(घोषित दि. 21.06.2014 व्दारा श्रीमती. माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदार हे शेअर मार्केटचा व्यवसाय करत असून, त्यांचा व्यवसाय पूर्णपणे इन्टरनेटवर चालतो. तक्रारदारांनी त्यांचे व्यवसाया करिता गैरअर्जदार यांचेकडून इन्टरनेट कनेक्शन नंबर 9370476038 जानेवारी 2011 मध्ये घेतले. परंतू गैरअर्जदार यांनी नेट कनेक्शनची स्पीड सांगितल्या प्रमाणे उपलब्ध केली नाही. या संदर्भात तक्रारदारांनी वेळोवेळी फोनवर तसेच नेटव्दारे गैरअर्जदार यांचेकडे रितसर तक्रार केली. गैरअर्जदार यांनी सेवेत सुधारणा न केल्यामुळे सेवा बंद करण्यात यावी. तसेच मागील काळातील बील देण्यात येवू नये असे कळवले. तक्रारदारांनी दिनांक 30.12.2011 रोजी वकीला मार्फत रजिस्टर्ड पोस्टाव्दारे नोटीस पाठवून नेट कनेक्शन करिता जमा केलेले रुपये 1,500/- तसेच व्यवसायाचे नूकसान रुपये 25,000/-, मानसिक त्रासापोटी रुपये 50,000/- अशी मागणी केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांच्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केलेले मजकूर पूर्णपणे नाकारला आहे.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, गैरअर्जदार 1 ते 3 यांचे लेखी म्हणणे यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विव्दान वकील श्री.एस.एम.धन्नावत यांचा युक्तीवाद ऐकला. गैरअर्जदार यांचे तर्फे युक्तीवाद नाही. त्यामुळे सदरील प्रकरण गुणवत्तेवर निकालासाठी ठेवण्याचा निर्णय न्यायमंचाने दिनांक 11.06.2014 रोजी घेतला.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार गैरअर्जदार यांचेकडून सदर नेट कनेक्शन जानेवारी 2011 मध्ये घेतले आहे. तक्रारदारांनी सदर नेट कनेक्शनच्या स्पीड संदर्भात दिनांक 24.05.2011 रोजी गैरअर्जदार यांच्या कस्टमर केअरला कळविल्याचे दिसून येते. सदर फिर्यादी मध्ये तक्रारदारांचा 5 जी.बी. कोटा पूर्ण झाल्यामुळे नेटची स्पीड कमी झाल्याचे गैरअर्जदार यांचे कडील श्री. प्रकाश झा यांनी सांगितल्याचे नमूद केले आहे. त्यानंतर दिनांक 27.05.2011 रोजी गैरअर्जदार यांनी पाठविलेल्या पत्रानुसार स्पीड संदर्भातील तक्रार त्यांचेकडे मिळाल्या नंतर त्यांचे इंजिनिअर 48 तासात व्हिजीट करता येण्याबाबत आश्वासन दिल्याचे दिसून येते.
गैरअर्जदार यांचे टिम मधील ऋषीकेश यांनी तक्रारदारांचे नेट कनेक्शनची तपासणी केल्यानंतर त्यांना ब्रॉडबॅंड स्पीड फक्त 0.32/0.36 एम.बी.पी.एस असल्याचे आढळले. तसेच त्यांनी तक्रारदारांना नेट कनेक्शनची स्पीड संध्याकाळी 7 नंतर तपासण्यास सांगितले. तक्रारदारांनी संध्याकाळी 7 नंतर नेट स्पीड चेक केली असता ब्रॉडबॅंड स्पीड 0.45 एम.बी.पी.एस असल्याचे दिसून आले. गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना सदर नेट कनेक्शनची स्पीड 3.1 एम.बी.पी.एस देण्याचे मान्य करुनही कमी स्पीडची सर्व्हिस दिली. असे तक्रारदारांनी दिनांक 31.05.2011 रोजी गैरअर्जदार यांना दिलेल्या ई-मेल वरुन कळविल्याचे दिसून येते. तक्रारदारांनी दिनांक 21.06.2011 रोजी घेतलेला नेट स्पीड टेस्ट रिझल्ट दाखल केला आहे. त्यानुसार Expected down load rate form our serves 14.84 KB/Sec. नमूद केले असून नेटचा स्पीड 10.97 Kb असल्याबाबत नमूद केले आहे व सदर रिझल्ट ई-मेल व्दारे गैरअर्जदार यांना 21 जून 2011 रोजी पाठवल्यानंतर “With Response to your mail, request you to kindly provide subscriber number for which you are taking speed issue & the location where the same is not safistacroty” असा Reply दिल्याचे दिसून येते. त्यांनतर 22 सप्टेबर 2011 रोजी तक्रारदारांनी गैरअर्जदार यांना पाठविलेल्या ई-मेल चे अवलोकन केले असता तक्रारदारांचे नेट कनेक्शन सस्पेंड केल्याचे दिसून येते.
तक्रारदारांनी दाखल केलेल्या वरील ई-मेलचे अवलोकन केले असता तक्रारदारांना गैरअर्जदार यांनी किती नेट स्पीड देण्याचे (agree) मान्य केले होते ? प्रत्यक्षात किती नेट स्पीडची सर्व्हिस त्यांना गैरअर्जदार यांचेकडून देण्यात आली ? या बाबत खूलासा होत नाही. तक्रारदारांनी या संदर्भात तज्ञांचा अहवाल अथवा शपथपत्रा व्दारे गैरअर्जदार यांनी कमी स्पीड ची सर्वीस दिल्या बाबत पुराव्यानिशी सिध्द केले नाही. अशा परिस्थितीत गैरअर्जदार यांची सेवेतील त्रूटी सिध्द होत नाही. असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब मंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
- खर्चाबाबत आदेश नाही.