जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीड यांचे समोर.
तक्रार क्रमांक – 110/2012 तक्रार दाखल तारीख – 14/05/2012
तक्रार निकाल तारीख– 18/04/2013
रुक्मीणी गोविंद राऊत
वय 28 वर्षे, धंदा शेती व घरकाम,
रा. सोनवळा ता.अंबाजोगाई जि.बीड. ..अर्जदार
विरुध्द
1) व्यवस्थापक,
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी
19,रिलायन्स सेंटर, वालचंद हिराचंद मार्ग,
बेलर्ड इस्टेट, मुंबई 400 038
2) कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस प्रा.लि.
राज अपार्टमेंट प्लॉट नं.29,जी सेंटर,
रिलायन्स पंपाच्या पाठीमागे,
चिस्तीया पोलिस चौकीजवळ, एम.जी. रोड,
सिडको टाऊन सेंटर, औरंगाबाद ...गैरअर्जदार
3) तालुका कृषी अधिकारी,
सोमवंशी पेट्रोल पंपाजवळ,
ता.अंबाजोगाई जि.बीड.
-----------------------------------------------------------------------------------
समक्ष - श्रीमती निलीमा संत, अध्यक्ष
श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य.
-----------------------------------------------------------------------------------
तक्रारदारातर्फे - अँड.आर.आर.जाधव
गैरअर्जदार क्र.1 तर्फे – अँड.ए.पी.कुलकर्णी
गैरअर्जदार क्र.2 व 3 तर्फे - स्वतः
------------------------------------------------------------------------------------
निकालपत्र
(घोषित द्वारा ः-श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार या सोनवळा ता.अंबाजोगाई जि.बीड येथील रहिवाशी आहेत. त्यांचे पती गोविंद राऊत यांचे दि.19.03.2009 रोजी रात्री 11 च्या सुमारास केज-बीड रस्त्यावर उमरी फाटा येथे अपघाती निधन झाले. ते मोटार सायकल क्र.एम.एच.-14-एच-1258 वरुन येत होते. तेव्हा अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली व ते जागीच मरण पावले. सदर घटनेची फिर्याद पोलिस स्टेशनला दिली. मयताचे शव विच्छेदन झाले. मयत हे शेतकरी होते. त्यामुळे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्कम रु.1,00,000/- मात्र मिळण्यासाठी तक्रारदारांने तालुका कृषी अधिकारी यांचेकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज दाखल केला. परंतु त्यांचे काहीही उत्तर तक्रारदाराला मिळाले नाही. तक्रारदाराने दि.19.01.2012 रोजी गैरअर्जदारांना कायदेशीर नोटीस देखील पाठवली. परंतु त्यांचे उत्तर गैरअर्जदारांला मिळालेले नाही. म्हणून तक्रारदाराची तक्रार आहे. तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत 7/12 तसेच 8-अ चा उतारा, घटनास्थळ पंचनामा, फिर्याद, मृत्यू प्रमाणपत्र, शवविच्छेदन अहवाल, कायदेशीर नोटीशीची स्थळप्रत इत्यादी गोष्टी दाखल केल्या आहेत.
गैरअर्जदार क्र.1 ते 4 मंचासमोर हजर झाले. त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. गैरअर्जदार क्र.3 तालुका कृषी अधिकारी यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी सर्व कार्यवाही मुदतीत पुर्ण केली आहे व प्रस्ताव गैरअर्जदार क्र.2 कबाल इन्शुरन्स यांचेकडे पाठवला. सबब, त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी.
गैरअर्जदार क्र.3 कबाल इन्शुरन्स यांच्या लेखी म्हणण्याप्रमाणे त्यांना मयत गोविंद राऊत यांचा क्लेम दि.06.07.2009 ला मिळाला व त्यांनी तो दि.03.08.2009 ला गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे पाठवला परंतु त्यांचे काही उत्तर आलेले नाही.
गैरअर्जदार क्र.1 यांच्या लेखी जवाबाप्रमाणे त्यांना विमा दाव्याचे कागदपत्रे योग्य त्या एजन्सी मार्फत प्राप्त झालेले नाही. पॉलिसीचा कालावधी दि.15.08.2008 ते 14.08.2009 असा होता.क्र.9 च्या मुदती संदर्भातील तरतूदीनुसार पॉलिसीचा कालावधी संपल्यानंतर 90 दिवसांपर्यतच दावा स्विकारता येतो. तसेच मंचा समोरील तक्रार पण दोन वर्षा पेक्षा अधिक काळानंतर दाखल केलेली आहे. म्हणून तक्रार मुदतीत नाही म्हणून खारीज करावी. त्याचप्रमाणे दाखल कागदपत्रांवरुन गोविंद राऊत मृत्यू पावले असे दिसत नाही. कारण पोलिसांच्या कागदपत्रांवर त्यांचे नांव नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खारीज करण्यात यावी.
