जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ३९/२०११ तक्रार दाखल दिनांक – ०१/०३/२०११
तक्रार निकाली दिनांक – १६/१०/२०१४
श्री. सोमनाथ जगन्नाथ बावीस्कर
उव ५३ व्यवसाय, पेंन्शनर.
रा.प्लॉट नं.६०, महात्माजी नगर,
इंदाई देवी शाळेजवळ, साक्री रोड धुळे. ................ तक्रारदार
विरुध्द
(१) व्यवस्थापक श्री बोंबले
सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया,
- , मुंदडा चौक, ग.नं.६, धुळे.
(२) श्री.चौधरी, ऋण विभाग,
सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, धुळे ............. सामनेवाला
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारातर्फे – अॅड.श्री. श्री.व्ही.एस. वाघ)
(सामनेवालातर्फे – अॅड.एम.बी. देशपांडे)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
१. सामनेवाले यांनी सेवा देण्यात त्रुटी केली, आश्वासन देवूनही कर्ज प्रकरण मंजूर केले नाही, या कारणावरून तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांचे सामनेवाले यांच्या बॅंकेत खाते आहे. त्याचा जुना क्रमांक १२४३५ असा असून नविन खाते क्रमांक १९१९०४८४२२ असा आहे. तक्रारदार यांचे हे निवृत्तीवेतनासाठीचे खाते आहे. सामनेवाले यांनी त्यांच्या विविध योजनांची माहिती बचत खात्याच्या पुस्तकावर छापली आहे. त्यानुसारच तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे निवृत्तीधारकांसाठी असलेल्या कर्ज योजनेची मागणी केली. त्यासाठीची आवश्यक कागदपत्रे तयार करून ती सामनेवाले क्र.२ यांच्याकडे सादर केली. त्यावेळी त्यांना रूपये ३५,०००/- एवढे कर्ज मिळेल असे सांगण्यात आले होते. तक्रारदार यांचे प्रकरण मंजुरीसाठी सामनेवाले क्र.१ यांच्याकडे गेले. त्यावेळी त्यांनी कर्ज प्रकरण मंजूर केले नाही. यामुळे आपल्याला घ्यावा लागलेला रूपये १००/- किंमतीचा मुद्रांक आणि इतर कागदपत्रे वाया गेली. सामनेवाले क्र.१ यांनी कर्ज मंजुरीसाठी रूपये २,०००/- एवढया कमिशनची मागणी केली असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. कमिशन दिले नाही म्हणूनच आपले प्रकरण मंजूर झाले नाही असा आरोपही त्यांनी लावला आहे. आश्वासन दिल्यानंतर आपले कर्ज प्रकरण मंजूर करणे आवश्यक होते. तसे न करून सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी दिली आहे. त्याबद्दल त्यांच्याकडून मानसिक त्रासापोटी रूपये २०,०००/-, तक्रारीचा खर्च रूपये ५,०००/- मिळावा अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
३. तक्रारीसोबत त्यांनी रहिवास दाखला, बॅंक खात्याच्या पुस्तकाची झेरॉक्स, मुद्रांकाची झेरॉक्स, कर्ज मागणी अर्जाची झेरॉक्स, निवृत्ती वेतन आदेशाची झेरॉक्स, माहिती अधिकारान्वये केलेल्या अर्जांची झेरॉक्स, सामनेवाले यांना पाठविलेल्या नोटीसची झेरॉक्स दाखल केली आहे.
४. सामनेवाले क्र.१ व २ यांनी हजर होवून संयुक्त खुलासा दाखल केला. त्यात म्हटले आहे की, तक्रारदार यांची तक्रार खोटी आहे. सामनेवाले क्र.१ यांनी त्यांच्याकडे कोणत्याही रकमेची मागणी केली नाही. तक्रारदार हे कर्ज मागण्यासाठी आले तेव्हा त्यांना सांगण्यात आले होते की, आम्ही फक्त केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतनधारकांना कर्ज देतो. आपण राज्य सरकारचे निवृत्ती वेतनधारक आहात. त्यामुळे तुमच्या कर्जाबाबत वरिष्ठ कार्यालयाला विचारून कळविले जाईल. त्यानुसार सामनेवाले क्र.१ यांनी दि.२०/०७/२०१० रोजी वरिष्ठ कार्यालयाकडे विचारणा करून परवानगी घेतली होती. वरिष्ठ कार्यालयाने दि.१४/०८/२०१० रोजी तक्रारदार यांना कर्ज देता येईल असे कळविले होते. त्यानुसार तक्रारदार यांना दि.२५/०८/२०१० रोजी कळविण्यात आले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी संपर्क साधला नाही. याचा अर्थ तक्रारदार यांना कर्ज नको होते. त्यामुळे त्यांच्या तक्रारीत कोणतेही तथ्य दिसत नाही. म्हणूनच त्यांची तक्रार रद्द करावी अशी मागणी सामनेवाले यांनी केली आहे.
५. तक्रारदार व सामनेवाले यांच्या विद्वान वकिलांना युक्तिवादासाठी वेळोवेळी सोळा तारखांना संधी देण्यात आली. मात्र त्यांनी युक्तिवाद केला नाही. तक्रारदार यांची तक्रार, त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे आणि सामनेवाले यांनी केलेला खुलासा, यावरून आमच्यासमोर पुढील मुद्दे उपस्थित होतात.
. मुददे निष्कर्ष
अ. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? होय
ब. तक्रारदार यांनी त्यांची तक्रार सिध्द केली
आहे काय ? नाही
- आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
- वेचन
७.मुद्दा ‘अ’- तक्रारदार यांचे सामनेवाले यांच्या बॅंकेत बचत खाते आहे. त्याचा जुना क्रमांक १२४३५ असा आहे. तर नविन क्रमांक १९१९०४८४२२ असा आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या खातेपुस्तकाची छायांकीत प्रत दाखल केली आहे. यावरून तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत हे सिध्द होते. याच कारणामुळे आम्ही मुद्दा ‘अ’ चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
८.मुद्दा ‘ब’ – सामनेवाले यांनी कर्ज मंजुरीचे आश्वासन देवूनही प्रत्यक्षात कर्ज मंजूर केले नाही, कर्ज मंजूरीसाठी रूपये २०००/- कमिशनची मागणी केली, कमिशन दिले नाही म्हणून कर्ज मंजूर झाले नाही अशी तक्रारदार यांची मुख्य तक्रार आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांची तक्रार फेटाळून लावली आहे. सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदार यांच्याकडे कमिशनची मागणी केलेली नाही. एवढेच नव्हे तर वरिष्ठ कार्यालयाच्या परवानगीने तक्रारदार यांना कर्ज देण्यास तयार होतो, त्याबाबत त्यांना कळविण्यात आले होते. मात्र ते कर्ज मागणीसाठी नंतर आलेच नाही असे स्पष्टीकरण सामनेवाले यांनी केले आहे.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत विविध कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत. त्याचे मंचाने अवलोकन केले. तथापि, त्यात सामनेवाले यांनी तक्रारदार यांना किती रकमेचे कर्ज मंजूर केले होते, कधी केले होते, सामनेवाले क्र.१ यांनी रूपये २०००/- हजाराचे कमिशन मागितले या संबंधातील कागदपत्रे आढळून आली नाही. तक्रारदार यांनी जी कागदपत्रे दाखल केली आहेत त्यात कर्ज मागणी करताना करावयाच्या पुर्ततेचा समावेश आहे. तक्रारदार यांनी निरनिराळे अर्ज आणि मुद्रांक याच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत. त्याचबरोबर जामिनदाराच्या हमीपत्राची प्रत दाखल केली आहे. या कागदपत्रांवर कोठेही सामनेवाले यांचा कर्ज मंजूर करीत असल्याचा शेरा नाही, सही नाही किंवा कर्ज मंजुरीबाबतचे आश्वासन आढळून येत नाही.
सामनेवाले क्र.१ यांनी कर्ज मंजुरीसाठी रूपये २,०००/- कमिशन मागितले असा आरोप तक्रारदार यांनी तक्रारीत केला आहे. मात्र या संदर्भात तक्रारदार यांनी योग्य त्या विभागाकडे तक्रार दाखल केल्याचा कोणताही पुरावा मंचासमोर आणलेला नाही.
सामनेवाले यांनी त्यांच्या खुलाशात तक्रारदार यांना वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी घेवून कर्ज मंजूर करण्याबाबत कळविण्यात आले होते असे नमूद केले आहे. त्याबाबतही तक्रारदार यांनी कोणतेही स्पष्टीकरण केलेले नाही.
वरील मुद्यांचा विचार करता तक्रारदार हे त्यांचे तक्रारीतील कथन आणि आरोप सिध्द करू शकलेले नाही असे आमचे मत बनले आहे. याचाच अर्थ तक्रारदार हे त्यांची तक्रार सिध्द करण्यास अयशस्वी ठरले आहे असे आम्हाला वाटते. म्हणूनच मुद्दा ‘ब’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
९.मुद्दा ‘क’ – तक्रारदार हे त्यांचे तक्रारीतील कथन आणि आरोप सिध्द करण्यात अयशस्वी ठरले आहेत हे स्पष्ट झाले आहे. याचा विचार करता तक्रारदार यांची तक्रार मंजूर करणे योग्य होणार नाही या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. म्हणून आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
धुळे.
-
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.