Maharashtra

Gadchiroli

CC/10/7

Shree Sukhdev Goma Bhoyar, Age 41 years - Complainant(s)

Versus

Manager, Rising Sons Seeds Company Pvt.Ltd., Civil Lines,Hinganghat - Opp.Party(s)

28 Jul 2010

ORDER

 
Complaint Case No. CC/10/7
 
1. Shree Sukhdev Goma Bhoyar, Age 41 years
At-Chalna,Post - Parsodi (rayat),Tal. Arjuni (Mor)
Gondia
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Manager, Rising Sons Seeds Company Pvt.Ltd., Civil Lines,Hinganghat
Civil Lines,Hinganghat (M.S.)
Wardha
Maharastra
2. M/s. Shetkari Krushi Kendra,Through Pro.Pra. Ganesh Jaykisan Fafat,
Laxmi Talkies Road,Desaiganj(Wadsa)
Gadchiroli
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE Shri. A. N. Kamble PRESIDENT
 HONORABLE Shri. R. L. Bombidwar Member
 HONORABLE Smt. M. J. Bhilkar Member
 
PRESENT:
 
ORDER

(मंचाचे निर्णयान्‍वये, श्री अनिल एन.कांबळे,अध्‍यक्ष (प्रभारी))

    (पारीत दिनांक : 28 जुलै 2010)

                                      

1.           अर्जदाराने, सदर तक्रार, गैरअर्जदाराचे विरुध्‍द दाखल केले असून, गैरअर्जदारांनी भेसळ युक्‍त बियाणे विकत देऊन फसवणूक केल्‍यामुळे, झालेल्‍या पिकाच्‍या नुकसानीची भरपाई मिळण्‍याकरीता दाखल केली आहे.  तक्रारीचा आशय थोडक्‍यात येणे प्रमाणे.

 

 

                        ... 2 ...                   (ग्रा.त.क्र.7/2010)

 

2.    अर्जदाराने दि.29.5.09 ला शेतकरी कृषी केंद्र देसाईगंज वडसा येथे आर.पी.11 चे बियाणे पावती क्र.958 दि.29.5.09 नुसार 12 किलो ग्रॅम प्रती बँग रु.480/- च्‍या प्रमाणे 4 बँग 1920/- रुपयात खरेदी केले. पावसाळा सुरु होताच गादी वाफे तयार करुन गैरअर्जदारांकडून विकत घेतलेल्‍या बियाणाची पेरणी करुन 21-22 दिवसांनी रोवणी केली. व रोपाना योग्‍य प्रकारची खताची माञा आणि औषध फवारणी केली.

 

3.    अर्जदाराचे शेतातील धान पिक खुप जोमाने वाढून आले, परंतु काही रोपटे लहान व काही आखुड, काळया धानाचा काटेरी लांबा उगवायला लागला.  दुस-या जातीचा खबरा धान व आर.पी. धानाच्‍या लोंबी दिसायला लागल्‍या. शेतात आर पी 11 धानाच्‍या लोंबी उंच धानाच्‍या लोंबा पेक्षा अतीशय कमी दिसायला लागल्‍या.  भेसळ बियाणाबाबत जिल्‍हा कृषी अधिकारी जिल्‍हा परिषद, गोंदिया व तत्‍सम अधिकारी यांना दि. 29.10.09 ला रजीस्‍टर पोष्‍टाने तक्रार करण्‍यात आले, तसेच, भेसळ बियाणासंबंधी बियाणे विक्रेता यांना तक्रार करुन प्रत्‍यक्ष पाहणी करण्‍यासंबंधी पञ पाठविले.  अर्जदारानी तक्रार केल्‍यानंतर, जिल्‍हा कृषी अधिकारी, जिल्‍हा परिषद गोंदिया यांनी दि.10.11.09 ला मौका चौकशीकरीता शेतावर राहण्‍यास सांगितले. त्‍यांनी काही अधिका-यांचे उपस्थितीत पंचासमक्ष आणि बियाणे कंपनीचे प्रतिनीधी जितेंद्र रहिले यांच्‍या उपस्थि‍तीत दि.10.11.09 ला पाहणी करुन मौका पंचनामा करण्‍यात आला.  त्‍यामध्‍ये, सरासरी 48 ते 52 टक्‍के बियाणे भेसळ असल्‍याबाबत संबंधितांना आढळून आल्‍या. त्‍याची प्रत कृषी संचालक (गु नी) कृषी आयुक्‍तालय पुणे आणि विभागीय सहसंचालक (कृषी), नागपूर यांना उचित कार्यवाही करीता पाठविण्‍यात आले.

