निकालपत्र :- (दि.22.02.2011)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, सामनेवाला वित्तीय कंपनीकडून तक्रारदारांनी रुपये 5,50,000/- चे कर्ज घेवून ट्रक नं.एम्.एच्.09 एल्. 1571 हे वाहन घेतले. सदर ट्रक घेतेवेळी सामनेवाला यांनी डाऊन पेमेंटपोटी रक्कम रुपये 1,84,000/- व कर्जाचे काही आगाऊ हप्ते रोखीने भरुन घेतले. सामनेवाला यांनी सामनेवाला कंपनीकडील वसुली क्लार्क-श्री.प्रकाश कापसे व श्री.शिलवंत बिडकर हे तक्रारदारांकडे वसुलीसाठी येत असत व तक्रारदारांकडून हप्त्यांची रक्कम स्विकारुन त्यांना त्याची कच्ची पावती देत असत व पुढील महिन्याचा हप्ता स्विकारणेस येत असताना मागील महिन्याच्या हप्त्याची पक्की पावती देत. त्यामुळे सदर श्री.प्रकाश कापसे व श्री.शिलवंत बिडकर यांचेवर तक्रारदारांचा विश्वास बसला. त्यांनंतर सदर श्री.प्रकाश कापसे व श्री.शिलवंत बिडकर यांनी तक्रारदारांकडून कर्जाच्या हप्त्यापोटी रक्कमा स्विकारल्या, परंतु कच्च्या पावतीचे बुक बरोबर घेवून येणेचे विसरले अशी सबब सांगून हप्त्याच्या ठरलेल्या रक्कमा तक्रारदारांकडून घेवून गेलेले आहेत. पावतीबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देवून तक्रारदारांच्या पावतीच्या मागणीबद्दल दुर्लक्ष केले. सदर यांनी हप्त्यांची रक्कम स्विकारली, परंतु सामनेवाला कंपनीचे पूर्वीचे ब्रॅंच इन्चार्ज श्री.िमलींद कुलकर्णी यांचेशी हातमिळवणी करुन त्या रक्कमा तक्रारदारांचे कर्जखातेस जमा न करता परस्पर स्वत:चे फायदेकरीता बेकायदेशीरपणे वापरलेल्या आहेत. अशा प्रकारे कर्जखात्याच्या हिशेबाबमध्ये अफरातफर करुन व चुकीचा हिशेब ठेवून चुकीची कागदपत्रे बनविलेली आहेत व कर्जखाते उतारा चुकीचा बनविलेला आहे. दि.31.12.2009 रोजीपर्यन्त तक्रारदारांनी कर्जखातेस रक्कम रुपये 84,500/- भरलेले आहेत. तसेच, आगाऊ हप्त्यांची रक्कम म्हणून भरुन घेतलेली रक्कम रुपये 64,000/- असे एकूण रुपये 1,48,500/- कर्जखातेस भरलेले आहेत. असे असताना दि.08.12.2001 रोजीचे पत्राने सामनेवाला यांनी तक्रारदारांकडे रुपये 67,820/- इतकी थकबाकी मागणी केली होती. त्याबाबत चौकशी केली असता सामनेवाला यांनी सदरची कॉम्प्युटर मिस्टेक असलेचे सांगून कोणतीही बाकी नसलेबाबत कळविले व पुढे हप्ते भरत रहा अशी चुक होणार नाही असे सांगून सामनेवाला यांनी केलेले चुकीबद्दल दिलगिरी मागितली. त्यानंतर अचानक दि.19.11.2002 रोजी सामनेवाला कंपनीने तक्रारदारांकडे रुपये 1,43,785/- ची कर्ज थकबाकी निघत असलेची नोटीस पाठविली. सदर बाबतीत चौकशी केली असता पूवीप्रमाणे हिशोबात कॉम्प्युटर मिस्टेक झालेचे सांगितले. परंतु दि.21.11.2002 रोजी अचानक तक्रारदारांचे अपरोक्ष तक्रारदारांचा ट्रक बेकायदेशीरपणे पूर्वकल्पना न देता अनाधिकाराने ओढून नेला. त्यानंतर तक्रारदार हे रुपये 1,49,000/- देणे लागत आहेत व तक्रारदारांनी सामनेवाला यांना चेक दिलेला आहे असे कोर्टाला भासवून वर्षभराने सन 2004 मध्ये समरी कि.केस नं. 471/2004 तक्रारदारांविरुध्द दाखल केली. त्यावेळेस दि.30.01.2009 रोजी तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे तथाकथित कर्ज खाते उतारा व ट्रकचा व्हॅल्युएशन रिपोर्ट कागदपत्रांची मागणी केली असता सदरची कागदपत्रे देणेस सामनेवाला यांनी टाळाटाळ केली व आजतागायत दिलेला नाही. त्यानंतर शेवटी तक्रारदारांनी सामनेवाला कंपनी व त्यांचे अधिकारी यांचे विरुध्द चिफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांचे कोर्टात खाते उता-यावर खोटया नोंदी केलेबद्दल व ट्रकचा चुकीचा व्हॅल्युएशन रिपोर्ट तयार केलेबद्दल तसेच तक्रारदारांच्या कर्ज खातेस हप्त्यांचा रक्कमा न जमा करता अपहार केलेबद्दल फौजदारी तक्रार दाखल केली. तरीदेखील आजतागायत सामनेवाला यांनी तथाकथित खाते उतारा व ट्रकचा व्हॅल्युएशन रिपोर्ट तक्रारदारांना दिलेला नाही. सबब, तक्रारदारांचा ट्रक नं.एम्.एच्.09 एल्. 