::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :-17/02/2020)
1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
2. वि.प.क्रं.1 व 2 हया क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी असून वि.प.क्रं.2 ही वि.प.क्रं.1 यांची भद्रावती येथील शाखा आहे आणि वि.प.क्रं.3 ही क्यु शॉप प्लॅन एचसी संबंधीत कपंनी असून सहारा कंपनीचीच एक शाखा आहे. तक्रारकर्तीने वि.प.क्रं.2 यांचेवर विश्वास ठेवुन वि.प.क्रं.1 यांच्याकडे 8 आर.डी.खाते काढले होते. तक्रारकर्तीने सन 2012 मध्ये तिला पैशाची आवश्यकता असल्याने तिने सदर आरडी खात्यामध्ये जमा असलेल्या पैशाची वि.प.क्रं.1 यांच्याकडे मागणी केली. परंतु त्यांनी मागणी केल्यानंतरही सदर रक्कम तक्रारकर्तीला न देता तिच्या परवानगीशिवाय सदर रक्कम “क्यु शॉप प्लॅन एच” या योजनेखाली वळती करुन त्याबाबत प्रमाणपत्र दिले. सदर रक्कम जमा केल्याचा तपशिल खालीलप्रमाणे
अ.क्र. | सर्टीफिकेट क्रं. | रक्कम | परिपक्व तिथी |
1 | 562000395403 | 6,850/- | 27/9/2018 |
2 | 562000395404 | 14,600/- | 22/10/2018 |
3 | 562000395405 | 3,400/- | 13/9/2018 |
4 | 562000395406 | 16,900/- | 13/9/2018 |
5 | 562000395407 | 4,000/- | 13/9/2018 |
6 | 562000395408 | 8,500/- | 13/9/2018 |
7 | 562000395409 | 14,600/- | 22/10/2018 |
8 | 562000395410 | 13,000/- | 14/9/2018 |
एकुण | - | 81,850/- | |
उपरोक्त रक्कम ही वि.प.क्रं.1 यांनी 72 महीन्याकरिता “क्यु शॉप प्लॅन एच” या योजनेखाली वळती केली असून सदर रक्कम ही दिनांक 13/9/18 ते दिनांक 22/10/18 या कालावधीत उपरोक्त दिलेल्या परिपक्वता तिथीला परिपक्व झाल्या. तक्रारकर्तीने सदर रक्कमेची मागणी केली असता सदर रक्कमेची परिपक्व तिथी पुर्ण झाल्याशिवाय रक्कम देता येणार नाही त्यामुळे वि.प.क्रं.1 यांनी तक्रारकर्तीस कर्ज घेण्यास सुचविले. त्यामुळे तक्रारकर्तीने वि.प.क्रं.1 यांचेकडुन दिनांक 15/12/2012 रोजी रु.61,000/- चे कर्ज घेतले. उपरोक्त ठेंवीच्या परिपक्व तिथीला व त्यानंतर सुध्दा सदर कर्जाची रक्कम वजा करुन उर्वरीत रक्कमेची विरुध्द पक्ष क्रं.1 यांना मागणी केल्यावरही त्यांनी दिनांक 19/11/18 रोजीच्या पत्रान्वये उपरोक्त ठेवींच्या रक्कमेतून कर्जाची रक्कम वजा करुन रक्कम रु.1,10,433/- पुढील 24 महिन्याकरिता गुंतवावी असे सुचित केले. परंतु तक्रारकर्तीस घराचे बांधकामाकरिता रक्कमेची आवश्यकता असल्याने तिने परत मागणी केली. सदर रक्कम विरुध्द पक्षांनी न दिल्याने तक्रारकर्तीने दिनांक 21/12/18 रोजी अधिवक्ता श्री पाचपोर यांचे मार्फत विरुध्द पक्ष 1 व 2 यांना पंचीबध्द डाकेने नोटीस पाठवून रक्कम रु. 1,10,433/- ची मागणी केली. सदर नोटीस विरुध्दपक्ष क्रं.1 यांना दिनांक 22/12/18 व विरुध्दपक्ष क्रं.2 यांना दिनांक 27/12/18 रोजी प्राप्त झाला. सदर नोटीस प्राप्त होऊनही विरुध्दपक्षांनी त्याची पुर्तता केली नाही. सबब तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रं.1 ते 3 यांचे विरुध्द मंचासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली की विरुध्द पक्ष क्रं.1 ते 3 यांनी वैयक्तीकरित्या किंवा सयुंक्तरित्या रक्कम रु. 1,10,433/- व सदर रक्कम तक्रारकर्तीच्या हातात पडेपर्यंत त्यावर 18% व्याज तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.50,000/- व तक्रार खर्च रु.10,000/- तक्रारकर्तीस देण्याचा आदेश पारित करण्यात यावा अशी विनंती केली.
3. तक्रारकर्तीची तक्रार स्विकृत करुन विरुध्दपक्ष क्रं. 1 ते 3 यांना नोटीस काढण्यात आली. विरध्द पक्ष क्रं.1 व 2 हे प्रकरणात उपस्थित होऊन त्यांनी प्राथमिक आक्षेपासह आपले लेखी कथन दाखल केले.
विरुध्द पक्ष हे सव्हिर्स प्रोव्हायडर असल्याने तक्रारकर्तीही त्यांची ग्राहक नाही. तसेच आपल्या लेखी उत्तरात पुढे नमुद केले की, तक्रारकर्तीने सदर मुदतठेवीच्या रक्कमेची मागणी ही “क्यु शॉप प्लॅन एच” या योजनेमध्ये केली आहे. सदर योजना ही विरुध्द पक्षांची नसुन त्यांनी ती योजना राबविली नाही. सदर योजना ही विरुध्दपक्ष क्रं.3 यांची आहे. विरुध्द पक्ष क्रं. 1व 2 ही वेगळी संस्था असुन त्यांचा विरुध्दपक्ष क्रं. 3 च्या योजनेशी काहीही संबंध नसुन त्या एकमेकांच्या नियंत्रणखाली नाहीत. तक्रारकर्तीने सदर ठेवीची रक्कम ही उपरोक्त योजने अंतर्गत मागणी केलेली आहे. विरुध्द पक्षांचा सदर ठेंवीशी काहीही संबंध नसुन ते सदर रक्कम तक्रारकर्तीस देण्यास जबाबदार नाहीत. सबब तक्रारकर्तीची तक्रार ही आधारहीन असल्याने खर्चासह खारीज होण्यास पात्र आहे.
4. विरुध्द पक्ष क्रं.3 यांना नोटीस प्राप्त होऊन सुध्दा ते मंचासमोर उपस्थित न झाल्याने त्यांचे विरुध्द निशाणी क्रं.1 वर दिनांक11/2/2020 रोजी एकतर्फा आदेश पारित केला.
5. तक्रारकर्तीची तक्रार, दस्तावेज,शपथपत्र व तक्रार अर्ज व शपथपत्र यालाच तक्रारकर्तीचा लेखी व तोंडी युक्तीवाद समजण्यात यावा अशी निशाणी क्रं. 15 वर पुरसीस दाखल. विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांचे लेखी उत्तर, लेखी कथनालाच विरुध्द पक्षांचा पुरावा समजण्यात यावा अशी निशाणी क्रं. 17 वर पुरसीस दाखल, लेखी युक्तिवाद, तक्रारकर्ती व विरुध्दपक्ष क्रं.1 व 2 यांचे तोंडी युकतीवाद आणि परस्पर विरोधी कथनानुसार खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(1) तक्रारकर्ती विरुद्ध पक्षांची ग्राहक आहेत काय ? होय
(2) विरुद्ध पक्षांनी तक्रारकर्त्याप्रति न्युनतापूर्ण सेवा दिली आहे काय ?
होय
(3) तक्रारकर्ती मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय ? अंतीम आदेशानुसार
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
6. तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांचे मार्फत विरुध्द पक्ष क्रं. 3 यांचेकडे खालील तक्त्यानुसार “क्यु शॉप प्लॅन एच” या योजनेखाली जमा केली त्याचा तपशिल खालीलप्रमाणे
अ.क्र. | सर्टीफिकेट क्रं. | रक्कम | परिपक्व तिथी |
1 | 562000395403 | 6,850/- | 27/9/2018 |
2 | 562000395404 | 14,600/- | 22/10/2018 |
3 | 562000395405 | 3,400/- | 13/9/2018 |
4 | 562000395406 | 16,900/- | 13/9/2018 |
5 | 562000395407 | 4,000/- | 13/9/2018 |
6 | 562000395408 | 8,500/- | 13/9/2018 |
7 | 562000395409 | 14,600/- | 22/10/2018 |
8 | 562000395410 | 13,000/- | 14/9/2018 |
एकुण | - | 81,850/- | |
उपरोक्त रक्कम ही वि.प.क्रं.1 व 2 यांनी 72 महीन्याकरिता क्यु शॉप प्लन एच” या योजनेखाली वळती केली. तसेच वि.प.क्रं. 2 “क्यु शॉप सहारा युनिक प्रॉडक्टस या योजनेखाली सन 2012 मध्ये रक्कम गुंतवणूक केली होती तसेच पुढे पण आमच्या शाखेमध्ये रक्कम गुंतवणूक करावी असे नमुद आहे. विरुध्द पक्षांनी सदर गुंतवणुक/ ठेवीचे प्रमाणपत्र दिले असुन सदर प्रमाणपत्र निशाणी क्रं. 4 वरील दस्त क्रंमाक 1 ते 8 वर दिनांक 19/11/18 चे पत्र तक्रारकर्तीने अभिलेखावर वर दाखल केले आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांचा विरुध्द पक्ष क्रं. 3 यांचा कांहीही सबंध नाही हा त्यांचा आक्षेप ग्राहय धरण्या योग्य नाही. वरील विवेंचनावरुन तक्रारकर्तीही विरुध्द पक्षांची ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब मुददा क्रमांक 1 चे उत्तर हे होकारार्थी नोदंविण्यात येते.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
7. तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांचेकडे अनुक्रमे दिनांक 13/9/12, 13/9/12, 22/10/12, 22/10/12, 14/9/12, 27/9/12, 13/9/12, 13/9/12 रोजी अनुक्रमे रक्कम रु. 8,500/-, 4,000/-, 14,600/-, 14,600/-, 13,000/-, 6,850/-, 3,400/-, 16,900/- असे एकुण रक्कम रु. 81,850/- जमा केली. सदर रक्कमेच्या परिपक्वता रक्कमेतुन कर्ज रक्कम रु. 61,000/- वजा करुन एकुण रक्कम रु. 1,10,433/- देणे आहे असे विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी दिलेल्या पत्राच्या तपशिलामध्ये नमुद आहे. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्तीस सदर रक्कमेच्या परिपक्वता तारखेला म्हणजे दिनांक 15/12/15 रोजी परिपक्वता रक्कम न देता तिला कर्ज म्हणुन रक्कम रु. 61,000/- दिले व उर्वरीत रक्कम ही विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांचा एजंट पराग देवगडे मार्फत विरुध्द पक्ष क्रं. 3 यांचेकडे उपरोक्त परिपक्वता रक्कम गुंतविली होती व सदर रक्कम हि सप्टेंबर 2018 व ऑक्टोबर 2018 मध्ये देय झाली. परंतु त्यांनी सदर रक्कमेमधुन कर्ज रक्कम रु. 61,000/- वजा करुन एकुण रक्कम रु. 1,10,433/- एवढी रक्कम परत करावयाची आहे. परंतु कंपनीच्या आर्थिक अडचणीमुळे विरुध्दपक्ष हे उर्वरीत रक्कम देण्यास असमर्थ आहेत व त्यांनी तक्रारकर्तीस रक्कम रु. 1,10,433/- परत 24 महिन्याकरिता जमा ठेव म्हणुन आमच्या शाखेमध्ये परत गुंतवावी असे सुचित केले. सदर पत्रावर विरुध्द पक्ष क्रं. 2 यांचा सही व शिक्का आहे. सदर पत्र निशाणी क्रमांक 4 वरील दस्त क्रमांक अ-9 वर दाखल आहे. यावरुन तक्रारकर्तीने विरुध्दपक्षांकडे उपरोक्त तपशिलानुसार रक्कम जमा केली होती व सदर रक्कम परिपक्वता तिथीला म्हणजेच 2015 परत न करता तिला कर्ज घेण्यास भाग पाडले व आता सुध्दा सप्टेंबर 2018 व ऑक्टोबर 2018 मध्ये उपरोक्त रक्कम परिपक्व झाली व तक्रारकर्तीने सदर रक्कमेची वारंवार मागणी करुनही तिला न देता सदर रक्कम पत्रान्वये त्यांच्या शाखेमध्ये परत गुंतविण्यास सांगत आहे. विरुध्द पक्ष हे एकमेकांशी संबंधित आहेत हे सदर पत्रावरुन निदर्शनास येते. त्यामुळे विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांचा विरुध्द पक्ष क्रं. 3 यांच्या सोबत कांहीही संबध नाही हा त्यांचा आक्षेप ग्राहय धरण्यायोग्य नाही. तसेच विरुध्द पक्ष क्रं. 3 यांनी तक्रारीत उपस्थित राहुन आपल्या बचावा पुष्टर्थ कांहीही दाखल केले नाही. मंचाच्या मते तक्रारीत दाखल दस्तावेजावरुन विरुध्द पक्षांनी तक्रारकर्तीस सदर रक्कम न देऊन तक्रारकर्ती प्रती सेवेत न्युनता केली हे सिध्द होते. त्यामुळे विरुध्द पक्ष हे तक्रारकर्तीस कर्ज रक्कम वजा जाता, रक्कम रु. 1,10,433/- व्याजासह तसेच रक्कम वेळेवर न दिल्याने तिला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
8. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्तीची तक्रार क्र.18/2019 अशंत: मंजूर करण्यात येत आहे.
(2) विरुद्ध पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी वैयक्तिक किंवा सयुंक्तरित्या तक्रारकर्तीस उपरोक्त मुदतठेवींची परिपक्वता रक्कमेतून कर्ज रक्कम वजा करुन रक्कम रूपये 1,10,433 / व त्यावर तक्रार दाखल दिनांक 23/1/19 पासून रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 9 % टक्के दराने व्याजासह दयावे.
(3) विरुद्ध पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी वैयक्तिक किंवा सयुंक्तरित्या तक्रारकर्तीस झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई रक्कम रु.15,000/- व तक्रारखर्च रू.10,000 /- तक्रारकर्तीस दयावी.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.