निकालपत्र
(घोषीत द्वारा- सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्ष)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून ट्रक खरेदीसाठी सन 2007 मध्ये रक्कम रु.6,50,000/- कर्ज घेतलेले होते. अर्जदाराने सदरील कर्ज गैरअर्जदार यांचेकडे सन 2011 मध्ये परत केले. सन 2010 मध्ये मुखेड परिसरामध्ये नापीकी झाल्याने दुष्काळ पडला,त्यामुळे जुन,2011 मध्ये अर्जदाराने सदर वाहनावर गैरअर्जदार यांचेकडून रक्कम रु.5,00,000/- कर्ज घेतले. सदरील कर्जाचा हप्ता रु.20,000/- ठरला. त्याप्रमाणे अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे रक्कम रु.10,79,200/- परतफेड केले. पूर्ण कर्जाची रक्कम परतफेड केल्यामुळे अर्जदार गैरअर्जदार यांचेकडे ऑक्टोबर,2012 मध्ये नाहरकत प्रमाणपत्र मागणेसाठी गेला असता गैरअर्जदार यांनी रक्कम रु.5,00,000/- थकबाकी निघते असे सांगितले. त्यावरुन गैरअर्जदार यांचेकडे कर्ज खात्याचा उतारा अर्जदाराने मागीतला. परंतु गैरअर्जदार यानी थकीत रक्कम भरली नाही तर अर्जदाराचा ट्रक क्रमांक एमएच 26/एच 5471 हा ताब्यात घेण्याची धमकी अर्जदारास दिली. दिनांक 25.10.2012 रोजी अर्जदाराचा ट्रक शेतीमाल घेऊन नागपूर येथे गेला असता गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा ट्रक ताब्यात घेतला. अर्जदाराने सदरील प्रकार हा गैरअर्जदार यास नांदेड येथे सांगितला. गैरअर्जदाराने त्यांची चूक मान्य करुन सदरील ट्रक दोन महिन्यामध्ये नांदेड येथून चालू स्थितीत परत करण्याची हमी दिली. अर्जदार हा दिनांक 15.04.2012 पर्यंत अनेकवेळा गैरअर्जदार यांचेकडे ट्रक परत मिळविण्यासाठी गेला असता गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा ट्रक परत केला नाही व सदरील ट्रक बेकायदेशीर विक्री करतो म्हणून धमकी दिली. त्यामुळे अर्जदार यांनी सदरील तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदार यांनी गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा ट्रक क्रमांक एमएच 26/एच 5471 चालू स्थितीमध्ये त्यांचे नवीन टायर्स व टूल बॉक्स बॅटरीसह परत करणेचा आदेश व्हावा. अर्जदाराकडे थकीत असलेले हप्ते स्विकारुन नाहरकत प्रमाणपत्र द्यावे. दिनांक 26.10.2012 पासून प्रतिदिन रक्कम रु.4000/- प्रमाणे ट्रक ताबयात देईपर्यंत नुकसान भरपाई द्यावी. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.50,000/- व दावा खर्च रु.15,000/- इत्यादी रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी वकीलमार्फत हजर होऊन लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. अर्जदार व गैरअर्जदार यांच्यामध्ये लवाद करार झालेला आहे. त्यामुळे कलम 8 लवाद कायद्यांतर्गत सदर तक्रार चालविणेचा मंचास अधिकार नाही. अर्जदारास गैरअर्जदार यांनी कोणत्याही प्रकारच्या सेवेत त्रुटी दिलेली नाही. अर्जदाराने तक्रार दाखल केल्यापासून एकही रुपये जमा केलेले नाही. अर्जदाराकडून दिनांक 05.10.2013 पर्यंत रक्कम रु.5,15,868/- येणे बाकी आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास दिनांक 18.09.2007 रोजी रक्कम रु.6,50,000/- कर्ज दिले होते. अर्जदाराने कर्ज खात्यामध्ये संपूर्ण रक्कम जमा केलेली नव्हती व अर्जदाराने पुर्वीचे कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज दिनांक 20.07.2011 रोजी रक्कम रु.5,00,000/- चे घेतले. सदर कर्जाची परतफेड 33 हप्त्यामध्ये करावयाची होती. हप्त्याची रक्कम रु.20,625/- असून पहिला हप्ता दिनांक 20.08.2011 रोजी व शेवटचा हप्ता दिनांक 20.04.2014 रोजी देय होता. गैरअर्जदार यांनी पुर्वीच्या कर्जाची रक्कम रु.3,80,000/- जुन्या कर्जखातयात जमा केली व इतर चार्जेस कपात करुन अर्जदारास रक्कम रु.1,10,626/- चा धनादेश दिला. सदरील कर्जाची परतफेड अर्जदाराने वेळेवर केलेली नाही. दिनांक 05.10.2013 पर्यंत रक्कम रु.5,15,868/- देणे बाकी आहे. अर्जदाराने हप्ते नियमित न भरल्याने तो थकबाकीदार झालेला आहे. अर्जदाराने दिनांक 14.11.2012 रोजी त्यास पुढे कर्ज खात्यातील थकीत रक्कम भरणे शक्य नाही म्हणून गैरअर्जदाराने सदरील गाडीचा ताबा घ्यावा व सदरील गाडी विकून प्राप्त झालेली रक्कम कर्जखात्यात जमा करावी असे पत्र दिलेले आहे. त्यानंतर अर्जदार एकदाही गैरअर्जदार यांचेकडे आलेला नाही. अर्जदाराने खोटी तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे सदरची तक्रार नामंजूर करावी अशी विनंती गैरअर्जदार यांनी लेखी जबाबाव्दारे केलेली आहे.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
6 अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून ट्रक खरेदीसाठी कर्ज घेतलेले असल्याचे दोन्ही बाजूस मान्य आहे. अर्जदाराने सन 2007 साली कर्ज घेतलेले असून सन 2011 साली कर्जाची थकबाकी राहिलेली असल्याने पुन्हा नवीन कर्ज गैरअर्जदार यांचेकडून घेतले ही बाब अर्जदारास मान्य आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराने सन 2011 साली घेतलेल्या कर्जाचे Agreement, Repayment Scheduled दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराने सन 2011 साली घेतलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड केलेली नाही असे नमुद केलेले आहे. यावर अर्जदाराने कर्जाची परतफेड केलेली असल्याचा कोणताही पुरावा दिलेला नाही. अर्जदाराने तक्रारीसोबत फक्त तीनच कागदपत्रे 1) ट्रक क्रमांक एमएच 26/एच 5471 चा नोंदणी उतारा,2)कायदेशीर नोटी व 3) रजि.पोहोच पावती एचढेच दाखल केलेले आहे. कर्ज परतफेडीपोटी भरलेल्या रक्कमेच्या पावत्या किंवा त्या संदर्भातील अन्य कागदपत्रे मंचासमोर दाखल केलेली नाहीत. त्यामुळे अर्जदार यांच्या तक्रारीतील कथन की अर्जदाराने कर्जाची परतफेड करुनही गैरअर्जदार यांनी अर्जदारास नाहरकत प्रमाणपत्र दिलेले नाही ही बाब ग्राह्य धरता येत नाही. अर्जदार आपली तक्रार पुराव्यानिशी सिद्ध करु शकलेला नाही असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.