निकालपत्र
(द्वारा- मा.अध्यक्ष - श्री.व्ही.आर.लोंढे)
(१) तक्रारदार श्री.वामन सुका शिंगाणे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये, सामनेवाले यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवा देण्यात त्रुटी ठेवलेली आहे म्हणून आदेश मिळणेसाठी व नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात येणे प्रमाणे आहे.
तक्रारदार यांनी सामनेवाले फायनान्स कंपनीकडून मारोती ओमनी हे वाहन खरेदी करण्यासाठी दि.२४-०२-२०११ रोजी रक्कम रु.९०,०००/- कर्ज घेतलेले होते. सदरील कर्जाची परतफेड दि.०५-०४-२०११ पासून सुरु होणारा व दि.०५-०३-२०१४ रोजी संपणारा मासिक हप्ता दरमहा रक्कम रु.३,६७५/- या प्रमाणे एकूण ३७ मासिक हप्त्यात करावयाची होती. तसेच तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून नविन टायर खरेदी करण्यासाठी रक्कम रु.४,०००/- कर्ज घेतले होते. सदरील कर्जाची फेड एकूण ५ हप्त्यात करावयाची होती. तक्रारदार यांनी वर नमूद केलेल्या दोन्हीही कर्जाची संपूर्ण फेड मुदतपुर्व केलेली आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे रक्कम रु.१,४९,९७५/- भरलेले आहेत. तसेच टायरची संपूर्ण कर्जफेड केलेली आहे. तक्रारदार यांनी घेतलेल्या कर्जाचा संपूर्ण मुदतपुर्व परतावा झालेला असतांनाही सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्याकडे कर्जापोटी रक्कम रु.३६,५५६/- वसूल करण्याचा तगादा लावला. प्रत्यक्षात एकूण ३७ मासिक हप्त्यात करावयाची कर्जाची फेड रक्कम रु.१,३५,९७५/- होती. तक्रारदार यांनी प्रत्यक्षात जास्त रक्कम सामनेवाले यांना दिलेली आहे. असे असतांनाही सामनेवाले यांनी बेकायदेशीरपणे तक्रारदार यांचेकडे कर्ज बाकी दाखवून रक्कम रु.३६,५५६/- ची मागणी केली आहे. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. सामनेवाले यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे असे ठरवून मिळावे. सामनेवाले यांच्या ताब्यात असलेले तक्रारदार यांचे आर.सी.बुक, परमीट, टॅक्स पावत्या, विमा पॉलिसी सर्व कागदपत्रे तक्रारदार यांना देण्याचा आदेश व्हावा आणि कर्ज फेडीचा निरंक दाखला देण्यात यावा. तसेच तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसानभरपाई देण्यात यावी ही मागणी तक्रारदारांनी केली आहे.
(३) सामनेवाले यांना या मंचाची नोटीस प्राप्त झाली. सामनेवाले हे अॅड.श्री.पवार यांचे वकिलपत्र दाखल करुन मंचासमोर हजर झाले. सामनेवाले यांनी वेळोवेळी लेखी खुलासा देणेकामी तारखा घेतल्या, मुदत देवूनही सामनेवाले यांनी लेखी खुलासा सादर केला नाही. त्यामुळे दि.३१-०७-२०१४ रोजी या मंचाने सामनेवाले विरुध्द नो-से आदेश केला आहे.
