ग्राहक तक्रार क्र. 130/2013
अर्ज दाखल तारीख : 07/09/2013
अर्ज निकाल तारीख: 22/12/2014
कालावधी: 01 वर्षे 03 महिने 15 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. शेख खालेद इस्माईल,
वय-61 वर्षे, धंदा – निवृत्तीवेतनधारक,
रा.महात्मा गांधी नगर, उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. व्यवस्थापक,
स्टेट बँक ऑफ इंडिया,
शाखा, उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2)मा.श्रीमती विदयुलता जे. दलभंजन सदस्य.
3) मा.श्री.एम.बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.डी.पी.वडगावकर.
विरुध्द पक्षकारा तर्फे विधीज्ञ : श्री.पी.डी.देशमूख.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री. एम.व्ही. कुलकर्णी यांचे व्दारा :
1) आपल्या खात्यावरची रु.7,603/- ही रक्कम ए.टी.एम. व्दारा काढल्याचे सांगून आयोग्यरीत्या नावे टाकून विरुध्द पक्षकार बँकेने सेवेत त्रुटी केली. म्हणून नुकसान भरपाई मिळावी म्हणून ही तक्रार तक्रारकर्ता याने विरुध्द पक्षकार यांचे विरूध्द केलेली आहे.
तक्रारदाराचे तक्रारीतील थोडक्यात कथन असे की,
तक्रारकर्ता माजी सैनिक असून निवृत्ती वेतन धारक आहे. त्याचे निवृत्त वेतन विरुध्द पक्षकार यांच्याकडील खात्यामध्ये जमा हेाते. त्यास ए.टी.एम.ची सुविधासुध्दा उपलब्ध आहे. दि.28/09/2011 रोजी निवृत्ती वेतन रु.7,452/- तक्रादाराचे खात्यात जमा झाल्यानंतर शिल्लक रु.8,582/- झाले. ता.07/10/2011 रोजी अॅक्सेस बँकेत ए.टी.एम.चा वापर करुन खात्यातून रु.5,000/- काढले त्याच दिवशी आय.सी.आय. बँकेच्या ए.टी.एम. मधून रु.2,520/- काढले त्यानंतर शिल्लक रु.1,062/- झाली. नंतरचे निवृत्ती वेतन जमा झाले तेव्हा शिल्लक रु.9,833/- झाली. दि.03/11/2011 रोजी रु.7,000/- व दि.09/11/2011 रोजी रु.2,000/- ए.टी.एम. मधून काढण्यात आले. दि.19/11/2011 रोजी खाते पुस्तकात सेट होल्ड रु.7,500/- अशी नोंद झाली. दि.30/11/2011 रोजी पेन्शन रु.7,783/- जमा झाले व शिल्लक रु.8,616/- दाखविण्यात आली. दि.03/12/2011 रोजी ए.टी.एम.व्दारे रु.1,000/- काढल्यावर शिल्लक रु.7,616/- दाखविण्यात आली. दि.16/12/2011 रोजी डिलीट होल्ड रु.7,500/- अशी नोंद करुन शिल्लक शुन्य दाखविण्यात आली.
तक्रारदाराने विरुध्द पक्षकार यांच्याकडे रक्कम कमी होण्याबददल चौकशी केली. विरुध्द पक्षकाराने तुमच्या खात्यावर रक्कम नसतांना ए.टी.एम. मधून रक्कम काढली असे सांगितले. वास्तविक पाहता तक्रारदाराने शिल्लक नसतांना ए.टी.एम. मधून अशी रक्कम काढलेली नाही. तक्रारदार याने आपली रक्कम आपल्या खात्यावर जमा करावी अशी विनंती केली व लेखी अर्ज दिले परंतू विरुध्द पक्षकाराने कारवाई केली नाही. तारीख 07/01/2013 रोजी विरुध्द पक्षकार यांच्या वरीष्ठांकडे रजिष्टर पोस्टाने तक्रार पाठविली तरीसुध्दा काहीही करण्यात आलेले नाही. अश्या प्रकारे रु.7,603/- चुकीने नावे टाकून विरुध्द पक्षकार यांनी सेवेत त्रुटी केली आहे. तक्रारदार यास आजारपणामध्ये पैशाची व्यवस्था करावी लागली. तरी विरुध्द पक्षकार यांना रु.7603/- खात्यात जमा करण्याबददल आदेश मिळावा तसेच मानसिक त्रासापोटी रु.50,000/- देण्याचा व तक्रारीच्या खर्चापोटी रु.10,000/- देण्याचा व वरील रक्कमेवर द.सा.द.शे.18 दराने व्याज देण्याचा हुकूम व्हावा. अशी विनंती केलेली आहे.
तक्रारीसोबत तक्रारदाराने बचत खात्याचा उतारा, नोटीसची स्थळप्रत व पोष्टाची पावती हजर केलेली आहे.
