ग्राहक तक्रार क्र. : 52/2013
दाखल तारीख : 13/03/2013
निकाल तारीख : 28/04/2015
कालावधी: 02 वर्षे 01 महिने 17 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. सुमनबाई हरिदास सुर्यवंशी,
वय - 41 वर्षे, धंदा – घरकाम, रा. नारंगवाडी,
ता.उमरगा, जि.उस्मानाबाद.
2. पूजा हरिदास सुर्यंवशी,
वय-10 वर्षे, धंदा – शिक्षण, रा. सदर,
3. भागवत हरिदास सुर्यवंशी, वय – 8 वर्षे,
धंदा – शिक्षण , रा. सदर
अर्जदार क्र. 2 व 3 हे अज्ञान असून
त्यांची अ.पा.क. अर्जदार क्र. 1 ही आहे. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) व्यवस्थापक,
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
570, नायगांव क्रॉस रोड नेक्स्ट टु रॉयल,
इंडस्ट्रीयल इस्टेट, वडाळा (वेस्ट) मुंबई.
2) शाखाधिकारी,
कबाल इन्शूरन्स सर्हिसेस प्रा. लि.
शॉप नं. 02, दिशा अलंकार, कॅनाट गार्डन,
टाऊन सेंटर, सिडको, औरंगाबाद-413003.
3) महाराष्ट शासन तर्फे,
तालूका कृषी अधिकारी साहेब,
तालुका कृषि कार्यालय, उमरगा. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विदयुलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री. व्ही.एल. पाटील.
विरुध्द पक्षकार क्र. 1 तर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.डी.मोरे.
विरुध्द पक्षकार क्र. 2 व 3 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी, यांचे व्दारा.
अ) हरिदास या शेतक-याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर शेतकरी अपघात विमा देण्यास विरुध्द पक्षकार (विप) यांनी टाळाटाळ केल्यामुळे तक्रारकर्ते (तक) हरिदास यांचे वारस यांनी ही तक्रार दाखल केलेली आहे.
1. तक यांचे तक्रारी अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे.
तक क्र.1 हिचे पती व तक क्र. 2 व 3 यांचे वडील हरिदास सुर्यवंशी हे नारंगवाडी ता.उमरगा येथील शेतकरी होता. तेथे गट क्र.134/1 मध्ये 83 आर. जमीन त्याचे नावावर होती. विप क्र.1 कडे शासनामार्फत त्याचा शेतकरी अपघात विमा काढलेला होता. दि.03/05/2008 रोजी रात्री 8.15 वाजता हरिदास हा पुणे येथे मोटर सायकल क्र. एम.एच. 12 एस 884 वरून जुना पुणे मुंबई रोडने जात होता. ट्रक क्र.20 ए 1688 हा औंध कडून रक्षक चौकाकडे जात होता. त्याचे चालकाने ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवला त्यामुळे ट्रक दुभाजकावर घूसून हरिदास यांचे मोटरसायकलला धडकला. हरिदास गंभीररित्या जखमी झाल व मृत्यू पावला. अपघाताची नोंद सांगवी पो. स्टे. येथे क्र.14808 दि.04/05/2008 रोजी भा.दं.वि कलम 279, 338, 304 अ अन्वये झाली. हरिदास त्यावेळी 46 वयाचा होता.
2. तक यांनी ता.08/07/2008 रोजी विमा रक्कम मिळणेसाठी अर्ज विप क्र. 3 यांचेकडे दाखल केला. सोबत जरुर ती कागदपत्रे पाठवली. विप क्र. 3 कडून विप क्र. 2 कडे व विप क्र. 2 कडून विप क. 1 कडे प्रस्ताव जावून तक यांना विमा रक्कम मिळणे जरुर असता विप यांनी टाळाटाळ केलेली आहे. त्याला विप क्र. 1 ते 3 जबाबदार आहेत. त्यामुळे विमा रक्कम रु.1,00,000/- व त्यावर द.सा.द.शे. 12 दराने व्याज तसेच झालेल्या त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळावी म्हणून ही तक्रार दि.13/03/2013 रोजी दाखल करण्यात आलेली आहे.
3. तक यांनी तक्रारीसोबत सातबारा उतारा, आठ अ चा उतारा, सहा क चा उतारा, मृत्यू प्रमाणपत्र, तलाठयाचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, एफ आय आर. पंचनामा, शवचिकित्सा अहवाल, ट्रकचे आर.सी बुकाची प्रत, ट्रक चालकाचे ड्रायव्हींग लायसेंन्सची प्रत, इत्यादी कागदपत्रांच्या प्रती हजर केलेल्या आहेत.
ब) विप क्र. 1 ने आपले लेखी म्हणणे दि.12/08/2014 रोजी दाखल केलेले आहे. त्याप्रमाणे तक यांनी प्रथम तक्रार जिल्हा नियंत्रण समितीकडे दाखल करणे आवश्यक आहे. तक यांनी तक्रार मुदतीत दाखल केलेली नाही. अपघाताच्या वेळी मयत हरिदास मोटार सायकल चालवित होते त्याचेकडे मोटर सायकल चालविण्याचा योग्य तो परवाना नव्हता त्यामुळे विमा पॉलिसीतील शर्तीचा भंग झाल्यामुळे विप विमा रक्कम देण्यास जबाबदार नाही. मयत हरिदास हे शेतकरी होते हे मान्य नाही. ट्रक चालकाने मयत हरिदास यांना धडक दिली हे मान्य नाही. तक यांनी कागदपत्रांसह प्रस्ताव दाखल केला हे मान्य नाही. विप क्र. 1 कोणतीही भरपाई देण्यास जबाबदार नाही. त्यामुळे तक्रार रद्द होण्यास पात्र आहे.
क) 1. विप क्र. 2 व 3 नोटिस मिळूनही हजर झाले नाही त्यांचे विरुध्द तक्रार एकतर्फा चालण्याचा आदेश झालेला आहे.
2. असे दिसते की तक यांनी उशीरा माफीचा अर्ज क्र.9/11 दाखल केला होता. त्यात विप क्र.2 व 3 यांनी आपले म्हणणे दाखल केले होते. दि.07/09/2011 च्या बहूमताच्या आदेशाने तो अर्ज फेटाळण्यात आला. तक यांनी त्या विरुध्द राज्य आयोगाकडे अपील क्र. 840/11 दाखल केले. राज्य आयोगाने उशीर माफीचा अर्ज मंजूर केला. विप क्र.3 यांनी आपल्या म्हणण्यात असे म्हंटले की तो प्रस्ताव त्यावेळी तहसील कार्यालयामार्फत सादर केलेला आहे. विप क्र. 2 यांनी असे म्हंटले की त्यांचेकडे सदरचा प्रस्ताव दि.04/06/008 रोजी मिळाला. त्यामध्ये काही कागदपत्रांची कमतरता होती ती कागदपत्रे दयावी म्हणून दि.07/07/2008, 28/08/2008, 13/11/2008, 21/03/2009, रोजी पत्र पाठवून कागदपत्रांची मागणी केली. शेवटी दि.23/06/2010 चे पत्राने विमा कंपनीने सुध्दा कागदपत्रांची मागणी केली, ती न मिळाल्यामुळे दि.24/11/2010 चे पत्रांन्वये विमा कंपनीने प्रस्ताव बंद केला.
ड) तक ची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, विप यांचे म्हणणे, यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांच्या समोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहली आहेत.
मुद्दे उत्तरे
1) विप यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3) आदेश कोणता ? शेवटी दिल्याप्रमाणे.
इ) कारणमीमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 :
1) विप क्र. 1 ने हे अमान्य केले की मयत हरिदास हा शेतकरी होता. आठ अ च्या उता-याप्रमाणे हरिदास नारंगवाडी येथील गट क्र.134 चा मालक होता सदर जमीनीचा सातबारा उतारासुध्दा हजर करण्यात आलेला आहे. त्यामुळे हरिदास हा शेतकरी होता हे शाबीत होते.
2) घटनास्थळ पंचनामा दि.03/05/008 रोजी 21.45 वाजता करण्यात आला. एफ आय आर. पुणे सांगवी पोलीस स्टेशन येथे दि.04/05/2008 रोजी 00.45 वाजता नोंदविण्यात आला. पी.एस.आय. गावडे यांनी एफ. आय. आर. लिहिला कारण फोनव्दारे अपघाताची माहिती 20.40 वाजता मिळाली होती. एफ.आय.आर. प्रमाणे मोटर सायकल क्र. एम.एच. 14 ए.डी.23723 वरील रामचंद्र शंकर चेलाळीकर तसेच एम.एच. 12 एस 8804 वरील हरिदास वैजनाथ सुर्यवंशी दोघे राहणार पुणे यांना ट्रकने धडक दिली. चेळालीकर जखमी झाला तर हरीदार मयत झाला. शवचिकीत्सा अहवालाप्रमाणे हरिदासचा मृत्यू अपघातातील जखमांमुळे झाला. त्यामुळे ही बाब शाबीत झालेली आहे.
3) आता विप चे म्हणणे आहे की विप क्र. 1 ला विमा प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. तथापि उशीर माफीचे अर्जाकामी म्हणणे देतांना विप क्र. 2 व 3 यांनी प्रस्ताव मिळाल्याचे मान्य केले होते. उलट विप क्र. 1 ने प्रस्ताव अमान्य केल्याचे दि.24/11/2010 चे पत्र दिलेले होते जी कागदपत्रे पाहिजे होती त्यांची यादीसुध्दा पाठविली होती आता प्रस्ताव मिळाला नाही हा घेतलेला बचाव खोटा आहे.
4) विप यांनी तक कडे ज्या कागदपत्रांची मागणी केली त्यामध्ये तलाठी दाखला सातबारा उतारा आठ अ सहा क चे उतारे एफ.आय. आर. पंचनामा पी.एम. रिपोर्ट ड्रायव्हिंग लायसेंन्स व आर.सी. बूक यांची मागणी करण्यात आलेली होती. ती कागदपत्रे तक यांनी पाठविली असली पाहिजेत कारण त्याच्या प्रती या पत्रांच्या सोबत हजर करण्यात आलेल्या आहेत. तक यांनी ट्रक क्र.1688 चे आर.सी. बुकाची प्रत तसेच ट्रक डायव्हर महादेव बबन आडसूळ यांचे ड्रायव्हिंग लायसेंन्सची प्रत हजर केले आहे. विप चे पत्रात मयत हरिदास याचे मोटरसायकलचे आर. सी. बूक तसेच मयत हरिदास यांचे ड्रायव्हिंग लायसेंनस द्यावे असे स्पष्टपणे म्हंटलेले नाही तक हे ग्रामीण भागातील विधवा व अज्ञान मुले आहेत. त्यामुळे विप चे पत्राने त्यांची दिशाभूल होऊन ट्रकचे आर.सी. बूक व ट्रक ड्रायव्हरचे ड्रायव्हींग लायसेन्स पाठविल्याचे दिसते यासाठी विप यांचे संदीग्ध्दतापूर्ण पत्रच जबाबदार आहे. त्यामुळे तक यांना विमा रक्कम नाकारुन विप यांनी सेवेत त्रुटी केली असे आमचे मत आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्र. 1 व 2 चें उत्तर होकारार्थी देतो व पुढीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
तक यांची तक्रार पुढीलप्रमाणे मंजूर करण्यात येते.
1) विप क्र. 1 यांनी तक यांना विमा रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक लाख फक्त) तिघांमध्ये समान हिश्यांमध्ये मिळण्यासाठी दयावी.
2) विप क्र. 1 यांनी वरील रकमेवर अर्ज दाखल तारखेपासून म्हणजेच दि.04/05/2011 पासून द.सा.द.शे.9 दराने व्याज दयावे.
3) तक क्र.2 व 3 यांची रक्कम ते सज्ञान होईपर्यंत राष्ट्रीयकृत बँकेमध्ये मुदत ठेव म्हणून ठेवण्यात यावी.
4) विप क्र. 1 यांनी या तक्रारीचा खर्च म्हणून तक यांना रु.3000/-(रुपये तीन हजार फक्त) दयावे.
5) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस
दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा.
6) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.