जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 139/2010. तक्रार दाखल दिनांक :29/03/2010. तक्रार आदेश दिनांक : 01/02/2011. नागेश व्यंकटेश विटेकर, वय 53 वर्षे, व्यवसाय : नोकरी, रा. 161, न्यू सुनिल नगर, अक्कलकोट रोड, एम.आय.डी.सी., सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. व्यवस्थापक, परिवहन उपक्रम व वाहन व्यवहार, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर. 2. आयुक्त, सोलापूर महानगर पालिका, सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : शशिकांत एस. मचाले विरुध्द पक्ष क्र.1 यांचेतर्फे प्रतिनिधी : ए.एम. गोरे आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, ते विरुध्द पक्ष यांच्याकडे टायर फीटर या पदावर नोकरीत आहेत. ते भविष्य निर्वाह निधीचे सभासद आहेत. त्यांची आई दि.23/1/2010 रोजी मृत्यू पावली असून तत्पूर्वी त्यांना वैद्यकीय उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करावे लागले. तसेच तक्रारदार यांचा मुलगा दहावी इयत्तेमध्ये शिक्षण घेत आहे. त्याकरिता त्यांना भविष्य निर्वाह निधीच्या खात्यावरील रु.50,000/- ची मागणी केली. त्यांना रक्कम देण्याबाबत विरुध्द पक्ष यांनी कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन भविष्य निर्वाह निधीची रक्कम रु.50,000/- मिळण्यासह नुकसान भरपाईपोटी रु.5,000/- व तक्रार खर्चापोटी रु.1,500/- मिळावेत, अशी विनंती केलेली आहे. 2. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार व त्यांच्यामध्ये नोकर व मालक संबंध आहेत. तक्रारदार यांना वेळोवेळी प्रॉव्हीडंट फंडाचे कर्ज दिले असून त्याची परतफेड अद्यापि चालू आहे. त्यांची आर्थिक परिस्थितीत बिकट व हालाखीची असल्यामुळे एकरकमी रक्कम देत येत नाही. तक्रारदार यांची तक्रार चालविण्यास मंचाला अधिकारक्षेत्र नाही आणि शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार हे विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या आस्थापनेवर टायर फीटर पदावर नोकरीत करीत असल्याचे आणि ते भविष्य निर्वाह निधीचे सभासद असल्याविषयी विवाद नाही. तसेच त्यांच्या वेतनातून विरुध्द पक्ष क्र.1 यांनी भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात करुन घेतल्याविषयी विवाद नाही. 5. प्रामुख्याने, तक्रारदार यांच्या मागणीनुसार रु.50,000/- भविष्य निर्वाह निधीची रक्कम देण्यात आलेली नाही, अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना रक्कम देता आली नसल्याचे स्पष्टपणे कबूल केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आर्थिक परिस्थितीमुळे देय रक्कम देण्यास विलंब लागत आहे. परंतु त्यांचे कथन मान्य करता येणार नाही. कारण भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळविणे, हा तक्रारदार यांचा कायदेशीर अधिकार असून तो डावलता येणार नाही. तसेच विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार हे भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळविण्यास पात्र नसल्याबद्दल कोणताही उचित पुरावा दाखल केलेला नाही. अशा परिस्थितीत, विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदार यांना देय असणारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम अदा न करुन सेवेत त्रुटी केलेली आहे, या मतास आम्ही आलो आहोत. 6. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदार यांना भविष्य निर्वाह निधीची रक्कम रु.50,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 2. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारदार यांना तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/25111)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |