श्री. एस.के.कापसे, मा. सदस्य यांचेनुसार
:- निकालपत्र :-
दिनांक 29 नोव्हेंबर 2011
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार जेष्ठ नागरिक असून जाबदेणार बँकेचे कार्ड धारक आहेत. तक्रारदारांनी सर्व देय रक्कम दिनांक 19/4/2006 रोजी भरलेली आहे. रक्कम भरल्यानंतर कार्ड रद्द करण्यात आलेले असून तक्रारदारांनी विनंती करुनही फायनल सेटलमेंटचे पत्र तक्रारदारांना देण्यात आलेले नाही. तक्रारदारांनी मागणी न करताच जाबदेणार बँक तक्रारदारांना दुसरे कार्ड देण्यात आल्याचा दावा करीत आहे, तो खोटा आहे. तक्रारदारांनी त्यांना दुसरे कार्ड नको असल्याबाबत बँकेस कळविलेले होते. तक्रारदारांनी दुसरे कार्ड क्र 4317 5750 4950 6935 घेतलेले नसतांनाही, त्या कार्डावर खरेदी केलेली नसतांनाही बँकेने कार्डाची फी व कार्डाची वार्षिक फी सुरुवातीलाच आकारुन लेट पेमेंट फी, गर्व्हनमेंट टॅक्सेस व आऊटस्टॅन्डींग वर रुपये 20,000/- आकारलेले आहेत. बँकेने रकमेच्या वसूलीसाठी तगादा लावलेला आहे. यासर्वांमुळे तक्रारदारांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागला. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार बँकेकडून रुपये 95,000/- व्याजासह त्यांच्या सारस्वत बँकेच्या बचत खात्यात जमा करुन मागतात. तसेच नुकसान भरपाई व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. तक्रारदारांनी दिनांक 21/6/2010 रोजीच्या अर्जान्वये एस.बी.आय कार्डस अॅन्ड पेमेंट सर्व्हिसेस प्रा.लि., स्टेट बँक हाऊस, 11, पार्लियामेंट स्ट्रीट, नवी दिल्ली 110 001 यांना नोटीस काढण्यात यावी अशी विनंती मा. मंचास केली होती. त्यानुसार वरील जाबदेणार यांना नवी दिल्ली येथे मंचाने नोटीस पाठविली असता सदरहू नोटीस 6/7/2010 रोजी रजिस्टर्ड पोस्टाने पोहोच झाल्याचे सिनीअर सुपरिटेंडेंट ऑफ पोस्ट, पुणे सिटी ईस्ट यांच्या दिनांक 26/8/2010 रोजीच्या पत्रावरुन दिसून येते. नोटीस प्राप्त होऊनही सदर जाबदेणार गैरहजर. म्हणून त्यांच्याविरुध्द एकतर्फा आदेश मंचाने पारीत केला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे मंचाने अवलोकन केले. तक्रारदारांनी एस.बी.आय क्रेडिट कार्डस, नवी दिल्ली यांना क्रेडिट कार्ड संदर्भात फायनल सेटलमेंट लेटर मिळणेबाबत दिनांक 17/11/2006 व 10/7/2006 रोजीच्या पत्रान्वये विनंती केली असल्याचे दिसून येते. तक्रारदारांनी क्रेडिट कार्ड क्र 4417575019031765 संदर्भात जाबदेणार बँकेकडे देय रक्कम रुपये 28,000/- भरणा केलेली होती. सदरहू कार्डाची मुदत 01/2007 पर्यन्तच होती. तक्रारदारांनी दुसरे क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी विनंती केलेली नव्हती. तसेच तक्रारदारांकडे दुसरे क्रेडिट कार्ड क्र.4317 5750 4950 6935 नव्हते. तक्रारदारांनी वेळोवेळी जाबदेणार बँकेशी संपर्क साधून, तोंडी व लेखी कळवूनही जाबदेणार बँकेनी फायनल सेटलमेंट लेटर तक्रारदारांना दिले नाही. तक्रारदारांकडे उपरोक्त नमूद दुसरे क्रेडिट कार्ड नसतांना, त्या कार्डावर कोणतीही खरेदी त्यांनी केलेली नसतांना देखील त्या संदर्भात जाबदेणार बँकेनी आर नारायणन अॅन्ड असोसिएट्स, अॅडव्होकेट्स, नवी दिल्ली यांच्या मार्फत तक्रारदारांना दिनांक 8/12/2009 रुपये 50,343/-, 10/3/2010 रुपये 54,976/-, 19/10/2010 रुपये 67,513/- ची पत्रे पाठवून मागणी केल्याचे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते. जाबदेणार बँकेनी पाठक अॅन्ड असोसिएट्स, दिल्ली यांच्यामार्फत तक्रारदारांना दिनांक 18/5/2011 रोजी पत्र पाठवून उपरोक्त क्रेडिट कार्डा संदर्भात रक्कम रुपये 82,909/- ची मागणी केल्याचे दिसून येते. तसेच जाबदेणार बँकेनी तक्रारदारांना क्रेडिट कार्ड क्र 4317 5750 4950 6935 दिनांक 25/6/2011 रोजीच्या मंथली स्टेटमेंट द्वारे रुपये 87,921/- देय असल्याबाबत कळविले असल्याचे दाखल स्टेटमेंटवरुन दिसून येते. तक्रारदार हे जेष्ठ नागरिक असून त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या पहिल्या क्रेडिट कार्डावरील संपूर्ण देय रक्कम जाबदेणार यांच्याकडे भरलेली होती. जाबदेणार बँकेकडे तक्रारदारांनी दुस-या क्रेडिट कार्डाची मागणी केलेली नसतांना देखील, तक्रारदारांना सदरहू कार्ड प्राप्त झालेले नसतांनाही, सदरहू कार्डावर तक्रारदारांनी खरेदी केलेली नसतांना देखील वेळोवेळी रुपये 87,921/- पर्यन्त रक्कम देय असल्याचे कळविलेले असल्याचे निदर्शनास येते. तक्रारदारांनी यासंदर्भात जाबदेणार बँकेकडे पाठपुरावा करुन देखील त्याची दखल बँकेने घेतलेली नसल्याचे दिसून येते. यावरुन जाबदेणार बँकेने अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केल्याचे तसेच सेवेतील त्रुटी असल्याचे दिसून येते. यामुळे तक्रारदारांना निश्चितच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला असेल असे मंचाचे मत आहे. म्हणून जाबदेणार बँकेने तक्रारदारांकडील क्रेडिट कार्ड क्र. 4317 5750 4950 6935 संदर्भातील रक्कम रुपये 87,921/- ची मागणी रद्द करावी असा मंच आदेश देत आहे. तसेच जाबदेणार बँकेने तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1,000/- दयावेत असा मंच आदेश देत आहे. तक्रारदारांनी नुकसान भरपाई पोटी रुपये 95,000/- ची मागणी केलेली आहे, तसेच सदरहू रक्कम त्यांच्या अन्य बँकेतील खात्यात वर्ग करुन मिळणेबाबत विनंती केलेली आहे. परंतू तक्रारदारांची ही मागणी अवास्तव आहे असे मंचाचे मत आहे, म्हणून तक्रारदारांची ही मागणी मंच अमान्य करीत आहे.
वर नमूद विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार बँक क्र.1 व 2 यांनी संयुक्तीरित्या आणि वैयक्तिकरित्या तक्रारदारांकडील क्रेडिट कार्ड क्र. 4317 5750 4950 6935 संदर्भातील रक्कम रुपये 87,921/- ची मागणी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत रद्द करावी.
[3] जाबदेणार बँक क्र.1 व 2 यांनी संयुक्तीरित्या आणि वैयक्तिकरित्या तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 10,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
[4] जाबदेणार बँक क्र.1 व 2 यांनी संयुक्तीरित्या आणि वैयक्तिकरित्या तक्रारदारांना तक्रारीचा खर्च रुपये 1000/- अदा करावा.
[5] आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.