(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्या यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 30/12/2011)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दि.28.04.2011 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार ट्रक क्र. महा-40/7595, इंजिन क्र. NPE 443132 चेसिस क्र. NPH 4227953, अशोक लेलँड, 2510 टिप्पर (10 चाकी) चा नोंदणीकृत मालक असुन सदर वाहनाची एकूण किंमत रु.25,00,000/- होती. तक्रारकर्त्याने सदर वाहनाचा विमा गैरअर्जदारांकडे दि.10.05.2010 ते 10.05.2011 या कालावधीकरीता काढलेला होता, तसेच तक्रारकता वाहनाचा रेती व विटा वाहून नेण्यासाठी करीत होता.
3. सदर ट्रकचा ड्रायव्हर दि.16.11.2010 रोजी ब्रास रेती भरुन वाहून नेत होता त्यावेळी सिमझीम पाऊस चालू होता. सायंकाळी 6.30 वाजताचे सुमारास नारी रोड, जरीपटका पोलिस स्टेशन, नागपूरच्या अधिकार क्षेत्रात उलटला. संबंधीत बाबीची तक्रार तक्रारकर्त्याने जरीपटका पोलिस स्टेशन, नागपूर यांचेकडे केली असुन त्यांनी सदर घटनेचा पंचनामा करुन अपघात गुन्हा नोंदवुन त्याचा अपघात क्र.50/10 दि.17.11.2010 असा आहे.
4. तक्रारकर्त्याने सदरचा ट्रक गुरुनानक मेकॅनिकल वर्क्स, टेकानाका, कामठी रोड, नागपूर येथे दुरुस्तीसाठी पाठविला असता रु.3,50,000/- इतका तक्रारकर्त्यास खर्च आला. तक्रारकर्त्याने सदर वाहनाचे नुकसान भरपाईची मागणी गैरअर्जदारांकडे केली , परंतु गैरअर्जदारांनी त्याची दखल घेतली नाही, ही त्यांचे सेवेतील कमतरता असल्याचे नमुद केले आहे. म्हणून सदर तक्रारकर्तीने सदर तक्रार दाखल करुन विमा दाव्याची रक्कम रु.3,50,000/- मिळावी, मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- मिळावे, तक्रार व नोटीसच्या खर्चापोटी रु.17,000/- मिळावे अशा मागण्या केलेल्या आहेत.
5. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र. 3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात दस्तावेज क्र.1 ते 10 च्या छायांकीत प्रती पान क्र.6 ते 20 वर जोडलेल्या आहेत.
4. गैरअर्जदारांना प्रस्तुत प्रकरणात नोटीस बजावला असता ते मंचात उपस्थित असुन त्यांनी आपला जबाब खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे...
गैरअर्जदाराने आपल्या कथनानुसार त्यांनी तक्रारकर्त्यास सदर वाहनाच्या अपघाताचे भरपाईपोटी दि.31.03.2011 रोजी रु.44,681/- धनादेश क्र.119896 व्दारे तक्रारकर्त्यास दिले असुन सदरची रक्कम तक्रारकर्त्याला प्राप्त झाल्यामुळे त्या संबंधी दि.30.06.2011 चा ‘क्लेम स्टेटस् रिपोर्ट’, सादर केलेला आहे. त्यामुळे सदरची तक्रार खारिज करण्यांत यावी अशी मंचास विनंती केलेली आहे.
5. गैरअर्जदारांच्या मते सदर वाहनाच्या अपघाताची सुचना मिळाल्यावर त्यांनी सर्व्हेअरची नेमणूक करुन त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर तक्रारकर्त्यास दि.08.03.2011 व दि.22.03.2011 ला स्मरणपत्रे पाठवुन ट्रकचे लोड चालान पाठविण्याचे कळविले. त्यानंतर वाहनाचे किती नुकसान झाले ह्याबाबत श्री. एल.पी. धामंडे, सर्व्हेअर यांनी दि.08.01.2011 रोजी आपला अहवाल सादर केला त्यात तक्रारकर्त्याने खर्चाचा अंदाज रु.3,66,000/- चा सादर केला. तसेच निरीक्षणाअंती व अत्यावश्यक दस्तावेज सादर केल्यानंतर श्री. धामंडे ह्यांनी सदर वाहनाचे दुरुस्ती खर्चापोटी रु.1,36,857/- देण्याची शिफारस केली.
6. तसेच सर्व्हेक्षणामधे असे आढळून आले की, सदर वाहन ज्यात रेती होती, तो ओबड-खोबड कच्च्या रस्त्यावर उभी केल्यामुळे व टिप्परवर एकीकडे भार पडल्यामुळे पलटी झाली, यात वाहकाचा निष्काळजीपणा दिसत होता. म्हणून सुटे भाग, हाड्रोलिक जॅकचे नुकसान सोडून देण्यास तयार असुन तक्रारकर्त्यास भार (लोड) चालानची प्रत दावा निकाली काढण्याकरता देण्यांचे सांगितले. त्यानंतर तक्रारकर्त्यास दोनदा स्मरणपत्रे पाठवुनही 5 दिवसांचे आंत उत्तर देण्याचे कळविले मात्र तक्रारकर्त्याने ती सादर केली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यास अंतिम दाव्याप्रमाणे रु.44,681/- चा धनादेश दिला.
