/2015
कालावधी: 0 वर्षे 03 महिने 26 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. सिंधूबाई नामदेव पवार,
वय - 38 वर्षे, धंदा – शेती व घरकाम,
रा.दत्त मंदिराजवळ, वाशी, ता.वाशी,
जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. व्यवस्थापक,
सोनालीका ट्रॅक्टर्स एजन्सी, तेरखेडा,
ता.वाशी, जि.उस्मानाबाद.
2. शाखा व्यवस्थापक,
कोटक महिंद्रा बँक लि.रुम नं.418-424,
4 था मजला, सोहराब हॉल –
21 ससुन रोड पुणे - 411001. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.बी.बी.देशमूख.
विरुध्द पक्षकार क्र.1 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत.
विरुध्द पक्षकार क्र. 2 तर्फे विधीज्ञ : श्री.एस.डी. कोठावळे.
न्यायनिर्णय
मा.अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
तक्रारकर्ती (तक) हिने विरुध्द पक्षकार (विप) क्र.1 विक्रेता यांचेकडून ट्रॅक्टर खरेदी करणेसाठी विप क्र.2 कडून कर्ज पुरवठा घेतला मात्र विप क्र.2 ने ट्रॅक्टर जप्त करुन नेऊन सेवेत त्रुटी केली म्हणून भरपाई मिळणेसाठी तक ने ही तक्रार दिलेली आहे.
तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पूढील प्रमाणे आहे.
1. तक ही वाशी जि.उस्मानाबाद ची रहिवाशी असून शेती करते. शेती उपयोगासाठी तिने विप क्र.1 कडून सोनालिका ट्रॅक्टर नंबर एम.एच.25 एच 2972 खरेदी केला. ट्रॅक्टर घेण्यासाठी तक ने विप क्र.2 बँकेकडून रु.3,57,405/- इतके कर्ज घेतले. सदरचा व्यवहार दि.18.3.2010 रोजी झाला. कर्ज हे दर सहामाही हप्ता रु.57,546/- याप्रमाणे दहा हप्त्यात फेडावयाचे होते. शेवटचा हप्ता दि.20.3.2015 ला द्यायचा होता. तक ने कर्जाची परतफेड नियमितपणे केली. दि.20.3.2013 पर्यत एकूण सहा हप्ते फेडले. उलट विप क्र.2 कडे जादा रक्कम पैकी फक्त रु.15,538/- देय आहेत. दि.20.03.2013 चा हप्ता धरुन एकूण रु..7,3784/- देय आहेत. मात्र विप क्र.2 ने दि.23.12.2013 रोजी नोटीस पाठवून रु.2,45,786/- थकीत असून भरावे असे कळविले. दि.02.03.2014 रोजी कूठलीही सूचना न देता विप क्र.2 तक चे ट्रॅक्टर जप्त करुन घेऊन गेले. तक ने हप्त्याची रक्कम घेण्याची विनंती केली. दि.27.03.2014 रोजी रु.1,30,630/- चा डि.डि. विप क्र.2 ला पाठविला मात्र विप क्र.2 ने तो डिडि परत पाठवून दिला. विप क्र.2 ने अटी शर्तीचे पालन न करता कर्ज फेडण्याची मुदत बाकी असताना ट्रॅक्टर ओढून नेले. ते ट्रॅक्टर परत देण्याचा विप क्र.2 ला हुकूम होणे जरुर आहे. तक ला मानसिक आर्थिक शारीरिक त्रासापोटी रु.25,000/- तसेच नुकसान भरपाई रु.2,00,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.5,000/- विप क्र.2 कडून मिळणे जरुर आहे ते मिळण्यासाठी तक ने ही तक्रार दि.05.05.2014 रोजी दाखल केली आहे.
2. तकारीसोबत तक ने विप क्र.2 चे दि.23.03.2010 चे पत्र ट्रॅक्टर चे आर. सी. बूक, 7/12 चा उतारा, 8 अ चा उतारा, दि.25.09.2010, 09.10.2010, 22.03.2011, 26.02.2011, रोजी हप्ता भरल्याच्या पावत्या विप क्र.1 ची नोटीस, दि.23.12.2013 ची दि.27.03.2014 चा डि.डि.,दि.11.04.2014 चे पत्र, दि.26.04.2014 चे विप क्र.2 चे पत्र, इत्यादी कागदपत्राच्या प्रति हजर केल्या आहेत.
3. तक्रारीसोबत तक ने नि.5 चा अर्ज दिला होता. विप क्र.2 ला रक्कम रु.1,30,630/- घेऊन ट्रॅक्टर तक ला परत करण्याचा आदेश द्यावा अशी विनंती करण्यात आली होती. त्या अर्जावर दि.5.5.2014 रोजी आदेश करुन कारणा दाखवा नोटीस काढण्याचा आदेश झाला. तसेच ट्रॅक्टरच्या टायटल बद्दल आहे ती परिस्थिती ठेवण्याचा आदेश झाला.
