निकाल
दिनांक- 17.08.2013
(द्वारा- श्री.विनायक लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला क्र.2 यांनी चुकीच्या पध्दतीने कर्ज वसूल केल्यामुळे झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी व सेवेत कसूर केल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार हे प्रगतशिल शेतकरी असून व्यापारी आहे. तक्रारदार हे गावातील एक प्रतिष्ठित नागरीक म्हणून ओळखले जातात. सामनेवाला क्र.1 हे टाटा मोटार्स वाहनाचे अधिकृत विक्रेते आहे. सामनेवाला क्र.2 हे टाटा मोटार्स वाहन कर्ज उपलब्ध करुन देणारे फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक आहेत.
तक्रारदार यांना वाहन विकत घेण्याचे असल्यामुळे ते सामनेवाला क्र.1 अधिकृत विक्रेते यांच्याकडे गेले. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांच्याकडे इंडिका डीएलएस या मॉडेलची गाडी खरेदी करण्याबाबत प्रस्ताव ठेवला, सदर गाडीची किंमत रु.3,82,000/- इतकी होती. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांना कर्ज रु.2,65,000/- सामनेवाला क्र.2 यांच्याकडून मिळेल अशी शाश्वती दिली. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांच्याकडे आवश्यक कागदपत्राची पुर्तता केली. दि.25.03.2011 रोजी सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांना गाडीचे वितरण केले. सामनेवाला क्र.2 यांचे प्रतिनिधी यांनी तक्रारदार यास सांगितले की, गाडी घेतल्याचा महिना सोडून म्हणजेच दि.11.05.2011 रोजी आपणास कर्जाचा पहिला हप्ता भरावा लागेल. तक्रारदार यांना सामनेवाला क्र.2 यांचे दि.23.04.2011 चे पत्र मिळाले, त्या पत्रानुसार तक्रारदार यांना रक्कम रु.2,65,000/- कर्ज मंजूर केल्याचे दाखवले. तसेच तक्रारदार यांना कळवले की, कर्जाचा पहिला हप्ता दि.11.03.2011 रोजी भरावा लागेल. सामनेवाला क्र.2 यांनी दरमहा कर्ज हप्त्याचे शेडयुल तक्रारदार यांना पाठवले. तक्रारदार यांनी दि.25.03.2011 रोजी गाडी ताब्यात घेतली त्याच वेळेस सामनेवाला क्र.2 यांनी कर्ज वितरण केले. सबब पहिला हप्ता दि.11.03.2011 रोजी मागण्याचा सामनेवाला क्र.2 यांना अधिकार नव्हता. सदरील बाबत तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांच्याकडे विचारणा केली असता, योग्य ती पुर्तता करुन देऊ असे सांगितले. तदनंतर सामनेवाला क्र.2 यांच्याकडून तक्रारदार यांना वारंवार फोनवर पहिल्या हप्त्याची रक्कम भरा असा तगादा लावला. तसेच सामनेवाला क्र.2 यांचे प्रतिनिधी के.यादव हे तक्रारदार यांच्या गावात आले व त्यांनी तीन हप्त्याच्या रकमेची मागणी केली. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांच्या प्रतिनिधीस सांगितले की, पहिला हप्ता दि.11.05.2011 रोजी भरावयाचा आहे. तत्पूर्वी तीन हप्ते कसे काय मागतात. परंतू सामनेवाला क्र.2 यांचे प्रतिनिधी संपूर्ण गावात तक्रारदार यांच्या मागे फिरुन पैशाची मागणी करु लागले त्यामुळे तक्रारदार यांची गावात नाचक्की झाली. शेवटी नातेवाईकांकडून पैसे घेऊन दि.16.05.2011 रोजी सामनेवाला क्र.2 यांच्या प्रतिनिधीस रु.12,500/- दिले. सदरील बाबीमुळे तक्रारदार यांना मानसिक व शारिरिक त्रासास सामोरे लावे लागले. दि.17.05.2011 रोजी तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांना सर्व प्रकार सांगितला. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास सांगितले की, सदरील गाडी प्रथम दुस-या व्यक्तीच्या नावे बूक होती, त्याची बुकींग रदद करुन आपणास गाडी दिली आहे. तदनंतर तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांच्याकडे संपर्क साधला असता, सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांना सांगितले की, गाडी दि.12.02.2011 रोजी घेतलेली आहे. सदरील बाब कळाल्यानंतर तक्रारदार यांच्या लक्षात आले की, सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी चुकीच्या, खोटया माहितीच्या आधारे तक्रारदार यांच्याकडून जास्त रक्कम वसूल व्हावी या हेतुने सदरील बनाव केला आहे. सामनेवाला क्र.2 यांनी मासिक हप्ता देय नसतानाही तक्रारदार यांना मानसिक त्रास दिला आहे. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 व 2 यांच्याकडून झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- मिळावे व तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळावे यासाठी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
सामनेवाला क्र.1 मंचासमोर हजर होऊन लेखी म्हणणे दाखल केले. सामनेवाला क्र.1 यांनी, तक्रारदार यांनी गाडी घेतल्याबाबत मान्य केले आहे. तसेच तक्रारदारांनी सदरील गाडी वितरण केली आहे, ही बाब मान्य केली आहे. सामनेवाला क्र.1 यांनी असे कथन केले आहे की, वाहनावर कर्ज देणे किंवा फायनान्स करुन देंणे या गोष्टीस त्यांचा संबंध नाही. तक्रारदार यांनी कर्ज प्रकरण स्वतः हाताळलेले आहे. सामनेवाला क्र.1 यांच्या विरुध्द केलेले आरोप खोटे आहे. तसेच कर्ज प्रक्रिया व कर्ज वसूली या बाबी सामनेवाला क्र.2 व तक्रारदार या दोघामध्ये असल्याने सामनेवाला क्र.1 यांचा कोणताही संबंध नाही. सबब सामनेवाला क्र.1 विरुध्द तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.
सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांच्याकडून कर्ज घेतले आहे व त्या कर्जापोटी करारपत्र लिहून दिलेले आहे. करारपत्रातील अटी व शर्ती तक्रारदार यांच्यावर बंधनकारक आहे. सामनेवाला क्र.2 यांनी असे कथन केले आहे की, ग्राहक मंचास सदरील तक्रार चालविण्याचा अधिकार नाही. तक्रारदार हा ग्राहक नाही. तक्रारदार यांनी सदरील वाहन व्यापारी कारणासाठी खरेदी केले आहे. त्यामुळे तक्रारदार हा ग्राहक या संज्ञेत बसत नाही. तसेच करारातील अटी व शर्ती नुसार काही वाद उपस्थित झाल्यास तो लवादाकडे सोपविण्याची तरतुद आहे. सबब सदरील तक्रार ग्राहक मंचापूढे चालविण्यास पात्र नाही. सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे लेखी निवेदनामध्ये पुढे असे कथन केले आहे की, कराराच्या अनुषंगाने तक्रारदार यांनी ठरवून दिलेले हप्ते दरमहा भरावयाचे आहेत. त्याने हप्ता न भरल्यास करारातील अटी नुसार तो व्याज देण्यास पात्र आहे. सामनेवाला क्र.2 यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदार यांनी दि.12.02.2011 रोजी करार केला आहे, आणि त्या कराराच्या अनुषंगाने दरमहा रु.7,400/- प्रमाणे 48 महिन्यात कर्ज रक्कम भरावयाची आहे. तक्रारदार यांनी पहिला हप्ता दि.11.03.2011 रोजी भरावयाचा होता, तो त्याने भरला नाही. म्हणून सामनेवाला क्र.2 यांनी हप्ते भरण्याबाबत तक्रारदार यांच्याकडे मागणी केली. सामनेवाला क्र.2 यांनी सेवा देण्यात कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. तक्रारदार यांनी खोटया माहितीच्या आधारावर सदरील तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. सबब तक्रारदार यांची तक्रार खारीज करावी अशी विनंती केली आहे.
तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र, सामनेवाला यांनी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र याचे अवलोकन केले. तक्रारदार यांचे विद्वान वकील श्री.धांडे यांचा युक्तीवाद ऐकला. तसेच सामनेवाला क्र.1 चे विद्वान वकील श्री.शिंदे आणि सामनेवाला क्र.2 चे विद्वान वकील श्री.काकडे यांचा युक्तीवाद ऐकला.
न्याय निर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) सामनेवाला क्र.2 यांनी, तक्रारदार यांना सेवा देण्यास
त्रुटी केली आहे, ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केली
आहे काय ? होय.
2) तक्रारदार हे तक्रारीतील मागणी केलेली नुकसान भरपाई
मिळण्यास पात्र आहे काय? अंशतः होय.
3) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 व 3 ः- तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्राचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 सान्या मोटार्स प्रा.लि. अधिकृत विक्रेते यांच्याकडून इंडिका डी.एल.एस. मॉडेलची कार रक्कम रु.3,82,000/- यास विकत घेतल्याबाबत निष्पन्न होते. तसेच सामनेवाला क्र.2 यांच्याकडून तक्रारदार यांनी रु.2,65,000/- कर्ज घेतल्याबाबत निष्पन्न होते. तक्रारदार यांचया मते दि.25.03.2011 रोजी त्यांनी सामनेवाला क्र.1 यांच्याकडून आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता करुन वाहन ताब्यात घेतले. दि.23.03.2011 रोजी संपूर्ण कागदपत्राची पुर्तता केली, त्यावेळेस सामनेवाला क्र.2 यांनी कर्जाचा पहिला हप्ता दि.11.05.2011 रोजी भरावा लागेल असे सांगितले. दि.25.03.2011 रोजी तक्रारदार यांनी गाडी ताब्यात घेतल्याबाबत निष्पन्न होते.
तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांच्याकडून कर्ज घेतले आहे, ते कर्ज भरत असताना अगर त्यामध्ये काही चूक केली असल्यास तक्रारदार हा सामनेवाला क्र.2 यांचा ग्राहक होतो, व त्यासंबंधी दाद मागण्याचा अधिकार तक्रारदार यांना आहेत. तक्रारदार यांचे कथन की, त्यांनी गाडी दि.25.03.2011 रोजी ताब्यात घेतली व त्याचवेळेस सामनेवाला क्र.2 यांनी कर्जाचे वितरण केले. पहिला हप्ता दि.25.03.2011 रोजी भरावयाचा होता, परंतू सामनेवाला क्र.2 यांनी पहिला हप्ता दि.11.03.2011 रोजीच म्हणजे गाडी ताब्यात मिळयाच्या 15 दिवस अगोदरच भरावा लागेल. याबाबत करार व दरमहा हप्त्याची रक्कम भरण्याबाबत उतारा पाठवला. यावरुन असे लक्षात येते की, तक्रारदार यांनी जर गाडी दि.25.03.2011 रोजी ताब्यात घेतली आहे, व त्याचवेळेस कर्जाचे वितरण सामनेवाला क्र.2 यांनी केले आहे, तर कर्ज वितरण करण्याच्या अगोदर हप्ता मागण्याचा अधिकार सामनेवाला क्र.2 यास प्राप्त होत नाही.
सामनेवाला क्र.2 यांचे कथन की, तक्रारदार यांनी दि.12.02.2011 रोजी लोन कर्ज, तारण पत्र, हमीपत्र व करारपत्र लिहून दिले आहे. त्यामुळे कर्जाचा पहिला हप्ता दि.11.03.2011 रोजी भरण्याचे तक्रारदार यांनी मान्य केले आहे. सदरील दाखल केलेल्या कागदपत्राचे व तक्रारदार यांचे कथन पाहिले असता असे निदर्शनास येते की, सदरील गाडी ही प्रथम दुस-या ग्राहकास विकण्याबाबत ठरले होते, त्या ग्राहकाने गाडी घेण्यास नकार दिल्यामुळे तक्रारदार यांना सदरील गाडी देण्यात आली. तक्रारदार यांनी सदरील गाडी दि.25.03.2011 रोजी ताब्यात घेतली. त्यामुळे तक्रारदार यांना दि.12.02.2011 रोजी सामनेवाला क्र.2 यांच्याकडे करार करण्याचा प्रसंग येऊ शकत नाही. आणि यदाकदाचित सामनेवाला क्र.2 यांनी सदरील करारपत्र करुन घेतले असले तरी, प्रत्यक्ष ज्या दिवशी तक्रारदार यांना कर्ज वितरण करण्यात आले, त्या तारखेनंतरच कर्ज वसूलीबाबत करारपत्रात नमुद करता येते. कर्जाची रक्कम सामनेवाला क्र.1 यांच्याकडे न भरता सामनेवाला क्र.2 यांना तक्रारदार यांच्याकडून अगोदरच कर्जाचा हप्ता मागता येणार नाही. मुळ बाबींचा विचार केला असता असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांना कर्ज वितरण हे. दि.29.03.2011 रोजी करण्यात आले. सदरील बाब सामनेवाला क्र.2 यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन स्पष्ट होते. तसेच सामनेवाला क्र.2 यांनी पहिला हप्ता दि.11.03.2011 रोजी भरावा असे कर्ज वितरणच्या उता-यात नमुद केले आहे, जर सामनेवाला क्र.2 यांनी कर्ज दि.29.03.2011 रोजी वितरण केले आहे व ती रक्कम सामनेवाला क्र.1 यांना दिली आहे, तर कर्जाचा पहिला हप्ता हा दि.29.04.2011 नंतर यावयास पाहिजे. तसे न करता सामनेवाला क्र.2 यांनी कर्जाचा पहिला हप्ता दि.11.03.2011 रोजी भरावा लागेल असे कळवले व कर्जाची मागणी केली. तसेच सामनेवाला क्र.2 यांचे प्रतिनिधी तक्रारदार यांच्या गावात जाऊन त्यांच्याकउून तीन हप्त्याची मागणी केली. सदरील बाबीचा विचार केला असता, सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यास त्रुटी ठेवली ही बाब निष्पन्न होते. म्हणून मुददा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते. व मुददा क्र. 2 अंशतः मान्य नाही.
सबब सर्व कागदपत्र व पुराव्याचे अवलोकन केले असता या मंचाचे असे मत पडते की, सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांच्याकडून चुकीच्या पध्दतीने कर्ज वसूल करण्याचा प्रयत्न केला, सेवेत त्रुटी ठेवली. त्यामुळे तक्रारदार यांना मानसिक व शारिरिक झाला. सबब, तक्रारदार हे त्यांना झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.7,000/- सामनेवाला क्र.2 यांच्याकडून मिळण्यास पात्र आहे. तसेच तक्रारीचा खर्च रक्कम रु.2500/- मिळण्यास पात्र आहे. तसेच तक्रारदार हे रक्कम रु.7,000/- वर तक्रार दाखल केल्यापासून ते संपूर्ण रक्कम वसूल होईपावेतो द.सा.द.शे.9 टक्के व्याज सामनेवाला क्र.2 यांचेकडून घेणेस पात्र आहे. येणेप्रमाणे हुकूम करण्यात यावा.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) सामनेवाला क्र.2 यांना असे आदेश देण्यात येते की, त्यांनी तक्रारदार
यांना मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.7,000/-(रक्कम रुपये
सात हजार) तीस दिवसाचे आत द्यावे.
2) सामनेवाला क्र.2 यांनी रक्कम रु.7,000/- वर तक्रार दाखल
केल्यापासून ते संपूर्ण रक्कम वसूल होईपावेतो द.सा.द.शे.9 टक्के
व्याज द्यावे.
3) सामनेवाला क्र.2 यांनी, तक्रारदारास तक्रारीचा खर्च रु.2500/- तीस
दिवसात द्यावे.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील
कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला
परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड