(निकालपत्र पारित व्दारा.सौ.अनिता ओस्तवाल.सदस्या.)
गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदाराने गैरअर्जदाराकडून दिनांक 11/10/2013 रोजी पिकअप पॅजिओ अॅटो खरेदी केला होता, त्याचा नोंदणी क्रमांक MH-22 AA-1693 असा आहे. सदरील वाहन खरेदी करते वेळेस गैरअर्जदार व त्यांच्या एजन्सीकडून 7 महिन्याची वॉरंटी व सदरील वाहनाचे मेन्टेनन्सची वॉरंटी देण्यात आली होती, व त्याचा कालावधी 11/10/2013 ते दिनांक 10/05/2014 असा आहे.
अर्जदाराने वाहन खरेदी केल्यानंतर दोन महिन्याच्या आतच वाहनाच्या समोरील भागातील चेचिसचे वेल्डींग केलेले टाके सुटले, त्यामुळे अर्जदारास वाहन चालवीणे अशक्य झाले, त्याला त्यापोटी प्रचंड आर्थीक नुकसान झाले. सदरील बाब अर्जदाराने गैरअर्जदाराच्या प्रतिनिधीच्या निदर्शनास आणून त्यांच्याकडे लेखी तक्रार नोंदविली, तरी देखील गैरअर्जदाराने अर्जदाराचे उपरोक्त वाहन वॉरंटी मध्ये असतांना दुरुस्त करुन दिले नाही, म्हणून अर्जदाराने मंचात तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिल्या बद्द ल रु. 60,000/- किंवा वाहनाचे चेचिस बदलून द्यावे, तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु. 3,000/- मिळावेत अशा मागण्या अर्जदाराने मंचासमोर केल्या आहेत.
अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.क्रमांक 2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि. 4 वर मंचासमोर दाखल केले.
मंचाची नोटीस गैरअर्जदार यांना तामील झाल्यानंतर त्यांनी लेखी निवेदन नि. 13 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केले आहे.
गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, सदर प्रकरणात उत्पादक कंपनी आवश्यक पक्षकार असतांना देखील अर्जदाराने उत्पादक कंपनीला पक्षकार न केल्यामुळे आवश्यक पक्षकारा अभावी सदरची तक्रार अयोग्य आहे, व या कारणास्तव अर्जदाराची तक्रार खारीज करणे योग्य होईल, गैरअर्जदार हे उत्पादक कंपनीचे परभणी येथील अधिकृत विक्रेते आहेत. सदर कंपनीने उत्पादित केलेली वाहने विकणे हा त्यांचा व्यवसाय आहे. वाहनांची वॉरंटी ही उत्पादक कंपनीची असते, व वाहनाचा उत्पादनातील त्रुटी बाबत काही तक्रार असल्यास ती कंपनीच्या निदर्शनास आणून दिली जाते, व तक्रार मान्य करणे वा नाकारणे हा पूर्णपणे कंपनीचा अधिकार असतो, व अधिकृत विक्रेता यास जबाबदार नसतो, सदर प्रकरणात अर्जदाराने केलेल्या तक्रारीचे निरवारण करण्यासाठी अर्जदाराची तक्रार त्वरित उत्पादक कंपनीकडे पाठविली, तदनंतर उत्पादक कंपनीने इंजिनीअर्स, मेकॅनीक व निरीक्षक यांना परभणी येथे पाठविले, इंजिनीयर, मेकॅनिक व निरीक्षक यांनी परभणी येथे दाखल होऊन वाहनाची पूर्ण तपासणी करुन नंतर अर्जदाराची तक्रार खारीज केली, त्याचा अहवाल ही दिलेला आहे. अशा परिस्थिती मध्ये उत्पादक कंपनीस पक्षकार करणे गरजेचे होते, केवळ एवढेच नव्हेतर गैरअर्जदाराने उत्पादक कंपनीस पक्षकार करावे असा अर्ज मंचासमोर दाखल केला होता, त्यावर म्हणणे मांडतांना अर्जदाराने कंपनीस पार्टी करण्यास विरोध दर्शविला.
पूढे गैरअर्जदाराने असा बचाव घेतला आहे की, सदरचे वाहन घेतल्यावर अर्जदाराने स्वतः मागच्या बाजूस एक लोखंडी जाळीदार फ्रेम बसविलेली असल्यामुळे त्याच्या Vibration मुळे व केलेल्या कारागिरीमुळे मुळचे वेल्डींगचे टाके तुटले आहेत. झालेला प्रकार हा अर्जदाराच्या चुकीमुळे घडलेला आहे. त्याला सर्वस्वी अर्जदार जबाबदार आहे. त्यामुळे योग्य त्या कारणास्तव अर्जदाराची तक्रार उत्पादक कंपनीने खारीज केलेली आहे. व उत्पादक कंपनीने अर्जदाराचा क्लेम निरस्त केलेला असल्यामुळे यात गैरअर्जदाराचा कोणताही दोष नाही, सबब अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह खारीज करण्याची विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे.
गैरअर्जदाराने लेखी निवेदना सोबत शपथपत्र नि.14 वर व पुराव्यातील कागदपत्र नि 10 वर मंचासमोर दाखल केले.
दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिल्याचे अर्जदाराने ठोसरित्या
शाबीत केले आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1 व 2.
अर्जदाराने गैरअर्जदाराकडून दिनांक 11/10/2013 रोजी पिकअप पॅजिओ अॅटो खरेदी केला होता. सदरील वाहन खरेदी करते वेळेस गैरअर्जदाराकडून अर्जदारास 7 महिन्याची वॉरंटी मिळाली होती, त्याचा कालावधी 11/10/2013 ते दिनांक 10/05/2014 असा होता, सदरचे वाहन खरेदी केल्यानंतर 2 महिन्याच्या आतच वाहनाचा समोरील भागातील चेचिस वेल्डींग केलेले टाके सुटले, त्यामुळे अर्जदारास सदरचे वाहन चालविणे अशक्य झाल्यामुळे त्याला या पोटी प्रचंड आर्थीक नुकसान झाले. अर्जदाराने अनेक वेळा गैरअर्जदाराकडे या संदर्भात तक्रार केली, परंतु वॉरंटी मध्ये असतांना देखील गैरअर्जदाराने अर्जदारास वाहन दुरुस्ती करुन दिली नाही, अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे.
यावर गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने उत्पादक कंपनीला सदरच्या प्रकरणात पक्षकार केलेली नाही, कारण वॉरंटी ही उत्पादक कंपनी देत असते गैरअर्जदार हा उत्पादक कंपनीचा वाहन विक्रेता आहे,
पूढे गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदाराने सदरचे वाहन खरेदी केल्यानंतर मागच्या बाजुस एक लोखंडी जाळीदार फ्रेम बसविलेली असल्यामुळे त्याच्या Vibration मुळे व केलेल्या कारागिरीमुळे मुळचे वेल्डींगचे टाके तुटलेले आहे, यास सर्वस्वी अर्जदार स्वतः जबाबदार आहे. त्यामुळे अर्जदाराने जेंव्हा गैरअर्जदाराकडे या संदर्भात तक्रार केली त्यावेळेस गैरअर्जदाराने अर्जदाराची तक्रार उत्पादक कंपनीकडे पाठविली, तदनंतर उत्पादक कंपनीने इंजिनीअर्स, मेकॅनिक व निरीक्षक परभणी येथे पाठवून त्याचा अहवाल तयार केला व त्यात वरील बाबी नमुद करुन दोषपूर्ण उत्पादन असल्याचे अर्जदाराचे कथन पूर्णपणे निरस्त करुन अर्जदाराची तक्रार खारीज केली. यात गैरअर्जदाराचा कोणताही दोष नाही, असा बचाव गैरअर्जदाराने घेतलेला आहे.
यावर मंचाचे असे मत आहे की, अर्जदाराने गैरअर्जदारा विरुध्द केलेली तक्रार योग्य नाही, कारण साधारणपणे उत्पादक कंपनी ही वाहन खरेदीदारास वॉरंटी देत असते, यात विक्रेताची कोणतीही भुमिका नसते, व वॉरंटीच्या कालावधी मध्ये जर वाहनास काही दोष आढळला तर त्याची दुरुस्ती करुन देणे अथवा दुरुस्ती करणे शक्य नसल्यास तो भाग बदलून देणे, याची सर्वस्वी जबाबदारी उत्पादक कंपनीवर असते, अर्जदाराने सदरच्या प्रकरणात उत्पादक कंपनीला पक्षकार करणे आवश्यक होते, गैरअर्जदाराने तशा आशयाचा अर्ज मंचासमोर दाखल केला होता, त्यास अर्जदाराने तिव्र आक्षेप नोंदविला होता, वास्तविक पाहता अर्जदाराने त्याची दखल घेऊन त्वरित उत्पादक कंपनीला पक्षकार करणे आवश्यक होते, त्यामुळे आवश्यक पक्षकार अभावी अर्जदाराची तक्रार अयोग्य असल्याचे मंचाचे मत आहे. पूढे अर्जदाराची तक्रार मिळाल्यानंतर उत्पादक कंपनीने तज्ञ मंडळीना परभणी येथे पाठविले. या तज्ञांनी अहवाल उत्पादक कंपनीकडे पाठविला, व यात उत्पादन दोषपूर्ण असल्याचे नाकारले, व या अहवाला आधारे अर्जदारास दाद मिळाली नाही, त्याच्या तक्रारीचे निराकरण करण्यात आले नाही, यात गैरअर्जदाराचा काहीही दोष नसल्याचे मंचाचे ठाम मत असल्यामुळे मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देऊन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो.
2 दोन्ही पक्षांनी आपापला खर्च आपण सोसावा.
3 दोन्ही पक्षांना निकालपत्राच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. प्रदीप.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.