न्या य नि र्ण य
(दि.27-05-2024)
व्दाराः- मा. श्रीम. अमृता नि.भोसले, सदस्या
1) तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रार अर्ज हा सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून गाडीचे कोटेशनप्रमाणे रक्कम घेऊनही तक्रारदारास गाडी न देऊन तक्रारदारास दयावयाचे सेवेत त्रुटी केलेने सामनेवाला विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा-2019 चे कलम 35 अन्वये दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथने थोडक्यात पुढील प्रमाणे-
तक्रारदार हे तक्रारीत नमुद पत्त्यावर कायमस्वरुपी राहतात. तक्रारदार यांचेकडे असलेली महिंद्र लोगन ही गाडी जुनी झाल्यामुळे नवीन चारचाकी गाडी खरेदी करावयाची होती. सामनेवाला क्र.1 चे मॅनेजर श्री प्रदिप कोतवडेकर यांनी बी.एस.4 असलेली HONDA WR-V-VX-MT(D)BS-IV या मॉडेलची टेस्ट ड्राईव्ह साठी वापरलेली डेमो गाडी सरकारी धोरणानुसार मार्च-2020 नंतर RTO पासिंग होणार नसल्यामुळे विकण्याची आहे असे सांगितलेचे तक्रारदारास त्यांचे मित्र अभिजीत चव्हाण यांचेकडून कळाले. सदर गाडीची एकूण किंमत रक्कम रु.8,40,000/- ठरली. त्याप्रमाणे तक्रारदारास कोटेशन देणेचे मान्य केले. तसेच तक्रारदाराची जुनी गाडी देऊन नवीन गाडी देण्याचे सामनेवाला यांनी मान्य केले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडे कर्ज घेतले व सामनेवाला यांना नवीन गाडीची खरेदीपोटी वेळोवेळी दि.24/02/2020 अखेर एकूण रक्कम रु.7,65,000/- अदा केलेली आहे व जुन्या गाडीची किंमत (BUY BACK) रु.72,000/- असे एकूण रक्कम रु.8,37,000/- सामनेवाला यांना पोहोच झाली. त्यानंतर तक्रारदार दि.25/02/2020 रोजी गाडीची डिलिव्हरी घेणेस गेले असता सामनेवाला यांनी तक्रारदारास उडवाउडवीची उत्तरे दिली तसेच नवीन गाडीचा ताबा दिला नाही अथवा तक्रारदार यांची जुनी गाडी ताब्यात घेतली नाही. त्यामुळे तक्रारदारयांनी सामनेवाला क्र.1 व 2 यांना दि.28/02/2020 रोजी नोटीस दिली. सदर नोटीसला सामनेवाला यांनी आजतागायत कोणतेही उत्तर दिलेले नाही. त्यानंतर सामनेवाला यांचेकडे तक्रारदार यांनी वारंवार चौकशी केली असता सामनेवाला यांनी दि.09/03/2020 रोजीचे त्यांचे विनासहीचे पत्र दि.20/04/2020 रोजी तक्रारदारास व्हॉटसॲप वर पाठवून दिले. सदर पत्रात सामनेवाला क्र.1 चे मॅनेजर श्री प्रदिप कोतवडेकर यांनी दि.11/02/2020 रोजी राजीनामा दिला असलेचे नमुद केले आहे. वास्तविक श्री प्रदिप कोतवडेकर यांनी दि.12/02/2020 रोजी शोरुमच्या शिक्यानिशी व सहीने बँकेला देण्यासाठी कोटेशन दिले होते. सदर दिवशी श्री कोतवडेकर शोरुम मध्ये मॅनेजर म्हणून काम करत होते. सामनेवाला यांनी सदरची गाडी अन्य ग्राहकास जास्त किंमतीला विक्री केली असल्याची तक्रारदारास शक्यता वाटते. असे असताना तक्रारदारांना मोबदल्यापोटी सेवा देण्याचे नाकारण्याचा सामनेवाला यांना कायदेशीर हक्क नाही तसेच तक्रारदारांना सेवा देण्याचे नाकारुन सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारास सदोष सेवा दिलेली आहे. त्यामुळे सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सबब सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराकडून गाडीच्या मोबदल्यापोटी घेतलेली एकूण रक्कम रु.8,37,000/- व मानसिक व आर्थिक नुकसानीपोटी व तक्रारीचा खर्च मिळून रक्कम रु.2,39,750/- असे एकूण रक्कम रु.10,76,750/- सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास अदा करावेत अशी विनंती तक्रारदाराने आयोगास केली आहे.
2. तक्रारदाराने त्याचे तक्रारीच्या पुष्टयर्थ नि.6 कडे एकूण 6 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये सामनेवाला यांनी तक्रारदारास दि.12/02/20 रोजी दिलेले कोटेशन, तक्रारदाराने सामनेवाला यांना अदा केलेल्या रक्कमेची पोच पावती, तक्रारदाराने बँकेकडून घेतलेल्या कार लोनचे ॲग्रीमेंटची प्रत, तक्रारदाराचे कर्जाचे स्टेटमेंट, तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 व 2 यांना दि.26/02/20 रोजीची दिलेली नोटीस, त्यास सामनेवाला क्र.2 यांनी दि.09/03/20 रोजी दिलेले उत्तर इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. नि.27कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.28 कडे श्री अभिजित विश्वनाथ चव्हाण या साक्षीदाराचे ॲफिडेवहीट दाखल केले आहे. तसेच नि.29 कडे श्री समिर सुधाकर खानविलकर या साक्षीदाराचे ॲफिडेव्हीट दाखल केले आहे. नि.30 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि.41 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
3. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी प्रस्तुत कामी हजर होऊन नि.13 कडे एकत्रित म्हणणे दाखल केलेले आहे. सदर सामनेवाला यांनी तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. सामनेवाला क्र.1 व 2 हे त्यांचे कथनात पुढे सांगतात, तक्रारदार यांनी होंडा कंपनीची टेस्ट ड्राईव्हसाठी असणारी डब्ल्युआरव्ही गाडी घेणेसाठी शोरुमला भेट दिलेचे त्यांचे दि.28/02/2020 रोजीचे पत्रावरुन प्रथमच समजले. तक्रारदार यांनी श्री प्रदिप कोतवडेकर यांचेशी केलेल्या कोणत्याही व्यवहाराबाबत सामनेवाला क्र.1 व 2 यांना कोणतीही कल्पना नव्हती. टेस्ट डेमो कार विक्री करावयाची झाल्यास त्याबाबत सामनेवाला क्र.2 मार्फत अंतिम निर्णय घेतला जातो व त्यानुसार जाहिरात प्रसिध्द केली जाते. परंतु अशाप्रकारची कोणतीही जाहिरात सामनेवाला क्र.2 यांनी केली नव्हती व कोणतीही डेमो गाडी विकायची नव्हती. तक्रारदाराची लोगन गाडी श्री प्रदिप कोतवडेकर यांनी एजंटमार्फत परस्पर विकून दिल्याचे समजले आहे. सदर व्यवहाराशी सामनेवाला क्र.1 व 2 यांचा काहीही संबंध नाही. तक्रारदाराने सामनेवाला यांना बुकींगची रक्कम रु.37,000/- व रोख रक्कम रु.2,00,000/- व स्टेट बँकेचा रक्कम रु.2,28,000/- चा धनादेश केव्हाही अदा केलेला नव्हता. श्री प्रदिप कोतवडेकर यांनी दि.11/02/2020 रोजी वैयक्तिक कारण देऊन राजीनामा दिला आहे. तक्रारदाराकडून सामनेवाला क्रे.1 व 2 यांना कोणतीही रक्कम प्राप्त झालेली नसलेने अशाप्रकाराच्या कोणत्याही पावत्या तक्रारदारास दिलेल्या नाहीत. तक्रारदार यांच्या दि.26/02/2020 रोजीच्या पत्रानुसार सामनेवाला क्र.2 यांनी दि.04/03/2020 रोजी ग्रामीण पोलीस ठाणे रत्नागिरी येथे श्री प्रदिप विश्वनाथ कोतवडेकर यांचेविरुध्द रितसर तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांच्या खात्यात वर्ग केलेली रक्कम रु.3,00,000/- सामनेवाला क्र.2 यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मारुती मंदिर यांचेकडील तक्रारदार यांचे कर्जखात्यास बँकेने मागणी केलेनुसार दि.22/12/2020 रोजी जमा केली आहे. अशाप्रकारे तथाकथीत व्यवहाराशी सामनेवाला क्र.1 व 2 यांचा कसलाही संबंध नसलेने सदर सामनेवाला यांनी तक्रारदारास कोणतीही सेवात्रुटी दिलेली नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासहित फेटाळण्यात यावा अशी विनंती केली आहे.
4. सामनेवाला क्र.1 यांनी म्हणणेच्या पुष्टयर्थ नि.15 कडे दोन कागदपत्रे दाखल केली असून त्यामध्ये श्री प्रदिप कोतवडेकर यांचा दि.11/02/2020 रोजी दिलेला राजीनामा, व सामनेवाला क्र.2 यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मारुती मंदीर यांना दिलेला धनादेश क्र.868823 दि.22/12/20 चा असे दोन कागदपत्र दाखल केली आहेत. नि.31 कडे सामनेवाला क्र.1 चे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. तसेच नि.32 कडे सामनेवाला क्र.2 यांनी पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. सामनेवाला क्र.2 यांनी नि.35 कडे सामनेवाला क्र.2 यांनी श्री प्रदिप कोतवडेकर यांचेविरुध्द दि.04/03/2020 रोजी दिलेला तक्रार अर्ज दाखल केला आहे. नि.40 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि.45 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
5. सामनेवाला क्र.3 हे सदर कामी वकीलांमार्फत हजर झाले. त्यांनी नि.19 कडे लेखी म्हणणे दाखल केले आहे. सदर सामनेवाला यांनी त्यांचे म्हणणेमध्ये कथन करतात की, तक्रारदाराची तक्रार निरर्थक खोटी व खोडसाळ असलेने सामनेवाला यांना तक्रारदाराची तक्रार मान्य नाही. सामनेवाला क्र.1ते 3 यांचे नाते हे निव्वळ Principal to principal या तत्वावर आधारीत आहे. म्हणून प्रत्येक पक्ष हा त्याच्या स्वत:च्या कृत्याला जबाबदार आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.3 यांचेशी कधीही प्रत्यक्ष व्यवहार केलेला नाही. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडून गाडी खरेदी केलेली असून विक्रीपश्चात सेवा सामनेवाला क्र.1 हे ग्राहकांना पुरवितात. केवळ उत्पादनातील / निर्मितीमध्ये दोष असल्यास ते दूर करणेची जबाबदारी सामनेवाला क्र.3 यांची येते. त्यामुळे सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदारास कोणत्याही प्रकारची सदोष सेवा दिलेली नसल्याने सामनेवाला क्र.3 विरुध्द सदरचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी विनंती सामनेवाला क्र.3 यांनी केली आहे.
6. सामनेवाला क्र.3 यांनी नि.33कडे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. तसेच नि.48 कडे लेखी म्हणणे हाच लेखी युक्तीवाद समजावा अशी पुरसिस दाखल केली आहे.
7. या आयोगाने नि.20 वर दि.22-03-2022 रोजी केलेल्या आदेशान्वये तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.4 यांना सामनेवाला पक्षकार केले. त्याप्रमाणे सामनेवाला क्र.4 यांना आयोगामार्फत नोटीस पाठविली असता सामनेवाला क्र.4हे त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी नि.26 कडे त्यांचे लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. सदर म्हणणेनुसार सामनेवाला क्र.4 कथन करतात की, तक्रारदार व सामनेवाला क्र.4 यांचेमध्ये कोणत्याही स्वरुपाचा करार केलेला नरव्हता. सामनेवाला क्र.4 हे सामनेवाला क्र.1 यांचेकडे मॅनेजर म्हणून पगारी नोकर म्हणून काम पाहात होते. त्यामुळे शोरुमला आलेल्या ग्राहकांना वाहनाबद्रदल माहिती देणे, कर्ज सुविधेबद्रदल माहिती देणे, इतकीच जबाबदारी सामनेवाला क्र.4 यांची होती. एखादया ग्राहकाला वाहन पसंत पडले तर तो शोरुममध्ये अकौन्ट सेक्शनमध्ये धनादेश अथवा रोख रक्कम जमा करतो व त्याची रितसर पावती ग्राहकाला दिली जाते. त्याच्याशी सामनेवाला क्र.4 यांचा काहीही संबंध येत नाही. तक्रारदाराची तक्रार दिवाणी स्वरुपाची असल्याने या आयोगासमोर संपूर्ण गुणदोषांवर चालवण्यास पात्र नसल्याने ती नामंजूर करण्यात यावी. तक्रारदार हे पोलीस खात्यामध्ये जबाबदार अधिकारी म्हणून काम पाहात असताना फसवणूक झाल्यास त्याची फिर्याद पोलीस ठाण्यामध्ये दाखल करता येते याची पूर्ण जाणीव तक्रारदारास आहे. तशी कोणतीही फिर्याद पोलीस ठाण्यामध्ये सामनेवाला क्र.4 विरुध्द दाखल केलेली नाही. तक्रारदाराने नमुद केलेला धनादेशाची मुदत संपलेली असून त्याचा वापर करता येणार नाही. तसेच तक्रारदार जुनी गाडी विकली असे म्हणतो परंतु जुनी गाडी त्यांचेच ताब्यात आहे. सामनेवाला क्र.4 यांनी दि.11/02/2020 रोजी राजिनामा दिला असलेने तक्रारदारास सामनेवाला क्र.4 यांनी कोटेशन दिले ही बाब नाकारत आहे. तक्रारदाराने पश्चात बुध्दीने सामनेवाला यास प्रस्तुत तक्रारीमध्ये गुंतवले असल्याने प्रस्तुतची तक्रार नामंजूर करण्यात येऊन सदर सामनेवाला यांना तक्रारदाराकडून नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.10,000/- देणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती सामनेवाला क्र.4 यांनी केली आहे.
8. सामनेवाला क्र.4 यांनी त्यांचे म्हणणेच्या पुष्टयर्थ नि.36 कडे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. तसेच नि.38 सोबत होंडा शोरुम यांचे हेड ऑफिसने दिलेले व्हिजीटींग कार्ड दाखल केले आहे. नि.39 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि.46 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
9) वर नमुद तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, दाखल कागदपत्रे तसेच सामनेवाला क्र.1 ते 4 यांचे लेखी म्हणणे, दाखल कागदपत्रे व उभय पक्षकारांचा लेखी व तोंडी युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन करता सदर आयोगाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ खालील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन वाहन विक्रीबाबत तक्रारदारास सदोष सेवा पुरविली आहे काय? | होय. सामनेवाला क्र.1, 2 व 4 |
