निकाल
(घोषित दि. 10.03.2017 व्दारा श्रीमती एम.एम.चितलांगे, सदस्य)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये दाखल केली.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे. तक्रारदार हा काकडा तांडा ता.जि.जालना येथील रहिवाशी आहे. तक्रारदार याची गट क्र.57 मध्ये शेतजमीन आहे. गैरअर्जदार क्र.1 हे अजित सीडस कंपनीचे व्यवस्थापक आहे. गैरअर्जदार क्र.2 हे गैरअर्जदार क्र.1 उत्पादीत करणा-या बियाणाचे कामकाज पाहणारे आहेत. गैरअर्जदार क्र.3 हे विक्रेते आहे. गैरअर्जदार क्र.4 हे विक्रेत्यांचे प्रतिनिधी आहे.
तक्रारदाराने स्वतःच्या मालकी असलेल्या शेतजमीन गट क्र.57 मध्ये टरबुज या बियाणीची लागवड केली होती त्याकरता तक्रारदार याने गैरअर्जदार क्र.1 व 2 या कंपनीने उत्पादीत केलेली अजित 44 संकरीत कलिंगड हे बियाणे गैरअर्जदार क्र.3 यांचेकडून खरेदी केले. तक्रारदार यांनी बियाणे खरेदीपोटी रक्कम रु.7,000/- गैरअर्जदार क्र.3 यास दिले. त्याबाबतची पावती क्र.472 दाखल केलेली आहे. गैरअर्जदार क्र.4 यांनी सदर बियाणाविषयी व त्याच्या कार्यक्षमतेविषयीची माहिती तक्रारदाराला दिली होती, सदर पिकाचा कालावधी हा 85 ते 95 दिवसाचा असून फळाचा आकार गोल व उभट होईल असे सांगितले.सदर बियाणाच्या लागवडीकरता तक्रारदार यांनी आवश्यक असणारे ठिबक सिंचन, खत व औषधी याचा योग्यवेळी योग्य पध्दतीने आवश्यक त्या प्रमाणात वापर केलेला होता. गैरअर्जदार क्र.1 ते 4 यांच्या प्रतिनिधी श्री.बोराडे यांनी वेळोवेळी शेताची पाहणी केली होती. तक्रारदार यांनी आवश्यक त्याप्रमाणामध्ये पिक संरक्षणसाठी किटकनाशकाचा वापर केलेला होता. साधारणपणे 60 ते 70 दिवसाच्या दरम्यान तक्रारदाराच्या लक्षात आले की, सदर टरबुजचे वेल हे योग्य प्रमाणात पाणी देत असूनही वाळत आहे म्हणून तक्रारदार याने गैरअर्जदार यांचेकडे तक्रार केली व गैरअर्जदारांनी तक्रारदाराच्या शेताची पाहणी करुन नुकसान झाल्याचे मान्य केले. तसेच सदरचे नुकसान हे बियाणातील दोषामुळे आहे म्हणून नुकसान भरपाई सुध्दा देध्ण्याचे मान्य केले. गैरअर्जदार यांनी तक्रारदार याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे तक्रारदार याने दि.17.03.2015 रोजी कृषी विकास अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी यांचेकडे रितसर अर्ज दाखल करुन सदर टरबुज या पिकाच्या पाहणीकरता विनंती अर्ज केला. त्यानुसार तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती व त्यांचे प्रतिनिधी यांनी दि.10.04.2015 रोजी तक्रारदार याचे शेतात भेट देऊन क्षेत्र व पिकाची पाहणी केली त्याबाबतचा अहवाल व पंचनामा दि.15.04.2015 रोजी दिला होता. सदर अहवालामध्ये तालुका समितीचा निष्कर्ष असा आहे की, फळ वाळत गेले व टरबुजाचे वेल वाळण्यास सुरुवात झाली. तसेच टरबुजाचे फळ उत्पादन अत्यंत नगण्य आले असे नमुद केले आहे. पिक व्यवस्थापन केले असतानाही उत्पादन आले नाही. याचे कारण गैरअर्जदार यांनी तक्रारदारास सदोष व दोषयुक्त बियाणे दिले आहे. सदर बियाणाची उगवण क्षमता व कार्यक्षमता नव्हती. सदर बियाणे हे निकृष्ट दर्जाचे होते. गैरअर्जदार यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे बियाणे हे उगवले परंतू तक्रारदारास त्यापासून कोणतेही पिक व उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे तक्रारदाराचे आर्थिक नुकसान झालेले आहे. गैरअर्जदार यांच्या कृतीमुळे तक्रारदार यास शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे तक्रारदार यांनी सदर तक्रार दाखल करुन आर्थिक नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.7,00,000/- व शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,00,000/- तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रु.10,000/- व इतर खर्चरु.2,000/- असे एकूण रु.8,12,000/- मिळण्याची विनंती केलेली आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मान्य करण्यात यावी.
गैरअर्जदार क्र.1 ते 4 मंचासमोर हजर झाले. त्यांनी आपले लेखी निवेदन नि.9 अन्वये दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 हे बियाणे उत्पादीत करणारी कंपनी आहे. गैरअर्जदारास मान्य आहे. तक्रारदार यांनी गैरअर्जदार क्र.3 यांचेकडून टरबुजाचे बियाणे खरेदी केलेले आहे ही बाब गैरअर्जदार क्रं.1 व 2 यांना मान्य आहे. तसेच दि.10.04.2015 रोजी तालुका निवारण समिती यांनी केलेल्या पंचनाम्याच्यावेळी गैरअर्जदार क्र.1 ते 4 यांचे प्रतिनिधी उपस्थिती होते ही बाब गैरअर्जदारास मान्य आहे. तक्रारीतील उर्वरीत मजकुर गैरअर्जदार क्र.1 ते 4 यांनी स्पष्टपणे नाकारलेला आहे. गैरअर्जदार यांचे अधिक कथन की, गैरअर्जदार यांची बि-बियाणे उत्पादीत करणारी नामांकित कंपनी असून गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी उत्पादीत केलेले अजित 44 टरबुजचे बियाणे हे सर्व बाबींच्या पडताळण्या झाल्यानंतर बाजारपेठेत वितरीत करण्यात आले आहे. त्याबाबतचे कागदपत्र सदर लेखी जबाबासोबत दाखल केलेले आहे. तक्रारदार यांनी दि.12.12.2014 रोजी गट क्र.57 मौजे काकडा येथे सदर टरबुजच्या बियाणाची लागवड केली आहे परंतू तक्रारदार यांनी त्याच्या नावावर मौजे काकडा येथे गट नं.57 मध्ये शेतजमीन आहे किंवा नाही याबददल कोणताही पुरावा दाखल केला नाही. त्यामुळे तक्रारदार याचे नावावर जमीन नसल्यामुळे सदर तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. तक्रारदार यांनी दि.12.12.2014 रोजी टरबुजाच्या बियाणाची लागवड केलेली आहे व दि.17.03.2015 रोजी तक्रारदार याने कृषी विकास अधिकारी जालना यांचेकडे तक्रार केलेली आहे. म्हणजेच तक्रारदार याने जवळपास 100 दिवसानंतर तक्रारअर्ज केला आहे.म्हणजेच पीक कालावधी संपल्यानंतर पूर्ण पिकाचा आर्थिक मोबादला घेवून तक्रार केली आहे.तक्रारदार याने बियाण्यापासुन उत्पादित केलेले टरबुज बाजारात विक्री केले.त्याबाबतचे छायाचित्र दाखल केले आहे.गैरअर्जदार याने जालना व महाराष्ट्रातील इतर भागात सदर बियाण्याची विक्री केली आहे.परंतू इतर कोणत्याही शेतक-याची तक्रार आलेली नाही.यावरून गैरअर्जदार क्रं.1 व 2 यांनी उत्पादित केलेल्या टरबूजच्या बियाण्यामध्ये कोणताही दोष नाही.तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी.
तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व पुराव्याकामी शपथपत्र याचे अवलोकन केले. गैरअर्जदार यांनी दाखल केलेले पुराव्याकामीचे शपथपत्र व कागदपत्रांचे अवलोकन केले. तक्रारदार यांच्या वकीलाचा युक्तीवाद ऐकला. गैरअर्जदार यांनी दाखल केलेला लेखी युक्तीवाद लक्षात घेतला. न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1) गैरअर्जदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्या
सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? नाही.
2) काय आदेश? अंतिम आदेशानुसार
कारणमीमांसा
मुददा क्र.1 ः तक्रारदार यांच्या वकीलांनी युक्तीवाद असा केला की, तक्रारदार याने गैरअर्जदार क्र.1 यांनी उत्पादीत केलेले टरबुज या फळाचे बियाणे गैरअर्जदार क्र.3 कडून विकत घेतले, त्याबाबतची पावती मंचासमोर दाखल केली. बियाणे विकत घेतल्यानंतर तक्रारदार याने स्वतःच्या शेतजमीनीत टरबुज या फळाची लागवड केली. खत, पाणि, औषध योग्य प्रमाणात वेळोवेळी दिले तरी सुध्दा सदर बियाणाच्या वेलीची वाढ झाली नाही व फळधारणा योग्य प्रमाणात झाली नाही. याबाबतची माहिती गैरअर्जदार यांना दिली. परंतू गैरअर्जदार यांनी कोणतीही दखल घेतली नाही. म्हणून दि.17.03.2015 रोजी उपविभागीय कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देवून स्थळपाहणीची विनंती केली. त्यामुळे तालुका तक्रार निवारण समितीने तक्रारदाराच्या शेतात भेट देऊन स्थळपाहणी करुन पंचनामा सादर केला. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास दिलेले बियाणे हे निकृष्ट दर्जाचे होते त्याची उगवण क्षमता नव्हती.वरील कारणास्तव गैरअर्जदार यांनी निकृष्ट दर्जाचे बियाणे पुरवून सेवा देण्यात त्रुटी ठेवली आहे म्हणुन तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
गैरअर्जदार यांच्या लेखी युक्तीवादाचे अवलोकन केले. गैरअर्जदार यांनी युक्तीवादमध्ये नमुद केले आहे की,त्यांनी उत्पादित केलेले टरबूज बियाणे योग्य चाचणी व पडताळणी केल्यानंतर बाजारात विक्रीस वितरीत केले. त्याबाबत Release order मंचासमोर दाखल केली आहे.तक्रारदार यांने बियाणे खरेदी करुन त्याची लागवड केली,परंतू त्याच्या नावे सदर शेतजमीन असल्याचा पूरावा दाखल केला नाही.तक्रारदार याने समाधानकारक स्वरुपात टरबुजचे पीक मिळाल्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.दि.11/03/2015 रोजी तक्रारदार याने त्याला समाधानकारक उत्पादन मिळाल्याचे लेखी मनोगत दिले आहे. उपविभागीय कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावली मध्ये खालील नमुद बाबी मान्य केल्या आहे.तक्ररदार याने पीक कालावधी संपल्यानंतर पीक पाहणी केली.पीक पाहणीचा पंचनामा बियाणे लागवड केल्यानंतर 130 दिवसानी केला.पिक उपलब्ध नसल्यामुळे तक्रारदार याने दिलेल्या माहितीप्रमाणे कृषी अधिका-यांनी अहवाल दिला असे युक्तीवादात सांगितले.सदर टरबूज बियाणे हे सदोष आहे असा उल्लेख पंचनाम्यात कुठेही नाही त्यामुळे पंचनाम्यावर विश्वास ठेवुन बियाण्यामध्ये दोष होता हे म्हणणे चुकीचे आहे. तालुका तक्रार निवारण समितीनेही स्पष्ट श्ब्दात निष्कर्ष दिला नाही.सदर तक्रार खोटी असून गैरअर्जदारांकडुन पैसे उकळण्याच्या उद्रदेशाने दाखल केली आहे.शेवटी तक्रारदार यांची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
आम्ही तक्रारदार यांनी केलेला युक्तीवाद व गैरअर्जदार यांच्या लेखी युक्तीवादाचे अवलोकन केले. तक्रारदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व पुराव्याकामी शपथपत्रांचे अवलोकन केले. तसेच दाखल केलेल्या प्रश्नावलीचे अवलोकन केले. यावरुन तक्रारदार यांनी दि.11.12.2014 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांनी उत्पादीत केलेले टरबुजचे बियाणे गैरअर्जदार क्र.3 कडून रक्कम रु.7,000/-देउुन बियाणे विकत घेतले. बियाणे विकत घेतल्याची पावती मंचासमोर दाखल आहे. यावरुन तक्रारदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे. तक्रारदार हा शेतकरी आहे. त्याच्या नावे काकडा तांडा येथे गट क्र.57 मध्ये शेतजमीन आहे. तक्रारदार याने टरबुज या फळाची लागवड त्याच्या स्वतःच्या शेतजमीनीत केली आहे ही बाब दर्शविण्याकरिता कोणतेही कागदपत्र मंचासमोर दाखल केले नाहीत. या बाबीचा आक्षेप गैरअर्जदार यांनी घेतला आहे. पंरतू तालुका तक्रार निवारण समितीच्या अहवालानुसार तक्रारदार याच्या नावे गट क्र.57 मध्ये शेतजमीन आहे.सदर शेतात टरबुज या फळाची लागवड केली आहे. त्यामुळे गैरअर्जदार यांचा आक्षेप मंचास स्विकार्य नाही.
तक्रारदार याने टरबुज बियाणे विकत घेतल्यानंतर दि.12.12.2014 रोजी सदर बियाणाची लागवड स्वतःच्या शेतजमीनीत केली. त्याकरीता खतपाणी व औषधीचा योग्यवेळी योग्य प्रमाणात वापर केला. तक्रारदार याने तक्रारीत नमुद केल्यानुसार बियाणे लागवडीनंतर 60 ते 70 दिवसात सदर टरबुजाच्या वेलीची वाढ होत नसल्याचे व त्यास योग्य प्रमाणात फळधारणा झाली नसल्याचे लक्षात आले. म्हणून त्याने दि.17.03.2016 रोजी उपविभागीय कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी यांना लेखी तक्रार अर्ज देऊन शेतजमिनीची स्थळ पाहणी करण्याची विनंती केली. त्यानुसार तालुका तक्रार निवारण समितीने दि.10.04.2015 रोजी तक्रारदार याच्या शेतास भेट देऊन स्थळपाहणी करुन पंचनामा केला. सदर पंचनाम्याचे अवलोकन केले असता व त्यामधील निष्कर्ष पाहिले असता टरबुजाच्या वेलीची उगवण समाधानकारक झाल्याचे त्यांना दिसून आले. पिकास फळधारणा झाल्याचे दिसून आले. लागवडीनंतर 60 दिवसांनी टरबुजाचे वेल वाळण्यास सुरुवात झाली. 200 ते 500 ग्राम वजनाची फळे वाळत गेली. क्षेत्रीय भेटीच्या वेळी पिकाची वाढीची अवस्था संपुष्टात आली होती, क्षेत्रावर फक्त वाळलेले वेल व फळे आढळून आले.सदर पंचनाम्यात तक्रारदार यांच्या शेतातील बियाण्याची उगवण समाधानकारक असल्याबददल उल्लेख आहे.सदर पंचनाम्यात जमीनीचा पोत,पोषकपणा व आवश्यक प्रमाणात ओलावा आहे किंवा नाही याचा स्पष्ट उल्लेख नाही.पंचनाम्यात तक्रार निवारण समितीने बियाण्याच्या दर्जाबाबत स्वतःचे मत स्पष्ट केलेले नाही तसेच तक्रारदार याने विकत घेतलेल्या बियाण्यांचा नमुना मंचासमोर हजर केला नाही .ज्या बॅगमध्ये सदर बियाणे भरले होते ती बॅग सुध्दा हजर केली नाही, सदर बियाणे हे सदोष आहे ही बाब सिध्द करण्याकरिता तक्रारदार याने बियाणे तपासणी करण्यासाठी विहीत मुदतीत अधिकृत प्रयोगशाळेत पाठवण्याची कायदेशीर कार्यवाही केलेली नाही.
तक्रारदार याने दाखल केलेल्या अजित 44 या वाणाच्या माहितीपत्रकाचे आम्ही अवलोकन केले. त्यावरुन सदर पिकाचा पहिला तोडा 70-75 दिवस आहे. पुर्ण कालावधी 85 ते 95 दिवस आहे असे कळते. जर तक्रारदारास टरबुज बियाणे लागवडीनंतर 60 ते 70 दिवसानंतर सदर पिकबाबतची त्रृटी लक्षात आली होती तर तक्रारदार यांनी त्याचवेळी स्थळपाहणीचा अर्ज अधिकृत अधिका-याकडे करणे गरजेचे होते. परंतू तक्रारदार याने दि.17.03.2015 रोजी म्हणजेच जवळपास 95 दिवसानंतर तक्रार दिली. याचाच अर्थ असा की, तक्रारदार याने पीक कालावधी संपल्यानंतर व उत्पन्नाचा मोबदला घेतल्यानंतर त्याची तक्रार दिली. तालुका तक्रार निवारण समितीच्या अहवालात सुध्दा क्षेत्रीय भेटीच्या वेळी पिकाची काढीची अवस्था संपुष्टात आली होती असा उल्लेख आहे. याचाच अर्थ असा की, तक्रारदार याने टरबूज पिकांचे पुर्णतः पिक समाधानकारक रित्या घेतले होते असा निष्कर्ष काढणे योग्य होईल. टरबूज बियाणे हे सदोष आहे असा उल्लेख पंचनाम्यात कुठेही नाही,त्यामुळे पंचनाम्यावर विश्वास ठेवुन बियाणेमध्ये दोष होता असा निष्कर्ष काढता येणार नाही.त्यामुळे गैरअर्जदार यांनी कोणतेही निकृष्ट दर्जाचे बियाणे तक्रारदारास दिले नाही व सेवा देण्यात त्रृटी ठेवली नाही असे या मंचाचे मत आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करता गैरअर्जदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत कसूर केला नाही. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार नामंजूर होणेस पात्र आहे. वरील कारणास्तव मुद्दा क्र. 1 चे उत्तर नकारार्थी देऊन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार नामंजुर करण्यात येते.
- खर्चाबाबत आदेश नाही.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना