न्या य नि र्ण य
(दि.29-04-2024)
व्दाराः- मा. श्री स्वप्निल मेढे, सदस्य
1) तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रार अर्ज हा सामनेवाला यांनी तक्रारदाराला उत्पादित दोष असलेले वाहन देऊन तक्रारदारास दयावयाचे सेवेत त्रुटी केलेने सामनेवाला विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा-2019 चे कलम 35 अन्वये दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथने थोडक्यात पुढील प्रमाणे-
तक्रारदार हे रत्नागिरी येथील कायम रहिवासी आहेत. सामनेवाला क्र.2 ही आयशर मॉडेलचे उत्पादक असून सामनेवाला क्र.1 हे सामनेवाला क्र.2 चे कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या चार जिल्हयाकरिता अधिकृत डिलर आहेत. तक्रारदार यांना सामनेवाला क्र.2 कंपनीची 5016 हे आयशरचे मॉडेल घ्यायचे होते. त्यासाठी तक्रारदार सामनेवाला क्र.1 यांचेकडे गेले असता सामनेवाला क्र.1 च्या कर्मचा-यांनी तक्रारदारास आयशर 3016 या मॉडेलबाबत माहिती सांगितली की, सदर मॉडेलला वोल्व्होची टेक्नॉलॉजी आहे. त्यामुळे सदर वाहन वापरल्याने खूप समाधान मिळेल व सदर वाहन ॲव्हरेजलादेखील चांगले असलेचे सांगितले. त्यांचे बोलण्याला भुलून तक्रारदाराने आयशर 3016 ही नवीन गाडी घेण्याचे ठरविले. गाडीची एकूण किंमत रक्कम रु.23,83,000/- होती. मात्र त्यावेळी चालू असणा-या स्किमनुसार रक्कम रु.2,00,000/- चा डिस्काऊंट तक्रारदारास दिला. तक्रारदाराने सुंदरम फायनान्स यांचेकडून रक्कम रु.18,00,000/- कर्ज घेतले व तक्रारदाराने रक्कम रु.2,78,000/- मार्जिन मनी भरुन एकूण रक्कम रु.21,83,000/- ला वाहन खरेदी केले. तक्रारदाराने घेतलेले कर्जाचा कालावधी हा 5 वर्षासाठी असून त्याचा मासिक हप्ता रक्कम रु.39,300/- एवढा आहे. तक्रारदार जेव्हा दि.30/11/2018 रोजी गाडी आणण्यासाठी सामनेवाला क्र.1 यांच्या वाठार येथील शोरुमला गेला. त्यावेळी सामनेवाला यांनी तक्रारदाराची गाडी आधीच टेंपररी पासिंग करुन ठेवली होती. तक्रारदाराने गाडी सुरु करुन पाहिली असता गाडीचे रनिंग 2019 किलोमिटर इतके झाले होते. त्यामुळे तक्रारदार यांनी गाडी घेणेस नकार दिला होता. त्यावेळी सामनेवाला क्र.1 चे अधिकारी / कर्मचारी यांनी ही एकमेव गाडी आमच्याकडे शिल्लक आहे व सदर गाडीचे पासिंग तुमच्या नांवे केलेले आहे व गाडीच्या किंमतीचा चेक कंपनीकडे गेलेला आहे असे सांगितले. नाईलाजाने तक्रारदारास सदरची गाडी घ्यावी लागली. तक्रारदाराने सदर गाडी रत्नागिरी आर.टी.ओ.मधून पासिंग करुन दापोलीला नेली. सदर गाडीचा नंबर MH-08-AP-4842 असा आहे व इंजिन नंबर E414CDJK243889 व चेसिस नंबर MC2H5JRCOJJ153134 असा आहे. गाडीच्या इंजिन व ट्रान्समिशनची वॉरंटी 4 वर्षाची आहे. तक्रारदार त्यांचे व कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी स्वत:च गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करुन गाडीतून लाकडांची वाहतूक करतात. सदर गाडीची क्षमता 12500 किलो वजन वाहून नेण्याची होती. परंतु सदर गाडीला 8 टन वजन नेण्याची क्षमता असलेल्या स्प्रिंगा असल्याने गाडीचे पाटे अनेकवेळा तुटले. त्यानंतर तक्रारदाराने दि.30/12/2018 रोजी सामनेवाला क्र.1 यांच्या सांगली येथील वर्कशॉपमध्ये गाडीचे पहिले फ्री सर्व्हिसिंग करुन घेतले.त्यानंतर 15 दिवसांनी तक्रारदारची गाडी मुंबई येथे जात असताना लाटवण गावाजवळ गाडीमध्ये Engine Check चा लाईट लागून High Immigration चा मेसेज गाडी दाखवू लागली. अशावेळी गाडी बंद पडते व त्यानंतर सुरु होत नाही. मोबाईलवरील कोड मॅच होऊनही गाडी सुरु होत नाही. त्यानंतर तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांना फोन केला असता त्यांचा मेकॅनिक चार दिवसांनी येऊन गाडी सुरु करुन शोरुमला घेऊन गेला व आठ दिवस गाडी तेथेच होती. त्यानंतर तक्रारदाराची गाडी प्रत्येक महिन्यामध्ये किमान एकदा रस्त्यामध्ये बंद अवस्थेत उभी राहिली अगर वर्कशॉपला रिेपेरिंगसाठी न्यावी लागली. सदर गाडीचे पाटे व गिअर प्रत्येक महिन्याला तुटले. तक्रारदाराला दोन वर्षामध्ये अनेकवेळा गाडी दुरुस्तीसाठी वर्कशॉपला न्यावी लागलेने तक्रारदारास व्यवसायाचे नुकसान होऊन तक्रारदाराला प्रचंड आर्थिक अडचणीला तोंड दयावे लागले. तसेच सदर गाडीचे कर्जाचे हप्तेही भरणे कठीण होऊन बसले. मार्च-2019 मध्ये तक्रारदाराच्या गाडीचे रनिंग 16,822 किलोमिटर झाले असताना तक्रारदाराची गाडी पुन्हा बंद पडली. त्यावेळी सदर गाडीचे गिअर तुटलेले होते, तसेच ट्रकचे टायर गरम झाल्याने टायरटयुब निकामी झाली होती. तसेच गाडीचे मायलेजदेखील 3.5 किलोमिटर एवढेच मिळत होते. त्यावेळी याकामांसहित गाडीचे क्लच डिस्क असेंब्ली, क्लच कव्हर असेंब्ली, वेल्डिंग रॉड वगैरे सर्व कामे करावी लागली. गाडीचे कामाचे बील रक्कम रु.20,581.18/- इतके झले. वास्तविक गाडी घेऊन चार महिन्यामध्ये क्लच संदर्भात दोष निमार्ण होणे ही गाडीचा उत्पादित दोष आहे. मूळात सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेल्या गाडीमध्ये अनेक प्रकारचे उत्पादित दोष होते. त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 व 2 यांना वकीलांमार्फत दि.23/03/2019 रोजी नोटीस पाठविली असता सामनेवाला क्र.1यांना नोटीस मिळूनदेखील त्यांनी सदर नोटीसला कोणतेही उत्तर दिले नाही. सामनेवाला क्र.2 यांनी दि.17/04/2019 रोजी नोटीसीस खोटी व खोडसाळ उत्तरे देऊन त्यांची जबाबदारी नाकारली. त्यानंतर पुन्हा 24/03/2019 रोजी गाडीमध्ये प्रॉब्लेम निर्माण झाला. त्यावेळी रक्कम रु.6,373.82/- इतके दुरुस्तीचे बील तक्रारदाराला भरावे लागले. सामनेवाला क्र.1 यांनी सदर गाडीमध्ये परस्पर अल्टरेशन करुन त्याला मोठी बॅटरी बसवून फ्युज बॉक्स बसवून दिला. त्यामुळे फ्युज ऊडून वारंवार गाडी रस्त्यामध्ये ब्रेकडाऊन होते. त्यानंतर दि.29/11/2019 रोजी गाडीमध्ये पुन्हा दोष निर्माण झाला. त्यावेळी रक्कम रु.10,458.17/- तक्रारदाराकडून भरुन घेतले. प्रत्येकवेळी सामनेवाला यांच्या वर्कशॉपमध्ये तक्रारदाराची गाडी अडकून पडल्यामुळे तक्रारदाराला किमान 10ते 12 लाख रुपयांचा नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. दि.09/12/2020 रोजी गाडीच्या पाटयाचे व इतरअनुषंगिक कामासाठी रक्कम रु.8850/- इतका खर्च करावा लागला. तसेच गाडीला स्पिड गव्हर्नर सर्टिफिकेट देण्यासाठी सामनेवाला क्र.1 यांनी रक्कम रु.2,503.16/- भरुन घेतले.
सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास उत्पादित दोष असलेली डेमेाची गाडी नवीन गाडी म्हणून विकली. त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाला यांना सदर गाडी बदलून दुसरी नवीन गाडी देण्याची मागणी सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडे केली. परंतु सामनेवाला यांनी त्यास कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सबब गाडीतील उत्पादित दोष दूर होणे शक्य नसल्याने तक्रारदाला नवीन गाडी देण्याचे आदेश सामनेवाला यांना दयावेत, अथवा गाडीमधील दोष संपूर्ण दुर करुन, गाडीचे सर्व पार्ट नवीन बसवून वादग्रस्त गाडी पूर्णपणे दुरुस्त करुन देण्याचे व त्याला रितसर नव्यासारखी वॉरंटी देण्याचे आदेश सामनेवाला यांना करण्यात यावेत. तेही शक्य नसल्यास सामनेवाला क्र.1 यांनी रक्कम रु.21,83,000/- व त्यावर दि.30/11/2018 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.18 % दर व्याजाने तक्रारदाराला परत देण्याचे आदेश सामनेवाला यांना दयावेत. शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.15,00,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.50,000/- तक्रारदाराला देणेबाबत सामनेवाला यांना आदेश व्हावेत अशी विनंती तक्रारदाराने केली आहे.
2) तक्रारदाराने त्याचे तक्रारीच्या पुष्टयर्थ तक्रारीसोबत नि.6 कडे एकूण 16 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्यामध्ये तक्रारदाराच्या गाडीचे आरसी बुक, इन्शुरन्स पॉलिसी, सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेली तीन पत्रे, गाडी दुरुस्तीचे काम केल्याचे दि.09/03/2019, दि.27/03/2019, दि.29/11/2019 ची बीले, तक्रारदाराने सामनेवाला यांना पाठविलेली वकीलांमार्फतची कायदेशीर नोटीस, सदर नोटीस सामनेवाला क्र.1 व 2यांनापोहोचलेची पोष्टाची पोहोच पावती, सामनेवाला क्र.2 यांनी सदर नोटीसला दिलेले उत्तर, दि.09/12/2020 रोजी गाडीच्या पाटयांचे कामाचे बील, वाहनाच्या ऑपरेटर्स म्यॅन्युअलमधील पान नं.3-2 व 3-8 ची प्रत, दि.11/12/2020 रोजी सामनेवाला क्र.1यांचे वर्कशॉपची पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.नि.19 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.21कडे एकूण 20 कागदपत्रे दाखल केली आहेत.त्यामध्ये सामनेवाला क्र.1यांचे वेगवेगळया वर्कशॉपमध्ये गाडीची केलेल्या कामाची बीले दाखल केली आहेत. तसेच क्रेन सर्व्हीसचे टोईंगचे बील, सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेल्या चालक मार्गदर्शक पुस्तकांतील पांनाच्या झेरॉक्स प्रती व गाडी खरेदीचे बील दाखल केले आहे. नि.25 कडे एकूण 2 कागदपत्रे दाखल केली असून त्यामध्ये सामनेवाला कंपनीच्या तुर्भे, मुंबई येथील शोरुममध्ये तक्रारदाराचे वाहनाच्या कामाचे दि.13/10/2021 व 23/10/2021 चे बील दाखल केले आहे. नि.26 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि.35 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
3) सामनेवाला क्र.1 हे त्यांचे वकीलांमार्फत याकामी हजर झाले असून त्यांनी नि.14 कडे त्यांचे लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. त्यांचे लेखी म्हणणेमध्ये सामनेवाला यांनी तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. सामनेवाला क्र.1 त्यांचे म्हणणेत पुढे कथन करतात की, सामनेवाला क्र.1 ही भागीदारी फर्म असून आयशर कंपनीचे अधिकृत डिलर म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार हे वखार व्यावसायिक असून सदर तक्रारीतील वाहनाचा वापर तक्रारदार व्यवसायिक कारणांसाठी करतात. तक्रारदार यांनी आयशर प्रो-3016 या मॉडेलच्या अजवड वाहनाची स्वेच्छेने ऑर्डर सामनेवाला क्र.1 यांचेमार्फत सामनेवाला क्र.2 यांना दिली. सदर तक्रारदारने बुकींग केलेले वाहन सामनेवाला क्र.2 यांच्या इंदोर, मध्यप्रदेश येथील कार्यालयामधून सामनेवाला क्र.1 यांनी बाय-रोड आणले असून त्याची सरकारी कागदोपत्री नोंद आहे. सबब तक्रारदारास डेमोचे वाहन विक्री करणेचा प्रश्नच उर्दभवत नाही. सदर वाहनाचे इंजिन हे Volvo eicher engine-3016-494 असून सदर वाहनाचे एकूण वजन 12500 किलोग्रॅम आहे. सदरचे वाहन डिझेलवर चालते. तक्रारदारांकडून सदरचे वाहनाची योग्य ती निगा घेणेत आलेली नाही. सदर वाहनावरील ड्रायव्हरने सदर वाहन वेळोवेळी चुकीच्या पध्दतीने चालविले व हाताळले आहे. त्यामुळे सदर तक्रारीस Estoppel by Conduct या कायदेशीर तत्वाचा बाध येतो. दि.17-10-2020रोजी कंपनी नियमानुसार मूळ बॅटरी डेड झालेने विनाशुल्क नवीन बॅटरी बसवून दिलेली आहे. तसेच क्लच प्लेट बर्निंग झाले होते, प्रेशन प्लेटस जळाले होते, बॅटरी डेड झाली होती, गिअर बॉक्स नादुरुस्त झाला होता. दि.22-01-2019 रोजी गिअर बॉक्स वॉरंटीमध्ये बदलून दिला होता. तसेच नि.20/04/2019 रोजी पॉवर स्टेअरींग पाईप बदलून दिली होती. तसेच सदर वाहनाचे पाटे तुटणे, व कथित टायर टयुब निकामी होणे ही बाब याकामी प्रथमत: उपस्थित केली आहे. तक्रारदाराच्या वाहनाचे दि.05/03/2019 रोजीच्या जॉबकार्डमध्ये रनिंग 16822 किलोमिटर इतके होते, दि.25/09/2020 रोजीच्या जॉबकार्डमघ्ये रनिंग 79796 इतके होते. तर दि.17-10-2020 रोजीच्या जॉबकार्डवर रनिंग 79902 इतके किलोमिटर होते. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदाराचे वाहनास स्पिड गव्हर्नर प्रमाणपत्र प्राप्त होणेसाठी सदर वाहनाचे कॅलीब्रेशन करुन दिले आहे. सदर कॅलिब्रेशनचे शुल्क आकाणेत आले होते. तसा सामनेवाला क्र.1 यांना अधिकार आहे. तसेच फ्री सर्व्हीसिंगच्यावेळी अगर वाहन दुरुस्तीवेळी वॉरंटीमध्ये समाविष्ट नसलेल्या पार्टसची ऑईलची किंमत आकारणी करणेचा अधिकार सामनेवाला क्र.1 यांना आहे. याकामी निव्वळ सहानुभूती प्राप्त करणेसाठी तसेच नुकसानीबाबतची व मॅन्युफॅक्चरींग डिफेक्टबाबतची रचनात्मक व खोटे वाद कथने करुन तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.सबब प्रस्तुतची तक्रार खर्चासह नामंजूर व्हावी व तक्रारदाराकडून सामनेवाला क्र.1 यांना एक्झेम्प्लरी कॉस्ट रु.1,00,000/- मिळावी अशी विनंती सामनेवाला क्र.1 यांनी याकामी केली आहे.
4) सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे म्हणणेच्या पुष्टयर्थ नि.28 कडे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. तसेच नि.48 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
5) सामनेवाला क्र.2 हे त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी सदर कामी नि.15 कडे इंग्रजीमध्ये म्हणणे दाखल केले. त्यानंतर नि.18 कडे मराठीमधील म्हणणे दाखल केलेले आहे. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली असून सदर सामनेवाला यांचे म्हणणेत पुढे कथन करतात की, तक्रारदार यांनी तक्रारीतील नमुद वाहन हे नफा मिळविण्याकरिता व्यावसायिक उद्देशाने खरेदी केलेले असलेने सदरचही तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र या आयोगास येत नाही. तसेच तक्रारदार यांनी तक्रारीमध्ये तक्रारदारास डेमो वाहन दि.30/11/2018 रोजी ताब्यात दिले असलेचे कथन केलेले आहे. त्यामुळे सदरची तक्रार मुदतीत नाही. सबब सदरची तक्रार फेटाळण्यात यावी. तक्रारदाराने सेवेतील कमतरतेबाबतचे केलेले सामनेवाला विरुध्दचे आरोप शाबीत करणेची संपूर्ण जबाबदारी तक्रारदार यांची आहे. तथापि सामनेवाला क्र.1 यांच्याकडून काही कमतरता असेल तरी सध्याच्या प्रकरणात ते सामनेवाला क्र.2 यांची आहे असे म्हणता येणार नाही. विक्री पश्चात सेवा पुरविण्याच्या संदर्भात सामनेवाला क्र.1 व 2 यांचे थेट संबंध नाहीत. तसेच तक्रार अर्जाचा विषय असणा-या वाहनामध्ये कोणत्याही प्रकारचे उत्पादन दोष नाहीत. वॉरंटीचे कालावधीमध्ये विक्री नंतरची सेवा ही सामनेवाला क्र.1 यांची जबाबदारी आहे. सामनेवाला क्र.2 यांची नाही. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी एकमेकांचेसोबत प्रिन्सीपल टू प्रिन्सिपल तत्वाने डिलरशिप करार केलेला आहे. त्यामुळे सामनेवाला क्र.1 यांनी केलेल्या तथाकथीत त्रुटीबाबत सामनेवाला क्र.2 यांना दोषी धरता येणार नाही. सबब तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती सामनेवाला क्र.2 यांनी केली आहे.
6) सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे सोबत अधिकारपत्राची प्रत दाखल केली आहे. नि.37 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.38 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि.39 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
7) वर नमुद तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, दाखल कागदपत्रे तसेच सामनेवाला क्र.1 व 2 यांचे लेखी म्हणणे, दाखल कागदपत्रे व उभय पक्षकारांचा लेखी व तोंडी युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन करता सदर आयोगाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ खालील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | सदर तक्रारीस Estoppel by Conduct या कायदेशीर तत्वाचा बाध येतो काय? | नाही |
3 | प्रस्तुतची तक्रार चालविण्याचे अधिकार या आयोगास आहेत काय? तसेच सदरची तक्रार मुदतीत आहे काय? | होय. |
4 | सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारास सदोष वाहन विक्री करुन तक्रारदारास सदोष सेवा पुरविली आहे काय? | होय. |
5 | तक्रारदार हे सामनेवाला यांचेकडून सदोष वाहनाच्या विक्रीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत काय ? | होय. |
6 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
-वि वे च न
–
8) मुद्दा क्रमांकः 1 – तक्रारदार हे स्वत:च्या व कुटूंबाच्या उदरनिर्वाहकरिता स्वयंरोजगाराचे व्यवसाय करणेसाठी तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 चे उत्पादित आयशर 3016 या मॉडेलचे वोल्व्होची टेक्नॉलॉजी असलेले इंजिन नंबर E414CDJK243889 व चेसिस नंबर MC2H5JRCOJJ153134 व नंबर MH-08-AP-4842 असा असलेले वाहन एकूण रक्कम रु.21,83,000/- ला सामनेवाला क्र.1 यांचेकडून खरेदी केले. सदर वाहनाचे आरसी बुक व इन्शुरन्स पॉलीसी तक्रारदाराने याकामी नि.6/1 व 6/2 कडे दाखल केली आहे. तसेच नि.21/18 कडे सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास वाहन खरेदीची दिलेली पावती दाखल केली आहे. यावरुन तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांचे उत्पादित वाहन सामनेवाला क्र.1 याचेकडून खरेदी केलेचे स्पष्ट होते. तसेच सदरची बाब सामनेवाला क्र.1 व 2 यांनी त्यांचे म्हणणेमध्ये नाकारलेली नाही. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक असलेचे व सामनेवाला हे विक्रेते/ सेवापुरवठादार असलेची बाब निर्विवादपणे सुस्पष्ट होते. सबब तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
9) मुद्दा क्रमांकः 2 –सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे म्हणणेमध्ये तक्रारदाराने सदरचे वाहन व्यवसायासाठी वापरत असलेचे व सदरच वाहन वेळोवेळी चुकीच्या पध्दतीने चालविले व हाताळले असलेचे व सदर वाहनाची योग्य ती निगा राखली नसलेचे कथन केले आहे. त्यामुळे सदर तक्रारीस Estoppel by Conduct या कायदेशीर तत्वाचा बाध येतो असे कथन केले आहे. परंतु सदर नमुद वाहन तक्रारदाराने चुकीच्या पध्दतीने चालविलेबाबत अथवा सदर वाहनाची योग्य ती काळजी तक्रारदाराने घेतली नसलेबाबतचा कोणताही पुरावा याकामी सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेला नाही. त्यामुळे सामनेवाला क्र.1 यांचा सदर तक्रारीस Estoppel by Conduct या कायदेशीर तत्वाचा बाध येतो असा घेतलेला आक्षेप हे आयोग फेटाळत आहे. सबब मुद्दा क्र.2चे उत्तर हे आयोग नकारार्थी देत आहे.
10) मुद्दा क्र.3 :- सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे म्हणणेमध्ये तक्रारदार यांनी सदरचे वाहन हे वैयक्तिक कारणसाठी घेतलेले नसून व्यवसायिक कारणसाठी घेतलेले आहे त्यामुळे या आयोगास तक्रारदाराची तक्रार चालविण्याचा अधिकार नाही तसेच तक्रारदाराने तक्रारीत नमुद वाहन हे 30/11/2018 रोजी ताब्यात घेतलेने सदरची तक्रार मुदतीत नाही असे कथन केले आहे. तक्रारदाराने त्यांचे तक्रारीमध्ये सदरचे वाहन हे स्वयंरोजगारासाठी व्यावसायिक कारणासाठी घेतलेचे नमुद केले आहे. तसेच सदरचा व्यवसाय हा त्याचे स्वत:चे व कुटूंबाचे उदरनिर्वाहकरिता करत असलेचे कथन केले आहे. तक्रारदार हा सदरचा व्यवसाय मोठया प्रमाणात करत असलेचा अथवा त्याचेकडे जास्त प्रमाणात व्यवसायिक वाहने असलेबाबतचा कोणताही पुरावा सामनेवाला यांनी याकामी दाखल केलेला नाही. तसेच तक्रारदार यांनी दि.30/11/2018 रोजी जरी वाहन ताब्यात घेतले असले तरी सदर वाहनाच्या दुरुस्तीसाठी तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांचे वर्कशॉपमध्ये दिलेचे तक्रारदाराने याकामी दाखल केलेल्या बीलावरुन स्पष्ट होते. तसेच तक्रारदाराने नि.23/03/2019 रोजी सामनेवाला क्र.1 व 2 यांना पाठविलेली कायदेशीर नोटीस पाहता सदरची तक्रार मुदतीत असलेचे स्पष्ट होते. सबब तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक असलेने सदरची तक्रार या आयोगास चालविण्याचे अधिकार आहेत. तसेच सदरची तक्रार मुदतीत असलेने सामनेवाला क्र.2 यांनी या आयोगास सदरची तक्रार चालविण्याचे अधिकार नाहीत व सदरची तक्रार मुदतीत नाही असे घेतलेले आक्षेप हे आयोग फेटाळत आहे. सबब मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
11) मुद्दा क्र.4 :- तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 चे उत्पादित आयशर 3016 या मॉडेलचे वोल्व्होची टेक्नॉलॉजी असलेले वाहन एकूण रक्कम रु.21,83,000/- ला सामनेवाला क्र.1 यांचेकडून दि.30/11/2018 रोजी खरेदी केले. त्यासाठी तक्रारदार यांनी सुंदरम फायनान्स यांचेकडून कर्ज घेतले होते. सदरचे वाहनाचा वापर करत असताना दि.09/03/2019 रोजी सामनेवाला यांचे वर्कशॉपला सदर वाहन दुरुस्तीसाठी दिलेचे नि.6/6 कडील सामनेवाला क्र.1 यांच्या जॉबकार्डवरुन स्पष्ट होते. यावरुन सदरचे नवीन वाहन घेऊन चार महिने झाले असताना सदर वाहनामध्ये दोष दिसून आला. तसेच सदर जॉबकार्डचे अवलोकन केले असता सदरवाहनाचे क्लेच प्लेट, क्लच कव्हर, वेल्डिंग रॉड बदललेचे दिसून येते तसेच ॲव्हरेज टेस्टींग केलेचे दिसून येते. त्यानंतर दि.27/03/2019, दि.29/11/2019 रोजी सदर वाहनाचे काम केलेचे नि.6/7 व 6/8 कडील जॉबकार्डवरुन स्पष्ट होते. तसेच नि.21/1 ते 21/4 कडील बील पाहता तसेच दि.31/01/2021, 10/02/21, 13/02/21, 23/01/21, 07/08/21, 21/08/21,03/09/21, 04/09/21, 06/09/21, 24/09/21, 25/09/21 रोजी केलेल्या कामाचे बीलांचे अवलोकन करता तक्रारदार यांची सदर गाडी ही वरचेवर बंद पडत होती व ती वारंवार दुरुस्तीसाठी सामनेवाला यांचे वर्कशॉपमध्ये तक्रारदारांना सोडावी लागत होती. त्यामुळे तक्रारदार यांना नुकसान झालेचे असलेचे स्पष्ट होते.
सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदाराने वाहन खरेदी केल्यानंतर तक्रारदारांकडून सदरचे वाहनाची योग्य ती निगा ठेवली नाही. तसेच सदर वाहनावरील ड्रायव्हरने सदर वाहन वेळोवेळी चुकीच्या पध्दतीने चालविले व हाताळले आहे. तसेच क्लच प्लेट बर्निंग झाले होते, प्रेशन प्लेटस जळाले होते, बॅटरी डेड झाली होती, गिअर बॉक्स नादुरुस्त झाला होता. दि.22-01-2019 रोजी गिअर बॉक्स वॉरंटीमध्ये बदलून दिला होता. दि.17-10-2020 रोजी कंपनी नियमानुसार मूळ बॅटरी डेड झालेने विनशुल्क नवीन बॅटरी बसवून दिलेली आहे. तसेच नि.20/04/2019 रोजी पॉवर स्टेअरींग पाईप बदलून दिली होती असे कथन केले आहे. म्हणजेच सामनेवाला क्र.1 मान्य करतात की तक्रारदाराने वाहन घेतलेपासून एक ते दोन वर्षामध्येच सदर वाहनातील गिअर बॉक्स, बॅटरी, स्टेअरींग पाईप बदलून दयावे लागले. याचाच अर्थ सदर वाहनामध्ये उत्पादित दोष होता हे सिध्द होते. त्यामुळे सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास सदोष वाहन विक्री करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवेत त्रुटी ठेवलेचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब मुद्दा क्र.4 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
12) मुद्दा क्र.5 :- तक्रारदार यांनी प्रस्तुत कामी नि.43 कडे पुरसिस दाखल केली आहे, सदर पुरसिसमध्ये तक्रारदार यांनी वादग्रस्त वाहन वारंवार दुरुस्ती करुनदेखील त्यातील दोष दुर होत नसल्याने व सदरचे वादग्रस्त वाहन कर्ज काढून खरेदी घेतले असल्याने कर्जाचे हप्ते भरावे लागत असलेने तक्रारदाराने सदर वादग्रस्त वाहन त्रयस्थांना आर्थिक अडचणीस्तव विक्री केले आहे. तक्रारदारांच्या ताब्यात सदर वादग्रस्त वाहन नसल्याने तक्रारदाराने त्यांचे तक्रार अर्जातील गाडीची मागणी व गाडी दुरुस्तीची मागणी सोडून देत असून मागणी क्र. 3ते 6 ची मागणी मागत असलेबाबतचे कथन केले आहे.
तक्रारदाराने त्यांचे तक्रारीमध्ये मागणी क्र.1- गाडीतील उत्पादित दोष दुर होणे शक्य नसल्याने तक्रारदाला नवीन गाडी देण्याचे आदेश सामनेवाला यांना दयावेत, अथवा मागणी क्र.2-गाडीमधील दोष स्वखर्चाने संपूर्ण दुर करुन, गाडीचे सर्व पार्ट नवीन बसवून वादग्रस्त गाडी पूर्णपणे दुरुस्त करुन देण्याचे व त्याला रितसर नव्यासारखी वॉरंटी देण्याचे आदेश सामनेवाला यांना करण्यात यावेत अशी मागणी केली होती. सदरची मागणी तक्रारदाराने नि.43 कडील पुरसिसप्रमाणे सोडून दिलेली आहे. तक्रारदार यांनी गाडी खरेदीपोटी सामनेवाला क्र.1 यांना दिलेली रक्कम रु.21,83,000/- परत मिळावी व त्यावर गाडी खरेदी तारखेपासून म्हणजे दि.30/11/2018 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे. 18 % व्याज मिळावे अशी मागणी केली आहे. परंतु तक्रारदार यांनी वादग्रस्त गाडी त्रयस्थांना विक्री केलेली असलेने सदर मागणीचा विचार करता येणार नाही. परंतु सदर तक्रारदारास सदोष वाहन विक्री करुन सामनेवाला यांनी तक्रारदारास दयावयाचे सेवेत त्रुटी केलेली असलेने व त्यामुळे तक्रारदारास मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे तक्रारदार सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,00,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.10,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब मुद्दा क्र.5 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
9) मुद्दा क्रमांकः 6 –सबब, वरील सर्व विवेचनांचा विचार करता प्रस्तुत कामी हे आयोग खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येतो.
2) सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास त्यांना झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.1,00,000/- (रक्कम रुपये एक लाख मात्र) अदा करावी. तसेच तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.10,000/- (रक्कम रुपये दहा हजार फक्त) अदा करावेत.
3) वर नमुद सर्व आदेशांची पूर्तता सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
4) विहीत मुदतीत सामनेवाला यांनी आदेशाची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
5) आदेशाच्या सत्यप्रती उभयपक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.