 

4.    अर्जदारानी आपले म्‍हणणे समजावून सांगण्‍याकरीता दि.21.12.10 ला अॅड.पी.एन. बुध्‍दे, देसाईंगंज यांच्‍या हस्‍ते गैरअर्जदारांना नोटीस पाठविण्‍यात आला.  अर्जदाराने भुमापन क्र.64, आराजी 0.59 हे.आर., भु.क्र.171 आराजी 1.21 हे.आर. मधील चार एकर जागेची रोवणी केली. परंतु, बियाणे भेसळ निघाल्‍यामुळे चार एकराचे नुकसान रुपये 83,200/-, मानसिक व इतर खर्च रु.10,000/-, वकील फी रु.500/- प्रवास खर्च रु.3000/- असे एकुण रु.96,700/- ची नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

 

5.    अर्जदाराने तक्रारीसोबत नि.2 नुसार झेरॉक्‍स दस्‍ताऐवज दाखल केले.  तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांना नोटीस काढण्‍यात आले.  गैरअर्जदार हजर होऊन, गै.अ.क्र.1 ने नि.14 लेखी बयाण दाखल केला तसेच, गै.अ.क्र.2 ने नि.16 नुसार लेखी बयाणात गै.अ.क्र. 1 ने सादर केलेले लेखी बयाण मान्‍य करुन, त्‍याव्‍यतिरिक्‍त आपले लेखी उत्‍तर सादर केले. 

 

6.    गै.अ.क्र.1 ने तक्रार अमान्‍य करुन, अर्जदाराने कोणत्‍या तारखेला, कोणत्‍या महिन्‍यात बियाणाची पेरणी केली हे दिले नाही, तसेच कोणत्‍या प्रकारची, कोणत्‍या औषधाची किती माञा केंव्‍हा दिली हे कथन तक्रारी केले नाही.  हे म्‍हणणे मान्‍य केले की, आर. पी. 11 या जातीची उंची, इतर धानाच्‍या लांबी पेक्षा कमी असते. जिल्‍हा कृषी

                        ... 3 ...                   (ग्रा.त.क्र.7/2010)

 

अधिकारी, जिल्‍हा परिषद गोंदिया यांनी दि.10.11.09 ला मौका चौकशी करण्‍याविषयीचे पञ दिले, हे मान्‍य केले. परंतु, कंपनीचे प्रतिनीधी रहिले आणि सक्षम अधिकारी  व पंच यांच्‍या समक्ष पंचनामा करण्‍यात आला, ही बाब मनघडत, बेबुनियाद असल्‍याने अमान्‍य आहे. अर्जदाराने केलेली प्रार्थना बेबुनियाद, काल्‍पनिक असून 83,200/- रुपयाचे नुकसान झाले हे कथन खोटे व पुराव्‍या अभावी अमान्‍य करुन तक्रार खारीज करण्‍याची मागणी केली आहे.

 

7.    गै.अ.क्र.1 ने लेखी बयाणातील विशेष कथनात असे कथन केले आहे की, बियाणे कंपनीला मार्केट मध्‍ये विक्री करीता बियाणे पाठविण्‍यापूर्वी लॉट नुसार बियाणाची गुणवत्‍ता प्रयोग शाळेतून तपासून घेणे व त्‍याप्रमाणे बियानाचे टॅगवर उल्‍लेख करणे  कायद्यानुसार आवश्‍यक आहे.  गै.अ.क्र.1 ने आर.पी 11 या धानाच्‍या बियाणाची जे या एरियात दिले त्‍याचे लॉट नुसार महाराष्‍ट्र राज्‍य शासकीय बियाने प्रयोग शाळा, नागपूर येथून त्‍याची गुणवत्‍ता तपासून घेतली आहे.  त्‍यानुसार सदर बियाणाची प्रत योग्‍य होती असे दिसून येते.  सन 2009-10 या धान हंगामात अर्जुनी/मोर या तालुक्‍यातील 427 शेतक-यांनी या लॉटच्‍या बियाणांची लागवड केली होती.  अर्जदार व सोबतचे 10 अर्जदार यांचे व्‍यतिरिक्‍त कोणाचीही तक्रार गै.अ.कडे आली नाही.  यावरुन, गै.अ.क्र.1  कंपनीच्‍या बियाणांची क्‍वॉंलीटी योग्‍य होती. सदर बियाणे निकृष्‍ठ भेसळ होते हे कथन खोटे आहे.  अर्जदारांनी बियाणांची लागवड व जोपासना शास्ञीय पध्‍दतीने केली नाही. अर्जदारांच्‍याच निष्‍काळजीपणामुळे, शास्‍ञीय पध्‍दतीने मशागतीने पिक न घेणे, पिकांची योग्‍य काळजी न घेणे व निसर्ग कोप, यामुळे नुकसान झाल्‍याचे दिसते, त्‍यासाठी गै.अ.क्र.1 जबाबदार नाही. 

 

8.    अर्जदाराने, सदर वानाची लागवड केलेल्‍या शेतातुन, किती उत्‍पन्‍न झाले याचे कथन केले नाही.  किती उत्‍पन्‍न मिळाले हे सुध्‍दा दिले नाही, त्‍यामुळे अर्जदाराची नुकसान भरपाईची मागणी मनघडत व खोटी आहे. मौका पंचनामा अर्जदाराचे शेतात करण्‍यांत आलेला नाही व भेसळची दिलेली टक्‍केवारी बेबुनियाद, काल्‍पनिक असून अमान्‍य करुन अर्जदाराचा नुकसान भरपाईचा अर्ज बेकायदेशिर आवश्‍यक पुरावा नसल्‍यामुळे खारीज होण्‍यास पाञ आहे, तो खारीज करण्‍यात यावा.

 

9.    गै.अ.क्र.2 ने, नि.16 नुसार दाखल केलेल्‍या लेखी बयाणात, गै.अ.क्र.1 चे लेखी बयाण स्विकारुन अतिरिक्‍त म्‍हणणे सादर केले. त्‍यानुसार, अर्जदारांनी बियाणे खरेदी करतेवेळी शास्‍ञीय पध्‍दतीने धानाची लागवड करावी, योग्‍य काळजी घ्‍यावी असे सांगीतले, पण अर्जदाराने तसे केल्‍याचे दिसून येत नाही.  शेणखत योग्‍य क्‍वॉलीटीचे वापरण्‍यास सांगितले होते, त्‍या शेतात मागील हंगामात लांबोर धान, टोळ धान असलेल्‍या बांधीत बियाणे टाकू नये असे सांगितले, पण अर्जदारांनी तसे केले नाही.  गै.अ.क्र.2 चे दुकानात बियाणे पेरणीच्‍या सिजनमध्‍ये बरीच गर्दी असते, तह. अर्जुनी/मोर, जि. गोंदिया येथील शेतकरी आगगाडीने येतात व परत जातात. त्‍यांना परत जाण्‍याकरीता वेळ कमी पडत असल्‍याने बियाणे देण्‍याची घाई करतात, त्‍यामुळे

                        ... 4 ...                   (ग्रा.त.क्र.7/2010)

 

दुकानात कल्‍लोळ होतो, तर कधी-कधी पावती लिहतेवेळी कमी-जास्‍त लिहील्‍या जाते.  गै.अ.क्र.2 च्‍या दुकानातून पावती क्र.994 बॅच नं.वाय 09-30304-06 गै.अ.क्र.1 कंपनीचे होते असे पाहिजे होते. परंतु, काही आकडे चुकीने लिहिण्‍यात आले.  तक्रार अर्ज बेबुनियाद मनघडत, बेकायदेशिर असल्‍यामुळे खारीज होण्‍यास पाञ आहे, तक्रार अर्ज खारीज करण्‍यांत यावा.

10.   अर्जदाराने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍ताऐवज, गै.अ.क्र.1 ने लेखी बयाणासोबत नि.15 नुसार दाखल केलेले दस्‍तऐवज आणि नि.22 नुसार सादर केलेल्‍या दस्‍ताऐवज आणि उभय पक्षाचे वकीलांनी केलेल्‍या युक्‍तीवादावरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.  

 

            मुद्दे                              :  उत्‍तर

 

(1)  गैरअर्जदार यांनी भेसळ युक्‍त बियाणे देवून सेवा     :  विवेचनानुसार.

      देण्‍यांत न्‍युनता केली आहे काय ?

(2)  अर्जदार नुकसान भरपाई मिळण्‍यास पाञ आहे काय ? :  होय.

(3)  या तक्रारीचा अंतिम निकाल काय ?                            : अंतिम आदेशाप्रमाणे.

 

मुद्दा क्रमांक 1 व 2 :-

 

11.    अर्जदारानी गै.अ.क्र.2 कृषी सेवा केंद्र, देसाईगंज यांचेकडून आर.पी. 11 या वाणाची खरेदी केली, ही बाब गैरअर्जदारांनी लेखी बयाणात मान्‍य केले आहे. तसेच, गै.अ.यांनी अॅड. प्रकश गुप्‍ता यांचे मार्फत दिलेल्‍या नोटीसाचे उत्‍तरातील पॅरा 3 वरुन मान्‍य केले आहे. तो मजकुर येणेप्रमाणे, ‘तुम्‍ही नोटीसाचे उत्‍तर घेणार यांनी माझे पक्षकार क्र.2 च्‍या कृषी केंद्रामधून धान खरेदी केला, याबाबत वाद नाही.’ या कथनावरुन गै.अ.क्र.1 व्‍दारा उत्‍पादीत आर.पी.11 या वाणाची खरेदी अर्जदाराने दि.29.5.09 रोजी 1920/- रुपयामध्‍ये चार बँग खरेदी केल्‍या, याबाबत वाद नाही. अर्जदारांनी विकत घेतलेल्‍या आर.पी.11 च्‍या वाणाची पेरणी शेतात केल्‍यानंतर, सर्व धान उगवला (Germination ).  अर्जदाराने धानाची रोवणी करुन योग्‍यप्रकारे खताची व औषधाची माञा दिली, त्‍यामुळेच लोंब निघाले, त्‍यावेळी त्‍या रोपातून खबरा व इतर वानाच्‍या धानाच्‍या लोंब निसावली, त्‍यात आर.पी.11 या वानाची लोंबे कमी प्रमाणात असल्‍याचे आढळून आले.  गै.अ.च्‍या वकीलांनी युक्‍तीवादात असे सांगीतले की, गैरअर्जदाराच्‍या वाणात भेसळ दिसली तर त्‍याची पेरणीच करावयास पाहिजे नव्‍हती, याबाबत डिमांडस्‍ट्रेशन म्‍हणून धानाच्‍या शॅम्‍पल मंचा समंक्ष दाखविली. त्‍यामध्‍ये काळ्या रंगाचे धान दिसून आले. गै.अ.यांनी दाखविलेले धान हे स्‍वतः तयार केलेला अयशस्‍वी प्रयत्‍न असल्‍याचे, मंचाचे निदर्शनास आले. वास्‍तविक, सामान्‍यपणे गै.अ.क्र.1 ने उत्‍पादीत केलेल्‍या आर.पी.11 चे धान पूर्णपणे उगवले, परंतु त्‍या उगवलेल्‍या रोपात आर पी 11 व्‍यतीरीक्‍त दूस-या प्रकारचे धान, त्‍याच कलरमध्‍ये असल्‍यामुळे, अर्जदारांना पेरणी करतेवेळी तो

                        ... 5 ...                   (ग्रा.त.क्र.7/2010)

 

धान दूस-या धानाचा किवा खबरा किंवा देवधान आहे, हे पेरणीच्‍या वेळी निदर्शनास येत नाही, तर ते धान लोंबे फेकणीच्‍या वेळात निदर्शनास येत असतो, असे या न्‍यायमंचाचे मत आहे.  त्‍यामुळे गै.अ.चे म्‍हणणे की, भेसळ युक्‍त धान होते तर ते अर्जदाराने पेरणी करावयास पाहिजे नव्‍हती, हे म्हणणे असंयुक्‍तीक असल्‍याने ग्राह्य धरण्‍यास पाञ नाही.

 

12.   अर्जदारास धान निसावनीचे वेळी काही रोपे लांब तर काही रोपे आखूड असल्‍याचे आढळून आले तसेच वेगळे रोपे दिसून आले.  त्‍यामुळे, त्‍यानी दि.29.10.09 ला जिल्‍हा चौकशी समिती यांना तक्रार केली, त्‍याप्रमाणे जिल्‍हा विकास अधिकारी जिल्‍हा परषिद गोंदिया यांनी मौका चौकशी करुन दि.10.11.09 ला पंचनामा मौजा चालना/पोळखा येथे  कास्‍तकार, सक्षम अधिकारी व पंचासमक्ष करण्‍यात आले, त्‍यावेळी पंचनाम्‍यानुसार आर पी 11 या वाणात 48 ते 52 टक्‍के भेसळ असल्‍याचे पाहणीत आढळून आले. सदर पंचनाम्‍याची प्रत अर्जदाराने रेकॉर्डवर दाखल केली आहे, त्‍याचे अवलोकन केली असता, जिल्‍हा स्‍तरीय तक्रार निवारण समितीने प्रत्‍यक्ष भेट घेऊन शेतक-याचे शेतातील पक्‍व स्थितीत उभ्‍या असलेल्‍या धानाची पाहणी केली व त्‍यानुसार पंचनामा तयार केला. गै.अ.चे वकीलाने युक्‍तीवादात असे सांगीतले की, जिल्‍हा स्‍तरीय समितीने तयार केलेल्‍या पंचनाम्‍यावर सह्या नाहीत. त्‍याचप्रमाणे कोणत्‍या भूमापन क्रमांकाच्‍या शेतात किंवा कोणत्‍या अर्जदाराच्‍या शेतात तयार करण्‍यात आला, याचा उल्‍लेख नाही.  गै.अ.चे वकीलाचे हे म्‍हणणे संयुक्‍तीक नाही. एकंदरीत दाखल दस्‍ताऐवजावरुन गै.अ.क्र.1 च्‍या आर पी 11 धान हा मुळातच दोष युक्‍त असल्‍यामुळे, फक्‍त एकच कास्‍तकार नाही तर ब-याच कास्‍तकारांच्‍या तक्रारी जिल्‍हा समितीला प्राप्‍त झाल्‍यामुळे, ज्‍या-ज्‍या शेतक-याचे तक्रारी होत्‍या, त्‍या-त्‍या शेतात जावून पाहणी करुन, एकञित पंचनामा केलेला असल्‍यामुळेच, प्रत्‍येक शेतक-याचे नांव व गट नंबर नमूद केलेला नाही. परंतु, पाहणी केलेल्‍या समितीमध्‍ये, कृषी विभागाशी संबंधीत तज्ञ, समितीत असल्‍याचे मौका पंचनाम्‍यावरुन स्‍पष्‍ट होते. त्‍याचप्रमाणे मौका चौकशी वेळी सीड्स कंपनीचे प्रतिनीधी व गांवातील नागरीक मौका स्‍थळी हजर होते त्‍यांच्‍या सह्या आंगठे असून, तज्ञ समितीच्‍या अधिका-या सहया त्‍यावर नमूद आहे. त्‍यामुळे तज्ञ समितीने दिलेला अहवाल हा चुकीचा व बनावटी आहे असे म्‍हणता येणार नाही, तर पुराव्‍या कायद्याच्‍या कलम 45 नुसार समितीचा अहवाल हा तज्ञाचा अहवाल (Expert Opinion) म्‍हणून ठोस पुरावा (conclusive proof) म्‍हणून ग्राहय धरण्‍यास पाञ आहे.

 

13.   अर्जदाराने दाखल केलेल्‍या तक्रारीसोबत अजुन इतरही अर्जदारांनी यासोबत तक्रारी गै.अ.चे विरुध्‍द दाखल केलेल्‍या आहेत. त्‍यातील तक्रार क्र.12/10 मध्‍ये गोविंद काशिवार यांचे शेतात दि.4.11.09 रोजी कृषी उप संचालक, जिल्‍हा गुण नियंञण निरीक्षक जि.अ.कृ.अ.गोंदीया, निरिक्षन अधिकारी, तज्ञ अधिकारी, कृषी सहाय्यक, जिल्‍हा कृषी अधिकारी इत्‍यादी सक्षम अधिका-यांनी, शेतकरी, पंच रतीराम कापगते (शेती निष्‍ठ शेतकरी), संपत जंगळे, चिरंजीव लेंढे यांचे समक्ष मौका पाहणी करण्‍यात आली.  त्‍यावेळी गै.अ.क्र.1 प्रतिनीधी प्रदिप पाटील व जितेंद राहिले हजर होते व त्‍यांनी

