नि.२७
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष : श्री.अनिल य.गोडसे
मा.सदस्या : श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. २०५८/०९
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : १७/०८/२००९
तक्रार दाखल तारीख : १/०९/२००९
निकाल तारीख : १७/०८/२०११
----------------------------------------------------------
सौ कुसुम ज्ञानदेव जाधव
व.व. ४८, धंदा-नोकरी
रा.सावंत गल्ली, कवठेपिराण,
ता.मिरज, जि.सांगली ..... तक्रारदारú
विरुध्दù
मॅनेजर
श्रीराम सीटी युनियन फायनान्स लि.
द्वारा १४७९, युनिट नं.२, ग्राऊंड फलोअर,
शहालुल्ला प्लाजा, दुर्गामाता मंदिराजवळ,
माधवनगर रोड, सांगली .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.एन.एन.वाळवेकर
जाबदार तर्फे : +ìb÷. श्री महेश मसाले
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज आपल्या वाहनाच्या सदोष सेवेबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार यांनी वाहन खरेदीसाठी जाबदार यांच्याकडून आर्थिक सहाय्य घेतले होते. तक्रारदार यांनी घेतलेल्या कर्जाचा दरमहा हप्ता रु.७,९०६/- असा ठरला होता. सदरचे कर्जाची मुदत ही चार वर्षे होती. तक्रारदार हे कर्जाचे हप्ते दरमहा अदा करत होते. परंतु तक्रारदार यांचे वाहनास अपघात झाल्यामुळे तक्रारदार यांचे कर्ज खाते थकीत झाले. जाबदार यांनी दि.२८/२/२००९ रोजी रु.२,४०,१२२/- इतक्या अवास्तव रकमेचा खातेउतारा पाठवून दिला. त्यानंतर जाबदार यांनी दि.६/३/२००९ रोजी रक्कम रु.३,६३,०००/- भरणेची नोटीस पाठविली. त्यानंतर दि.१३/५/२००९ रोजी रक्कम रु.२,५६,६८२/- इतक्या रकमेचा खातेउतारा पाठवून दिला व खातेउता-याचे चार्जेस म्हणून रक्कम रु.१००/- अनाधिकाराने घेतले. जाबदार यांनी वेगवेगळे चार्जेस बेकायदेशीरपणे आकारणी करुन मागणी केल्याने सर्व खाते उतारे व नोटीस पूर्णपणे चुकीची व बेकायदेशीर असलेने तक्रारदार यांनी जाबदार यांना तुम्ही तुमच्या खातेउता-याची रक्कम व चार्जेस कमी न केल्यास मी कोणताही हप्ता भरणार नाही असे सांगितले. त्यामुळे तक्रारदार यांनी हप्ते भरणेचे बंद केले. जाबदार यांनी बेकायदेशीरपणे बिनतारखेच्या को-या चेकचा गैरवापर करुन तक्रारदार यांच्यावर फौजदारी केसेस दाखल केल्या. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज जाबदार यांनी दिलेल्या दूषित सेवेबाबत दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने ७ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार यांनी याकामी नि.१६ ला आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदारांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी मे २००७ मध्ये तक्रारदारांच्या मागणीनुसार रक्कम रु.२,५५,०००/- चे कर्ज द.सा.द.शे.१२.२० टक्के व्याजदराने दिले होते. सदर कर्जाचा दरमहा हप्ता रु.७,९०६/- चा ठरला होता. सदर कर्जाची परतफेड ४८ हप्त्यांमध्ये करण्याची होती. तक्रारदार यांनी कर्जाची परतफेड वेळेत केली नाही. दि.२८/२/२००९ रोजी दिलेला उतारा हा फोरक्लोजर लेटर आहे. दि.२३/२/२००९ रोजी तक्रारदार यांनी कधीही खातेउतारा मागितला नाही. दि.१३/५/०९ रोजीच्या दिलेल्या सेटलमेंट अमाऊंटचे पत्रातील रक्कम तक्रारदारांच्या तोंडी मागणीवरुन जाबदार यांच्या चेन्नई ऑफिसतर्फे आलेली तडजोडीची रक्कम आहे. सदरचे पत्र म्हणजे खातेउतारा नाही. तक्रारदाराकडून हप्ते थकीत झाले आहेत. तक्रारदार यांनी दिलेले धनादेश वटले नसल्याने तक्रारदार यांचेवर फौजदारी खटला दाखल केला आहे. त्याबाबत या न्यायमंचात दाद मागता येणार नाही. जाबदार यांनी कोणतीही दूषित सेवा दिलेली नाही अथवा अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केलेला नाही. या सर्व कारणांचा विचार करुन तक्रारदार यांचा तक्रारअर्ज खर्चासह फेटाळणेत यावा. जाबदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.१७ ला प्रतिज्ञापत्र व नि.१८ च्या यादीने ५ कागद दाखल केले आहेत.
४. तक्रारदार यांनी नि.१९ ला जादा पुरावा देणेचा नाही अशी पुरशिस दाखल केली आहे. तसेच तक्रारदार यांनी नि.२० व २१ च्या यादीने ७ कागद दाखल केले आहेत. तक्रारदार तर्फे नि.२३ ला लेखी युक्तिवाद दाखल करण्यात आला आहे. तसेच नि.२५ अर्जान्वये एक कागद दाखल केला आहे. जाबदार यांनी नि.२६ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
५. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दाखल करण्यात आलेली कागदपत्रे व दोन्ही बाजूंचा युक्तिवाद यावरुन खालील मुद्दे मंचाचे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
१. तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत का ? होय.
२. तक्रारदार यांना जाबदार यांनी सदोष सेवा
दिली आहे का ? नाही.
३. तक्रारदार हे मागणीप्रमाणे अनुतोष मिळणेस पात्र
आहेत का ? नाही.
४. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
विवेचन
६. मुद्दा क्र.१ –
तक्रारदार यांनी जाबदार यांच्याकडून वाहन खरेदीसाठी कर्ज घेतले होते. त्यामुळे तक्रारदार हे जाबदार यांचे कर्जदार आहेत. कर्ज देणे व कर्जाबाबत योग्य त्या सेवा देणे या ग्राहक संरक्षण कायद्यातील “सेवा” या व्याख्येमध्ये अंतर्भूत होत असलेमुळे तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक होतात या निष्कर्षाप्रत सदरचा मंच येत आहे.
७. मुद्दा क्र.२ व ३ एकत्रित -
तक्रारदार यांनी आपल्या तक्रारअर्जामध्ये जाबदार यांनी चुकीचा व अवाढव्य रकमेचा खातेउतारा दिला तसेच चेक वटले नाहीत म्हणून फौजदारी केसेस दाखल केल्या असे नमूद केले आहे. जाबदार यांनी त्यांचे युक्तिवादामध्ये तक्रारदारांचे सर्व मुद्दे खोडून काढताना तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांकडे मंचाचे लक्ष वेधले. नि.५/१ वर दि.२८/२/२००९ रोजीचा फोरक्लोजर अमाऊंटबाबतचे पत्र आहे तसेच नि.५/३ वर दि.६/३/२००९ रोजीच्या पत्राचे अवलोकन केले असता त्यावरुनही रु.३,६३,०००/- ची मागणी केलेली दिसून येत नाही. केवळ रु.५५,३४२/- ची मागणी केलेली आहे. नि.५/४ वर चेन्नईच्या झोनल ऑफिसचे सेटलमेंट अमाऊंट ब्रेकअप या बाबतचे पत्र असलेचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार यांनी त्यांच्या अर्जात नमूद केल्याप्रमाणे चुकीचा खातेउतारा दिला, या कथनामध्ये कोणतेही तथ्य दिसून येत नाही. तक्रारदार यांनी आपल्या अर्जामध्ये जाबदार यांनी त्यांच्यावर चेकच्या वसुलीसाठी बेकायदेशीर खोटया फौजदारी केसेस दाखल केल्या व अनुचित सेवा दिली असेही नमूद केले आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जामध्येच त्यांनी केवळ १५ हप्त्यांची रक्कम जमा केल्याचे नमूद केले आहे. कर्जासाठी मुदत चार वर्षाची असताना व कर्जाची परतफेड ४८ हप्त्यांमध्ये करावयाची असताना कर्जाची मुदत संपली असूनही तक्रारदार यांनी केवळ १५ हप्ते भरलेले आहेत. यावरुन तक्रारदार हे थकीत कर्जदार आहेत ही बाब स्पष्ट होते. कर्जाच्या वसुलीसाठी जाबदार यांनी चेकच्या आधारे फौजदारी केसेस दाखल केल्या आहेत व त्या न्यायनिर्णयासाठी प्रलंबित आहेत त्यामुळे त्याबाबत कोणतेही भाष्य करणे योग्य होणार नाही असे या मंचाचे मत आहे. कर्ज थकीत झाले असेल तर कराराप्रमाणे कर्जाच्या वसुलीसाठी योग्य त्या कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा जाबदार यांना निश्चितच अधिकार आहे. कर्ज थकीत झाले असताना उर्वरीत रकमेवर द.सा.द.शे. १२.२० टक्के प्रमाणे सरळव्याजाची आकारणी होवून कर्जखाते फेडीत करुन घ्यावे तसेच दि.२३/२/२००९ पासून सदर रकमेवर कोणत्याही प्रकारच्या व्याजाची आकारणी करु नये या मागण्या मंजूर करणे संयुक्तिक होणार नाही. तक्रारदार यांना जाबदार यांनी कोणतीही सदोष सेवा दिली असल्याचे प्रस्तुत प्रकरणी दिसून येत नाही. तक्रारदार हे थकीत कर्जदार झाले आहेत त्यामुळे ते कोणताही अनुतोष मिळणेस पात्र नाहीत या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार याचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सांगली
दिनांकò: १७/०८/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११