नि.33 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर तक्रार क्रमांक : 20/2010 तक्रार दाखल झाल्याचा दि.06/04/2010 तक्रार निकाली झाल्याचा दि.08/07/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या श्रीमती भावना पिसाळ, सदस्या सौ.प्रतिभा विजय कदम रा.मु.पो.निवेखुर्द, ता.संगमेश्वर, जि.रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कं.लि. करीता, व्यवस्थापक, श्री.गणेश पाटील शिर्के प्लाझा, पहिला मजला शिर्के पेट्रोल पंपाजवळ, जयस्तंभ, ता.जि.रत्नागिरी. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.पेडणेकर सामनेवालेतर्फे : विधिज्ञ श्री.जायगडे -: नि का ल प त्र :- द्वारा : मा.सदस्या, श्रीमती भावना पिसाळ 1. तक्रारदार यांना सामनेवाला यांनी कर्ज प्रकरण संदर्भात दिलेल्या सदोष सेवेबाबत तक्रारदार यांनी मंचामध्ये सामनेवालाविरुध्द तक्रार दाखल केलेली आहे. 2. तक्रारदार यांच्या तक्रारीप्रमाणे तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून ट्रक संदर्भात रक्कम रु.1,80,000/- चे कर्ज घेतले. तक्रारदार यांनी सदर कर्जफेडीपोटी रक्कम रु.83,000/- सामनेवालाकडे भरणा केली. तक्रारदार यांनी शेवटचा हप्ता दि.03/12/2009 रोजी भरला परंतु त्यानंतर तक्रारदार यांचा ट्रक नादुरुस्त झाल्यामुळे तक्रारदार यांना दोन महिने कर्जाचे हप्ते भरता आले नाहीत म्हणून तक्रारदार यांनी याबाबत सामनेवाला यांना सांगितले व एकदम तीन महिन्यांचे हप्ते भरतो असे सांगितले. सामनेवाला यांनी सुरुवातीला तक्रारदार यांना संमती दिली परंतु नंतर दि.09/01/2010 व दि.05/03/2010 रोजी कर्जाची रक्कम भरण्यासंदर्भात कळविले. तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये सामनेवाला यांनी तक्रारदार यांना पाठविलेल्या नोटीसमधील रकमेमध्ये तफावत आहे असे नमूद केले आहे. तक्रारदार हे सामनेवाला यांनी दिलेले कर्जाचे हप्ते नियमितपणे भरत होते, तक्रारदार यांनी एका महिन्यात दोन वेळा कर्जाचा हप्ता रक्कम रु.7,600/- भरलेले आहेत. तसेच हप्त्यापेक्षा अधिक रक्कम तक्रारदार यांनी सामनेवालाकडे भरलेली आहे. तक्रारदार यांचा ट्रक नादुरुस्त झाल्यामुळे दोन महिन्यांचे हप्ते थकित राहिले होते. सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्याकडून भरमसाठ प्रमाणात कर्जावर व्याज काढून हप्ते घेतले आहेत. सामनेवाला यांनी कर्ज देतेवेळी कर्जाच्या अटी व नियम तक्रारदार यांना समजावून सांगितलेले नाहीत, काही फॉर्मवर सहया घेतल्या, कोरे सहा चेक घेतले. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदार यांना फुल व फायनल सेटलमेंटसाठी रक्कम रु.1,75,000/- भरण्यास सांगितले आहे. तसेच सामनेवाला हे कर्ज खाते ऊतारा देत नाहीत व सामनेवाला हे तक्रारदार यांचे वाहन ओढून नेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्याबाबत दि.30/03/2010 रोजी तक्रारदार यांना सामनेवाला यांनी हप्ते भरण्यासाठी सांगितले होते. सामनेवाला यांच्या या वर्तणुकीमुळे तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्या या सदोष सेवेबाबत मंचामध्ये तक्रार दाखल केलेली आहे व आपल्या मागणीमध्ये सामनेवाला कंपनीने तक्रारदार यांच्या मालकीचे वाहन ओढून घेवून जावू नये, अवास्तव घेतलेली हप्त्यापोटीची रक्कम मुद्दलामध्ये जमा करुन घेणेत येवून, कमीतकमी त्याच आधाराने तक्रारदार हिला झालेल्या आर्थिक, मानसिक त्रासापोटी रु.5,000/-, तक्रार खर्च रु.3,000/- अशी मिळून एकूण रक्कम रु.8,000/- एवढी रक्कम व त्यावरील अर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष मिळेपर्यंत 12% व्याजाने सामनेवाला यांचेकडून मिळावेत अशी विनंती मंचासमोर केलेली आहे. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीच्या पृष्ठयर्थ नि.2 वर शपथपत्र, नि.5 च्या यादीप्रमाणे नि.5/1 ते नि.5/11 वर कागदपत्रे, नि.6 वर ताकीदीचा अर्ज व नि.7 वर अर्जाच्या पृष्ठयर्थ शपथपत्र दाखल केलेले आहे. 3. सामनेवाला यांनी नि.15 वर तक्रारदार यांच्या मूळ अर्जास व स्थगितीचे अर्जास म्हणणे दाखल केलेले आहे व नि.19 वर म्हणण्याच्या पृष्ठयर्थ शपथपत्र दाखल केलेले आहे. सामनेवाला यांनी नि.17 च्या यादीअन्वये नि.17/1 वर कागदपत्रे दाखल केलेली आहेत. सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांची तक्रार नाकारलेली आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे कर्ज प्रकरण केले होते व कर्जफेडीपोटी रक्कम रु.83,000/- भरले हेही मान्य केले आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे सुरुवातीपासूनच कराराप्रमाणे एकदा हप्ता नियमितपणे भरलेला नाही. तक्रारदार हे सुरुवातीपासूनच विलफुल डिफॉल्टर आहे असे सामनेवाला यांनी म्हणण्यामध्ये कथन केले आहे. तक्रारदार यांची तक्रार अर्जातील विनंती दिवाणी स्वरुपाची म्हणजेच Settlement of Account बाबत आहे त्यामुळे तक्रारदार यांचा तक्रार अर्ज व स्थगितीचा अर्ज खर्चासह रद्द करणेस पात्र आहे असे सामनेवाला यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. तक्रारदार यांना दि.09/05/2008 च्या करारप्रमाणे रक्कम रु.92,766/- अधिक कराराप्रमाणे व्याज व अन्य चार्जेससह रक्कम सामनेवाला यांना अदा करण्याबाबत आदेश करण्यात यावेत व तक्रारदार यांचा तक्रार अर्ज खर्चासह रद्द करण्यात यावा अशी मंचासमोर विनंती केलेली आहे. 4. तक्रारदार यांनी नि.24 वर आपले प्रतिउत्तर शपथपत्राच्या स्वरुपात दाखल केलेले आहे. तक्रारदार यांनी आपल्या प्रतिउत्तरामध्ये सामनेवाला यांचे म्हणणे नाकारलेले आहे. तक्रारदार हे विलफुल डिफॉल्टर नाहीत व तक्रारदार यांची तक्रार दिवाणी स्वरुपाची नाही असे नमूद केले आहे. तक्रारदार यांची तक्रार मंजूर करण्यात यावी अशी प्रतिउत्तरामध्ये विनंती केलेली आहे. तक्रारदार यांनी नि.28 वर व सामनेवाला यांनी नि.30 वर आपला लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे. 5. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाला यांनी दिलेले म्हणणे, शपथपत्र, सामनेवाला यांनी दाखल केलेली कागदपत्रे, तक्रारदार यांचे प्रतिउत्तर, दोन्ही बाजूंनी दाखल लेखी युक्तिवाद व ऐकण्यात आलेला तोंडी युक्तिवाद यावरुन खालील मुद्दे मंचाच्या निष्कर्षासाठी उपस्थित होतात. अ.क्र. | मुद्दे | उत्तरे | 1. | तक्रारदार यांना सामनेवाला यांनी सदोष सेवा दिली आहे हे तक्रारदार यांनी सिध्द केले आहे काय ? | नाही. | 2. | तक्रारदार हे आपल्या मागणीप्रमाणे अनुतोष मिळण्यास पात्र आहेत काय ? | नाही. | 3. | काय आदेश ? | अंतिम आदेशाप्रमाणे. |
विवेचन 6. मुद्दा क्र.1 व 2 एकत्रित- दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार यांना सामनेवाला यांनी दि.30/03/2010 रोजी वाहन ओढून नेतो अशी धमकी दिली व सदोष सेवा कशी दिली हे तक्रारदार यांनी आपल्या तक्रार अर्जात सबळ पुराव्याने सिध्द केलेले नाही. सामनेवाला यांनी तक्रारदार यांची गाडी ओढून नेतो अशी धमकी दिली होती ही बाब आपल्या नि.15 वरील म्हणण्यामध्ये नाकारलेली आहे. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदार यांचेकडून भरमसाठ प्रमाणावर कर्जावरील व्याज लावून हप्ते घेतले होते व हप्त्यापोटी अवास्तव रक्कम घेतली होती याबाबतही तक्रारदार यांनी कागदोपत्री पुरावा हजर केलेला नाही. तक्रारदार यांनी नि.5/4 ते नि.5/11 वर पावत्या हजर केलेल्या आहेत. त्यावरुन तक्रारदार हे नियमितपणे कर्जाचे हप्ते फेडत होते हे स्पष्ट होत नाही याबाबत तक्रारदार यांनी कोणताही कागदोपत्री पुरावा हजर केलेला नाही अथवा तक्रारदार व सामनेवाला यांच्यामध्ये झालेला करार हजर केलेला नाही. तसेच सामनेवाला यांना तक्रारदार व सामनेवाला यांच्यामधील करार हजर करण्यासंदर्भात आदेश करण्यात यावा अशी विनंती करणारा अर्जही मंचासमोर दाखल केलेला नाही. सामनेवाला यांनी नि.17/1 वर तक्रारदार यांचा कर्ज खात्याचा उतारा हजर केलेला आहे. सदर कर्जखात्याचे अवलोकन करता तक्रारदार हे नियमितपणे हप्ते भरत नव्हते ही बाब स्पष्ट होते त्यामुळे तक्रारदार यांच्या तक्रार अर्जामधील “तक्रारदार हे नियमितपणे हप्ते भरत होते” या विधानामध्ये विसंगती दिसून येते. तक्रार अर्जामधील दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार याचे हप्ते थकित आहेत हे दिसून येते. तक्रारदार यांच्या तक्रारीप्रमाणे तक्रारदार यांचा ट्रक नादुरुस्त झाल्यामुळे त्यांना दोन महिन्यांचे हप्ते आर्थिक नुकसानीमुळे भरता आले नाहीत याबाबतही कोणताही पुरावा तक्रारदार यांनी मंचासमोर हजर केलेला नाही. तसेच सदर वाहन सद्यपरिस्थितीत तक्रारदार यांच्याच ताब्यात आहे हे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते. तक्रारदार व सामनेवाला यांच्यामध्ये कर्ज प्रकरण संदर्भात झालेला करार हा उभय पक्षांवर बंधनकारक असताना त्यामध्ये सामनेवाला यांनी तक्रारदार यांना कशी सदोष सेवा दिली हे तक्रारदार यांनी सबळ पुराव्याने सिध्द केलेले नाही. त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार अर्जातील मागणी व स्थगितीचा अर्ज मंजूर करणे योग्य व संयुक्तिक होणार नाही अशा निर्णयाप्रत सदरचा मंच येत आहे. वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. 2. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही. रत्नागिरी दिनांक : 08/07/2010 (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (भावना पिसाळ) (स्मिता देसाई) सदस्या, सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| HONABLE MRS. Smita Desai, MEMBER | HONABLE MR. Anil Y. Godse, PRESIDENT | HONABLE MRS. Bhavana Pisal, MEMBER | |