7. वरील सर्व बाबी लक्षात घेता गैरअर्जदारांनी दिलेल्या सेवेत कमतरता नाही, याउलट तक्रारकर्त्याने खोटी तक्रार दाखल केल्यामुळे त्याचेवर रु.50,000/- चा दंड ठोठाऊन सदर तकार खारिज करण्यांत यावी अशी मंचास विनंती केलेली आहे.
8. सदर तक्रार मंचासमक्ष मॉखिक युक्तीवादाकरीता दि.12.12.2011 रोजी आली असता दोन्ही पक्ष हजर मंचाने त्यांचा युक्तिवाद ऐकला व तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील प्रमाणे निष्कर्षाप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
9. सदरच्या प्रकरणातील एकंदरीत वस्तुस्थिती, पुरावे व दोन्ही बाजुंचे म्हणणे पाहता या मंचाचे असे निदर्शनास येते की, निर्वीवादपणे तक्रारकर्त्याने त्याचे मालकीचा टिप्पर क्र. महा-40/7595, इंजिन क्र. NPE 443132 चेसिस क्र. NPH 4227953, अशोक लेलँड, 2510 टिप्पर (10 चाकी) वाहनाचा विमा गैरअर्जदारांकडे काढलेला होता व त्याचा कालावधी दि.10.05.2010 ते दि.10.05.2011 होता. तसेच वैध कालावधीत सदर वाहनास दि.16.11.2010 रोजी अपघात झाला.
10. तक्रारीसोबबत दाखल दस्तावेजांवरुन दिसुन येते की, तक्रारकर्त्याने विमा दावा गैरअर्जदाराकडे सादर केल्यावर गैरअर्जदाराने स्पॉट सर्व्हेअर म्हणून श्री. अहलुवालिया यांची नेमणूक केलेली होती व दि.20.11.2010 आपला अहवाल सादर केला, त्यानंतर फायनल सर्व्हेअर म्हणून डॉ. एल.पी. धामंडे यांनी (दस्तावेज क्र.3) वर आपला अहवाल सादर केला त्यात त्यांनी रु.1,36,857/- एवढया खर्चाची शिफारस केलेली होती, असे दिसुन येते.
11. गैरअर्जदारांच्या मते तक्रारकर्त्याच्या वाहकाच्या निष्काळजीपणामुळे सदर वाहनाचे नुकसान झाले. तसेच तक्रारकर्त्यास टिप्परमधे असलेल्या लोडचे चालानची प्रत सादर करण्यांस सांगुन व दोनदा स्मरणपत्रे पाठवुनही त्यांनी सादर न केल्यामुळे तक्रारकर्त्याचा अंतिम दावा रु.44,681/- चा धनादेश क्र.119986 दि.31.03.2011 रोजी देण्यांत आला. परंतु दस्तावेज क्र. 2 व 3 वरील दोन्ही सर्व्हेअरचे अहवाल बघता तक्रारकर्त्याचे वाहकाचे निष्काळजीपणामुळे सदर वाहनाचे नुकसान झाले असे दिसुन येत नाही किंवा तसा सुस्पष्ट पुरावा गैरअर्जदारांनी सादर केला नाही. तसेच दस्तावेज क्र.11 वरील तक्रारकर्त्याचे शपथपत्रातील परिच्छेद क्र.6 वरुन तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांचे निरीक्षकास सदर वाहनाचा परवाना व रेती वाहून नेण्याचा परवाना सादर केलेला होता, असे दिसुन येते. तसेच डॉ.एल.पी. धामंडे, यांच्या अहवालावरुन देखील Permit found in order असे नमुद केले असतांना स्वतःहून अयोग्य कारणास्तव सर्व्हेअरने शिफारस केलेली वाहन दुरुस्तीची रक्कम न देता केवळ रु.44,681/- एवढीच मंजूर करणे, ही गैरअजर्तदारांची कृति निश्चितच सेवेतील कमतरता आहे. तक्रारकर्त्याने मागणी केलेली नुकसान भरपाईची रक्कम पुराव्या अभावी या मंचाला मान्य करता येणार नाही. तक्रारकर्त्याने शपथपत्रान्वये सदरची रक्कम रु.44,681/- स्विकारली नसल्याचे कबुल केलेले आहे.
12. वरील सर्व बाबी लक्षात घेता गैरअर्जदाराने सर्व्हेअर श्री. धामंडे यांनी दिलेल्या अहवालानुसार विमा दाव्याची रक्कम योग्य आहे, असे या मंचाचे मत आहे. त्यामुळे ती रक्कम गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास विमा दाव्यापोटी द्यावी या निष्कर्षाप्रत हे मंच येते.
वरील सर्व बाबींचा विचार करता आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास विमा दाव्याची रक्कम रु.1,36,857/- द्यावी. सदर रकमेतुन सॉल्वेजची रक्कम रु.9,500/- कमी करावी व उर्वरित रकमेवर दि.15.02.2011 पासुन रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 9% दराने व्याजासह परत करावी.
3. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/- अदा करावे.
4. वरील आदेशाचे पालन गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आत करावे.