2) विरुध्द पक्षकाराने मंचात हजर होऊन आपले म्हणणे दिलेले आहे. विरुध्द पक्षकाराचे म्हणणे आहे की ता.07/10/2011 रोजी तक्रारदाराने ए.टी.एम. व्दारे रु.7,500/- काढले तथापि ती रक्कमतक्रारदार याचे बचत खात्यातून डेबीट न झाल्याचा गैरफायदा घेवून दुस-यांदा ए.टी.एम. व्दारे रु.5,000/- व रु.2,520/- दुस-या ए.टी.एम. व्दारे तक्रारदाराने काढले. आपल्या खात्यात रु.7,500/- नसतांना व त्याची पुर्ण कल्पना असतांना तक्रारदाराने अतिरीक्त रक्कम काढली. सदर बाब विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदार यांच्या निदर्शनास आणली. तांत्रिक चुकीमुळे तक्रारदार यांनी अधिकचे रु.7,500/- काढले म्हणून त्या रक्कमे करीता तक्रारदाराचे खाते सेट होल्ड करण्यात आले. सदरहू रक्कम व्याजासह तक्रारदार यांचे कर्ज खात्यातून वर्ग करण्यात आली. आपल्या खात्यातून रु.7,500/- काढल्यानंतर सुध्दा ती रक्कम डेबीट पडली नाही याची पुरेपुर कल्पना तक्रारदार याला होती. त्यामुळे तक्रारदाराची मागणी बेकायदेशीर आहे. विरुध्द पक्षकाराने सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही तक्रार खर्चासह खारीज होणे जरुर आहे.
विरुध्द पक्षकाराने दि.07/10/2011 चे ए.टी.एम. व्यवहाराचे पत्र हजर केलेले आहे.
3) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, गैरतक्रारदार यांचे म्हणणे, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, उभयतांचा लेखी युक्तीवाद इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित करीत आहोत. त्यांची उत्तरे त्यांचे समोर खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुद्दे निष्कर्ष
1) विरुध्द पक्षकाराने तक्रारकर्त्याच्या सेवेत त्रुटी केली आहे का ? होय.
2) तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 ते 2 चे विवेचन
4) तक्रारदाराच्या पासबुकाचा उतारा पाहीला असता हे स्पष्ट होते की दि.28/09/2011 रोजी पेन्शन रु.7,452/- जमा झाल्यानंतर शिल्लक रु.8,582/- झाली. दि.07/10/2011 रोजी अॅक्सीस बँकेच्या ए.टी.एम. व्दारे रु.5,00/- तर ICICI बँक ATM व्दारा रु.2,520/- काढलेवर शिल्लक रु.1,062/- झाली. दि.14/10/2011 रोजी पेन्शनच्या रकमा रु.332/-, 332/-, 332/- तर रु.28/10/2011 रोजी पेन्शन रु.7,783/- जमा झाल्या त्यानंतर शिल्लक रु.9,833/- झाली दि.19/11/2011 रोजी सेट होल्ड रु.7500/- केले दि.16/12/2011 रोजी DELETE HOLD रु.7,500/- म्हणून शिल्लक रु.7,616/- वरुन शुन्य वर आणली आहे.
5) विरुध्द पक्षकार यांनी ए.टी.एम. transaction चा उतारा हजर केला आहे तो दि.07/10/2011 चा आहे एकूण 3 व्यवहार झाले. 13.08.29 वा. T1CW 1024 मध्ये रु.7,500/- काढले. 13.10.21 वाजताT1CW1024 मध्ये रु.5,000/- काढले. 13.30.09 वाजता S1CW 5539 मध्ये रु.2,520/- काढले 13.30.50 वा SKW5539 व्दारा रु.8/- खर्ची पडले. याचा अर्थ दि.07/10/2011 रोजी 13.08.29 वा. रु.7,500/- काढले मात्र खात्यातुन ते कमी झाले नाहीत म्हणून पुन्हा 13.10.21 वाजता त्याच अॅक्सीस च्या ए.टी.एम. व्दारे रु.5,000/- तक्रारदाराने काढले. याचा अर्थ तक्रारदाराला 13.08.29 याचे व्यवहारानंतर समजले की आपल्या खात्यातुन रु.7,500/- कमी झालेले नाहीत मात्र विरुध्द पक्षकार बँकेला ही गोष्ट फक्त दि.19/11/2011 रोजी कळाली तेव्हा रु.7,500/- SET HOLD केले शेवटी दि.16/12/2011 रोजी DELETE HOLD म्हणून रु.7,616/- कमी केले.
6) आता प्रश्न हा उभा रहातो की 13.08.29 वाजताचे व्यवहाराची आकौंटमध्ये नोंद का झाली नाही ? त्या व्यवहाराची विरुध्द पक्षकाराकडे ताबडतोब नोंद होणे गरजेचे होते. 13.10.21 वाजताच्या व्यवहाराची मात्र नोंद विरुध्द पक्षकाराकडे झाली. तक्रारदारने 13.08.29 वाजताचे व्यवहाराची slip काढून घेतल्या शिवाय त्यास पैसे खात्यातून कमी न झाल्याचे कळाले नसते अॅक्सीस ए.टी.एम. च्या शाखेने लगेचेच विरुध्द पक्षकाराकडे रु.7,500/- ची मागणी करणे जरुर होते. अॅक्सीस ए.टी.एम. च्या कॅशचे दि.07/10/2011 रोजीचे अकौंट पाहील्याशिवाय ती रक्कम तक्रारदाराने खरेच काढली की नाही हे समजणार नाही ते अकौंट हजर करण्याची जबाबदारी विरुध्द पक्षकारावर होती ती त्याने पार पाडली नाही.
7) 13.08.29 वाजताचे रु.7,500/- काढण्याची विपकडे नोंद लगेच का झाली नाही याचा खूलासा विरुध्द पक्षकाराने केलेला नाही. केवळ अशी नोंद न आल्यामुळे 13.10.29 वा. तक्रारदाराला रु.5,000/- काढता आले अशी विरुध्द पक्षकाराची तक्रार आहे. नंतर 13/30/09 वा आय.सी.आय.सी.आय. एटीएम व्दारा तक्रारदाराने आणखी रु.2,520/- काढले. केवळ दि.13/08/29 वाजताचे व्यवहाराची विपकडी अकौंटमध्ये नोंद न झाल्यामुळे पुढील 2 व्यवहार तक्रारदाराला करता आले असे विरुध्द पक्षकाराचे म्हणणे आहे. system मध्ये असा घोटाळा कसा होऊ शकतो हे सांगण्याची जबाबदारी विपची होती ती विपने पार पाडली नाही.
8) वर म्हंटल्याप्रमाणे अॅक्सीस ए.टी.एम. च्या दि.07.10.11 च्या कॅश अकौंटची पाहणी केल्या शिवाय अगर व्हिडीओ फुटेज पाहील्या शिवाय वरील वेळेस रु.7,500/- काढले होते का याची खात्री पटणार नाही ज्या अर्थी विरुध्द पक्षकाराच्या अकौंटस मध्ये ती नोंद आली नाही त्या अर्थी तो अपयशी व्यवहार असू शकतो. अँक्सीस बँकेने त्वरीत विरुध्द पक्षकाराकडे त्या रक्कमेची मागणी केली व ती रक्कम विरुध्द पक्षकाराने अॅंक्सीस बँकेकडे पाठवली याबददल पुरावा दिलेला नाही. रु.2,510/- ची मागणी आयसीआयसीआय बँकेने केली व विपने ते पाठवले याबददलही पुरावा नाही. तक्रारदाराचे खात्याचा उतारा हे दाखवतो की विरुध्द पक्षकाराकडे दि.07/10/2011 रोजी रु.7,500/- ची डेबीट ऐंट्री ए.टी.एम. व्यवहाराव्दारा झाली नाही त्याबददल संपूर्ण कागदपत्रासह खूलासा विरुध्द पक्षकाराने देणे जरुर होते. काय तांत्रीक बिघाड झाला याचा खूलासा जरुर होता. विरुध्द पक्षकाराने तसे न केल्यामुळे विरुध्द पक्षकार हे शाबीत करु शकले नाही की दि.07/10/2011 रोजी 13.08.29 वा. तक्रारदाराने अँक्सीस ए.टी.एम. व्दारा खात्यातून रु.7,500/- काढले त्यामुळे विरुध्द पक्षकाराने रु.7,616/- खात्यामधून कमी करुन तक्रारदाराचे सेवेत त्रुटी केली असून तक्रारदार अनुतोषास पात्र आहे. म्हणून मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्षकाराने तक्रारदारास खात्यातून कमी कलेले रक्कम रु.7,616/- (रु.सात हजार सहाशे सोळा फक्त) दयावी.
3) विरुध्द पक्षकाराने तक्रारदारास वरील रक्कमेवर तक्रार दाखल तारखेपासून रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज दयावे.
4) विरुध्द पक्षकाराने तक्रारदारास तक्रारीचा खर्च म्हणून रु.1,000/- (रुपये एक हजार फक्त) दयावे.
5) वरील आदेशाची पुर्तता करुन विरुध्द पक्षकार यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा.
मंचासमोर सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर
आदेशाची पुर्तता विरुध्द पक्षकार यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली
नसल्याबाबत मंचात अर्ज दयावा.
6) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.एम.व्ही.कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.