 

                        ... 6 ...                   (ग्रा.त.क्र.7/2010)

 

पंचनाम्‍यावर सही केलेली आहे.  त्‍यावेळी त्‍यानांही गै.अ.क्र.1 ने उत्‍पादीत केलेल्‍या आर पी 11 या वाणात भेसळ असल्‍याचे आढळून आले, त्‍यामुळेच त्‍यांनी कुठलीही तक्रार किंवा आक्षेप न घेता, समितीने तयार केलेल्‍या पंचनाम्‍यावर सही केलेली आहे.  प्रस्‍तुत प्रकरणातही, गै.अ.क्र.1 च्‍या वतीने प्रदिप पाटील यांनी लेखी बयाण शपथेवर दाखल केला आहे. तसेच, वकालतनामा दाखल केलेला आहे. त्‍यावरील सही आणि दि.4.11.09 ला केलेल्‍या पंचनाम्‍यावरील सही समान आहे.  मंचाला वकीलपञावरील, लेखी बयाणावरील सह्याचे तुलनात्‍मक साम्‍य करण्‍याचा अधिकार आहे.  गै.अ.क्र. 1 चा प्रतिनीधी त्‍यावेळी हजर होता व त्‍यानांही धानात भेसळ असल्‍याचे आढळून आले. त्‍यामुळे, त्‍यांनी कोणतीही तक्रार न करता, वस्‍तुस्थिती मान्‍य करुनच त्‍यावर सही केलेली आहे.  सदर पंचनाम्‍यावरील सही आणि लेखी बयाणावरील सही ह्या साम्‍य असल्‍याचे, निर्णयाप्रत हे न्‍यायमंच आले आहे.  मंचाला तुलानात्‍मक साम्‍यता पाहण्‍याचा अधिकार आहे, असे मत मा.राष्‍ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, नवी दिल्‍ली, यांनी खलीत याकुब दामत .वि. अब्‍दुल हमीद बरमारे व इतर III(2008) सीपीजे- 60 (एन.सी.) या प्रकरणात दिले आहे. त्‍या प्रकरणात दिलेले मत, या प्रकरणाला लागु पडते.

 

14.   गै.अ.ने लेखी बयाणात असे कथन केले आहे की, बियाणाचा लॉट नुसार प्रयोग शाळेतून बियाणाचे टँगवर उल्‍लेख करुन प्रयोग शाळेत बियाणांची तपासणी करुन घेणे कायद्यानुसार आवश्‍यक आहे.  याबाबत, दस्‍ताऐवजाचे यादी नुसार ब 1 ते 3 वर गै.अ.क्र.1 ने टेस्‍टींग रिपोर्ट दाखल केलेला आहे.  त्‍याचे अवलोकन केले असता, गै.अ.क्र. 1 ने आर पी 11 या धानाची लॉट नं.Y-09-30301-02, Y-09-30301-03 आणि Y-09-30304-06 या तिन लॉट च्‍या टेस्‍टींग रिपोर्ट दाखल केल्‍या आहेत, त्‍याचे अवलोकन केले असता, शेरा (Remarks) मध्‍ये नंबर 3 ला असे नमूद आहे की, Salable but purity required because of more weed seed तसेच, नंबर 4 मध्‍ये Seed kind is not as per  असे नमूद आहे, यावरुन आर पी 11 या वाणाची दि.20.3.09 ला शासकीय बीज परिक्षण लेबॉटरी महाराष्‍ट्र शासन (Government Seed Testing Laboratory यांनी केले असता, ते दोषपूर्ण असल्‍याचे, तसेच, बियाणे म्‍हणून वापरण्‍यायोग्‍य नसल्‍याचे नमूद केले असून सुध्‍दा गै.अ.क्र. 1 यांनी आर पी 11 या वाणाची, गै.अ.क्र.2 च्‍या मार्फत भेसळ युक्‍त बियाणाची विक्री करुन, अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब करुन सेवा देण्‍यात ञृटी केली आहे, असे परिक्षण रिपोर्ट व दाखल दस्‍ताऐवजावरुन सिध्‍द होतो. मा. राष्‍ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग यांनी एका प्रकरणात दिलेले मत या प्रकरणाला लागु पडते, त्‍यातील महत्‍वाचा भाग खालील प्रमाणे. 

  

(  Consumer Protection Act, 1986 – Section 21(b)—Agriculture—Seeds – Defective – Expected yield not resulted – Crop defective proved by Horticulturist, who visited the field – Deficiency in service alleged – Seeds packed in 1993, sold in 1996 – Petitioner failed to give shelf life of seeds and reason for delayed marketing – This must have contributed in improper/defective yield – Complaint allowed by forum – Compensation for loss of crop with cost of seeds, along  with compensation for mental agony

 

                        ... 7 ...                   (ग्रा.त.क्र.7/2010)

 

awarded—Interest on compensation for loss of crop, awarded in appeal – No. interference required in revision.

 

National Seeds

-V/s.-

PV Krishna Reddy

I(2009) CPJ 99 (NC)

 

 

15.   अर्जदारांनी तक्रारीत दोन एकर शेताचे नुकसान झाले, त्‍यामुळे त्‍याची नुकसान भरपाई गैरअर्जदारांकडून वसूल करुन द्यावी अशी मागणी केली आहे.  गै.अ.चे वकीलांनी युक्‍तीवादात सांगीतले की, एका एकराला दोन बँग बियाणाची आवश्‍यकता असते, गैरअर्जदाराचे हे म्‍हणणे गृहीत धरले तरी एक एकराचे सर्वसामान्‍यपणे 15 क्विंटल धानाचे उत्‍पादन अपेक्षीत आहे. गै.अ.यांचे वकीलांनी नुकसान बाबत प्‍लीडींग तक्रारीत नाही, असे सांगीतले. त्‍यामुळे, तक्रार खारीज करण्‍यात यावी. परंतु, तक्रार अर्जदाराने दाखल केले आहे, त्‍यामुळे त्‍याला कायद्याचे परिपूर्ण ज्ञान आहे, असे म्‍हणता येणार नाही. अर्जदाराने अॅड. बुध्‍दे मार्फत पाठविलेल्‍या नोटीसामध्‍ये झालेल्‍या नुकसानीचे वर्णन केले आहे.  त्‍यानुसार आर पी धानामध्‍ये खबरा व इतर जातीचे धान असल्‍यामुळे त्‍याचा भाव निश्चितच कमी मिळाला. वास्‍तविक, निव्‍वळ आर पी 11 धान असता तर त्‍याला निश्चितच भाव जास्‍त मिळाला असता, भेसळ युक्‍त धान असल्‍यामुळे भाव कमी मिळून उत्‍पादन कमी होऊन अर्जदाराचे नुकसान झाले, तसेच, आर पी धानाच्‍या लोंब पकण्‍याचे पूर्वीच बाकी धानाचे लोंब परिपक्‍व झाल्‍यामुळे धानाचा झळवा होऊन उत्‍पन्‍नाचेही नुकसान झाल्‍याचे बाब उपलब्‍ध रेकॉर्डवरुन सिध्‍द होतो. एंकदरीत चार बँगच्‍या बियाणामुळे सरासरी 14000/- रुपयाचे नुकसान झाले असल्‍यामुळे, गै.अ.क्र.1 दोष युक्‍त बियाणे दिल्‍यामुळे उत्‍पन्‍नाच्‍या नुकसानीची रक्‍कम रुपये 14000/- देण्‍यास पाञ आहे. तसेच, अर्जदारांनी, गैरअर्जदारांना झालेल्‍या नुकसानी बाबत तसेच वकीलामार्फत नोटीस पाठवून उत्‍पन्‍नाचे नुकसानीमुळे मानसिक, शारिरीक ञास सहन करावा लागला असल्‍याने गै.अ.क्र.1 नुकसान भरपाई देण्‍यास पाञ आहे. गै.अ.क्र.1 ने उत्‍पादीत केलेल्‍या आर पी 11 या वाणाचे सिलबंद बँग विक्री करुन तो डिलर असल्‍यामुळे त्‍यांनी सेवेत न्‍युनता केली हे सिध्‍द होत नाही. त्‍यामुळे त्‍याचे विरुध्‍द तक्रार खारीज होण्‍यास पाञ आहे.  मा. राष्‍ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग यांनी साऊथ ईस्‍टर्न सीड कार्पोरेशन –वि.- आर शेखर ऊर्फ श्रीधर, I(2008) सीपीजे -158 (एन.सी.)  या प्रकरणात दिलेले मत, या प्रकरणाला लागु पडते. तसेच, मा. आध्रप्रदेश ग्राहक तक्रार निवारण आयोग, हैद्राबाद, यांनी एका प्रकरणात आपले मत दिले आहे, त्‍यानी दिलेले मत या प्रकरणाला तंतोतंत लागु पडते, त्‍यातील महत्‍वाचा भाग खालील प्रमाणे.

 

(  Consumer Protection Act, 1986 – Section 2(1)(g) – Agriculture – Seeds defective – Crop loss – No development of carrot tuber, remained root like in soil – Contention, proper procedure not followed by complainant, sown seeds in wrong month, not acceptable in absence of evidence in support –

 

                        ... 8 ...                   (ग्रा.त.क्र.7/2010)

 

Deficiency in service proved – O.P. liable to pay compensation for loss of crop inclusive of expenses incurred, with interest @ 9% -- Costs awarded.

 

K. -V/s.-

National Seeds Corporation Ltd.

IV (2004) CPJ 181

 

16.   गै.अ.चे वकीलानी युक्‍तीवादात असा मुद्दा उपस्थित केला की, आवश्‍यक पक्ष न केल्‍यामुळे तक्रार खारीज होण्‍यास पाञ आहे. गैरअर्जदाराचे वकीलाचे कथन सर्व तक्रारीच्‍या अनुषंगानेही ग्राह्य धरण्‍यास पाञ नाही.  अर्जदार हे लाभ धारक (Benificiary) असून आर पी 11 या वाणाचे बियाणे स्‍वतः घेतले असल्‍यामुळे व स्‍वतः लाभ धारक असल्‍यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या तरतुदी नुसार ग्राहक या संज्ञेत मोडत असल्‍यामुळे, त्‍यांना मुळ मालकाला पार्टी न केल्‍याच्‍या कारणावरुन तक्रार खारीज होण्‍यास पाञ नाही.  वास्‍तविक, 7/12 च्‍या उता-यावर वेगवेगळी नांवे असली तरी त्‍यातील एकाला तक्रार दाखल करण्‍याचा अधिकार आहे. तसेच, जरी 7/12 वर नांव नसला तरी वडीलांची शेती मुलगा किंवा इतर व्‍यक्‍ती करीत असल्‍यामुळे त्‍यांना तक्रार दाखल करण्‍याचा अधिकार आहे, असे या न्‍यायमंचाचे ठाम मत असल्‍यामुळे गै.अ.चा योग्‍य पक्ष न केल्‍याचा मुद्दा (Non  ग्राह्य धरण्‍यांस पाञ नाही.

 

17.   गै.अ.क्र. 1 यांनी दोष युक्‍त बियाणे देवून, अर्जदारास नुकसानीत पाडले या निर्णयाप्रत हे न्‍यायमंच आले असल्‍यामुळे अर्जदाराची तक्रार मंजुर करण्‍यास पाञ असल्‍याचे निर्णयाप्रत हे न्‍यायमंच आले असल्‍यामुळे, मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

 

मुद्दा क्रमांक 3 :-

 

      वरील मुद्दा क्रमांक 1 व 2 चे विवेचनावरुन तक्रार अंशतः मंजूर करुन, खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

 

                  // अंतिम आदेश //

 

(1)  अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर.

(2)  गैरअर्जदार क्र. 1 ने, अर्जदारास चार बँग आर पी 11 धानाच्‍या पिकाच्‍या

नुकसानीबाबत नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 14,000/- तक्रार दाखल दि.23/2/2010 पासून 9 % व्‍याजाने आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.

 

 

 

                        ... 9 ...                   (ग्रा.त.क्र.7/2010)

 

(3)   अर्जदारास झालेल्‍या मानसिक, शारिरीक ञासापोटी रुपये 2500/- व तक्रारीचा खर्चापोटी रुपये 1000/- आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.

(4)   गैरअर्जदार क्र. 2 विरुध्‍द तक्रार खारीज.

(5)  उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्‍यात यावी.   

 

गडचिरोली.

दिनांक :- 28/07/2010.

 
 
[HONORABLE Shri. A. N. Kamble]
PRESIDENT
 
[HONORABLE Shri. R. L. Bombidwar]
Member
 
[HONORABLE Smt. M. J. Bhilkar]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.