न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.
2. तक्रारअर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे -
तक्रारदार ही प्रोप्रायटरी फर्म असून तिचा कापड व्यवसाय आहे. वि.प.क्र.1 हे ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय करीत असून वि.प.क्र.2 हे वि.प.क्र.1 यांचे मुख्य कार्यालय आहे. तक्रारदार यांनी एम.एम. टेक्स्टाईल एजन्सी यांचेमार्फत बेंगलोर स्थिती हिरंत (अरिहंत) टेक्स्टाईल वि.प.क्र.1 यांचेकडे बिल नं. 235 नुसार रक्कम रु. 41,843/- चे कापड पाठविण्यात आले होते. सदरचे कापड हिरंत (अरिहंत) टेक्स्टाईल यांना मिळालेनंतर त्यांनी सदरचे कापड एल.आर. नं. 909052 x 2 दि. 16/10/2013 रोजीने रक्कम रु. 39,924/- चे वि.प.क्र. 1 यांचेमार्फत तक्रारदार यांचेकडे पाठविले. तथापि सदरचा माल प्रवासात गहाळ झाल्याचे कारण देवून वि.प. यांनी सदरचे कापड देण्यास नकार दिला. म्हणून तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 व 2 यांना दि. 19/7/2016 रोजीचे पत्राने कळवून वर नमूद कापडाची मागणी केली परंतु तरीही वि.प. यांनी त्यास कोणताही प्रतिसाद दिला नाही. म्हणून तक्रारदार यांनी वकीलामार्फत वि.प. यांना दि. 17/5/2017 रोजी कायदेशीर नोटीस दिली परंतु तरीही वि.प. यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. अशा प्रकारे वि.प. यांनी हेतुपुरस्सर अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. म्हणून तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुतकामी वर नमूद कापडाची किंमत रु. 32,924/-, सदर रकमेवर होणारी व्याजाची रक्कम रु.23,700/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व अर्जाचा खर्च रु.10,000/- देणेबाबत वि.प. यांना आदेश व्हावा अशी मागणी केली आहे.
4. तक्रारदार यांनी याकामी शपथपत्र, कागदयादीसोबत वि.प. यांचेकडील बुकींग पावती, एम.एम. टेक्स्टाईल एजन्सीची पावती, तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेले पत्र तसेच नोटीस, सदरची नोटीस मिळाल्याची वि.प. यांची पोहोच, वि.प. यांनी दिलेले उत्तर इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारअर्जासोबत दाखल केलेले शपथपत्र हेच पुराव्याचे शपथपत्र समजणेत यावे अशी पुरसीस दाखल केली आहे.
5. वि.प. क्र.1 व 2 यांना प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस लागू होवूनही ते गैरहजर राहिलेने नि.1 वर वि.प.क्र.1 व 2 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
6. तक्रारदारांची तक्रार व त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत तक्रारअर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय |
3 | तक्रारदार वि.प. यांचेकडून वादातील कापड मालाची होणारी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे |
वि वे च न –
7. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण हिरंत (अरिहंत) टेक्स्टाईल यांनी तक्रारदार यांना एल.आर. नं. 909052 x 2 अन्वये दि. 16/10/2013 रोजी रक्कम रु. 39,924/- चे कापड वि.प.क्र. 1 यांचेमार्फत पाठविले होते. सदरची बाब वि.प. यांनी त्यांचे दि. 20/5/17 रोजीच्या उत्तरी नोटीसमध्ये स्पष्टपणे मान्य केली आहे. तक्रारदाराने वि.प. यांनी दिलेली बुकींगची पावती क्र. 909052 याकामी दाखल केली आहे. सदर पावतीअन्वये वि.प. यांनी हिरंत (अरिहंत) टेक्स्टाईल यांनी पाठविलेला कापड माल तक्रारदार यांचेकडे पोहोच करण्याचे मान्य केले होते व त्याबदल्यात मोबदल्याची रक्कम रु.310/- स्वीकारली आहे. सदर व्यवहार किंवा बुकींग पावती वि.प. क्र.1 व 2 यांनी हजर होवून नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार व वि.प.क्र.1 व 2 हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत या निष्कर्षापत हे मंच येत आहे.
8. यातील हिरंत (अरिहंत) टेक्स्टाईल यांनी तक्रारदार यांना एल.आर. नं. 909052 x 2 अन्वये दि. 16/10/2013 रोजी रक्कम रु. 39,924/- चे कापड वि.प.क्र. 1 यांचेमार्फत पाठविले होते. सदरची बाब वि.प. यांनी त्यांचे दि. 20/5/17 रोजीच्या उत्तरी नोटीसमध्ये स्पष्टपणे मान्य केली आहे. सदर पावतीअन्वये वि.प. यांनी हिरंत (अरिहंत) टेक्स्टाईल यांनी पाठविलेला कापड माल तक्रारदार यांचेकडे पोहोच करण्याचे मान्य केले होते. परंतु तक्रारदाराचे कथनानुसार, सदरचा माल प्रवासात गहाळ झाल्याचे कारण देवून वि.प. यांनी सदरचे कापड देण्यास नकार दिला. म्हणून तक्रारदार यांनी वि.प.क्र.1 व 2 यांना दि. 19/7/2016 रोजीचे पत्राने कळवून वर नमूद कापडाची मागणी केली परंतु तरीही वि.प. यांनी त्यास कोणताही प्रतिसाद दिला नाही. म्हणून तक्रारदार यांनी वकीलामार्फत वि.प. यांना दि. 17/5/2017 रोजी कायदेशीर नोटीस दिली परंतु तरीही वि.प. यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. तक्रारदार यांनी याकामी वि.प. यांना पाठविलेल्या नोटीसची प्रत दाखल केली आहे. तसेच वि.प. यांनी सदर नोटीसीस दिलेल्या उत्तराची प्रतही दाखल केली आहे. सदरचे नोटीस उत्तराचे अवलोकन करता, वि.प. यांनी तक्रारदारास पोहोच करावयाचा कापड माल ते का पोहोच करु शकले नाहीत याचे कोणतेही संयुक्तिक कारण वि.प. यांनी नोटीस उत्तरामध्ये नमूद केलेले नाही. वि.प. क्र. 1 व 2 यांनी या मंचासमोर आपले लेखी म्हणणे दाखल करुन तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन नाकारलेले नाही. सबब, वि.प. यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. सबब, वि.प. यांनी तक्रारदारांना वादातील कापड माल पोहोच केला नाही असा प्रतिकूल निष्कर्ष हे मंच काढत आहे. वि.प. यांचे सदरचे कृत्य म्हणजे निश्चितच तक्रारदाराला दिलेली सदोष सेवा आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
9. सबब, वर नमूद विस्तृत विवेचन व दाखल सर्व कागदपत्रे यांचा ऊहापोह करता तक्रारदार हे वि.प. क्र.1 व 2 यांचेकडून वादातील कापड मालाची किंमत रु.32,924/- मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. तसेच सदर रकमेवर द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज मिळणेसही तकारदार पात्र आहेत. तसेच वि.प. च्या कृत्यामुळे तक्रारदार यांना झाले मानसिक व शारिरिक त्रासाची रक्कम रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, सदरकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना गहाळ झालेल्या वादातील कापड मालाची किंमत रु. 32,924/- अदा करावी व सदर रकमेवर दि. 16/10/2013 पासून संपूर्ण रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.स.द.शे. 9 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु. 3,000/- अदा करावा.
4) वर नमूद आदेशांची पूर्तता वि.प.क्र.1 व 2 यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) वर नमूद आदेशाची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 25 व 27 अन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.