तक्रारदारांच्या विद्वान वकील श्रीमती रेखा जाधव व गैरअर्जदार क्र.1 चे विद्वान वकील श्री.ए.पी.कुलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारदारांच्या वकिलांनी सांगितले की, मृत्यू दि.19.03.2009 ला झाला व त्यांनी मुदतीत दावा तालुका कृषी अधिकारी यांचेकडे दाखल केला होता. कबाल इन्शुरन्स कंपनी कडे दावा दि.06.07.2009 ला पोहोचला. म्हणजेच त्यांनी मुदतीतच प्रस्ताव पाठवला आहे. ब-याच काळापर्यत गैरअर्जदारांच्या उत्तरांची त्यांनी वाट बघितली नंतर दि.19.01.2012 ला नोटीस पाठवली व मे 2012 मध्ये सदर तक्रार दाखल केली. मधल्या कालावधीत तक्रारदार विमा दाव्याच्या निकालाची वाट बघत होती. तशा अर्थाचे तक्रारदाराचे शपथपत्र व विलंब माफीचा अर्जही दाखल आहे. मयताचे नांव पोलिसांच्या कागदपत्रांवर गोविंद माळी असे आहे. परंतु मयत व तक्रारदार हे राऊत व माळी अशी दोनही आडनांवे लावत असत. त्यामुळे घटनेत मृत्यू पावलेली व्यक्ती व तक्रारदार हे एकच आहेत. यासाठी त्यांनी तक्रारदाराचे तशा अर्थाचे शपथपत्र दाखल केले आहे व कागदपत्रांतील नमुना 8-अ मध्ये देखील रुक्मीणी गोविंद माळी (राऊत) अशी नोंद आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार मंजूर करण्यात यावी.
गैरअर्जदारातर्फे वकील श्री. कुलकर्णी यांनी सांगितले की, सदरच्या तक्रारीची मुदत दि.18.03.2011 ला संपते. त्यामुळे तक्रार खारीज करावी. त्यांनी सीपीजे-2007 पान 144 सुदाम लाल वि. न्यू इंडिया इन्शूरन्स या मा. राष्ट्रीय आयोगाच्या दाखला दिला. त्यात अपघात दि..22.04.1994 ला झाला होता. कंपनीने दि.06.10.1994 ला दावा नाकारला व तक्रार मात्र 1999 ला दाखल झाली. त्यात मा.राष्ट्रीय आयोगाने मुदत काळ घटना झाल्या दिवशी पासुन सुरु होतो. दावा नाकारल्याचे पत्र नसेल तर दावा दाखल झाल्या दिवशी पासून मुदतकाल सुरु होतो असे म्हटले आहे. सबब, तक्रार नामंजूर करावी अशी त्यांनी विनंती केली.
वरील विवेचनावरुन खालील मुददे मंचाने विचारात घेतले.
मुददे उत्तर
1. तक्रारदाराची तक्रार मुदतीत आहे का ? होय.
2. तक्रारदाराने ती शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत
विमा रक्कमेस पात्र आहे हे सिध्द केलेंडर आहे का ? होय.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
मुददा क्र.1 ः-
सदरची विमा पॉलिसी दि.15.08.2008 ते 14.08.2009 या कालावधीसाठी होती. घटना दि.19.03.2009 ला घडली. गैरअर्जदार क्र.2 कबाल इन्शुरन्स यांच्या जवाबाप्रमाणे त्यांना कागदपत्रे दि.06.07.2009 ला मिळाली. त्यापुर्वीच ती तालुका कृषी अधिकारी यांचे कडे पोहोचली होती. कबाल ने ती दि.03.08.2009 ला गैरअर्जदार क्र.1 कडे पाठवली. अद्यापपर्यत तक्रारदाराला काहीही उत्तर आले नाही. दरम्यान दि.19.01.2012 रोजी तक्रारदाराने गैरअर्जदारांना नोटीसही पाठवली होती. मा.राष्ट्रीय आयोगाने लक्ष्मीबाई व इतर वि. आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड या रिव्हीजन अर्जात म्हटल्याप्रमाणे केवळ दोन वर्षात तक्रार दाखल केली नाही म्हणून मंचापूढे येण्याचा तक्रारदाराचा हक्क संपत नाही. त्यांच्या तक्रारीचे कारण इन्शुरन्स कंपनी दावा निकाली काढत नाही. तोपर्यत चालूच रहाते. (Continuous cause of action ) या विवेचनावरुन मंच सदरची तक्रार मुदतबाहय नाही असा निष्कर्ष काढत आहे.
मुददा क्र.2 ः-
मयताचा मृत्यू रस्ता अपघातात झाला ही गोष्ट पोलिसांच्या कागदपत्रांवरुन स्पष्ट दिसते. मृत्यू प्रमाणपत्र, शवविच्छेदन अहवाल या सर्वर कागदपत्रांवरुन अपघातात गोविंद मारुती माळी ही व्यक्ती मरण पावलेली दिसते. तक्रारदाराचे शपथपत्र व 8-अ चा उतारा यावरुन गोविंद मारुती माळी व गोविंद मारुती राऊत ही एकच व्यक्ती आहे असे दिसते. मयत हा शेतकरी होता हे ही यकागदपत्रांवरुन सिध्द झालेले आहे म्हणून मंच मुददा क्र.2 चे उत्तर होकारार्थी देत आहे.
सबब, मंच खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारदार यांना आदेश मिळाल्यापासून तीस
दिवसांचे आंत शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा
रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) अदा करावेत.
3. सदरची रक्कम विहीत मुदतीत अदा न केल्यास ती 9 टक्के व्याज दराने तक्रारदारांला द्यावी.
4. खर्चाबाबत आदेश नाही.
5. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड