(मंचाचे निर्णयान्वये, श्री.सादिक मो.जव्हेरी, मा.सदस्य) (पारीत दिनांक :14.03.2011) अर्जदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे. 1. अर्जदार हा बाबुपेठ, चंद्रपूर, ता.जि.चंद्रपूर येथील रहिवासी आहे. अर्जदार यांनी स्वंयरोजगाराकरीता टाटा ट्रक मॉडेल नंबर 2515, र.क्र.एम.एच.-34-एम-6321(दहा चाकी) गै.अ.क्र.1 चे माध्यमाने सुरु असलेले चंद्रपूर येथील गै.अ.क्र.2 चे कार्यालय येथून फायनान्सवर खरेदी केला. करीता, अर्जदार हा दोन्ही गै.अ. यांचा ग्राहक आहे. अर्जदार यांनी, ट्रक घेतेवेळी गै.अ.क्र.2 यांचेकडे फायनान्स त्यांचेकडून घेतांना त्यास रक्कम रुपये 25,000/- दिले व फायनान्स रुपये 4,80,000/- चे केले. फायनान्सची किस्त रक्कम समान 42 हप्तामध्ये अर्जदारास गै.अ.क्र.2 कडे जमा करायचे होते. गै.अ.क्र.2 यांनी अर्जदारास वेळेवर गाडीचे कागदपञ दिले नाही व गाडीचे कागदपञ हे अर्जदारास फेब्रुवारी 2010 मध्ये दिलेत. 2. अर्जदाराने, ट्रक खरेदी केल्यानंतर ट्रकच्या बॉडीचे काम करण्यास रुपये 90,000/- व गाडीचे डेन्टींग पेन्टींग करीता रुपये 60,000/- खर्च केले. परंतू, गै.अ.क्र.2 यांनी वेळेवर कागदपञ न दिल्याने अर्जदारास ट्रक रोडवर चालविता आला नाही. तरी ही अर्जदार यांनी वेळेवर जुळवा-जुळव करुन गै.अ.ची किस्त ही दि.26.2.09 पासून 29.1.10 पावेतो रुक्कम 1,45,600/- गै.अ.क्र.2 कडे जमा केली आहे. गाडी अर्जदाराचे नावानी होण्यास गै.अ.क्र.2 यांनी पुन्हा रुपये 27,000/- मागितली व अर्जदाराने ती रक्कम गै.अ.क्र.2 यास दिली आहे. अर्जदाराकडे, अचानक गै.अ.क्र.2 चा कर्मचारी दि.28.3.10 ला येवून सांगीतले की, ट्रकचे फोटो घ्यायचे आहेत. त्या कारणाने गाडी ही अर्जदाराकडे उभी ठेवण्यास सांगीतले. अर्जदार यांनी दि.29.3.10 ला ट्रक अर्जदाराकडे उभी ठेवली. परंतू, गै.अ.क्र.2 चे कर्मचारी यांना अर्जदाराचा ट्रक कोणतीही नोटीस न देता व काहीच न सांगता अर्जदाराचे घेरुन घेवून गेलेत व गै.अ.क्र.2 यांनी अर्जदारास पूर्ण रक्कम रुपये 5,68,000/- भरण्यास सांगीतले. परंतू, अर्जदार हे अतिशय गरीब असल्याने तेवढी रक्कम गै.अ.क्र.2 कडे एकावेळी जमा करणे शक्य नव्हते. परंतू, अर्जदार यांनी रुपये 50,000/- भरण्याची तयारी दाखवली. मॅनेजर श्री मिलींद यांनी पूर्ण रक्कम 5,68,000/- ही भरण्यास सांगीतले. नंतरच ट्रक सोडण्याचे सांगीतले. त्यामुळे, अर्जदार यांनी अधि.डी.के.हजारे यांचे मार्फतीने दि.29.4.10 व 27.8.10 ला नोटीस पाठविला. गैरअर्जदार यांनी नोटीस स्विकारुनही काहीच उत्तर दिले नाही व वादातील ट्रक सुध्दा परत केला नाही. त्यामुळे, अर्जदारास, दोन्ही गैरअर्जदारांनी ट्रक करीता लावलेला खर्च रक्कम 150.000/- ही दि.15.2.09 पासून 12 % व्याजासह द्यावे. अर्जदारास जानेवारी 09 ट्रक खरेदी केल्यापासून तर फेब्रुवारी 10 पर्यंत रुपये 1500/- रोज याप्रमाणे व नंतर दि.29.3.10 पासून अर्जदारास रक्कम मिळेपावेतो रोज रुपये 1500/- प्रमाणे दोन्ही गैरअर्जदारांनी द्यावे. अर्जदाराने गै.अ.कडे जमा केलेली किस्ती रक्कम 1,45,600/- ही सुध्दा दि.29.3.10 पासून 12 % व्याजासह गैरअर्जदारांकडून मिळण्याचे आदेश व्हावे. अर्जदारास शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 2,00,000/- व तक्रार खर्च रुपये 10,000/- दोन्ही गैरअर्जदारांकडून मिळण्याचे आदेश व्हावे, अशी मागणी केली आहे. 3. अर्जदाराने नि.5 नुसार 16 झेराक्स दस्ताऐवज दाखल केले आहे. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांना नोटीस काढण्यात आला. गैरअर्जदार क्र.1 व 2 हजर होऊन, गै.अ.क्र.2 ने नि.14 नुसार लेखी उत्तर व नि.15 नुसार 6 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. गै.अ.क्र.1 ने नि.22 नुसार लेखी उत्तर दाखल केले. 4. गै.अ.क्र. 1 ने, लेखी बयानात नमूद केले की, गै.अ.क्र.2 ही गै.अ.क्र.1 ची शाखा आहे. गै.अ.क्र.1 हे गै.अ.क्र.2 ने लेखी दाखल केलेले लेखी उत्तर स्विकारत आहे, त्यामुळे गै.अ.क्र.2 चे दाखल केलेले लेखी उत्तर हे गै.अ.क्र.1 चे लेखी उत्तर समजण्यात यावे असे म्हटले आहे. 5. गै.अ.क्र.2 ने लेखी बयानात, अर्जदाराचे तक्रारीतील संपूर्ण कथन चुकीचे व खोटे असल्याने आमन्य केले आहे. गै.अ.क्र.2 ने लेखी बयानातील विशेष कथनात नमूद केले की, अर्जदाराने गै.अ.क्र.2 कडून ट्रक क्र.एम.एच.34 एम 6321 खरेदी करण्याकरीता दि.27.12.08 ला रुपये 4,80,000/- चे कर्ज 18.24 % दराने घेतले होते व आहे. अर्जदाराला कर्जाची व्याजासहीत नियमितपणे परतफेड दरमहा दि.1.2.09 पासून दि.1.7.12 पर्यंत 42 किस्तीमध्ये रुपये 18,726/- याप्रमाणे एकूण रुपये 7,86,492/- परतफेड करावयाची होती. गै.अ.क्र. 2 व अर्जदार यांच्यामध्ये कर्ज दिल्याबद्दल दि.27.12.08 रोजी लेखी करारनामा झाला. अर्जदार हा आज रोजी थकीतदार आहेत. अर्जदार आज रोजी गै.अ.ला कर्जाची थकीत रक्कम रुपये 2,01,143/- देणे लागतो व त्याकरीता गै.अ.क्र.2 ने स्टेटमेंट दाखल केलेले आहेत. गै.अ.ने थकीत कर्जाची रक्कम भरण्यासाठी सुचित केले होते. परंतू, अर्जदाराने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करुन थकीत रक्कम भरली नाही. गै.अ.ला अर्जदाराचा ट्रक थकीतदार असल्याने नाईलाजास्तव जप्त करावा लागला. जप्त केल्यानंतर गै.अ.ने अर्जदाराला दि.7.7.10 ला नोटीसव्दारे सुचित केले होते. अर्जदाराने नोटीस प्राप्त होऊनही दाखल घेतली नाही. त्यामुळे, गै.अ.ने सदर ट्रक रुपये 4,60,000/- ला हमीद हुसेन यांना विकला व सदरहू रक्कम अर्जदार यांचे खात्यात जमा केली. गै.अ.ने, रुपये 4,60,000/- अर्जदाराचे खात्यात जमा केल्यावरही अर्जदाराकडून रुपये 2,01,143/- घेणे आहे. गाडी विकण्याची प्रक्रीया व त्याची संपूर्ण माहिती अर्जदाराला माहित होती. अर्जदाराने सत्य माहिती विद्यमान मंचापासून लपवून ठेवली आहे. अर्जदाराविरुध्द गै.अ.क्र.2 ने नागपूर येथे लवाद न्यायालयात तक्रार दाखल केलेली आहे व त्याची माहिती अर्जदार यांना आहे. अर्जदाराने गाडीसाठी कोणताच खर्च केलेला नाही. अर्जदाराने दाखल केलेले बिल हे चुकीचे, बनावट व खोटे आहे. अर्जदाराने गै.अ.स गाडी नावावर करण्यासाठी रुपये 27,000/- दिलेले नाहीत, तसेच कर्ज घेतेवेळी सुध्दा रुपये 25,000/- दिलेले नाहीत. अर्जदार यांनी ट्रकची बॉडी व डेटींग पेटींग करुन घेतली नाही. त्यामुळे, अर्जदाराने गै.अ.ला थकीत कर्जाची रक्कम रुपये 2,01,143/- द्यावे असा आदेश गै.अ.करीता व अर्जदाराविरुध्द विद्यमान मंचानी पारीत करावा. अर्जदाराने दाखल केलेला अर्ज अर्थहीन असल्यामुळे अर्जदाराची प्रार्थना खर्चासहीत खारीज करण्यात यावी, अशी विनंती केली. 6. अर्जदाराने नि.24 नुसार शपथपञावर सरतपासणी दाखल केले. गै.अ.क्र.2 ने नि.28 नुसार शपथपञावर सरतपासणी व नि.29 नुसार 9 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. गै.अ.क्र.1 ने ने नि.27 नुसार गै.अ.क्र.2 ने दाखल केलेली शपथपञावरील सरतपासणी ही गै.अ.क्र.1 ची सरतपासणी समजण्यात यावी, अशी पुरसीस दाखल केली. अर्जदार व गैरअर्जदारांनी दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपञ सरतपासणी व उभय पक्षांच्या वकीलांनी/प्रतिनिधीनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात. @@ कारणे व निष्कर्ष @@ 7. अर्जदाराने, गै.अ.कडून फायनान्स करुन घेतलेली गाडी क्र.एम.एच.34/एम 6321 सदरहू गाडीवर अर्जदाराने घेतलेली फायनान्सची रक्कम 52 किस्ती मध्ये भरणा करावयाचे होते. परंतू, ही रक्कम अर्जदाराने शेड्युल प्रमाणे भरलेली नाही. अर्जदार व गै.अ. दोघांनी दाखल केलेले दस्तऐवज वरुन सिध्द होते. तसेच, अर्जदाराचे हे म्हणणे ही गृहीत धरण्या सारखे नाही की, त्याने गाडी घेतल्यानंतर दुरुस्तीसाठी खर्च केलेला आहे. कारण, ट्रकचे बॉडी बनविण्याचे दोन दोन बिल दाखल बिल आहे व नि.अ-6 व अ-9 नुसार त्याच्यातही ही तफावत आहे. एकाच महिण्यामध्ये 15/2/09 व 24/2/09 अर्जदाराने दोन वेळा ट्रक बॉडी कशी बनविली ? याचा खुलासा केला नाही. तसेच, सदर दोन्ही बिल म्हणून गृहीत धरण्यासारखे नाही, कारण त्या दोन्ही बिलावर सेल टॅक्स वॅट टॅक्सचे नंबर, बिल नंबर इत्यादी नाहीत. अर्जदाराचे हे ही म्हणने संयुक्तीक नाही की, अर्जदाराने, गैरअर्जदारास पाठविलेले नोटीसचे उत्तर गै.अ.ने दिलेले नाही. कारण, गै.अ.ने आपल्या उत्तरासोबत दाखल दस्तऐवज ब-3 व ब-4 वर अर्जदाराचे नोटीसाला उत्तर दाखल असून, अर्जदाराने त्याला अमान्य केलेले नाही. 8. अर्जदाराने, घेतलेली गाडीचे कागदपञ गै.अ.ने वेळेवर दिले नाही, हे ही कारण संयुक्तीक नाही. कारण, अर्जदाराने स्वतः दाखल केलेले गाडीचे कागदपञावरुन असे दिसून येते की, गाडीचा इंशुरन्स दि.16.11.09 ला अर्जदाराच्या नावाने झालेला आहे व गाडीचा टॅक्स भरणे व गाडीला आर.टी.ओ. कडून तपासून घेणे हे जबाबदारी गाडी घेणा-याची असते, असे असतांना अर्जदाराने गै.अ.कडे जाऊन गाडी घेतली, पैसे दिले, गाडी घेतल्या बद्दल अग्रीमेंट केले, फायनान्स चढविला, परंतू गाडीचे कागदपञ घेतले नाही, हे कथन गृहीत धरण्या सारखे नाही. 9. गै.अ.ने, अर्जदारास दि.7.7.10 ला नोटीस पाठवून दस्त क्र.ब-5 नुसार थकीत रकमे बाबत मागणी करुन व न भरण्यास कायदेशीर गाडी जप्त करुन लिलाव करण्याबाबत कळविले असून, सुध्दा अर्जदाराने काहीही केलेले नाही, हे स्पष्ट होते. कारण, अर्जदाराने म्हटले की, आम्ही रुपये 50,000/- भरण्याची तयारी दर्शविली व रक्कम भरण्यासाठी गेले असता, घेण्यास नकार दिला, याबाबत अर्जदाराने कुठलाही पुरावा सादर केलेला नाही. जसे की, रुपये 50,000/- चा डी.डी.काढला किंवा नगद नेले व जमा केल्यानंतर गै.अ.ने त्याची पावती दिली नसती तर अर्जदाराने त्याबाबत त्यांना पञाव्दारे किंवा नोटीस व्दारे कळविल्याबाबत कुठलेही दस्तऐवज दाखल नाही, म्हणून हे ही बाब गृहीत धरण्या सारखी नाही. 10. एकंदरीत, गै.अ.ने, अर्जदारास सदर वादग्रस्त ट्रकवर केलेले फायनांन्सची रक्कम मागणी रितसर केलेली आहे व अर्जदाराने ती रक्कम भरलेली नाही, म्हणून गै.अ. ने एग्रीमेन्ट प्रमाणे कायद्यानुसार अर्जदारास नोटीस देऊन व जप्ती बाबत पोलीस स्टेशन ला कळवून रितसर जप्तीची कार्यवाही केलेली आहे, हे दाखल दस्तऐवजावरुन सिध्द होते. 11. अर्जदाराने, थकीत असलेली रकमेपोटी नागपूर लवाद मध्ये गै.अ. व्दारे दाखल केलेली तक्रारीला तोंड द्यायचे नाही व थकीत रक्कम भरण्यापासून बचाव व्हावे म्हणून ही तक्रार गै.अ.विरुध्द दाखल केली असल्याचे दिसून येते. म्हणून, अर्जदाराची ही तक्रार गै.अ.विरुध्द खारीज होण्यास पाञ आहे, असे या न्यायमंचाचे मत आहे व गै.अ.ने अर्जदारास कुठलीही न्युनता पूर्ण सेवा दिलेली नाही, तसेच कुठलीही अनुचीत व्यापार पध्दती अवलंबलेली नाही, म्हणून अर्जदाराची ही तक्रार खारीज करुन, खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार खारीज. (2) उभय पक्षांनी आपआपला खर्च सोसावा. (3) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
| [HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar] MEMBER[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT[HONORABLE Shri Sadik M. Zaweri] Member | |