-निकालपत्र–
(पारित व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या.)
( पारित दिनांक-29 जुन, 2016)
01. तक्रारकर्त्याने त्याचे विरुध्दपक्ष क्रं-2) वित्त पुरवठा करणा-या कंपनीने जप्त केलेले वाहन परत मिळावे यामुख्य मागणी व इतर अनुषंगीक मागण्यांसह उभय विरुध्दपक्षां विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली तक्रार दाखल केली आहे.
02. तक्रारीचे स्वरुप थोडक्यात खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याचे मौजा सातोना येथे कपडयाचे दुकान असून तो उपरोक्त नमुद पत्त्यावर राहतो. यातील विरुध्दपक्ष क्रं-1) वाहनाची एजन्सी/विक्रेता आहे तर विरुध्दपक्ष क्रं-2) वाहनावर कर्ज पुरवठा करणारी प्रायव्हेट कंपनी आहे. त्याने दिनांक-25/05/2013 रोजी विरुध्दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता एजन्सी कडून टी.व्ही.एस.वेगो ज्याचा नोंदणी क्रं-MH-36-Q 7157 असा आहे एकूण रुपये-57,637/- एवढया किंमतीत विकत घेतली. वाहनाचे किंमती पैकी रुपये-27,000/- डाऊन पेमेंट नगदी विरुध्दपक्ष क्रं-1) वाहन एजन्सी विक्रेत्याकडे भरलेत आणि उर्वरीत रकमेचे कर्ज विरुध्दपक्ष क्रं-2) वित्त पुरवठा करणा-या कंपनी कडून घेतले. कर्जाचे रकमेची परतफेड ही प्रतीमाह रुपये-1223/- प्रमणे एकूण 36 मासिक किस्तीमध्ये भरण्याचे ठरले होते.
उभय पक्षांमध्ये ठरल्या नुसार तक्रारकर्त्याने दिनांक-21.06.2013 पासून ते दिनांक-18.12.2015 पर्यंत काही मासिक किस्ती विरुध्दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता एजन्सी कार्यालयात नगदीने जमा केल्यात व तेथील कर्मचा-यांच्या सहयाच्या पावत्या प्राप्त केल्यात. त्यानंतर विरुध्दपक्ष क्रं-2) वित्त पुरवठा करणा-या कंपनीचे सांगण्या नुसार त्याने काही मासिक किस्ती विरुध्दपक्ष क्रं-2) कंपनीच्या (वर्थ फीनेस्ट सर्व्हीसेस) बँक ऑफ इंडीया शाखा वरठी व कोदामेंडी येथे असलेल्या खात्यात जमा केल्यात तर काही मासिक किस्ती विरुध्दपक्ष क्रं-2) कर्ज पुरवठा करणा-या कंपनीच्या कार्यालयात जमा केल्यात व पावत्या प्राप्त केल्यात. अशाप्रकारे तक्रारकर्त्याने कर्ज परतफेडीपोटी डिसेंबर-2015 पर्यंत नियमित 31 मासिक किस्ती भरल्यात आणि उर्वरीत 05 मासिक किस्ती जानेवारी-2016 पासून त्याला विरुध्दपक्ष क्रं-2) वित्त पुरवठा करणा-या कंपनीकडे जमा करावयाच्या होत्या.
पुढे तक्रारकर्त्याने असे नमुद केले की, दिनांक-22.12.2015 रोजी विरुध्दपक्ष क्रं-2) वित्त पुरवठा करणा-या कंपनीचा कर्मचारी नामे साईनाथ हा त्याच्या गावात आला व त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) कंपनीचा कर्मचारी राजु अहिरकर याचेकडे कोदामेंढी येथे त्याने निर्गमित केलेल्या किस्तीच्या पावत्या तपासावयाच्या असल्याचे सांगून त्याला त्याचे गाडीसह नेले. काही वेळा नंतर साईनाथने , तो विरुध्दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता एजन्सी मधून येतो, त्याला वाहनाची चाबी द्दावी अशी मागणी केली. सदर चाबी त्याला देण्यास राजु अहिरकरने सांगितल्याने तक्रारकर्त्याने त्याचे वाहनाची चाबी साईनाथला दिली तेंव्हा त्याने दहा मिनीटात परत करतो असे सांगितले परंतु तो परत आला नाही व त्यानंतर त्याने तक्रारकर्त्याचे वाहन विरुध्दपक्ष क्रं-2) वित्त पुरवठा करणा-या कंपनीकडे नेऊन जमा केले व फोनव्दारे सांगितले की, तक्रारकर्त्याकडे 03 मासिक किस्ती बाकी आहेत, त्यामुळे गाडी परत मिळणर नाही. त्यावर सदर बाब तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेत्यास सांगितली असता तो काहीच करु शकत नसल्याचे सांगितले. शेवटी तक्रारकर्त्या जवळ पैसे नसल्याने तो परत आपल्या गावात 25 किलोमीटर अंतर पायी चालत आला. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं-2) वित्त पुरवठा करणा-या कंपनीचे कर्मचारी राजु अहिरकर आणि साईनाथ यांनी बेकायदेशीरपणे तक्रारकर्त्याचे वाहन जप्त केले.
म्हणून शेवटी तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन त्याचे जप्त केलेले वाहन टी.व्ही.एस. वेगो परत करण्यास विरुध्दपक्ष क्रं-2) वित्त पुरवठा करणा-या कंपनीस आदेशित व्हावे. तसेच त्याला झालेल्या मानसिक त्रासा बदद्यदल रुपये-50,000/- व तक्रारखर्च म्हणून रुपये-20,000/- दोन्ही विरुध्दपक्षां कडून वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या देण्याचे आदेशित व्हावे अशा मागण्या केल्यात.
03. दोन्ही विरुध्दपक्षानां मंचाचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविण्यात आल्यात, त्या दोन्ही विरुध्दपक्षानां प्राप्त झाल्या बद्दल रजिस्टर पोस्टाच्या पोच अनुक्रमे नि.क्रं-9 आणि नि.क्रं-8 प्रमाणे अभिलेखावर दाखल आहेत. परंतु दोन्ही विरुध्दपक्ष मंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा त्यांनी आपले लेखी उत्तर मंचा समोर सादर केले नाही म्हणून दोन्ही विरुध्दपक्षां विरुध्द एकतर्फी तक्रार चालविण्याचा आदेश मंचाने दिनांक-15/03/2016 रोजी पारीत केला.
04. तक्रारकर्त्याने नि.क्रं-3 वरील यादी नुसार वाहनाचे बिलाची प्रत, आर.सी.बुक, मासिक किस्तीच्या पावत्यांच्या प्रती, पोलीस रिपोर्टची प्रत, विरुध्दपक्षांना वकीलांचे मार्फतीने पाठविलेल्या नोटीसची प्रत, रजिस्टर पोस्टाच्या पावत्यांच्या प्रती व पोच अशा दस्तऐवजांच्या प्रती दाखल केल्यात.
05. तक्रारकर्त्याचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. तसेच त्यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले. त्यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
::निष्कर्ष ::
06. तक्रारकर्त्याने दिनांक-25/05/2013 रोजी विरुध्दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता एजन्सी कडून टी.व्ही.एस.वेगो वाहन नोंदणी क्रं-MH-36-Q 7157 एकूण रुपये-57,637/- एवढया किंमतीत विकत घेतले व वाहनाचे किंमती पैकी रुपये-27,000/- डाऊन पेमेंट नगदी विरुध्दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता एजन्सीमध्ये भरलेत आणि उर्वरीत रकमेचे कर्ज घेतले. कर्जाचे रकमेची परतफेड ही प्रतीमाह रुपये-1223/- प्रमाणे एकूण 36 मासिक किस्तीमध्ये भरण्याचे ठरले होते या बाबी दाखल विरुध्दपक्ष क्रं-1) गणेश आटोमोबाईल्स एजन्सी कोदामेंढी याने निर्गमित केलेल्या दिनांक-25.05.2013 च्या बिलाच्या प्रतीवरुन दिसून येते.
07. तक्रारकर्त्याचे म्हणण्या प्रमाणे उभय पक्षांमध्ये ठरल्या प्रमाणे त्याने कर्ज परतफेडी बद्दल काही मासिक किस्ती विरुध्दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता एजन्सी मध्ये नगदी जमा केल्यात, त्या अनुषंगाने विरुध्दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता एजन्सी कडून निर्गमित रुपये-1223/- प्रमाणे मासिक किस्ती भरल्यात त्यापैकी एकूण-10 मासिक किस्तीच्या विरुध्दपक्ष क्रं-1) एजन्सीच्या छापील पावत्या अभिलेखावर दाखल केल्यात. पुढे विरुध्दपक्ष क्रं-2) वित्तीय पुरवठा करणा-या कंपनीच्या सांगण्या वरुन , वि.प.क्रं-2) कंपनीच्या बँक ऑफ इंडीया, शाखा वरटी येथे रुपये-1223/- प्रमाणे 02 मासिक किस्ती तसेच बँक ऑफ इंडीया कोदामेंढी येथे 01 मासिक किस्त जमा केल्याचा पुरावा म्हणून बँक ऑफ इंडीयाच्या 03 स्लिपच्या प्रती पुराव्या दाखल अभिलेखावर दाखल केल्यात. त्यानंतर विरुध्दपक्ष क्रं-2) वर्थ फीनेस्ट सर्व्हीसेस रुईकर रोड, चिटणीस पार्क, महाल नागपूर याचे कार्यालयात रुपये-1223/- प्रमाणे नगदी एकूण-13 मासिक किस्ती भरल्या बाबत विरुध्दपक्ष क्रं-2) वित्त पुरवठा करणा-या कंपनीच्या छापील पावत्यांच्या प्रती अभिलेखावर दाखल केलेल्या आहेत. पुढे गुणवंत मेन्टनन्स सर्व्हीसेस, आग्याराम देवी मंदिर, गणेशपेठ नागपूर येथे रुपये-1223/- प्रमाणे एकूण-03 मासिक किस्ती भरल्या बद्दल गुणवंत मेन्टनन्स सर्व्हीसेस नागपूरच्या छापील पावत्यांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत.
08. येथे विशेषत्वाने हे नमुद करणे आवश्यक वाटते की, विरुध्दपक्ष क्रं-2) वित्तीय कंपनीच्या छापील पावत्यांवर केलेल्या स्वाक्ष-या आणि गुणवंत मेन्टनन्स सर्व्हीसेस नागपूर छापील पावत्यांवर केलेल्या स्वाक्ष-या या एकाच व्यक्तीच्या (अहिरकर) दिसून येतात.
09. या व्यतिरिक्त तक्रारकर्त्याने साध्या कागदा वरील रुपये-1223/- मासिक किस्त या प्रमाणे 02 मासिक किस्ती दिल्या बाबत विरुध्दपक्ष क्रं-2) वर्थ फीनेस्ट लिमिटेडच्या नावे निर्गमित दोन पावत्यांच्या प्रती दाखल केल्यात. येथे सुध्दा नमुद करणे आवश्यक वाटते की, या साध्या पावत्यांवरील कर्मचा-याच्या सहया आणि विरुध्दपक्ष क्रं-2) तर्फे निर्गमित छापील पावत्यां वरील या एकाच व्यक्तीच्या स्वाक्ष-या (अहिरकर) असल्याचे दिसून येते.
10. याप्रमाणे तक्रारकर्त्याने दिनांक-21/06/2013 ते दिनांक-18/12/2015 पर्यंतचे कालावधीत कर्ज परतफेडीपोटी प्रतीमाह रुपये-1223/- प्रमाणे एकूण 31 मासिक किस्ती जमा केल्याची बाब पूर्णतः दाखल पावत्यांच्या प्रतीं वरुन सिध्द होते. तक्रारकर्त्याला कर्ज परतफेडीपोटी प्रतीमाह रुपये-1223/- प्रमाणे एकूण-36 मासिक किस्तीची परतफेड करावयाची होती, पैकी त्याने डिसेंबर-2015 पर्यंत नियमित एकूण-31 मासिक किस्ती जमा केल्याचे दाखल पावत्यांच्या पुराव्या वरुन दिसून येते आणि जानेवारी-2016 पासून तो उर्वरीत 05 मासिक किस्ती भरावयास तयार होता. तक्रारकर्त्याने शेवटची मासिक किस्त ही दिनांक-18/12/2015 रोजी विरुध्दपक्ष क्रं-2) वित्तीय कंपनीचा कर्मचारी अहिरकर याचेकडे भरलेली असताना दिनांक-22/12/2015 रोजी विरुध्दपक्ष क्रं-2) चा कर्मचारी साईनाथ याने तक्रारकर्त्या कडून वाहनाची चाबी घेऊन त्याचे वाहन विरुध्दपक्ष क्रं-2) वित्तीय कंपनी कडे जमा केली व तीन किस्ती बाकी आहेत, वाहन परत मिळणार नाही असे सांगितले. तक्रारकर्त्याने या संदर्भात पोलीस अधिक्षक, भंडारा यांचेकडे दिनांक-23/12/2015 रोजी विरुध्दपक्षां विरुध्द लेखी तक्रार केल्या बाबत तक्रारीची प्रत पुराव्या दाखल सादर केली, त्यावर तक्रार मिळाल्या बाबत पोलीस अधिक्षक कार्यालयाचा शिक्का व स्वाक्षरी आहे व त्यामध्ये उपरोक्त नमुद घटनाक्रम नमुद त्यानंतर तक्रारकर्त्याने त्याचे वकील श्री एम.जी.हरडे यांचे मार्फतीने दोन्ही विरुध्दपक्षानां दिनांक-30/12/2015 रोजीची कायदेशीर नोटीस पाठविल्या बद्दल रजिस्टर पोस्टाच्या पावत्यांच्या प्रती व विरुध्दपक्ष क्रं-1 ची पोच अभिलेखावर दाखल केली. परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने शेवटी ही तक्रार ग्राहक मंचात दाखल केली.
11. मंचाची रजिस्टर नोटीस मिळूनही उभय विरुध्दपक्ष मंचा समक्ष हजर झाले नाहीत वा त्यांनी आपले लेखी उत्तरही दाखल केले नाही. तक्रारकर्त्याची तक्रार ही प्रतिज्ञालेखावर दाखल आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार आणि पुराव्या दाखल उपलब्ध दस्तऐवजांच्या प्रतींवरुन ही तक्रार गुणवत्तेवर निकाली काढण्यात येत आहे.
12. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षां विरुध्द केलेले आरोप त्यांनी खोडून काढलेले नाहीत. पोलीस अधिक्षक, भंडारा यांचेकडे केलेल्या तक्रारी वरुन तक्रारकर्त्याचे वाहन विरुध्दपक्ष क्रं-2) वित्त पुरवठा करणा-या कंपनीचा कर्मचारी साईनाथ याने उचलून नेले व त्यासाठी विरुध्दपक्ष क्रं-2 चा कर्मचारी अहिरकर याने वाहन साईनाथ जवळ देण्यास तक्रारकर्त्यास सांगितले असल्याचे दिसून येते. तक्रारकर्त्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड नियमितपणे केली असल्याचे आणि त्याने 36 मासिक किस्तींपैकी डिसेंबर-2015 पर्यंत 31 मासिक किस्ती नियमित भरलेल्या असताना व उर्वरीत 05 मासिक किस्ती भरण्यास पुढील कालावधीत भरण्यास तो तयार असताना त्याला कोणतीही पूर्व लेखी सुचना न देता अचानक दिनांक-22/12/2015 रोजी त्याचे वाहन साईनाथ या कर्मचा-याने उचलून ते विरुध्दपक्ष क्रं-2) वित्तीय कंपनीचे कार्यालयात जमा केले. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं-2) वित्त पुरवठा करणा-या कंपनी तर्फे तिच्या कर्मचा-यांनी तक्रारकर्त्याचा कोणताही दोष नसताना त्याचे वाहन जप्त करुन त्यास दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब दाखल पुराव्या वरुन सिध्द होते.
13. यामध्ये विरुध्दपक्ष क्रं-1) एजन्सी हे केवळ वाहन विक्रेता आहे आणि तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष क्रं-2) वाहनास वित्त पुरवठा करणारी कंपनी मधील मध्यस्थ आहे. यातील विरुध्दपक्ष क्रं-1) वाहन विक्रेता एजन्सी असून त्यांचे एजन्सीचे कार्यालयात त्यांचेच समतीने वित्त पुरवठा करणा-या कंपन्यांचे कर्मचारी कर्ज पुरवठयाचा व्यवसाय करतात. तक्रारकर्त्याने सुरुवातीच्या काही किस्ती विरुध्दपक्ष क्रं-1) विक्रेता एजन्सीचे कार्यालयात जमा केल्या असल्याने तसेच विरुध्दपक्ष क्रं-1) यांनी कोणताच खुलासा मंचा समक्ष न केल्याने आम्ही दोन्ही विरुध्दपक्षांना या प्रकरणात जबाबदार ठरवित आहोत. तक्रारकर्ता त्याचे जप्त केलेले वाहन सुस्थितीत विरुध्दपक्ष क्रं-2) वित्त पुरवठा करणा-या कंपनी कडून त्याची उर्वरीत प्रतीमाह रुपये-1223/- प्रमाणे देणे असलेली 05 मासिक हप्त्यांची रक्कम अदा करुन ते वाहन परत मिळण्यास पात्र आहे. या शिवाय विरुध्दपक्ष क्रं-2) वित्त पुरवठा करणा-या कर्मचा-यांचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला निश्चीतच शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला यासाठी तो नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- विरुध्दपक्षां कडून मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
14. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, मंच तक्रारीत पुढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश ::
(1) तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष क्रं-(1) आणि क्रं-(2) विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) तक्रारकर्त्यास निर्देशित करण्यात येते की, त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) वर्थ फीनेस्ट सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर येथील कार्यालयात रुपये-1223/- प्रतीमाह किस्त या प्रमाणे उर्वरीत देणे असलेली पाच मासिक किस्ती पैकी तुर्त एका मासिक किस्तीची रक्कम जमा करावी व अशी रक्कम प्राप्त झाल्या नंतर विरुध्दपक्ष क्रं-2) ने तक्रारकर्त्याचे टी.व्ही.एस.वेगो वाहन सुस्थितीत त्याचे सुपूर्द करावे व वाहनाचा ताबा सुस्थितीत मिळाल्या बद्दल तक्रारकर्त्या कडून लेखी पोच घ्यावी. उर्वरीत राहिलेल्या चार किस्ती पुढील चार महिन्यात तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) वित्तीय कंपनीचे कार्यालयात जमा कराव्यात. या पाचही किस्तींवर कोणत्याही प्रकारचे व्याज वा दंड विरुध्दपक्ष क्रं-2) ने आकारु नये.
(3) काही कारणास्तव विरुध्दपक्ष क्रं-2) वर्थ फीनेस्ट सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड, नागपूरला तक्रारकर्त्याचे जप्त केलेले वाहन देणे शक्य नसल्यास तक्रारकर्त्याने वाहनाचे डाऊन पेमेंट पोटी जमा केलेली रक्कम रुपये-27,000/- आणि तक्रारकर्त्याने प्रतीमाह रुपये-1223/- प्रमाणे जमा केलेल्या एकूण-31 मासिक किस्तीची रक्कम रुपये-37,913/- असे मिळून एकूण जमा केलेली रक्कम रुपये-64,913/-(अक्षरी जमा एकूण रक्कम चौसष्ठ हजार नऊशे तेरा फक्त) वाहन जप्त केल्याचा दिनांक-22/12/2015 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.12% दराने व्याजासह येणारी रक्कम तक्रारकर्त्यास देण्यास विरुध्दपक्ष क्रं-1) आणि विरुध्दपक्ष क्रं-2) हे वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या जबाबदार राहतील.
(4) तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-(1) आणि क्रं-(2) यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्यास अदा करावेत.
(5) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-1) आणि क्रं-2) यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून तीस दिवसांचे आत करावे.
(6) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन
देण्यात याव्यात.