4. विप क्र.1 ला नोटीस बजावूनही विप क्र.1 हजर न झाल्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश झालेला आहे.
5. विप क्र.2 ल नोटीस बजावल्यानंतर विप क्र.2 कोठावळे वकिलामार्फत हजर झाले. मात्र विप क्र.2 ने लेखी म्हणणे दाखल केलले नाही. त्यानंतर लेखी युक्तीवाद अगर तोंडी युक्तीवाद केला नाही.
6. तक ची तक्रार व तिने दाखल केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात, त्यांची उत्तरे आम्ही त्यांचे समोर खालील दिलेल्या कारणासाठी दिली आहेत.
मुद्दे उत्तरे
1. विप क्र.2 यांने सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय
2. तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय
3. आदेश कोणता ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुद्दा क्र.1 व 2 :
7. वर म्हटल्याप्रमाणे विप क्र.2 यांनी लेखी म्हणणे दाखल केलले नाही अगर युक्तिवाद ही केलेला नाही. दि.23.03.2010 चे विप चे पत्राप्रमाणे करारनामा दि.18.03.2010 रोजी झाला होता. कर्ज रु.3,57,405/- देण्यात आलेले होते. त्यांचे वाटप दि.18.03.2010 रोजी झाले होते. त्यानंतर प्रत्येक 20 सप्टेंबर व 20 मार्च अशा दहा हप्त्यामध्ये कर्ज फेडावयाचे होते. शेवटचा हप्ता दि.20.03.2015 रोजी देण्याचा होता. हप्त्याची रक्क्म रु.57,546 ठरलेली होती.पहिल्या हप्त्यापोटी रु.40,000/- दि.25.09.2010 रोजी व रु.17,550/- दि.09.10.2010 रोजी तक ने दिल्याचे दिसते. त्या पावत्या हजर आहेत. दुसरा हप्ता दि.22.03.2011 रोजी रु.57,546/- चा भरल्याचे पावतीवरुन दिसते. तिसरा हप्ता पण दि.26.09.2011 रोजी भरल्याचे पावतीवरुन दिसते. त्यानंतरचे हप्ते भरल्याबद्दल पावती नाही.
8. दि.20.03.2012 चा हप्ता भरल्याची पावती तक कडे नाही. पण तक चे म्हणणे आहे की, त्यापैकी फक्त रु.15,538/- देण्याचे बाकी होते. त्याबद्दल तक ने कागदपत्र हजर केले नाही. ते सापडून येत नाही असे म्हणणे आहे. यांचा अर्थ असा होतो की, दि.20.03.2011 पासूनचे हप्ते तक ने भरलेले नाहीत. दि.23.12.2013 चे विप क्र.2 चे नोटीशी प्रमाणे रु.2,45,586/- तक कडून येणे होते. ही रक्कम कशी आली हे समजून येत नाही. दि.26.04.2014 चे पत्रापमाणे तक कडून येणे रु.3,04,643/- दाखवले आहे. काहीही असले तरी तक कडे पूढील हप्ते बाकी असल्याचे दिसून येत आहे.
9. हप्ते चुकले तर विप क्र.2 यांना ट्रॅक्टर ओढून देण्याचा हक्क राहील. असे दाखवणारे करारपत्र हजर करण्यात आलेले नाही. तक ने करारपत्र हजर केले असे यादी मध्ये लिहीणे प्रत्यक्षात ते रिपेमेट शेडयूल आहे. मात्र विप क्र.2 ची जबाबदारी असताना आपला हक्क दाखवण्यासाठी विप क्र.2 ने करारपत्र हजर केलेले नाही.यांचा अर्थ असा की, विप क्र.2 ला ट्रॅक्टर जप्त करण्याचा अधिकार नव्हता तथापि विप क्र.2 ने दि.02.03.2014 रोजी तक कडून जबरदस्तीने ट्रक्टर नेला हे तक चे म्हणणे विप क्र.2 ने अमान्य केलेले नाही. कराराप्रमाणे अधिकार नसताना विप क्र.2 ने ट्रक्टर ओढून नेले म्हणून सेवेत त्रुटी केली व तक अनुतोषास पात्र आहे असे आमचे मत आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालील प्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक ची तक्रार खालील प्रमाणे मंजूर करण्यात येते.
2) तक ने थकवलेले संपूर्ण हप्ते ठरलेल्या दंडासह एक महिन्यात भरल्यास विप क्र.2 ने तक्रारीतील ट्रॅक्टरचा ताबा ताबडतोब तक ला द्यावा.
3) विप क्र.2 ने तक ला या तक्रारीचा खर्च म्हणून रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) द्यावेत.
ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
4) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत
मंचात अर्ज दयावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष.
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.