(४) तक्रारदार यांनी पुराव्याचे शपथपत्र नि.नं. १४ अन्वये दाखल केले आहे. तक्रारदार यांनी नि.नं.१६ वर लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारी सोबत नि.नं.४ सोबत तक्रारदार यांच्या कर्ज खात्याचा उतारा, कर्ज पावती, तक्रारदाराने सामनेवालेस पाठविलेली नोटीस, सामनेवाले यांना नोटीस प्राप्त झाल्याची पोहोचपावती दाखल केलेली आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पुराव्याचे अवलोकन केले. सामनेवाले यांचे वकील युक्तिवादासाठी गैरहजर. न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) सामनेवाले यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे, ही बाब तक्रारदार शाबीत करतात काय ? | : होय |
(ब) तक्रारदार हे तक्रारीत केलेली मागणी मिळण्यास पात्र आहेत काय ? | : होय |
(क) आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
कारणमिमांसा
(५) मुद्दा क्र. “अ” आणि “ब” :- तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्रांचे अवलोकन केले. तक्रारदाराने सामनेवाले फायनान्स कंपनीकडून वाहन खरेदी करण्यासाठी रक्कम रु.९०,०००/- कर्ज घेतले होते. सदरील कर्जाची फेड दि.०५-०४-२०११ पासून ते दि.०५-०३-२०१४ पर्यंत एकूण ३७ मासिक हप्त्यात करावयाची होती. एकूण मुद्दल व व्याज मिळून तक्रारदार यांनी सामनेवाले यांना रु.१,३५,९७५/- द्यावयाचे होते. तसेच तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून टायर खरेदी करण्यासाठी रु.४,०००/- कर्ज घेतले होते. सदरील कर्जाचा परतावा हा दरमहा रु.१,०००/- प्रमाणे पाच महिन्यात करावयाचा होता. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या मासिक कर्जफेडीच्या हप्त्याचे अवलोकन केले असता, तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे मुदतपुर्व संपूर्ण कर्ज व व्याजाची रक्कम फेड केलेली आहे. तशी नोंद त्यांचे खातेउता-यात दर्शविलेली आहे. तक्रारदार यांनी टायरसाठी घेतलेले कर्जही सामनेवाले यांना परतफेड केले आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पुराव्यावरुन तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून घेतलेले संपूर्ण कर्ज व्याजासहीत परत केलेले आहे ही बाब निदर्शणास येते. संपूर्ण कर्जाची फेड झालेली असल्यामुळे, सामनेवाले यांनी तक्रारदार यांना त्यांनी घेतलेल्या वाहनाचे आर.सी.बुक, परमीट, टॅक्स दिल्याच्या पावत्या, विमा पॉलिसी हे दस्त तक्रारदार यांना हस्तांतरीत करणे आवश्यक होते. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना दि.२५-०९-२०१३ रोजी नोटीस देवून, संपूर्ण कर्जाची फेड झालेली आहे असे असतांनाही रक्कम रु.३६,५५६/- कर्ज रक्कम बाकी दाखवून वसूल करण्याची कारवाई करत आहात असे कळविले आहे. तसेच कर्ज खाते उतारा देण्याबाबत मागणी केलेली आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या नोटीसीस उत्तरही दिलेले नाही.
संपूर्ण पुराव्याचे निरीक्षण केले असता, सामनेवाले यांनी तक्रारदार यांचेकडून कर्जफेड झालेली असतांनाही अधिक रकमेची मागणी केलेली आहे. सदरील बाब ही अनुचित व्यापारी प्रथा आहे. सामनेवाले यांना तक्रारदार यांचेकडून कर्जरक्कम व व्याज याचेव्यतीरिक्त जास्त रक्कम घेण्याचा अधिकार नाही. तक्रारदार यांनी सर्व कर्ज मुदतपुर्व फेड केलेली आहे. संपूर्ण कर्जाची परतफेड झालेली असतांनाही सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्याकडे कर्ज बाकी दाखवलेली आहे. त्यामुळे तक्रारदार यांना सदरील तक्रार दाखल करणे भाग पडले आहे आणि तक्रारदार यांना मानसिक व आर्थिक त्रास सोसावा लागला आहे. सबब सामनेवाले यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. “अ” आणि “ब” चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(६) मुद्दा क्र. “क” :- उपरोक्त सर्व विवेचनाचा विचार करता खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदार यांची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
(ब) तक्रारदार हे सामनेवाले कंपनीस वाहन खरेदी घेतलेल्या कर्जापोटी कोणतीही रक्कम देणे लागत नाहीत, असे जाहिर करण्यात येत आहे.
(क) सामनेवाले यांनी, हा आदेश प्राप्त झाल्यापासून पुढील तीस दिवसांचे आत.
(१) तक्रारदार यांना, त्यांच्या वाहनाचे आर.सी.बुक, परमीट, टॅक्स पावत्या, पॉलिसी, इत्यादी मुळ कागदपत्रे परत द्यावीत.
(२) तक्रारदार यांना, मानसिक व आर्थिक त्रासापोटी एकूण रक्कम २,०००/- (अक्षरी रक्कम रुपये दोन हजार मात्र) व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम १,०००/- (अक्षरी रक्कम रुपये एक हजार मात्र) द्यावेत.
धुळे.
दिनांक : २६-११-२०१४
(श्री.एस.एस.जोशी) (श्री.व्ही.आर.लोंढे)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.