1571 चा व्हॅल्युएशन रिपोर्ट व कर्ज खातेचा उतारा देणेबाबत आदेश व्हावेत. तसेच, सामनेवाला यांच्या सेवेत कसुर केलेबाबत रुपये 1 लाख देणेचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत सामनेवाला यांचे दि.28.09.01 रोजीचे पत्र, सामनेवाला कंपनीकडे पैसे भरलेच्या पावत्या, सामनेवाला कंपनीच्या थकबाकी मागणीच्या नोटीसेस, कॅव्हेट नोटीस, सामनेवाला यांनी वडगांव पोलीस स्टेशनला दिलेले दि.21.11.2002 रोजीचे पत्र, तक्रारदारांनी कागद मागणीसाठी केलेल्या अर्जाची पोच दि.30.01.2009, 471/04 व 605/09 या फौजदारी फिर्यादी, 471/04 कामी कागद हजर परवानगी अर्ज दि.06.09.2007, हजर केलेल्या कागदपत्रांची यादी, कागद मागणीसाठीचा दि.25.02.2009 रोजीचा अर्ज, सामनेवाला यांचा सदर अर्जास अनुसरुन दि.31.03.2009 रोजी दिलेला अर्ज व म्हणणे, सदर अर्जासोबत व म्हणण्यासोबत सामनेवाला यांचे दि.07.03.2009 व दि.30.03.2009 रोजीचे पत्र, तक्रारदारांनी सामनेवाला यांचेविरुध्द परस्पर कागदपत्रे काढून घेतलेबाबत गुन्हा दाखल व्हावा म्हणून केलेला दि.17.07.2009 रोजीचा अर्ज, सदर अर्जास सामनेवाला यांचे दि.28.08.2009 रोजचे म्हणणे इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला वित्तीय कंपनीने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांची तक्रार मुदतीत नाही. तक्रारदारांविरुध्द फौजदारी स.क्रि.471/2004 दाखल असून त्यामध्ये डॉक्युमेंट प्रॉडक्शनचा अर्ज मंजूर करुन घेता येत होता, तसे न करता तब्बल 8 वर्षांनी सदरची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. (5) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. तसेच, दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद सविस्तरपणे ऐकले आहेत. सामनेवाला वित्तीय कंपनीकडून ट्रक वाहन खरेदी करणेकरिता तक्रारदारांनी कर्ज घेतले ही वस्तुस्थिती उपलब्ध कागदपत्रांवरुन दिसून येते. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीत सदर कर्ज खात्याचा उतारा, सामनेवाला यांच्या भरलेले हप्ते, तक्रारदारांचा ट्रक जप्त करुन नेलेनंतर ट्रक व्हॅल्युएशनप रिपोर्ट इत्यादी कागदपत्रांची मागणी केली आहे. कर्जदार हे ग्राहक आहेत. त्यांच्या कर्जखात्याची वस्तुस्थिती, त्या अनुषंगाने कागदपत्रांची केलेली मागणी यांचा विचार करता त्यास मुदतीचा बाध येत नाही. कर्जदार ग्राहक हा त्याच्या कर्ज खात्याच्या संबंधित कागदपत्रे केव्हांही मागू शकतो व सामनेवाला वित्तीय कंपनीने ग्राहक या नात्याने त्या तक्रारदारांना त्यांचे कर्ज खात्याच्या संबंधी कागदपत्रे देणे आवश्यक असतानाही तसे त्यांनी दिलेले नाहीत. तसेच, प्रस्तुतची तक्रार दाखल केलेनंतरही तसे कागदपत्रे प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेले नाहीत याचा विचार करता सामनेवाला वित्तीय कंपनीने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला वित्तीय कंपनीने तक्रारदारांना कर्जखात्याचा उतारा, ट्रक नं.एम्.एच्.09 एल्. 1571 चे व्हॅल्युएशन रिपोर्ट याबाबत सर्व ती संबंधित कागदपत्रे तक्रारदारांना द्यावीत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच, कर्जखात्याची कागदपत्रे देणेस नकार दिल्याने तक्रारदारांना दिलेल्या मानसिक व आर्थिक त्रासापोटी तक्रारदार हे रक्कम मिळणेस पात्र आहेत. सबब आदेश. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला वित्तीय कंपनीने त्यांच्या कर्ज खात्याचा उतारा, त्या अनुषंगाने सर्व ती कागदपत्रे, ट्रक नं.एम्.एच्.09 एल्. 1571 चा व्हॅल्युएशन रिपोर्ट इत्यादी कागदपत्रे तक्रारदारांना द्यावीत. 3. सामनेवाला वित्तीय कंपनीने तक्रारदारांना मानसिक व आर्थिक त्रासापोटी रुपये 10,000/- (रुपये दहा हजार फक्त) द्यावेत. 4. सामनेवाला वित्तीय कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त) द्यावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |