::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, कल्पना जांगडे (कुटे)मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 31/01/2017)
1.अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम १२ अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
2. अर्जदाराने आपल्या तक्रारीत असे कथन केले आहे की, अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडून 12522 क्रमांकाचे गॅस कनेक्शन घेतले असून गैरअर्जदार, अर्जदाराला सिलेंडरचा पुरवठा करत असतो. अर्जदार यांनी दिनांक 4/11/2014 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे सिलेंन्डर भरून मिळण्यासाठी ऑनलाईन बुकींग केली होती. सदर बुकींगचा क्रमांक 2000048192 असा आहे. त्यानंतर अर्जदाराने, गैरअर्जदार यांच्याकडे गॅस सिलेंडर मिळण्यासाठी फोनवर बरेच वेळा विचारणा केली तसेच स्वतः एजन्सीमध्ये जावूनही विचारणा व मागणी केली. परंतु गैरअर्जदाराने भरलेले गॅस सिलेंडर दिले नाही व बुकींग केल्यानंतर जाणीवपूर्वक सिलेंडर देण्यांस 21 दिवसांचा विलंब लावला. अर्जदाराने सिलेंडर भरुन मिळण्यासाठी मागणी केल्यानंतर लगेचच अर्जदाराला सिलेंडर मिळणे आवश्यक होते कारण गॅस मिळणे हे अत्यावश्यक सेवेमध्ये येते. अर्जदार यांच्याकडे सदर गॅस कनेक्शनवर सिंगल सिलींडर आहे. गैरअर्जदाराकडून सिलेंडर देण्यांत विनाकारण उशीर लावल्यामुळे अर्जदाराला गैरअर्जदाराकडे भरलेले सिलेंडर मिळण्यासाठी चकरा माराव्या लागल्या. गैरअर्जदाराने, अर्जदाराला सिलेंडर मिळण्यांस होणा-या उशिराबाबत ‘तुम्हाला काय करायचे ते करा’ असे बोलून अपमानास्पद वागणूक दिली. त्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदाराला दिनांक 25/11/2014 रोजी भरलेले सिलेंडर पाठविले. सिलेंडर मिळण्यांस 21 दिवसांचा उशीर झाल्यामुळे अर्जदारांस फार त्रास झाला. वास्तविकतः गैरअर्जदाराकडे, अर्जदाराने सिलेन्डर भरून मिळण्याकरीता बुकींग केले त्या कालावधीमध्ये गैरअर्जदाराकडे भरलेल्या सिलेंडरची उपलब्धता होती. तरीसुध्दा गैरअर्जदाराने मुद्दामपणे हेकेखोरपणाचे धोरण अवलंबून अर्जदारांस उशिरा भरलेले सिलेंडर पाठविले. गैरअर्जदाराने अर्जदारास भरलेले सिलेंडर पाठविण्यांस मुद्दामपणे 21 दिवसांचा उशीर लावला ही गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती सेवेत दिलेली त्रुटी आहे. सबब अर्जदार यांनी दिनांक 21/1/2015 रोजी अधिवक्ता श्री.रामटेके यांचेमार्फत गैरअर्जदाराला नोटीस पाठविली. परंतु गैरअर्जदाराने सदर नोटीसला उत्तर दिले नाही व पुर्तताही केली नाही. सबब अर्जदार यांनी मंचासमक्ष तक्रार दाखल करून तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदाराने भरलेले गॅस सिलेंडर देण्यांसाठी झालेल्या 21 दिवसांच्या उशिराबद्दल अर्जदाराला शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रू.10,000/- व तक्रारीचा खर्च रू.5000/- गैरअर्जदाराकडून मिळण्याचा आदेश व्हावा अशी प्रार्थना केली आहे.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होवून त्यांनी नि. क्रं. 11 वर आपले लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदाराने आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने, गैरअर्जदार गॅस एजन्सी कडुन क्रं 12522 चे गॅस कनेक्शन घेतले असुन अर्जदाराला गैरअर्जदाराकडुनच गॅस सिलेंडरचा पुरवठा होत असतो तसेच अर्जदाराने दिनांक 04/11/14 रोजी गैरअर्जदाराकडे सदर गॅस सिलेंन्डर भरून मिळण्यासाठी ऑनलाईन बुकींग केली असुन त्याचा मागणी बुकींग क्रं 2000048192 असा आहे याबाबत वाद नाही. परंतु अर्जदाराचे तक्रारीतील उर्वरीत कथन गैरअर्जदार यांनी नाकबुल केले आहे. त्यांनी आपल्या विशेष कथना मधे नमुद केले आहे की, नियमाप्रमाणे ज्या तारखेला सिलेन्डर देण्यात आले त्या तारखेपासुन 21 दिवसा पर्यन्त पुन्हा नंबर लावले जात नाही. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. यांचे नियमाप्रमाणे व मध्यंतरी आलेल्या तरतूदीप्रमाणे सिलेन्डर मिळण्याकरिता फोन व्दारे एका विशिष्ट नंबरवर फोन करून ग्राहकनंबर नमुद केल्यावर बुकींग केली जात होती व त्याच प्रमाणे एजन्सी धारक ग्राहकांना सिलेन्डर वितरीत करत होते त्यामुळे अर्जदाराने दिनांक 04/11/14 रोजी बुकींग केल्यानंतर लगेच त्याला त्याचा नंबर न येताही सिलेन्डर दिले असते तर दुस-या ग्राहकांसोबत वाद होणे व तक्रारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून गैरअर्जदार हा नियमाप्रमाणे व नंबर प्रमाणे सिलेन्डर वितरीत करत होते. त्यात अर्जदारानी दुस-याचा नंबर खोडुन त्यांना सिलेन्डर देण्याची मागणी केली परंतु अर्जदाराची बेकायदेशीर मागणी फेटाळल्यामुळे त्यांनी खोटा वाद मंचासमक्ष दाखल केले. गैरअर्जदारानी पुढे नमुद केले की, अर्जदार यानी दाखल केलेले दस्त क्रं 4 हे इंडियन ऑईल कॉर्पोरेशन च्या अधिपत्यात येत नसुन भारत गॅसशी संबंधीत आहे. या दोन वेगळया कंपन्या असुन त्यांची दोघांची नियमावली वेगळी आहे. वास्तविक अर्जदाराला यापुर्वी किंवा आजपर्यन्त कोणताही त्रास झाला नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदाराला घरपोच सेवा दिलेली आहे. गैरअर्जदार यांनी उपलब्धता, नियम व नंबर प्रमाणे अर्जदाराला नेहमी योग्य वेळी सिलेन्डर चा पुरवठा केलेला आहे. गैरअर्जदार यांचे कडे 15,000 उपभोक्ता असुन अर्जदाराला किंवा इतर कुणालाही कोणतीही तक्रार नाही परंतु अर्जदाराच्या दबावा खाली न येता नोव्हेंबर 2014 मधे त्यांच्या बेकायदेशीर मागणी प्रमाणे दुस-यांचे नंबर बाजुला न ठेवता नियमाप्रमाणे काम केल्यामुळे अर्जदार यांनी सुडबुध्दीने गैरअर्जदाराचे विरूध्द तक्रार दाखल केली आहे. गैरअर्जदाराने अर्जदार यांना सेवेमधे कोणतीही त्रुटी दिली नाही. सबब अर्जदाराचा अर्ज बेकायदेशीर असल्यामुळे खर्चासह खारीज करण्यात यावा.
4. अर्जदाराचा तक्रारअर्ज, दस्तावेज, शपथपञ, लेखी युक्तीवाद व अर्जदार यांनी लेखी युक्तीवादालाच आपला तोंडी युक्तीवाद गृहीत धरण्यात यावा अशी नि.क्रं 17-अ वर पुरशिस दाखल केली आहे. तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, दस्तावेज, शपथपञ व गैरअर्जदार यांनी लेखी युक्तीवाद दाखल न केल्यामुळे दिनांक 07/05/2016 रोजी गैरअर्जदार यांचे लेखी युक्तीवादाशिवाय प्रकरण पुढे चालविण्यात येत आहे असा नि.क्रं 1 वर आदेश पारीत व गैरअर्जदार यांनी लेखी उत्तर व शपथपत्र यालाच गैरअर्जदार यांचा तोंडी युक्तीवाद समजण्यात यावा अशी नि.क्रं 16 वर पुरशिस दाखल. उभय पक्षांच्या पुनर्सूनावणीनंतर आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
(2) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला होय
आहे काय ?
(3) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे होय
काय ?
(4) अर्जदार मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून 12522 क्रमांकचे गॅस कनेक्शन घेतले असून गैरअर्जदार, अर्जदार यांना सिलेंडरचा पुरवठा करीत असतो. सदर बाब उभय पक्षांना मान्य असल्याने अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे हे सिध्द होत आहे. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 व 3 बाबत ः-
6. अर्जदार यांनी दिनांक 04/11/2014 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे सदर गॅस सिलेंन्डर भरून मिळण्यासाठी ऑनलाईन बुकींग केली असुन त्याचा मागणी बुकींग क्रं 2000048192 असा आहे. त्यानंतर गैरअर्जदाराकडून अर्जदाराला दिनांक 25/11/2014 रोजी म्हणजे बुकींगपासून तब्बल 21 दिवसानंतर भरलेले सिलेंडर प्राप्त झाले यासंदर्भात अर्जदार यांनी नि.क्र. 5 वर दस्त क्र.ब-2 वर पावती दाखल केली आहे तसेच याबाबत उभय पक्षांमध्ये वाद नाही. यावरून अर्जदारांस भरलेले सिलेंडर मिळण्याकरीता 21 दिवसांचा कालावधी लागला हे सिध्द होत आहे. गैरअर्जदार यांनी आपल्या लेखी उत्तरामध्ये बचावाकरीता कथन केले आहे की, गैरअर्जदार हे इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. यांच्या नियमाप्रमाणे ग्राहकांना सिलेंडर वितरीत करतात व सदर नियमाप्रमाणे, ज्या तारखेला सिलेन्डर देण्यात आले त्या तारखेपासुन 21 दिवसा पर्यन्त पुन्हा भरलेले सिलेंडर मिळण्याकरीता नंबर लावला जात नाही व अर्जदार यांनी दिनांक 4/11/2014 रोजी भरलेले सिलेंडर मिळण्याकरीता बुकींग केल्यानंतर त्यांनासुध्दा नियम व नंबरप्रमाणे भरलेले सिलेंडर दिले. परंतु गैरअर्जदार यांनी सदर कथन सिध्द करण्याकरीता इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. यांच्या नियमावलीची प्रत अथवा कोणतेही दस्तावेज दाखल केलेले नाहीत. सबब अर्जदाराचे कथन की गैरअर्जदार यांचेकडे सिलेंडर उपलब्ध असूनही गैरअर्जदाराकडून सिलेंडर मिळण्यांस 21 दिवसांचा उशीर झाला व त्यामुळे अर्जदारांस फार त्रास झाला, हे ग्राहय धरण्यासारखे आहे. सबब मंचाचे मतानुसार, अर्जदाराने दाखल केलेल्या दस्तावेजांवरून, गैरअर्जदार यांनी अर्जदारांस भरलेले गॅस सिलेंडर देण्याकरीता 21 दिवसांचा विलंब लावून अर्जदाराप्रती अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब करून सेवेत त्रुटी दिली असे सिध्द होत आहे. सबब मुद्दा क्रं. 2 व 3 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 4 बाबत ः-
7. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(2) गैरअर्जदार यांनी अर्जदारांस भरलेले सिलेंडर देण्याकरीता लावलेल्या
विलंबामुळे अर्जदाराला झालेल्या शारीरिक मानसिक ञासापोटी गैरअर्जदाराने नुकसान
भरपाईपोटी रु.5000/- अर्जदारांस द्यावे.
(3) गैरअर्जदार यांनी अर्जदारास तक्रारीच्या खर्चापोटी रू.2000/- द्यावेत.
(4) गैरअर्जदार यांनी वरील आदेशाची पुर्तता आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45
दिवसांचे आंत करावी.
(5) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
(6) सदर आदेश संकेतस्थळावर टाकण्यांत यावा.
चंद्रपूर
दिनांक - 31/01/2017