ग्राहक तक्रार क्र. 47/2014
दाखल तारीख : 04/02/2014
निकाल तारीख : 19/08/2015
कालावधी: 01 वर्षे 06 महिने 16 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. डॉ. विलयम डेव्हीड दलभंजन,
वय.59 वर्ष, धंदा- स्वयंरोजगार,
रा.ए.31, एम. आय.डी.सी. उस्मानाबाद. ... तक्रारदार.
वि रु ध्द
1. व्यवस्थापक,
श्री.डी.जी.कुलकर्णी,
समर्थ अर्बन को-ऑप बँक लि. उस्मानाबाद,
काळा मारुती चौक, उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रादारातर्फे विधीज्ञ : श्री. रमेश श. मुंढे.
विरुध्द पक्षकारा तर्फे विधीज्ञ : श्री. बी.आर.माने.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष, श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
अ) विरुध्द पक्षकार (विप) बँकेकडून कर्ज घेतले त्यांची परतफेड करुनही विप ने कर्ज रकमेची मागणी चालूच ठेवली व सेवेत त्रुटी केली म्हणून तक्रारकर्तो (तक) यांने भरपाई मिळण्यासाठी ही तक्रार दिलेली आहे.
तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे.
1. तक यांने विप कडून सन 2000 मध्ये वाहन तारण कर्ज घेतले. दि.30.3.2002 रोजी रु.15,000/- कर्ज घेतले. सुझूकी कंपनीची मोटार सायकल क्र.एम.एच. 25-1966 विप कडे कर्जास तारण म्हणून ठेवली. दि.11.12.2013 पर्यत एकूण रु.24,563/- चा भरणा केला. विप ने हप्ते रेग्यूलर न भरले व कर्ज खाते थकीत झाले असे म्हणून तक ची मोटार सायकल जप्त केली. विप ने मोटार सायकल विक्री करुन तिची किंमत कर्ज खाती जमा करुन कर्ज खाते बेबाकी करण्याचे ठरवले. मोटार सायकल जुनी असल्यामुळे विकली नाही असे म्हणले आहे. अशा प्रकारे तक ने विप चे कर्जाची परतफेड केलेली आहे. असे असतानाही विप तक कडे रु.62,199/- ची मागणी करीत आहे. तक ने विप कडे शेअर्स ची रककम रु.11,400/-व्याजासह परत मिळण्याची विनंती केली. तथापि विप ने दि.15.01.2014 रोजी रक्कम भरण्याचा तगादा लावला व तक ची मालमत्ता जप्त करण्याची धमकी दिली. त्यामुळे तक आजारी पडला. त्यामुळे तणाव आला. त्यामुळे विप ला दंड करुन त्यांचेकडून तक ला रु.25,000/- मिळावेत व तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- द्यावेत म्हणून ही तक्रार दि.04.09.2014 रोजी दाखल केलेली आहे.
2. तक ने तक्रारीसोबत विप चे पत्र, विप चे दुसरे पत्र, रजिष्ट्रेशन सर्टीफीकेट, कर्जाचा उतारा, असिस्टंट रजिस्ट्रार यांना लिहीलेले दि.14.01.2002 चे पत्र विप यांना लिहीलेले दि.13.01.2014 चे पत्र दि.27.11.2013, 30.12.2013 चे पत्र, यशोधरा हॉस्पीटल सोलापूर सिव्हील हॉस्पीटल उस्मानाबादचा दाखला इत्यादी कागदपत्राच्या प्रति हजर केल्या आहेत.
ब) विप ने दि.14.10.14 रोजी आपले म्हणणे दाखल केलेले आहे. तक ने घेतलेले कर्ज, दिलेल्या हप्त्याप्रमाणे न फेडल्यामुळे कर्ज खाते एन.पी.ए. झाले वसूलीच्या कार्यवाहीत तक ची मोटार सायकल जप्त केली. वाहन जुने असल्यामुळे त्यांची विक्री झाली नाही. तक ने गाडीची कागदपत्रे आणून देतो असे सांगूनही दिली नाहीत. विप सहकारी बँक असल्यामुळे नोटीसच्या अभावी तक ची तक्रार चालणार नाही.
4. तक ने या कर्जाशिवाय डायमन्ड कॅडल युनिट करिता विप कडून कॅश क्रिडीट घेतलेले होते. ते कर्ज तक ने परतफेड केले नाही. तक निे विप च्या हक्कात वसूलीपोटी चेक दिले होते. ते न वटल्यामुळे विप ने तक विरुध्द फौजदारी खटला केला. त्यामध्ये तक ला शिक्षा झाली. तक ने त्याविरुध्द अपिल केले. त्यानंतर तक ने रक्कम भरल्यामुळे केस निकाली झाली.
5. विप ने तक ला वाहन कर्ज रु.15,000/- दि.30.3.2002 रोजी दिले होते. त्याची रु.63,080/- इतकी थकबाकी आहे. विनाकारण खोटया तक्रार करण्याचा तक चा स्वभाव आहे. विप ने कर्जाची कायदेशीर वसूली करु नये म्हणून तक ने ही तक्रार दिली आहे. ही तक्रार खारीज करावी.
क) तक ची तक्रार, त्यांने दाखल केलेली कागदपत्रे, तसेच विप चे म्हणणे, यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात आम्ही त्यांची उत्तरे त्यांचे समोर खालील दिलेल्या कारणासाठी लिहीली आहेत.
मुद्दे उत्तरे
1. विप ने सेवेत त्रूटी केली आहे काय ? नाही.
2. तक अनुतोषास पात्र आहे काय ? नाही.
3. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
ड) कारणमिंमासा
मुद्दा क्र.1 व 2 :
1. विप च्या पहिल्या पत्राप्रमाणे दि.30.3.2002 रोजी रु.15,000/- कर्ज दिले. त्यापैकी मुद्दल रु.11,506/- तसेच ओव्हरडयू रु.11,506 व व्याज रु.786/- डयू होते. दुसरे पत्राप्रमाणे ओव्हरडयू रक्कम रु.24,169/- झाली होती. कर्ज, खात्याच्या उता-याप्रमाणे दि.22.02.2002 अखेर रु.16,118/- येणे बाकी होते. अधिक येणे व्याज रु.45,935/- अशा प्रकारे एकूण येणे रु.62,199/- होते. दि.11.04.2004 पासून जमा रकमा नाहीत. दि.11.12.2013 अखेर येणे रु.32,778/- होते. दि.11.12.2013 रोजी ट्रान्स्फर इंन्ट्री रु.17,353/- ची दाखवली आहे. ही कोणती रक्कम आली याबद्दल खुलासा होत नाही. कदाचित ती मोटार सायकलची किंमत असू शकते.
2. तक च्या म्हणण्याप्रमाणे त्यांने वेळच्या वेळी हप्ते भरले होते. ते दाखवायला तक ने पुरावा दिलेला नाही. विप चे म्हणणे होते की, तक ने मोटार सायकलचे कागदपत्र न दिल्यामुळे व वाहन जुने असल्यामुळे त्यांची विक्री झाली नाही. तक ने इतकी वर्षे हप्ते भरलेले नसताना दि.11.12.2013 रोजी रु.17,353/- भरले असतील याबद्दल शंका आहे. काहीही असले तरी त्यादिवशी रु.32,778/- येणे होते. विप तर्फे विधीज्ञांनी युक्तीवाद केला की खाते एनपीए झाल्यानंतर देय व्याजाच्या रक्कमा वेगळया खात्या मध्ये नोंदवल्या जातात. ज्यामुळे येणे रक्कम कमी दिसते. अशी थकीत व्याजाची रक्कम रु.45,935/- वेगळी कडे नोंदवली असे विप चे म्हणणे आहे.
3. काहीही असले तरी तक ने कर्जाची संपूर्ण रक्कम फेडली याबद्दल काहीही पुरावा दिलेला नाही. जर शेवटचा हप्ता फेडला असता तर तक ने बेबाकी प्रमाणपत्र मिळवले असते. असे न केल्यावरुन हे स्पष्ट आहे की तक ने संपूर्ण कर्ज परत फेडलेले नाही. विप चे म्हणणे आहे की तक ने दुस-या व्यवसायासाठी सुध्दा कर्ज घेतले होते व ते परत फेडले नाही म्हणून फौजदारी खटला झाला होता व तक ला शिक्षा झाली होती. विप ने सेवेत त्रुटी केली हे तक शाबीत करु शकला नाही. म्हणून मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही नकारार्थी देतो व खालील प्रमाणे आदेश करतो.
आदेश
1. तक ची तक्रार रद्द करण्यात येते.
2. खर्चाबद्दल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (श्री.एम.व्ही.कुलकर्णी)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद