जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 303/2016.
तक्रार दाखल दिनांक : 06/10/2016.
तक्रार आदेश दिनांक : 30/03/2017. निकाल कालावधी: 00 वर्षे 05 महिने 24 दिवस
दुर्गा इंद्रजित आखाडे, वय 38 वर्षे, व्यवसाय : घरकाम,
रा. शिवनाभी निवास, काकडे प्लॉट, उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ती
विरुध्द
(1) मॅनेजर, समृध्दी जिवन मल्टी स्टे-स्टे, मल्टी पर्पज को-ऑप.
सोसायटी लि., शाखा मोदानी बिल्डींग, एस.बी.आय.
बँकेच्या वर, उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद.
(2) समृध्दी जिवन मल्टी स्टे-स्टे, मल्टी पर्पज को-ऑप. सोसायटी लि.,
रजि. ऑफीस : 4 था मजला, तंत्रा बिल्डींग, यशोधन बिझनेस
कॉम्प्लेक्स, घोळे रोड, शिवाजी नगर, पुणे – 411 005. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष
श्री. मुकूंद बी. सस्ते, सदस्य
तक्रारकर्ती यांचेतर्फे विधिज्ञ : एस.बी. तावरे
विरुध्द पक्ष अनुपस्थित / एकतर्फा
न्यायनिर्णय
श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. तक्रारकर्ती यांचेद्वारे उपस्थित वादविषय थोडक्यात असा आहे की, त्यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून 36 महिने मुदतीची पॉलिसी घेतली असून प्रतिमहा रु.1,000/- प्रमाणे भरणा केल्यानंतर मुदत पूर्ण झाल्यास त्यांना रु.87,000/- देय होते. त्यानुसार तक्रारकर्ती यांना विरुध्द पक्ष यांनी पॉलिसी कव्हरनोटी नं.527344 दिली. तक्रारकर्ती यांनी 36 महिने प्रतिमहा रु.1,000/- प्रमाणे रकमेचा भरणा केला. दि.14/7/2016 रोजी पॉलिसीची मुदत पूर्ण झाली आणि त्यांना पॉलिसीप्रमाणे रु.87,000/- मिळणे क्रमप्राप्त होते. तक्रारकर्ती यांनी विरुध्द पक्ष यांना रकमेची मागणी केली असता त्यांना रक्कम परत करण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारकर्ती यांनी विरुध्द पक्ष यांचेकडून रु.87,000/- व्याज व लाभासह मिळण्यासाठी प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे. तसेच त्यांनी मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- विरुध्द पक्ष यांच्याकडून मिळावेत, अशी विनंती केलेली आहे.
2. विरुध्द पक्ष यांना या जिल्हा मंचाच्या नोटीसची बजावणी झालेली आहे. उचित संधी देऊनही ते जिल्हा मंचापुढे उपस्थित राहिले नाहीत आणि लेखी उत्तर दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश पारीत करण्यात येऊन सुनावणी पूर्ण केली.
3. तक्रारकर्ती यांची तक्रार व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारीमध्ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ उपस्थित होणा-या वादमुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये
त्रुटी केल्याचे सिध्द होते काय ? होय.
2. तक्रारकर्ती ह्या अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
4. मुद्दा क्र. 1 व 2 :- अभिलेखावर दाखल करारपत्राचे अवलोकन केले असता तक्रारकर्ती व विरुध्द पक्ष यांचेमध्ये पशुधन संगोपन करार झाल्याचे निदर्शनास येते. करारानुसार तक्रारकर्ती यांनी प्रतिमहा रु.1,000/- प्रमाणे 36 महिन्यामध्ये एकूण रु.36,000/- भरण्याचे होते. पशुधन संगोपन करार पूर्ण झाल्यानंतर तक्रारकर्ती यांना रु.87,000/- मिळणे क्रमप्राप्त होते. तक्रारकर्ती यांच्या वादकथनाप्रमाणे मुदतपूर्तीनंतर त्यांनी करारानुसार देय रकमेची मागणी केली असता विरुध्द पक्ष यांच्याकडून टाळाटाळ करण्यात येत आहे.
5. विरुध्द पक्ष यांना जिल्हा मंचातर्फे नोटीस बजावणी झाल्यानंतर ते जिल्हा मंचापुढे उपस्थित झाले नाहीत आणि उचित संधी देऊनही त्यांनी लेखी उत्तर केलेले नाही. निर्विवादपणे तक्रारकर्ती यांच्या वादकथनाचे खंडण करण्यासाठी लेखी उत्तर व पुराव्याची कागदपत्रे दाखल करण्यास विरुध्द पक्ष यांना उचित संधी उपलब्ध होती. परंतु त्यांनी तक्रारकर्ती यांचे वादकथन व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे उचित पुराव्याद्वारे खंडन केले नाही. त्यामुळे एका अर्थाने तक्रारकर्ती यांची तक्रार, त्यातील कथने व दाखल कागदपत्रे विरुध्द पक्ष यांना मान्य आहेत, असे अनुमान काढणे न्यायोचित वाटते.
6. मुख्य वादविषयाकडे गेल्यानंतर असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ती यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे पशुधन संगोपन करारानुसार रक्कम गुंतवलेली आहे. तक्रारकर्ती यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे प्रतिमहा रक्कम जमा केल्याच्या पावत्या दाखल केल्या आहेत. तक्रारकर्ती व विरुध्द पक्ष यांच्यातील करारानुसार दि.14/7/2016 रोजी तक्रारकर्ती यांना विरुध्द पक्ष यांच्याकडे रु.87,000/- रक्कम देय आहे. तक्रारकर्ती यांना मुदतपूर्तीनंतर देय रक्कम का अदा केली नाही ? याचा खुलासा विरुध्द पक्ष यांनी केलेला नाही. आमच्या मते तक्रारकर्ती यांना रु.87,000/- अदा न करुन विरुध्द पक्ष यांनी सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे आणि तक्रारकर्ती ह्या प्रस्तुत रक्कम मिळण्यास पात्र आहेत. त्यामुळे मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
(1) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ती यांना रु.87,000/- रक्कम अदा करावी. तसेच प्रस्तुत रकमेवर दि.14/7/2016 पासून प्रत्यक्ष रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज द्यावे.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ती यांना तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(3) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी आदेश प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत करावी.
(4) उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्क देण्यात यावी.
(श्री. मुकूंद बी. सस्ते) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
-00-