3 | तक्रारदार हे सामनेवाला यांचेकडून वाहनाच्या विक्रीबाबतच्या झालेल्या व्यवहारापोटीची रक्कम तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
-वि वे च न-
10. मुद्दा क्रमांकः 1 – तक्रारदार यांनी त्यांचेकडे असलेली महिंद्र लोगन ही गाडी जुनी झाल्यामुळे सदरची गाडी बदलून HONDA WR-V-VX-MT(D)BS-IV या मॉडेलची टेस्ट ड्राईव्ह साठी वापरलेली डेमो गाडी सामनेवाला क्र.1 चे मॅनेजर श्री प्रदिप कोतवडेकर यांनी तक्रारदारास दि.12/02/2020 रोजी दिलेल्या कोटेशनप्रमाणे रक्कम रु.8,40,000/- ला खरेदी घेणेचे ठरविले. सदरचे कोटेशन तक्रारदार यांनी नि.6/1 कडे दाखल केले आहे. तसेच तक्रारदार यांनी नि.6/2 कडे सामनेवाला क्र.4 यांनी तक्रारदारास गाडी डिलीव्हरीसाठी झालेल्या विलंबाबाबत दि.21/02/2020 रोजी दिलेले पत्र पाहता त्यावर सामनेवाला क्र.4 ची सही व सामनेवाला क्र.2यांचा शिक्का असलेचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.3 यांचे उत्पादित वाहन सामनेवाला क्र.1,2 व 4 यांचेकडून खरेदी केलेचे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक असलेचे व सामनेवाला हे विक्रेते/ सेवापुरवठादार असलेची बाब निर्विवादपणे सुस्पष्ट होते. सबब तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
11. मुद्दा क्रमांकः 2 – सामनेवाला क्र.2 हे होंडा कंपनीचे चारचाकी गाडया विक्री करण्याचे अधिकृत डिलर आहेत व सामनेवाला क्र.1 ही त्यांची शाखा आहे. प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांना सामनेवाला क्र.1 यांनी BS-IV -HONDA WR-V-VX-MT(D)BS-IV या वाहनाचे कोटेशन दिले होते. सदरचे कोटेशन नि.6/1 वर तक्रारदार यांनी दाखल केले आहे. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराची सर्व कथने नाकारलेली आहेत व सामनेवाला क.4 हे त्यांच्या कार्यालयात मॅनेजर या पदावर काम करीत होते. सामनेवाला क्र.4 यांनी त्यांच्या पदाचा दि.11/02/2020 रोजी राजीनामा दिला आहे. तसेच सामनेवाला क्र.1 व 2 यांना तक्रारदाराकडून कोणतीही रक्कम मिळाली नाही असे त्यांच्या लेखी म्हणण्यामध्ये सांगितले आहे. तसेच नि.6/1 कडील दाखल वाहनाचे कोटेशनचे अवलोकन करता सदर कोटेशनवर तारीख ही सामनेवाला क्र.4 यांनी राजीनामा दिलेनंतरची आहे व त्यावर सामनेवाला क्र.2 यांचा शिक्का आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी दि.26/02/20 रोजी सामनेवाला यांना सदरचे वाहन बुकींग करुन मुदतीत न मिळालयाबाबत लेखी पत्र पाठवले आहे. त्याची प्रत नि.6/5 कडे दाखल आहे. त्यास सामनेवाला क्र.1 व 2 यांनी उत्तर पाठविले आहे. त्याची प्रत दि.6/6 कडे दाखल आहे. सदर कागदपत्राचे अवलोकन केले असता सामनेवाला यांनी कबूल केले आहे की, सदर वाहनाची किंमत रक्कम रु.8,37,000/- इतकी नसून त्याची किंमत रक्कम रु.10,00,000/- इतकी होती. यावरुन असे दिसून येते की, तक्रारदार घेऊ इच्छित असलेले वाहन हे सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडे विक्रीसाठी होते. त्यांचेकडे रोख रक्कम स्विकारण्याची पध्दत नाही, परंतु स्विकारली असता त्याची पावती दिली जाते असे कथन केले आहे. परंतु प्रस्तुत प्रकरणात तक्रारदाराला रोख रक्कम दिल्याची पावती दिली नाही. तक्रारदाराला इंटरनेट प्रॉब्लेम असलेचे सांगून पावती देणेस टाळाटाळ केली असे तक्रारदाराने तक्रारीमध्ये नमुद केले आहे.
12. सामनेवाला क्र.1 व 2 त्यांचे म्हणणेमध्ये कथन करतात की, सामनेवाला क्र.4 यांनी दि.11/02/20 रोजी राजीनामा दिला आहे. दि.15 कडे सामनेवाला क्र.2 यांनी सदर राजीनामा दाखल केला आहे. सदर राजीनाम्याचे अवलोकन करता त्यावर सामनेवाला यांनी राजीनामा स्विकारल्याबाबतचा सामनेवाला यांची कुठेही सही दिसून येत नाही. किंवा सदर राजीनामा मंजूर केला आहे किंवा नाही याबाबतचा कोणताही पुरावा सामनेवाला यांनी याकामी दाखल केलेला नाही. तसेच सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे खात्यामध्ये तक्रारदाराची वर्ग केलेली रक्कम रु.3,00,000/- दि.22/12/20 रोजी जमा केली आहे. वास्तविक तक्रारदाराने नि.6/3 येथे वाहनासाठी कर्ज घेतलेबाबत ॲग्रीमेंट लेटर दाखल केले आहे. सदर कर्जप्रकरण हे दि.13/02/20 रोजीचे असलेचे दिसून येते व त्यामध्ये Loan Purchase of Purchase of New Hond WR-V-VX-MT(D) Term Loan of Rs.3,00,000/- असा उल्लेख आहे. सदरची रक्कम सामनेवाला यांचे खात्यामध्ये वर्ग केलेली होती व ती सुमारे 10 महिने सामनेवाला यांनी वापरली होती व बँकेच्या सांगण्यावरुन त्यांनी पुन्हा सदर रक्कम तक्रारदाराचे कर्जखात्यात वर्ग केली. परंतु त्याबाबतीत बँकेकडून कोणत्याही प्रकाराचा ई-मेल किंवा इतर पत्रव्यवहार झाला अथवा सदर रक्कम कोणत्या कारणासाठी सामनेवालाचे खात्यात वर्ग झाली याबाबत सामनेवाला क्र.1 व 2 यांनी कोणताही खुलासा केलेला नाही.
13. सामनेवाला क्र.2 यांनी नि.35 चे कागदयादीसोबत सामनेवाला क्र.4 श्री प्रदिप कोतवडेकर विरुध्द पोलीस स्टेशनला दिलेला तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यामध्ये सामनेवाला क्र.4 यांचे दैनंदिन कामाकाजाचे स्वरुप स्पष्ट केले आहे. त्यामध्ये शोरुममध्ये येणा-या नवीन होंडा कार घेऊ इच्छिणा-या ग्राहकांना होंडा कारबाबत सविस्तर माहिती देणे त्यांचेकडे बुकींगपोटी रोख रक्कम अथवा चेक स्विकारणे व ती रक्कम कंपनीत जमा करुन त्याची पावती संबंधीत ग्राहकांना देणे असे आहे. तसेच प्रदिप कोतवडेकर याने शोरुममध्ये येणारे ग्राहकाकडून कार बुकींगपोटी परस्पर पैसे घेऊन त्याचा वापर स्वखर्चासाठी केलेला आहे अशी तक्रार केली आहे. मात्र सामनेवाला क्र.4 यांनी ते सामनेवाला यांचेकडे टिमलिडर म्हणूनकाम करीत होते. त्यांचा रक्कमेच्या व्यवहाराबाबत कोणताही संबंध नव्हता असे नमुद केले आहे. वास्तविक सामनेवाला यांनी पोलीस स्टेशनकडे केलेल्या तक्रारीत त्यांचे दैनंदिन व्यवहाराबाबत स्पष्टपणे नमुद केले आहे. परंतु नि.6/2 च्या पत्राचे अवलोकन केले असता सामनेवाला क्र.4 यांनी तक्रारदाराकडून वाहन विक्रीपोटी रोख रक्कम व चेक स्विकारले असलेबाबत स्पष्टपणे नमुद केलेले आहे.
14. तक्रारदाराने सामनेवाल यांना दि.05/02/20 रोजी बुकींगपोटी रक्कम रु.37,000/- व दि.07/02/0 रोजी रक्कम रु.2,00,000/- रोख दिलेली आहे. व इतर रक्कम सामनेवालांच्या खात्यात वर्ग केलेली होती. परंतु सामनेवाला यांनी त्यांचेकडे बँकेमार्फत वर्ग केलेली रक्कम रु.3,00,000/- परत तक्रारदाराचे कर्जखात्यामध्ये सामनेवाला यांनी जमा केलेली आहे. तसेच तक्रारदाराच्या जुन्या गाडीचे व्यवहाराबाबत कोणताही पुरावा तक्रारदार यांनी याकामी दाखल केलेला नाही. तसेच दि.07/02/20 रोजीचा रक्कम रु.2,28,000/- चा चेक सामनेवाला यांनी वटवलेला नाही त्यामुळे सदरची रक्कम सामनेवाला यांना मिळाली असे गृहीत धरता येणार नाही. तक्रारदाराने नि.28 कडे श्री अभिजित विश्वनाथ चव्हाण या साक्षीदाराचे ॲफिडेव्हीट दाखल केले आहे. त्यामध्ये सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून गाडीच्या खरेदीचा व्यवहार ठरलेबाबत व सामनेवाला क्र.4 यांनी रक्कम स्विकारली असलेचे कथन केले आहे तसेच नि.29 कडे श्री समिर सुधाकर खानविलकर या साक्षीदाराचे दाखल केलेल्या ॲफिडेव्हीटमध्ये सामनेवाला क्र.4 यांनी त्यांचेसमोर दि.21/02/20 रोजी पावती लिहून दिलेचे कथन केले आहे. त्याचबरोबर तक्रारदाराकडून रोख रक्कम रु.2,37,000/- स्विकारली आहे हे तक्रारदाराने दि.6/2 कडे दाखल केलेल्या सामनेवाला क्र.4 ने तक्रारदारास दिलेल्या पत्रावरुन दिसून येते. परंतु सदर रक्कम स्विकारलेची पावती दिलेली नाही यावरुन सामनेवाला यांनी तक्रारदारास सदोष सेवा दिली असलेचे स्पष्ट होते. तक्रारदाराचे बँकेकडून सामनेवाला यांचे खातेवर रक्कम रु.3,00,000/- जमा झालेली होती. सदरची रक्कम सामनेवाला यांनी का ठेवून घेतली याबाबतचा कोणताही खुलासा अथवा कागदोपत्री पुरावा याकामी दाखल केलेला नाही व बँकेने सदर रकमेची मागणी केलेनंतर ती बँकेस सामनेवाला यांनी परत केली. यावरुन सामनेवाला क्र.1, 2 व 4 यांनी तक्रारदाराकडून वादातील वाहनाचा व्यवहार केलेचे व सदर व्यवहारापोटी तक्रारदाराकडून रोख रक्कम रु.2,37,000/- स्विकारलेचे व रक्कम रु.2,28,000/-चा चेक स्विकारला परंतु तो वटवला नाही याबाबी स्पष्ट होतात. यावरुन सामनेवाला क्र.1, 2 व 4 यांनी तक्रारदाराबरोबर डेमो वाहन खरेदीचा व्यवहार करुन तो पूर्ण न करुन तक्रारदारास दयावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेचे स्पष्ट होते. तसेच सामनेवाला क्र.3 ही वादातील वाहन उत्पादित कंपनी असून त्यांचा या व्यवहाराशी कोणताही संबंध नसलेने सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदारास कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. त्यामुळे सामनेवाला क्र.1, 2 व 4 यांनी तक्रारदाराकडून वाहन व्यवहारापोटी रोख रक्कम स्विकारुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवेत त्रुटी ठेवलेचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
15. मुद्दा क्रमांकः 3 – सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.4 यांचेविरुध्द पोलीस ठाणेमध्ये तक्रार दाखल केलेचा अर्ज दाखल केला आहे. परंतु सदर तक्रारीचा पाठपुरावा केला काय अथवा तक्रारीचे पुढे काय झाले याबाबत कोणताही खुलासा सामनेवाला क्र.2 यांनी केलेला नाही. तक्रारदाराच्या जुन्या गाडीचा सामनेवालासोबत व्यवहार झालेबाबतचा कोणताही पुरावा तक्रारदाराने याकामी दाखल केलेला नाही. तसेच तक्रारदार व सामनेवाला क्र.1, 2 व 4 यांचेमधील झालेल्या वाहन विक्रीच्या व्यवहारातील वादातील वाहनाची सदयस्थिती काय आहे याबाबत कोणताही पुरावा याकामी आयोगासमोर आलेला नाही. वाहनाच्या व्यवहारापोटी तक्रारदार यांनी सामनेवाला यांना रोख रक्कम रु.2,37,000/- दिलेले आहेत. परंतु तक्रारदाराने सामनेवाला यांना दिलेला रक्कम रु.2,28,000/- चा चेक सामनेवाला यांनी वटवलेला नाही. तसेच तक्रारदाराचे बँकेकडून सामनेवाला यांना अदा केलेली रक्कम रु.3,00,000/- सामनेवाला यांनी तक्रारदाराचे बँकेकडे परत पाठविलेली आहे. त्यामुळे तक्रारदार सामनेवाला क्र.1, 2 व 4 यांचेकडून वाहनाच्या खरेदीपोटी स्विकारलेली रोख रक्कम रु.2,37,000/- परत मिळणेस व सदर रक्कमेवर तक्रार दाखल तारखेपासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9% दराने व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तक्रारदाराने नि.6/4 कडे त्यांचे बँक स्टेटमेंट दाखल केले आहे व त्यामध्ये आर.सी.बुकची कॉपी हजर न केल्याने दंड आकारण्यात आला आहे. सदर दंडाची रक्कम रु.14,750/- सामनेवालाकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच तक्रारदाराने सामनेवालाकडून मानसिक व शारिरीक त्रासापोटी मागणी केलेली रक्कम ही अवाजवी व अवास्वत आहे. तक्रारदारासोबत सदोष वाहन विक्री व्यवहार करुन सामनेवाला यांनी तक्रारदारास दयावयाचे सेवेत त्रुटी केलेली असलेने व त्यामुळे तक्रारदारास मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे तक्रारदार सामनेवाला क्र.1, 2 व 4 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
16. मुद्दा क्रमांकः 4 –सबब, वरील सर्व विवेचनांचा विचार करता प्रस्तुत कामी हे आयोग खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येतो.
2) सामनेवाला क्र.1, 2 व 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास वादातील वाहन व्यवहारापोटी स्विकारलेली रक्कम रु.2,37,000/- (रक्कम रुपये दोन लाख सदतीस हजार फक्त) अदा करावी. सदर रक्कमेवर तक्रार दाखल तारखेपासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9 %दराने व्याज अदा करावे.
3) सामनेवाला क्र.1, 2 व 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास बँकेने आर.सी.बुक ची प्रत हजर न केलेने आकारलेल्या दंडाची एकूण रक्कम रु.14,750/- (रक्कम रुपये चौदा हजार सातशे पन्नास फक्त) अदा करावी.
4) सामनेवाला क्र.1, 2 व 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास त्यांना झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- (रक्कम रुपये दहा हजार फक्त) अदा करावी. तसेच तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- (रक्कम रुपये पाच हजार फक्त) अदा करावेत.
5) वर नमुद सर्व आदेशांची पूर्तता सामनेवाला क्र.1, 2 व 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
6) सामनेवाला क्र.3 यांचेविरुध्द कोणतेही आदेश नाहीत.
7) विहीत मुदतीत सामनेवाला क्र.1, 2 व 4 यांनी आदेशाची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
8) आदेशाच्या सत्यप्रती उभयपक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.