ग्राहक तक्रार क्र. 61/2014
दाखल तारीख : 15/02/2014
निकाल तारीख : 16/02/2016
कालावधी: 02 वर्षे महिने 02 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. अरविंद वसंत यादव,
वय - 38 वर्षे, धंदा – शेती,
रा.साळुंकेनगर, ता. बेंबळी रोड, उस्मानाबाद,
ता.जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. मा.व्यवस्थापक,
श्रीजी फोर्ड, श्रीजी अॅटोवर्ल्ड प्रा.लि,
मोहन मिल कॉप्पांऊंड, ठाणे,
घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम)-400607.
2. मा.व्यवस्थापक,
फोर्ड इंडिया प्रा.लि. विभागीय कार्यालय,
(पश्चिम) 301, सेंट्रल प्लाझा,
सी.एस.टी. रोड, कलिन सांताक्रुझ (पुर्व) मुंबई-400098.
3. बँक ऑफ इंडिया शाखा- उस्मानाबाद.
शिवाजी चौक, उस्मानाबाद, ता. जि.उस्मानाबाद.
4. श्रीराम फोर्ड, तेरणा कॉलेज जवळ,
एमआयडीसी सोलापूर औरंगाबाद रोड,
उस्मानाबाद ता.जि.उस्मानाबाद. ....विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.एन.एच.पडवळ.
विरुध्द पक्षकारा क्र.1 तर्फे विधीज्ञ : श्री.आर. एन.लोखंडे.
विरुध्द पक्षकारा क्र.2, 3, व 4 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत.
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्री.मुकुंद बी.सस्ते यांचे व्दारा:
1. तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
तक्रारदाराची तक्रार या न्यायमंचात विप ने त्याच्या संदर्भात केलेली अनूचित व्यापार पध्दतीबाबत व सेवेतील त्रुटीबाबत दाखल केलेली आहे. तक ची तक्रार थोडक्यात अशी की त्यांना स्वत:च्या व्यावसायासाठी व कुटुंबासाठी फिरण्यासाठी वाहन पाहिजे होते. सदरचे वाहनाची माहिती इंटरनेटवरुन घेऊन दि.06/08/2013 रोजी विप क्र. 1 यांचे दालनास भेट देऊन वाहन घेण्याचे निश्चित केले. सदरचे वाहन हे इको स्पोर्ट 1.5 टिटॅनियम (ऑप्शनल) M Red हे मॉडेल त्यावेळी उस्मानाबाद येथे विप चे शोरुम मध्ये नसल्याबाबत सांगितले असता फोर्ड कंपनीचे शोरुम सध्या उस्मानाबाद येथे नसले तरी संपूर्ण सेवा आम्ही उस्मानाबाद येथे देऊ व वाहना बाबत कोणतीही तक्रार येऊ देणार नाही, असे आश्वासन दिले त्या नंतर विप क्र.1 चा विक्री प्रतिनिधी स्वप्नील पडवळ तक च्या घरी येऊन वाहनाचे कोटेशन रु.10,59,200/- चे दिले. त्या नुसार तक ने बँक ऑफ इंडीया मध्ये कर्ज प्रस्ताव दाखल करुन दि.22/08/2013 रोजी धनाकर्षाव्दारे ही रक्कम विप क्र.3 यांनी देऊ केली. तक पुढे म्हणतो की सन 2013 च्या दस-याच्या मुहुर्तावर म्हणजेच दि.13/10/2013 रोजी वाहन खरेदी करणे करता व दि.24/08/2013 रोजी विप क्र. 1 कडे यांचे कडे प्रत्यक्ष येऊन सदरचे दोन डीडी हस्तांतरीत केले व त्यानुसार असे डि डि मिळाल्याची पावती विप क्र.1 ने तक ला दिली. त्यानुसार वाहनाची उपलब्धी विषयी वारंवार चौकशी केली असता अंतिमत: विप क्र.1 यांनी दस-याच्या दिवशी वाहन उपलब्ध करुन देण्यास दि.20/10/2013 रोजी लेखी पत्राने असमर्थता कळविली. त्यावर तक ने नाराज होऊन निदान दिवाळीला तरी द्या असे सांगितले. अंतिमत: दि.25/10/2013 रोजी उद्या तुमची नोंदणी केलेले वाहन उपलब्ध असुन सदरचे वाहन घेऊन जावे असे कळविले म्हणून तक विप कडे वाहन घेण्यासाठी गेले असता नोंदणी केलेल्या वाहन एैवजी दुसरेच मॉडेल व रंगाचे वाहन Eco sport1.5 (D) Titnium-SG-Gray किंमत रु.7,73,767/- हे वाहन देऊ केले. याबाबत तक ने विचारणा केली असता त्याला काही दिवसासाठी हे तात्पूरते वाहन दिले आहे, तुमचे वाहन उपलब्ध झाल्यावर हे वाहन घेऊन नंतर परत तुम्हाला तुमचे वाहन देऊ व ते उपलब्ध न झाल्यास नोंदणी रदद करुन दि.24/08/2013 पासूनचे रु.10,59,200/- व्याजासह परत करीन असे आश्वासन दिले. या अश्वासनावर विश्वास ठेऊन तक ने नाखुषीने ताबा घेतला व उस्मानाबाद येथे आले. यानंतर तक ने माझे वाहन उपलब्ध झाले कि नाही हे विचारले असता विप ने कसलाही योग्य प्रतिसाद दिला नाही. म्हणजेच नोटीस पाठवली असता त्याला विप ने चुकीचे उत्तर दिले व पासिंग पोटी व वाहन टॅक्स पोटी रक्कम रु.93,000/- भरावी लागली व याबाबत त्याला झालेला मानसिक त्रास व नुकसानी पोटी रु.3,78,708/- 12 टक्के व्याजासह तसेच विप क्र. 1 व 2 यांच्याकडून मानसिक व शारीरिक त्रासापोटी व खर्चापोटी रु.20,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- मिळावे अशी विनंती केली आहे.
2. तक ने तक्रारीसोबत विप ने दिलेले कोटेशन, डिडि झेरॉक्स,डिडि मिळालयाबाबतची विप ने दिलेली पावती व पत्र, ऑर्डर बुकींग फॉर्म, Interim Contract Certificate, विप ला पाठवलेली नोटीस, नोटीस चे उत्तर, पोच पावती, फॉर्म क्र.20, डिलीवरी चेक लिस्ट, पॉलिसी शेडयूल, आरटीओ नोंदणी पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
3. तक ने न्यायमंचात दि.15/02/2012 रोजी प्रकरण दाखल केले. पुढे विप क्र.1, 2, व 3 यांना नोटीस काढली. तक यांनी तक्रारीतील दुरुस्तीच्या संदर्भातील अर्ज दाखल केला असता त्यावर दि.04/09/2014 रोजी प्रकरणात दुरुस्ती करण्यात येऊन विप क्र.4 चा आवश्यक पक्षकार म्हणून समावेश करणे विषयी आदेश करण्यात आला. दुरुस्त अर्ज दाखल करण्यात आला त्या वेळी या प्रकरणी विप क्र.4 ला ही नोटीस काढण्यात आली. मात्र म्हणणे दाखल न झाल्याने विप क्र.1 ते 4 विरुध्द एक्सपार्टी आदेश करण्यात आले. त्या नंतर विप क्र.1 ने हजर होऊन सदरचा आदेश सेट असाईड करण्या विषयी विनंती अर्ज दाखल केला असता रु.200/- कॉस्ट भरण्याचे अटीवर से दाखल करण्याचा आदेश झाला. तथापि विप ने रु.200/- हि रक्कम न भरल्यामुळे सदरचा आदेश रद्द झाला नाही. पुन्हा शेवटी अंतिमत: दि.24/04/2015 रोजी कॉस्ट भरल्यामुळे त्यांनी लेखी म्हणणे दाखल करुन घेण्यात आले. सदरच्या लेखी म्हणण्यामध्ये विप क्र.1 ने सदरचे वाहन तक ला विकले होते ऐवढाच मजकूर मान्य केला असून बाकीचा सर्व मजकुर अमान्य केला आहे. तक चे तक्रारीतील वाहन खरेदीचा संपूर्ण व्यवहार ठाणे या ठिकाणी केलेला असल्याने या न्यायमंचास कार्यक्षेत्र येत नाही. तसेच तक ने वरीष्ठ कार्यालयास/अधिकारी यांचेकडे कोणतीही तक्रार केलेली नाही. केवळ विप ची बदनामी व्हावी व खप कमी व्हावा या उद्देशाने तक्रार दाखल केली आहे, असे म्हणणे दिलेले आहे.
4. तक ची तक्रार व सोबत दाखल केलेली कागदपत्रे, विप क्र.1 यांचे म्हणणे व व तक चा युक्तिवाद इ. कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले असता आमचे विचारार्थ सदर प्रकरणात खालीलप्रमाणे मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर
1) सदरची तक्रार या न्यायमंचास चालवण्याचा
अधिकार आहे काय ? होय.
2) अर्जदार यांना देण्यात येणा-या सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
3) अर्जदार नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र आहे का ? होय.
4) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
मुद्दा क्र.1 :
5. तक ने घेतलेले वाहन हे ठाणे येथून घेतलेले असून कोटेशन वरील पत्ता हा साळुंके नगर उस्मानाबाद येथील असून सेल्स कंन्सल्टंन्ट म्हणून स्वप्नील पडवळ यांची सही दिसुन येते. बँक ऑफ इंडीया, उस्मानाबाद यांनी केलेला पत्र व्यवहार दिसुन येतो जो की तक च्या कार संदर्भातील आहे. अंतिमत: काढलेले डीडी बँक ऑफ इंडिया ब्रँन्च उस्मानाबाद येथील काढलेले आहे. विप ने वाहन उपलब्ध नसल्याबाबत पत्र व्यवहार अरविंद यादव यांचे नावे उस्मानाबाद येथील पत्यावर दि.08/10/2013 चा दिसुन येतो. ग्राहक संरक्षण कलम 11 ABC नुसार विप क्र.4 श्रीराम फोर्ड, हा दुरुस्ती नुसार दाखल झालेला व विरुध्द पक्ष क्र.3 बँक ऑफ इंडिया, शाखा-उस्मानाबाद या मंचाच्या कार्यक्षेत्रातच येते. म्हणून सदरची तक्रार चालवण्याचा अधिकार या मंचास आहे हया बाबत दुमत नाही.
मुद्दा क्र. 2 व 3
6) तक ने तक्रार केल्या प्रमाणे तक्रार ही विप क्र.1 यांचेकडे तक्रारीतील व्यवहार करण्यासाठी विक्री प्रतिनिधी स्वप्निल पडवळ यांच्याशी झालेल्या चर्चेनूसार केला. विप क्र. 1 याला उस्मानाबाद येथे त्या वेळी सदरचे वाहन अधिकृत विक्री केंद्र नसल्यामुळे सदरचे वाहन हे विक्री करता येणे शक्य होते. म्हणून Eco sport1.5 Titnium (ऑप्शनल) M-Red या मॉडेलचे वाहन घेण्यासाठी गेले होते, ही बाब तक ने सिध्द केलेली नाही. तक ने याच मॉडेलसाठी दि.22/08/2013 रोजी डी.डी.ने उस्मानाबाद येथे दिलेल्या कोटेशन प्रमाणे रु.10,59,200/- एवढी रक्कम विप क्र.3 कडून अदा केलली आहे हि बाब वादग्रस्त नाही. या नंतर तक ला त्यांनी दिलेल्या नोटीसच्या उत्तरामध्ये विप क्र.1 ने असे म्हंटलेले आहे की, त्याला हया गोष्टीचा खुलासा केला होता की जे वाहन मॉडेल उपलब्ध होईल ते देण्यात येईल. याच सोबत तक चे म्हणण्यातील याच मुद्याचा प्रतिवाद केला आहे की, त्याला सदरचे मॉडेल हे तात्पूरते स्वरुपात दिले गेले कारण असे तात्पूरत्या स्वरुपात कोणतेही वाहन दिले जात नाही व ते कंपनीचे धोरण नाही. सर्व गोष्टी नियमानुसार केलेल्या आहेत. या दोन्ही बचावाचा विचार केला असता तक ने दाखल केलेले विप चे कोटेशन व बँक ऑफ इंडीया उस्मानाबादचे पे ऑर्डर व त्यातील मजकूर व वाहन पुरवठा करु शकत नसल्याबाबतची दिलगीरी या सर्व बाबी तक ला वाहन वेळेत न मिळाल्याबाबत तसेच त्याच्या एैवजी दुसरे व वाहन दिल्या बाबतचे पुष्टी देते. आता या न्यायमंचापुढे प्रश्न आहे की सदरचे वाहन मॉडेल हे त्याला स्वखुशीने बदलून दिले होते की तात्पूरत्या स्वरुपात दिले होते. तसेच दोन्ही मॉडेलच्या वाहनाच्या किंमतीमध्ये फरक आहे काय. या संदर्भात या न्यायमंचाचे उत्तर आहे की तक ने दुस-या मॉडेलच्या वाहनाचा ताबा घेऊन वापरले आहे तसेच सदरचे वाहन ताबा घेतांना त्यांनी अशा स्वरुपाच्या निर्णयाचा किंवा दुसरे मॉडेल न स्विकारण्याबाबत कोणतेही दिलेले स्पष्ट लेखी निवेदन सदर केलेले नाही. त्यामुळे त्यांनी या मॉडेलचे वाहन हे स्वखुशीने स्विकारले असावे असे म्हणावे लागेल. त्याचे कायम रजिष्ट्रेशन करुन इन्शुरन्सपण घेतलेला आहे. अर्थात यासाठी कायदेशीर estopple principle(by conduct) लावता येईल. तथापि ची कोटेशन वरील किंमत रु.10,59,200/- व तक यांनी ताबा घेतलेले मॉडेल Eco sport1.5 (D) Titnium-SG-Gray चे कोटेशन तक यांनी दिलेले नाही त्यामुळे विमा पॉलिसीवर दाखवलेली रक्कम व तक ने दाखवलेली रक्कम यात फरक असून पॉलिसीवर वाहनाची किंमत रु.8,57,650/- IDV म्हणून दिसुन येते. म्हणून वाहनाची किंमत इन्शुरन्स पॉलिसी प्रमाणे रु.8,57,650/- अशी आहे. त्यानुसार दोन्ही मॉडेलच्या किंमतीमध्ये फरक असल्याचे दिसुन येते. तक ने अदा केलेली रक्कम रु.8,99,989/- अधिक रु.1,59,211/-= 10,59,200/- एवढी होते. विप क्र.3 ने काढलेले डिडि हे नंतर बदलता येणे शक्य नव्हते त्यामुळे हे नैसर्गीकच होते की विप क्र.1 ने फरक 10,59,200/- वजा रु.8,57,650/-=2,01,550/- रक्कम परत देणे आवश्यक होते. मात्र ती रक्कम विप ने तक यांना दिलेली नाही म्हणून आम्ही खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) विप क्र.2 व 4 यांनी तक यांना फरकाची रक्कम रु.2,01,550/-(रुपये दोन लक्ष एक हजार पाचशे पंन्नास फक्त) वाहन ताब्यात घेतलेपासून द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह तक यांना अदा करावी.
2) अर्जदारास तक्रार खर्चापोटी रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) आदेश पारीत तारखेपासून 30 दिवसात द्यावेत.
3) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस
दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा,
सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न
केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज द्यावा.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकुंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.